दरडी कोसळणं टाळता येईल; पण... (डॉ. बी. एम. करमरकर)

dr b m karmarkar
dr b m karmarkar

दरडी कोसळणं ही एक किरकोळ भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास करून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना टाळता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा!

वर्तमानपत्रांत ठराविक बातम्या ठराविक महिन्यात येतात. मार्च महिना उजाडला की ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याच्या बातम्या येऊ लागतात. जून महिन्यात मोसमी पावसाच्या आगमनासंबंधी अंदाज वर्तवणाऱ्या बातम्या येऊ लागतात. त्याचप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातली सह्याद्रीची मुख्य रांग आणि तिच्या उपरांगा यांच्या उतारावर घेतलेल्या घाटरस्त्यावर दरडी कोसळल्याच्या बातम्या येतात. विशेषतः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दर पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे त्या मार्गावरची वाहतूक विस्कळित होणं ही तर आता नित्याचीच बाब झालेली आहे. दरडी कोसळल्यामुळे काही वेळा जीवितहानीही होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सन २००२ पासून वाहतूक सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत, गेल्या १७ वर्षांत दरडी कोसळण्याच्या सुमारे १६० घटना घडल्या. त्यातल्या ५ घटना गंभीर स्वरूपाच्या होत्या. दरडी कोसळू नयेत म्हणून गेल्या १७ वर्षांत केल्या गेलेल्या उपाययोजनांवर काही कोटी रुपये तरी खर्च झाले असावेत; परंतु आजपर्यंत हाती मात्र काहीच लागलेलं नाही. दरडी कोसळण्याच्या घटना घडतच आहेत. आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करूनही अद्याप दरडी कोसळण्याचं थांबवण्याच्या प्रयत्नांना यश का येत नाही, याचा आता गंभीरपणे विचार केला पाहिजे.

गेली ४५ वर्षं मी महाराष्ट्रातल्या बेसॉल्ट खडकांचा व सह्याद्रीच्या जडणघडणीचा भूशास्त्रीय (Geological) अभ्यास करत आहे. मी व माझ्या सहकाऱ्यांनी सह्याद्रीच्या पश्‍चिम उतारावरच्या ११ घाटांचा (त्यापैकी दोन घाट लोहमार्गासाठी आहेत), तसंच सह्याद्रीच्या पठारावरच्या महाबळेश्‍वरपर्यंतच्या १२ घाटांचा, मराठवाड्यातल्या ९ घाटांचा, तसंच धुळ्याजवळच्या तोरणमाळ घाटाचा आणि अमरावतीजवळच्या चिखलदरा घाटाचा अशा एकूण ३४ घाटांचा, त्यांच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत प्रत्यक्ष पायी हिंडून भूशास्त्रीय अभ्यास केला आहे.

या अभ्यासात, घाटरस्त्याच्या कडेला असलेल्या खडकात उभा छाट घेतल्यानंतर त्या छाटात लख्ख उघड्या पडलेल्या खडकांचं अनेक वेळा प्रत्यक्ष पायी हिंडून निरीक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक थरातील बेसॉल्ट खडकांचा प्रकार, थरांचा कल (Attitude) तसेच प्रत्येक थरातल्या खडकांचे क्षेत्रीय गुणधर्म (Field characters) यांचा तपशीलवार (Detailed) अभ्यास केला आहे आणि त्यावर आधारित शोधनिबंध भूशास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत, तसंच काही विद्यार्थ्यांचे पीएच.डीचे प्रबंधही या अभ्यासावर आधारित आहेत.

