esakal | खेळाचा आनंद कमी होईल (चंदू बोर्डे)

बोलून बातमी शोधा

chandu borde

गेल्या शतकातलं पहिले अर्धशतक पार पडल्यानंतर माझी कारकिर्द सुरू झाली. दोन दशकांच्या प्रथमश्रेणी, तर एका दशकाच्या कसोटी कारकिर्दीनंतर एकविसाव्या शतकातली दोन दशकं उलटत असतानासुद्धा क्रिकेटशी असलेला माझा टच कायम आहे.

खेळाचा आनंद कमी होईल (चंदू बोर्डे)
sakal_logo
By
चंदू बोर्डे

गेल्या शतकातलं पहिले अर्धशतक पार पडल्यानंतर माझी कारकिर्द सुरू झाली. दोन दशकांच्या प्रथमश्रेणी, तर एका दशकाच्या कसोटी कारकिर्दीनंतर एकविसाव्या शतकातली दोन दशकं उलटत असतानासुद्धा क्रिकेटशी असलेला माझा टच कायम आहे. या कालावधीत मी अनेक बदलांचा साक्षीदार बनलो, तरीही क्रिकेटचं पारंपरिक स्वरूप कायम राहिलं. आता कसोटी क्रिकेट पाचऐवजी चार दिवसांचं करण्याबाबत चर्चा आहे. परंपरेला छेद जाणार आहे. त्यावरून मतभेद होत आहेत. या प्रस्तावावर खेळाची आंतरराष्ट्रीय शिखर संघटना म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) लवकरच निर्णय घेईल.

आता तुम्ही मला विचाराल, की तुमचं मत काय, तुम्हाला कसोटी पाच दिवसांचीच राहावी असं वाटतं, की चार दिवसांची कल्पना तुमच्या पचनी पडेल, पसंतीस उतरेल? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मीच तुम्हाला प्रश्न करतो...तुम्हाला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या वन-डे क्रिकेटमधल्या किती इनिंग्ज माहीत आहेत, सांगा पाहू.

शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिननं काढलेली शतकं, वडिलांच्या निधनानंतर त्यानं केनियाविरुद्ध काढलेलं शतक किंवा विराटचं २०१५च्या विश्वकरंडक स्पर्धेतलं पाकिस्तानविरुद्धचं शतक अशी मोजकी उदाहरणं तुम्ही देऊ शकाल. हे सोडा, गेल्या वर्षी पार पडलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतली रोहित शर्माची सगळी शतकं आठवा, असं विचारलं तरी तुम्ही घडाघडा बोलू शकणार नाही. मात्र, हेच कसोटी क्रिकेटमधल्या या दोघांच्याच नव्हे, तर अगदी सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, महंमद अझरुद्दीन अशा असंख्य भारतीय फलंदाजांच्याच नव्हे, तर इतर देशांच्या शैलीदार फलंदाजांच्या फेव्हरीट नॉक्स तुमच्या तोंडपाठ असतील. होय की नाही?

वन-डे : आज खेळा उद्या विसरून जा
मला खात्री आहे, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळलं आहे; पण मी माझ्या तोंडून तुम्हाला ते इतक्यात सांगणार नाही. वन-डे क्रिकेटबद्दल मी एक विधान करतो आणि ते ऐकून तुम्ही मान डोलावल्याशिवाय राहणार नाही. वन-डे म्हणजे आज खेळायचं आणि उद्या विसरून जायचं! होय की नाही?
आता मी कसोटी चार दिवसांची झाली, तर काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझी मतं मांडतो. याचा अर्थ मी माझी मतं तुमच्यावर लादतो असं नाही बरंका.

डावपेच तरी राहणार का?
पाच दिवसांच्या कसोटीत सत्रागणिक परिस्थिती बदलते, त्यानुसार खेळ बदलतो. खेळपट्टीचं स्वरूपही बदलत जातं. त्याप्रमाणं डावेपच बदलतात. पाचव्या दिवशी चौथा डाव खेळणाऱ्या संघाची कसोटी लागलेली असते. कसोटी अनिर्णित जरी राखायची म्हटलं, तरी फलंदाजांना कडवा संघर्ष करावा लागतो. त्याला अशा खेळपट्टीवर टिकायचं असतं, जिथं चेंडू हातभर वळायला सुरुवात झालेली असते. फिरकी गोलंदाजांना फायदा होत असतो. खेळपट्टीवर काही स्पॉट्सही तयार झालेले असतात. त्यामुळे वेगवान गोलंदाजही भरात असतात. अर्थात गोलंदाजांवरही जबाबदारी असते, की चेंडूचा टप्पा योग्य ठिकाणी पडला पाहिजे. एकूणच चुरस वाढलेली असते. प्रतिस्पर्धी संघ डावपेचांद्वारे पारडे फिरवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा वेळी उत्कंठा शिगेला पोचलेली असते. हाच कसोटी क्रिकेटचा चार्म आहे. चार दिवसांमुळं तो राहणार का, डावपेचांना वावच मिळणार नसेल किंवा डावपेच निर्णायक ठरणार नसतील, तर हा चार्म नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

