महानायकाचा रास्त गौरव (दीपक सावंत)

dipak sawant
dipak sawant

महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके सन्मान जाहीर झाला आहे. अभिनयाचा मानदंड असलेले अमिताभ यांच्याबरोबर त्या पुरस्काराचाही हा गौरव. त्या निमित्तानं गेली पन्नास वर्षं अमिताभ यांचे रंगभूषाकार म्हणून काम करणारे दीपक सावंत यांनी व्यक्त केलेल्या भावना.

अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके सन्मान’ मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हा सन्मान त्यांना मिळाला हे ऐकून आम्हालाही प्रचंड आनंद झाला. हा सन्मान अमिताभजींना या आधीच मिळायला हवा होता, असं मला वाटतं. उशिरा का होईना तो त्यांना मिळाला आहे त्याबद्दल आनंदच आहे. मला असं वाटतं, अमिताभजी या पुरस्कारासाठी अगदी पात्र आहेत. गेली पन्नास वर्षं मी त्यांना जवळून पाहतोय, त्यांच्यासोबत काम करतोय. त्यांचा समाजकार्यात, देशकार्यात लागलेल्या हातभाराचा विचार करता असा कलाकार होणं नाहीच. अमिताभजी यांना भारतरत्न सन्मान मिळावा, माझी अशी मनापासून इच्छा आहे आणि यासाठी माझ्यासकट त्यांचे सगळेच चाहते या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

जगाच्या पाठीवर अगदी कुठंही गेलं, तरी अमिताभजींना कोणी ओळखत नाही असं होणं अशक्‍यच. त्यांची ख्याती भारतभर तर आहेच, त्याचप्रमाणं परदेशातही त्यांची ख्याती बरीच पसरली आहे. माझी आणि अमिताभजी यांची पहिली भेट एका चित्रपटादरम्यान झाली. ‘रास्ते का पत्थर’ या चित्रपटादरम्यान आम्ही पहिल्यांदाच भेटलो. याच ‘रस्त्या’वरून माझा त्यांच्यासोबतचा एकत्र प्रवास सुरू झाला. यांनतर मी त्यांच्या सर्वच चित्रपटांमध्ये त्यांच्याबरोबर रंगभूषाकार म्हणून काम केलं. खरं सांगायचं, तर त्यांचे सर्वच चित्रपट मला आवडतात. ‘शोले’, ‘सूर्यवंशम’, ‘दिवार’, ‘ब्लॅक’, ‘अमर अकबर अँथोनी’ हे सर्वच चित्रपट मला आवडतात. त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भूमिका ते खूप आत्मीयतेनं साकारतात, अगदी जीव ओतून काम करतात. त्यामुळंच कायम त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांनी केलेला अभिनय सुपरहिट ठरतो. गेली पन्नास वर्षं मी अमिताभजींबरोबर काम करतोय- खरोखर मी नशीबवान आहे. देवानं मला या गृहस्थाकडं पाठवून मला धन्य केलं, त्याबद्दल देवाचाही मी भरपूर आभारी आहे. अमिताभजी माझ्या कामाचं नेहमी कौतुक करतात. कधी कधी चित्रीकरणादरम्यान काय होतं, की अमिताभजी मला बोलावताना जोरात ओरडून बोलावतात. त्यावेळी ते आता मला ओरडणार की काय, इतर स्टाफला भीती वाटते. पण गंमत म्हणजे अजिबात असं काही नसतं. ते मला हाक मारताना, बोलावताना अगदी ओरडून ‘अरे इधर आओ’ असं म्हणतात. अमिताभजी वेळेच्या बाबतीत अतिशय नेमके आहेत. सेटवरही ते खूप मज्जा मस्ती करतात, अगदी स्टाफला हसवण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक अडचणीत मदत करण्यासाठी ते त्यांच्या सोबत असतात.

मला आठवतंय, एकदा चित्रीकरणासाठी रामनगरहून बंगळूरला आम्ही निघालो. एक तासाचा तो प्रवास होता. एकाच गाडीतून आम्ही प्रवासाला निघालो. त्यावेळी जया बच्चनही सोबत होत्या. गाडीत जयाजी आधीच बसल्या होत्या. अमिताभजी बसतच होते आणि मी पुढं बसायला म्हणून दार उघडलं आणि आत गेलो. मी दार लावताच, अमिताभजी जोरात ओरडले : ‘‘हात गया, हात गया!’’ क्षणार्धात काही सुचलंच नाही. तात्काळ मी आणि जयाजी गाडीबाहेर आलो आणि त्यांचा हात माझ्याच दरवाज्यात अडकल्यानं मला चांगलाच घाम फुटला. ‘बर्फ लाना, बर्फ लाना’ असं ओरडायलाही माझ्या तोंडातून अवाक्षर फुटत नव्हतं. मी आणि जयाजी चांगलेच घाबरलो. याचा अंदाज घेत अमिताभजी जोरात हसायला लागले आणि म्हणाले : ‘‘डरो मत.. मुझे कुछ नही हुवा, मजाक कर रहा था.’’ हे ऐकताच माझा जीव भांड्यात पडला. अशी अधूनमधून मस्ती अमिताभजी करायचे. आज गेली पन्नास वर्षं मी अमिताभजी यांच्याबरोबर काम करतोय याहून मोठं भाग्य काही नाही.
(शब्दांकन : स्नेहा गावकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com