* महाराष्ट्राची भूशास्त्रीय रचना :
या ३४ घाटमार्गांवर उघड्या पडलेल्या खडकांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की समुद्रसपाटीच्या वर ४० मीटर उंचीपासून (वरंधा घाटाचा पायथा) ते १२५० मीटर उंचीपर्यंत (सिंहगड घाटाचा माथा) अशा एकूण १२१० मीटर उंचीच्या उभ्या भूभागावर (Vertical Stretch), तसंच महाराष्ट्राच्या उघड्या पडलेल्या ८५ टक्के पृष्ठभागावर मुख्यत्वे ‘कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट’ (Compact Basalt) आणि ‘अमिग्डलॉयडल बेसाल्ट’ (Amygdaloidal Basalt) असे दोन प्रकारचे बेसॉल्टचे थर आहेत.
रस्त्यासाठी या दोन्ही थरांत घेतलेल्या उभ्या छाटांत उघड्या पडलेल्या खडकांची, तसंच डोंगरउतारावर उघड्या पडलेल्या खडकांची स्थिरता थरांच्या क्षेत्रीय गुणधर्मावर अवलंबून असते, असंही या अभ्यासात आढळून आलं.
अभ्यास केलेल्या घाटांतल्या कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टचे आणि ॲमिग्डलॉयडल बेसॉल्टचे थर लहान-मोठ्या जाडीचे, क्षितिजसमांतर (Horizontal) एकमेकांवर रचल्यासारखे आहेत. कोणत्याही भूभागाची स्थिरता ही त्या भागातल्या खडकांच्या थरांचा कल (Attitude) कसा आहे यावर, म्हणजे ते थर क्षितिजसमांतर आहेत की कललेल्या अवस्थेत आहेत, यावर अवलंबून असते.
महाराष्ट्रात सर्वदूर सारख्याच प्रकारचे बेसॉल्ट खडकांचे थर असले तरी मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना फक्त सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या पश्‍चिम उतारावर असलेल्या घाटातच होतात. त्यामानानं महाराष्ट्राच्या पूर्व भागात असलेल्या घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना क्वचितच घडतात. सह्याद्रीच्या पश्‍चिमेकडच्या कोकणपट्टीला लागून असलेल्या घाटात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते, त्यामानानं सह्याद्रीच्या पूर्वेकडं असलेल्या घाटमार्गावर पर्जन्यवृष्टी हळूहळू कमी होत जाते. याचा अर्थ, मुसळधार पर्जन्यवृष्टी व दरडी कोसळणं यांचा निश्‍चितच अन्योन्यसंबंध आहे.
निसर्गात क्षितिजसमांतर असलेली कोणतीही वस्तू स्थिर राहते; परंतु तीच कलत्या स्थितीत (Inclined, Dipping) असेल तर तिच्यात अस्थिरता निर्माण होते. अस्थिरतेची तीव्रता ती वस्तू किती प्रमाणात कलती आहे यावर अवलंबून असते.
हिमालयातल्या खडकांचे थर तिरके (Dipping) असल्यानं ते नेहमीच अस्थिर असतात. हे तिरके थर मुख्यत्वे गाळ व वाळूमिश्रित असल्यानं काहीसे सच्छिद्र असतात. त्यामुळे अशा थरांत पावसाळ्यात पाणी मुरतं. पाण्याच्या संपर्कानं ते अधिकच अस्थिर होतात; त्यामुळे सुरुंगाच्या हादऱ्यानं किंवा भूकंपाच्या सौम्य धक्‍क्‍यानंही मूळची अस्थिर असलेली थरांची सारी चळत पर्वताच्या उताराच्या दिशेनं घसरून येते.
या घटनेत पर्वताचा फार मोठा भूभाग खालच्या दिशेनं घसरून येत असल्यानं या घटनेला ‘भूघसरण’ किंवा ‘लॅंडस्लाईड’ (Landslide) असं म्हणतात. भूघसरणीमुळे पर्वताच्या
पायथ्यालगतचा काही किलोमीटरचा भूभाग राडारोड्याखाली व मातीखाली झाकला जातो.
महाराष्ट्रातल्या बेसॉल्ट खडकांचे थर क्षितिजसमांतर असल्यामुळे ते नेहमीच स्थिर अवस्थेत असतात. कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या स्थलतलावर (Bedding Plane) घसरून येण्याची शक्‍यता नाही. ता. १२ डिसेंबर १९६७ ला झालेल्या भूकंपाची महत्ता (Magnitude) ६.५ रिश्‍टर एवढी होती. त्या वेळी कोयनानगरच्या परिसरातल्या डोंगरउतारावर असलेले खडकांचे सुटे संधीखंड (Joint Blocks) फक्त गडगडत खाली आले. महाराष्ट्रातल्या बेसॉल्ट खडकांची रचना अशी आहे की महाराष्ट्रात कधीही भूघसरण होणार नाही. झाले तर फक्त ‘शिलापात’ (Rock Falls) होतील.