निकाल लागण्याचा मुद्दा
कसोटी क्रिकेटबाबत पूर्वी एक ओरड असायची, की निकालच लागत नाहीत. कसोटी सामने रटाळ होतात. खेळ कंटाळवाणा होतो. त्यात काही प्रमाणात तथ्य होतं. कारण बहुतांश खेळपट्ट्या फलंदाजांनीच वर्चस्व गाजवलं पाहिजे, अशा पद्धतीनं बनविल्या जायच्या; पण हे चित्र केव्हाच बदललं आहे. कसोटी सामने निकाली ठरण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं पूर्वीच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमधून चाहत्यांना मिळणारा आनंदसुद्धा वाढला आहे.

प्रेक्षकांचा मुद्दा
कसोटी सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती रोडावल्याची चर्चा होते; पण अॅशेस अर्थात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध इंग्लंड अशा मालिकांच्या वेळी प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभतो. नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीला मेलबर्नमध्ये विक्रमी प्रेक्षक लाभले.
आता मी प्रेक्षकांच्या मुद्द्याची आणखी विस्तारानं चर्चा करतो. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यातला खेळाडू हा एका अर्थानं कलाकारच असतो. त्याला लोकांच्या टाळ्या हव्या असतात. प्रोत्साहनच नव्हे, तर प्रेमसुद्धा हवं असते. मला आजदेखील चाहते सन १९६४ मध्ये दसऱ्याच्या दिवशी बॉबी सिम्पसन यांच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या खेळीबद्दल विचारतात. तेव्हा ब्रेबॉर्न स्टेडियममधील कसोटीत माझ्या धावा होत्या नाबाद ३०. म्हणजे मी काही शतक तर सोडाच, अगदी अर्धशतकही ठोकलं नव्हतं; पण त्या नाबाद खेळीनं आपण जिंकलो होतो. तेव्हा लतादीदींनी त्यांच्या पेडर रोडवरच्या बंगल्यावर साऱ्या संघासाठी मेजवानी ठेवली होती. मी जाऊ शकलो नाही, कारण आमच्या कूपर कंपनीचे साहेब भारत जोशी यांनी मला आणि पत्नीला (विजयमाला) त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. नंतर मी सीसीआयवर (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) परत आलो, तेव्हा माझ्यासाठी लतादीदींच्या घरून बरेच फोन येऊन गेल्याचा निरोप मिळाला. गानसम्राज्ञीच्या पाहुणचाराला मुकल्याची हुरहूर मला आजही वाटते. चाहत्यांच्या प्रेमाच्या बाबतीत मी भाग्यवानच. शोमन राज कपूर, बिग बी अमिताभ बच्चन यांनी मला शतकानंतर उचलून घेत भावपूर्ण दाद दिली आहे. अमिताभ गेल्याच वर्षी सुनील गावसकरनं वाढदिवसानिमित्त दिलेल्या स्नेहभोजनाच्यावेळी भेटले होते. तेव्हा त्यांनी ‘‘मीच तो ज्यानं तुम्हाला दिल्लीत शतकानंतर उचलून घेतलं होतं,’’ असं अभिमानानं सांगितलं होतं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहललाल नेहरू यांनीही माझी पाठ थोपटली आहे.
असो, आता मी भूतकाळात जाऊन थोडं रमण्यामागचं कारण सांगतो. माझ्यासारखीच दाद अनेक दादा फलंदाजांना मिळाली आहे. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या ४०० धावांच्या नाबाद खेळीची आजही चर्चा होते. एका चँपियनला अशीच दाद लाखमोलाची असते.