* शिलापाताचं स्वरूप :
हिमालयाच्या परिसरात घडणाऱ्या भूघसरणीच्या पुढं महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगांच्या उतारावर असलेल्या घाटमार्गावर दरडी कोसळणं ही एक अत्यंत किरकोळ घटना आहे. दरडी कोसळल्यामुळे रस्त्याच्या फारच थोड्या भागावर माती व खडकाचे सुटे झालेले
लहान-मोठे तुकडे येऊन पडतात आणि ते सहज काढून टाकता येतात.
ज्या भागात नेहमी दरडी कोसळतात त्या भागाच्या भूरचनेची, तसंच त्या भागातल्या खडकांच्या क्षेत्रीय गुणधर्मांची तपशीलवार माहिती घेतली तर, दरडी कोणत्या कारणांमुळे होतात याचा छडा लावला तर आणि त्या अभ्यासावर आधारित योग्य ती उपाययोजना केली तर दरडी कोसळण्याच्या घटना कायमच्या टाळणं निश्‍चित शक्‍य आहे.

* दरडी कोसळण्याची कारणं :
महाराष्ट्रात मुख्यत्वे दोन कारणांनी दरडी कोसळतात.
१) डोंगरांच्या उतारावरच्या, तसंच रस्त्यासाठी घेतलेल्या छाटातील खडकांची क्षेत्रीय वैगुण्यामुळे.
२) मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या क्रियेमुळे.
वर म्हटल्यानुसार, सह्याद्रीची मुख्य रांग व तिच्या उपरांगा ॲमिग्डलॉयडल बेसॉल्ट व कॉम्पॅक्‍ट या दोन प्रकारच्या खडकांच्या अगणित थरांनी तयार झालेल्या आहेत. दरडी कोसळण्याच्या दृष्टीनं या दोन खडकांच्या क्षेत्रीय गुणधर्मांत जमीन-आसमानाइतकं अंतर आहे.

* ॲमिग्डलॉयडल खडकांच्या थरांची स्थिरता :
न कुजलेल्या, ठणठणीत स्वरूपातल्या ॲमिग्डलॉयडल बेसॉल्टच्या थरात आकुंचनसंधींच्या भेगा नसतात. त्यामुळे ॲमिग्डलॉईड खडकांचे थर लाकडी ठोकळ्याप्रमाणे एकसंध असतात. डोंगरउतारावर या खडकात सौम्य स्वरूपाचा उतार (Gentle slope) तयार होऊन तो थर कायम स्थिर स्थितीत राहतो. ॲमिग्डलॉयडलच्या सौम्य उतारावर, डोंगरावरून वाहून आलेली माती साठून राहते आणि तीवर झाडं उगवून डोंगरउताराचा तो भाग हिरव्या रंगाचा दिसतो. त्यामुळे त्या भागावर ॲमिग्डलॉयडल बेसॉल्ट असल्याचं लांबूनही सांगता येतं.
ॲमिग्डलॉयडल बेसॉल्टच्या खडकात संधींच्या भेगा नसल्यानं रस्त्यासाठी व रेल्वेमार्गासाठी या खडकात घेतलेले उभे छाट वर्षानुवर्षं उभ्या स्थितीत स्थिर राहू शकतात. पुणे शहराच्या आसपास असलेल्या खाणींतले उभे छाट, सेनापती बापट रस्त्यावर ‘सिम्बायोसिस’लगतचे खिंडीसाठी घेतलेले उभे छाट, पौड फाट्याजवळ असलेल्या जुन्या खाणीतला उभा छाट, तसंच बोरघाटात खंडाळा स्टेशनजवळ पुण्याच्या दिशेकडचे समोरासमोर घेतलेले दोन उभे छाट, रेल्वेमार्गावरची ठाकूरवाडी केबिन ते रेल्वेचा बोगदा क्रमांक १४ पर्यंतचा सुमारे एक किलोमीटर लांबीचा, लोहमार्गाला लागून असलेला उंच छाट सन १८६८ मध्ये घेतलेला आहे. तरीही तो अजून स्थिर अवस्थेत उभा आहे. हे सारे छाट संधींच्या भेगा नसलेल्या एकसंध ॲमिग्डलॉयडल खडकांच्या थरात घेतलेले असल्यानं त्यातून कधीही शिलापात (Rock Falls) होत नाहीत.
कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट खडकांचे थर काहीसे जाड व बऱ्याच अंतरापर्यंत पसरलेले असतात. त्यांच्या काळ्या रंगामुळे हे थर लांबूनही ओळखता येतात. अशाच एक ७० मीटर जाड असललेला कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या थरावर सिंहगड वसलेला आहे. हा थर लांबूनही एखाद्या काळ्या जाड ठोकळ्यासारखा दिसतो. ‘मंकी हिल’च्या पठारावरून उल्हास नदीच्या पश्‍चिमेकडच्या काठाखाली असलेल्या उभ्या कड्यातही हे थर स्पष्टपणे दिसतात. त्याप्रमाणेच महाबळेश्‍वरच्या पठारावरून पलीकडं असलेल्या जावळी खोऱ्यातल्या सह्याद्रीच्या उतारावर असेच थर आलटून-पालटून आडव्या काळ्या समांतर एकावर एक रचल्यासारख्या पट्ट्यांच्या स्वरूपात दिसतात.
कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टचे थर त्यात असलेल्या संधींच्या अवस्थेत असतात. संधींच्या भेगांमुळे कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या थरांत निरनिराळ्या आकाराचे सुटे संधीखंड तयार होतात. उन्हाळ्यात खडक तापल्यामुळे कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या थरांतल्या संधींच्या भेगा उकलतात. त्यामुळे संधीखंड काहीसे सुटे होतात. दर पावसाळ्यात असे सुटे झालेले संधीखंड कोसळून कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट थरात उंच उभे कडेच तयार होतात. रस्त्यासाठी आणि रेल्वेमार्गासाठी या खडकात घेतलेल्या छाटांतून, तसंच डोंगरावर या खडकात तयार झालेल्या कड्यातून पावसाळ्यात नेहमी दरडी कोसळतात.
पश्‍चिम महाराष्ट्रातले किल्ले कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट खडकाच्या थरावरच वसलेले आहेत. या किल्ल्यांच्या भोवती असलेले उंच कडे, कॉम्पॅक्‍ट खडकाच्या थरातले संधीखंड कोसळून तयार झालेले आहेत. ते कुणीही मुद्दाम खडक उभा तासून तयार केलेले नाहीत.

* कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट खडकांच्या थरांची अस्थिरता :
कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट थरात घेतलेले छाट किती काळ स्थिर अवस्थेत उभे राहतील हे त्या थरात किती संख्येनं संधींचा भेगा आहेत, तसंच त्यांची संरचना कशी आहे, एकमेकांना लागून असलेल्या दोन संधींच्या भेगांमधलं अंतर किती आहे या सर्व गोष्टीवर अवलंबून असतं. संधींच्या भेगा निरनिराळ्या दिशेत असतात. त्यापैकी बऱ्याच भेगा तिरक्‍या उताराच्या किंवा रस्त्याच्या दिशेत असतील तर अशा कड्यांत किंवा छाटांत फार अस्थिरता निर्माण होते. पावसाळ्यात त्यातले संधीखंड त्यांच्या तिरक्‍या स्पर्शतलावर घसरून खाली येतात.
वर्षानुवर्षं बेसॉल्ट थरांतल्या भेगांमध्ये पावसाचं पाणी मुरत असल्यानं तो थर काहीसा कुजलेल्या स्थितीत असतो. मुरलेलं पावसाचं पाणी झऱ्याच्या रूपानं या थरातून बाहेर पडताना त्या पाण्याबरोबर खडक कुजून तयार झालेला मुरूम आणि माती वाहून जाते. त्यामुळे कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट थरांतले तयार झालेले संधीखंड सुटे होतात. पावसाच्या माऱ्यानं आणि झिरपणाऱ्या पाण्याच्या वेगानं हे संधीखंड कड्यातून निसटतात आणि उतारावरून गडगडत खाली येतात.
अनेक वेळा कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टमधले संधीखंड कुजून त्यांच्या पृष्ठभागावर एकावर एक असलेली, कांद्यासारखी, मुरमाची टरफलं तयार होतात. त्यामुळे संधीखंडांना काहीसा गोलाकार येतो. गोलाकारामुळे संधीखंड अत्यंत अस्थिर स्वरूपात असतात. त्यामुळे अशा थरांतूनच दर पावसाळ्यात दरडी कोसळतात.

दरडी कोसळण्यावर प्रतिबंधक उपाययोजना :
कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट आणि ॲमिग्डलॉयडल बेसॉल्ट या दोन थरांपैकी फक्त कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टचे थरच त्यात असलेल्या संधीखंडामुळे तुटलेल्या अवस्थेत असतात आणि त्यातूनच दरडी कोसळतात.
त्याप्रमाणेच पावसाचं पाणी फक्त कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट थरांमध्ये त्यांच्या दोन संधीखंडांमधल्या भेगांवाटे मुरतं आणि त्यामुळे अस्थिर होऊन दरडी कोसळतात. म्हणून प्रतिबंधक उपाययोजना फक्त कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट थरापुरतीच मर्यादित स्वरूपात करावी लागते. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना करणं तसं अवघड व जिकिरीचं होत नाही. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी तातडीनं पुढं दिल्यानुसार योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तर दरडी कोसळणं निश्‍चित थांबवता येईल.
१) भूशास्त्रीय सर्वेक्षण :
कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट थराच्या छाटांतून, तसंच डोंगरउतारावरच्या कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या कड्यांतून दरडी कोसळतात. त्यामुळे रस्त्याच्या मार्गावरच्या छाटांचं, तसंच लगतच्या डोंगरउताराचं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पायी हिंडून भूशास्त्रीय सर्वेक्षण करून, त्या मार्गावरच्या कोणत्या भागात कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टचे थर आहेत हे निश्‍चित केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्या सर्वेक्षणात कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या थरात किती प्रमाणात संधींच्या भेगा आहेत, त्यांची रचना कशी आहे, त्या एकमेकींपासून किती अंतरावर आहेत, तसंच संधीखंड किती प्रमाणात कुजलेले आहेत याचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे रस्त्यावरचा कोणता भाग जास्त शिलापातप्रवण आहे ते ठरवता येईल.

२) परिणामकारक निचराचर घेणं :
मुसळधार पर्जन्यवृष्टी व दरडी कोसळणं यांचा अन्योन्यसंबंध असल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्याच्या छाटांत व कड्यांत न मुरता त्याचा निचरा परस्पर व लवकरात लवकर व्हावा यासाठी कड्याच्या, तसंच छाटांच्या वरच्या बाजूला निचराचर (Drains) घेणं जरुरीचं असतं. हे चर कड्याला किंवा छाटाला समांतर असावेत, तसंच ते ठणठणीत स्वरूपात असलेल्या खडकांपर्यंत खोदले जायला हवेत. चराला योग्य उतार देऊन चरात गोळा होणारं पावसाचं पाणी जवळच्या नाल्यात सोडून द्यावं. चराला सर्व बाजूंनी काँक्रिटचं आवरण केलं तर चरात गोळा होणाऱ्या सर्व पाण्याचा निचरा होईल.