म्हणूनच खेळाडूंचा विरोध
माझ्या काळातल्या सोडा; पण आजघडीचा सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली याच्यासह बहुतांश प्रमुख क्रिकेटपटूंचा चार दिवसांच्या कसोटीला विरोध आहे. याचं कारण खरा कस लागतो तो कसोटी क्रिकेटमध्येच, याची त्यांना कल्पना आहे. त्यांना खरंखुरं आव्हान हवे आहे. त्यांना अशा परमोच्च कसोटीला सामोरं जायचं आहे. त्यातली कामगिरी अशा दादा खेळाडूंना चिरकाल आनंद देणारी ठरते.
सांगायचा मुख्य मुद्दा असा, की कसोटीतली कामगिरी, कसोटीतलं यश हे खेळाडूंप्रमाणंच चाहत्यांसाठी चिरंतन ठेवा असतो. कसोटी क्रिकेट हे खेळणाऱ्यालाच नव्हे, तर पाहणाऱ्यालाही दीर्घकाळ टिकेल, असा आनंद देतं. मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मायदेशात-परदेशात मिळविलेल्या सोनेरी यशाच्या सुखद स्मृती चिरकाल टिकतात.

क्लासिक शॉट की टोलेबाजी?
खरं तर वन-डे काय किंवा टी-२० काय, सतत चौकार-षटकारांची बरसात होत असते. प्रत्येक शॉटवर टाळ्या पडतात; पण पुढच्या चेंडूपर्यंत त्या हवेत विरून जातात. सामन्यानंतर तुम्हीसुद्धा विसरून जाता, की किती वेळा कशासाठी, कुणासाठी किती टाळ्या वाजविल्या होत्या... मात्र हेच कसोटी क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर कट, फ्लिक अशा शॉट्सवर तुम्ही फिदा होता. समालोचकसुद्धा ‘व्हॉट ए ब्युटी’ असे उद्‍गार काढतात. अशा शॉट्सचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. ते खेळणाऱ्या फलंदाजांची स्टाईल तुम्हाला तृप्त करते. हेच इन्स्टंट क्रिकेटमध्ये तो फलंदाज हाण-हाण-हाण हेच करत असतो. सिक्सर बसला, तरी त्याला पुढच्या चेंडूवर हाणायचं असतं आणि हुकला तर मग नंतर हाणण्यावाचून गत्यंतर नसतं.

व्यावसायिकतेचा अतिरेक
असं असूनही मग खेळात असे बदल का होत राहतात? तर यासाठी मी संयोजकांकडं बोट दाखवीन. म्हणजे मी त्यांना दोष देतोय, असं नाही. अलीकडं त्यांचा मार्केटिंग करून पैसा कमावण्याकडं वाढता कल आहे. ते व्यावसायिक बनले आहेत आणि त्यांना फायदा करून घ्यायचा आहे.
असं म्हणतात, की समाजाचं प्रतिबिंब काही गोष्टींत उमटत असतं. तुमची-आमची जीवनशैलीसुद्धा अशीच क्रिकेटसारखी इन्स्टंट बनली आहे. आपल्याला आता सारं काही इन्स्टंट हवं असतं. मला किती लवकर किती जास्त पैसा मिळेल, हेच ज्याच्या-त्याच्या ध्यानीमनी असतं. पैसा आला, सुविधा आल्या; पण आनंद आला का? आलाच, तर तो बराच काळ टिकला का?
मी म्हणतो म्हणून नव्हे, तर तुम्हाला पटलं तर हे प्रश्न स्वतःला विचारा. त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. खरं तर जीवन हे एखाद्या कसोटी सामन्यासारखं असते. त्यात चढ-उतार येत राहतात. त्यानुसार तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. बदलांना सामोरं जावं लागतं. सतत नवनवीन आव्हानं पेलावी लागतात. जीवन म्हणजे संघर्ष हे ब्रीद लक्षात ठेवावं लागतं. संघर्षाचं, मेहनतीचं, संयमाचं फळ गोड असते; पण त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आज अशी टेस्ट-कसोटी-सत्वपरीक्षा कुणाला नको आहे. समाजाचं हेच प्रतिबिंब क्रिकेटमध्येही उमटत आहे, बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला?

रेडिओला हार घालायचे, आता टीव्हीला?
मला आठवतं, रेडिओ कॉमेंटरीचा जमाना होता, तेव्हा चाहते रेडिओला हार घालायचे. दक्षिणेत चित्रपट कलाकारांना असाच प्रतिसाद मिळतो. चार दिवसांच्या कसोटीतली कामगिरी आणि पर्यायानं निकालांची वन-डे क्रिकेटप्रमाणं गत झाली, तर मग असं कुणी करेल का? टीव्हीला कुणी हार घालेल का?

(लेखक भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, व्यवस्थापक; राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष आहेत.)