३) जाड जाळीचं आवरण :
जाड लोखंडी जाळीचं आवरण उघड्या पडलेल्या संधीखंडांच्या पृष्ठभागावर लांब खिळे ठोकून घट्टपणे बसवणं जरुरीचं असतं. अर्थात जाळी बसवणं हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. काही वेळा जाळी बसवल्यानंतर संधीखंड सुटे होतात. सुट्या झालेल्या संधीखंडांच्या वजनामुळे जाळीला फुगवटा येतो. तथापि, दरडी कोसळण्याची पूर्वसूचना तरी निदान त्यामुळे मिळू शकते.

४) शैलबंधन करणं :
जाळी बसवण्याची उपाययोजना केल्यावर संधीखंडामध्ये छिद्रे पाडून, त्या छिद्रांमध्ये ३ ते ४ मीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त लांबीचे जाड सळईसारखे रॉक बोल्ट्स (Rock Bolts) व रेझिन (Resin) वापरून खडकाच्या आतले सुटे संधीखंड एकमेकांत गुंतवून ठेवावेत. बोरघाटातला (खंडाळा ते कर्जत) रेल्वेचा जुना बोगदा क्रमांक २६ च्या मुंबईकडच्या तोंडाजवळ (Mumbai Portal) कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या उभ्या थरातून सन १९८३ पूर्वी दर पावसाळ्यात दरडी कोसळत असत. कॉम्पॅक्‍ट बेसॉल्टच्या छाटांतल्या संधीखंडांना रेल्वेच्या अभियंत्यांनी (कै) डॉ. आर.बी. गुप्ते (थोर भूशास्त्रज्ञ) यांच्या सल्ल्यानुसार अशाच प्रकारे शैलबंधन (Rock bolting) करून संधीखंड स्थिर केले आहेत. त्यामुळे सन १९८४ नंतर त्या भागातल्या रेल्वेमार्गावर दरडी कोसळणं थांबलं आहे.

५) रुंद स्कंध (Berm) आणि उभे लोखंडी भक्कम खांब :
उंचावरून गडगडत येणारे संधीखंड रस्त्यावर न पडता उतारावरच वरच्या बाजूस थांबून राहावेत म्हणून छाटाच्या वरच्या बाजूस असलेल्या उतारावर सपाटीकरण करून बऱ्याच रुंदीचे (कमीत कमी ३ मीटर रुंदीचे) सपाट स्कंध (Berm) तयार करून, स्कंधाच्या काठावर काहीसे उंच लोखंडी खांब घट्ट रोवून उभे केले तर वरून गडगडत येणारे संधीखंड लोखंडी खांबांना थटतील व खाली रस्त्यावर येऊन पडणार नाहीत.
बोरघाटातल्या रेल्वेच्या मार्गावरच्या बोगदा क्रमांक २३ व २३ A यांमधल्या डोंगरांच्या उतारावर, पायथ्याच्या भागात अशीच उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यामुळे उतारावरून गडगडत येणारे संधीखंड रेल्वेमार्गाच्या वरच्या बाजूलाच थांबून राहतात.
कोकण रेल्वेच्या मार्गावरही ठिकठिकाणी अशीच उपाययोजना करण्यात आलेली आहे.

६) कृत्रिम बोगद्यांचं बांधकाम :
ज्या ठिकाणी सतत दरडी कोसळत असतील त्या भागात रस्त्यावर लोखंडी कमानी उभारून कृत्रिम तऱ्हेचे बोगदे बांधले तर रस्त्यावर दरडी न कोसळता त्या कृत्रिम बोगद्यावर येऊन पडतील. बोरघाटातल्या रेल्वेचा बोगदा क्रमांक. २३ A याच कारणासाठी कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेला आहे.

महामार्गावर कृत्रिम बोगद्यांची आवश्‍यकता :
१) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आडोशी’ बोगद्याच्या पुण्याच्या तोंडाकडच्या (Pune Portal) रस्त्याच्या भागावर अशा प्रकारचा बराच लांब बोगदा तयार केला तर रस्त्यावर दरडी कधीच कोसळणार नाहीत. या बोगद्याची रुंदी १२ मीटर तरी असायला हवी. त्यामुळे डोंगरालगतची संपूर्ण लेन कृत्रिम बोगद्यामुळे झाकली जाईल.
या कृत्रिम बोगद्याच्या मुंबईकडून येणाऱ्या मार्गाकडच्या काठावर उंच लोखंडी खांब उभे केले तर कितीही जोरात दरड कोसळून आली तरी ती पुण्याच्या दुसऱ्या लेनवर पडू शकणार नाही.
२) आडोशी बोगदा हा फक्त मुंबईकडं जाणाऱ्या लेनवरच आहे व त्याची लांबी २२० मीटर आहे. या बोगद्यावरून दरडी कोसळत येऊन काही वेळा पुण्याच्या लेनवर येऊन पडतात. त्यामुळे आडोशी बोगद्याच्या पलीकडं पुण्याच्या लेनवरही असाच कृत्रिम बोगदा तयार करावा लागेल.
३) याप्रमाणेच खंडाळा बोगद्याच्या पुण्याकडच्या तोंडासमोर बऱ्याच मोठ्या लांबीचा कृत्रिम बोगदा तयार करावा लागेल. त्याचप्रमाणे मुंबईकडच्या तोंडासमोरही कृत्रिम बोगदा करणं योग्य होईल.
४) ‘अमृतांजन’ पुलाजवळही कृत्रिम बोगदा तयार केला तर रस्त्यावर दरडी कोसळणार नाहीत.

७) पावसाळ्यापूर्वीची देखभाल व दुरुस्ती :
द्रुतगती मार्ग आणि त्याच परिसरात असलेला बोरघाटातला रेल्वेचा लोहमार्ग हे सारख्याच भूशास्त्रीय रचनेतून जातात, तसंच या दोन्ही मार्गांवर सारखंच पर्जन्यमान असतं. मग द्रुतगती मार्गावरच दरडी कोसळण्याच्या घटना नेहमी का होतात आणि बोरघाटातल्या लोहमार्गावर त्या क्वचितच का होतात असा प्रश्‍न काहींच्या मनात येतो.
माझ्या पीएच.डीच्या संशोधनासाठी, तसंच त्यानंतर Third line in Bor Ghat या प्रकल्पासाठी नवीन बोगद्यांच्या कामाच्या संदर्भात सुमारे सात वर्षं मी रेल्वेमार्गांवर हिंडत होतो. रेल्वेची यंत्रणा, दर पावसाळ्यापूर्वी लोहमार्गालगतच्या पर्वताच्या उतारावरील खडकांची पाहणी व सर्वेक्षण मी करत असे, तसंच कोसळण्याची शक्‍यता असलेल्या उतारावरचा प्रत्येक खडक फोडून त्याचे बारीक तुकडे करत असे. रेल्वे अभियंत्यांना सुचवलेल्या उपाययोजना काटेकोरपणे अंमलात आणल्या जात असल्याचं मला त्या वेळी आढळून आलं. (उदाहरणार्थ : बोरघाटातला बोगदा क्रमांक २६ च्या मुंबईच्या तोंडाजवळ (Mumbai Portal) असलेल्या कॉम्पॅक्‍ट बेसॉल्ट खडकाच्या थरात केलेलं शैलबंधन) रेल्वेची यंत्रणा काळजीपूर्वक व नेकीनं उपाययोजना करत असल्यामुळे लोहमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना कधीतरीच होतात.

दरडी कोसळणं ही एक भूशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे ज्या भागात दरडी कोसळतात त्या भागाचा सखोल भूशास्त्रीय अभ्यास केल्याशिवाय दरडी कोसळण्याच्या समस्येवर परिणामकारक उपाययोजना करता येणार नाहीत. तसा अभ्यास करून उपाययोजना केल्या तरच दरडी कोसळण्याच्या घटना थांबवता येतील; परंतु प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा व प्रामाणिक प्रयत्नांचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com