गाणं जागतं ठेवणारा कवी (डॉ. सिसिलिया कार्व्हालो)

डॉ. सिसिलिया कार्व्हालो drceciliacar@gmail.com
रविवार, 15 सप्टेंबर 2019

 

ज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध...

 

 

ज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध...

 

‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असं कविवर्य केशवसुत गाऊन गेलेत. लौकिकदृष्ट्या वयोमानानुसार मनाची कोवळीक जपणं किती अवघड गोष्ट; पण कलावंतासाठी मात्र ही अगदीच सोपी गोष्ट! कारण, कलावंताला वयच नसतं...त्याचं वाढतं आयुष्य लौकिकदृष्ट्या वयात मोजता येतं; पण त्याची वाहती प्रतिभा अशी ‘काला’त मापता येत नाही. त्यामुळे कवीला वय नसतं आणि कवितेला मृत्यू माहीत नसतो.

‘गझलसम्राट’ असं ज्यांना सार्थपणे संबोधलं जातं त्या कविवर्य सुरेश भट यांचे शिष्य आणि आजच्या गझलकारांमधलं महत्त्वाचं नाव म्हणजे रमण रणदिवे. रणदिवे हे येत्या आठवड्यात (ता. २० सप्टेंबर) वयाची सत्तर वर्षं पूर्ण करत आहेत. सत्तरी पूर्ण करत असतानाही आपल्या अलवार संवेदनांचं अत्तर ते आजही कवितांमधून-गझलांमधून शिंपडताहेत! कवितेची-गझलांची ही कशिदाकारी रणदिवे यांना कशी सुचते?
‘थोरामोठ्यांच्या प्रतिभाप्रकाशात मला माझी कविता पारखून घेता आली हे मी माझं भाग्य समजतो,’ असं रणदिवे म्हणतात. ही त्यांची विनयशीलता. मात्र, ‘भट यांच्यानंतरचा महत्त्वाचा गझलकार’ या शब्दांत गझलेचे ज्येष्ठ भाष्यकार डॉ. राम पंडित यांच्यासारख्यांनी रणदिवे यांना नावाजलेलं आहे.
ज्येष्ठ लेखक-समीक्षक-गझलकार प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा सहवास तर रणदिवे यांना लाभलेला आहेच; परंतु त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचाही लाभ त्यांना झालेला आहे. ज्येष्ठ कवयित्री-गीतकार शान्ताबाई शेळके यांनी रणदिवे यांना ‘शब्दांच्या पुनरुक्तीतली प्रासादिकता आणि अर्थसघनता’ यातलं आकलन दिलेलं आहे.
कविवर्य शंकर वैद्य यांचं मार्गदर्शन रणदिवे यांनी आपल्या ओंजळीत झेललेलं आहे...आणि गेयरचनांचं आव्हानही पेललेलं आहे.

रणदिवे यांच्या ठायी असलेली सतत ‘विद्यार्थी’ असण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती त्यांच्यातली गीत-पुष्पवाटिका फुलवत राहिलेली आहे.
गेयरचनेची देणगी रणदिवे यांना कुटुंबातूनच मिळाली. रणदिवे हे घराणंच मुळात कलावंतांचं. रमण रणदिवे यांचे वडील प्रल्हाद शांतवन रणदिवे हे संस्कृतपंडित होते. संस्कृत भाषेच्या आणि साहित्याच्या प्रभावातून त्यांनी वृत्तबद्ध रचनानिर्मिती केली. गेय कवितेचा वारसा असा रक्तातूनच प्रवाहित होऊन रणदिवे यांच्यापर्यंत आला आणि रणदिवे यांच्याकडून तो त्याच्या मुलांपर्यंत...नातवंडांपर्यंत खळखळत राहाणारा निर्झर झाला आहे. संगीत-वादनकलेत पारंगत अशी रणदिवे यांच्या कुटुंबातली तिसरी आणि चौथी पिढी कलावंताचा वारसा समर्थपणे सांभाळत आहे...
मान्यवरांचे आशीर्वाद आणि प्रातिभस्पर्श लाभल्याचं ऋण, त्याचबरोबर रक्तातला गुण रणदिवे अत्यंत मोकळेपणानं मान्य करतात. त्यांच्या मनाची ही पारदर्शकता, निरभ्रता यांमुळे त्यांच्यातलं ‘प्रौढत्वी निज शैशव’ टिकून राहू शकलं आहे. रणदिवे यांच्या गझलरचनेबरोबरच त्यांचं कवितालेखनातलं सौष्ठवही तेवढंच उजळून निघालं आहे.

भट यांनी दिलेली संथा रणदिवे यांनी पचवली आहे. रणदिवे यांच्या पाठीवर थाप देत भट म्हणत असत : ‘शब्दांची इज्जत करा, देखण्या आणि उपऱ्या शब्दांच्या नादी लागू नका. आयुष्याला भिडा, म्हणजे गझलेत आपोआपच भिजून चिंब व्हाल.’
‘चंद्रमेंदीच्या खुणा’ या संग्रहातल्या गझला तर रणदिवे यांच्या जणू रक्तरंगात न्हाऊन निघालेल्या आहेत! रणदिवे म्हणतात :‘उत्तम गझल तेव्हाच होऊ शकते, जेव्हा जीवनानुभवानं ओतप्रोत भरलेलं मन अत्यंत तरल होऊन जातं. केवळ काफिया आणि रदीफ वापरून गझल होतेच असं नाही.’

रणदिवे यांच्या मनातून गीत वा कविता अलगद उमलून आली तरीही मूर्तरूपातल्या त्यांच्या कवितांची संख्या कमी आणि वाऱ्यावर विरलेल्या आणि अधुऱ्या राहिलेल्या कवितांची, गझलांची संख्या अधिक आहे. सशक्त, सुदृढ आणि निरोगी रचनांच्या प्रसववेणांमध्ये प्रगल्भता आणि प्रफुल्लता दडलेली आहे याचं पूर्ण भान त्यांना आहे.
रणदिवे हे गात्या गळ्याचे कवी आहेत. संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्यांनी केलेला आहे. वाद्य-वादनातही रमणारा हा कवी आहे. त्यांची संगीतातली रुची त्यांच्या कवितालेखनासाठी, गेय रचनावलीसाठी पूरक ठरली आहे. हार्मोनिअमचे सूर त्यांच्या शब्दांना खुणावतात आणि कधी शब्द सुरांना शहाणीव देतात. गाण्यातला जीव आणि जीवनातलं गाणं जागतं ठेवणारा हा कवी आहे. ‘भाग्यवंत’ या रचनेतल्या एका कडव्यात रणदिवे म्हणतात :
ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे
गातो म्हणून मीही अजुनी जिवंत आहे.

गाईन रोज गाणे, गेलो थकून तरिही
दारात थांबलेल्या सांगेन मृत्युलाही
आता मरावयाला कोणा उसंत आहे?
गातो म्हणून मीही अजुनी जिवंत आहे

मृत्यूलाही थांबवून ठेवण्याची जिच्यात ताकद आहे इतकी ऊर्जस्वल गझल रणदिवे प्रसवत आहेत...
रणदिवे यांच्याकडं उत्तम वक्तृत्व आहे. त्याच्या वक्तृत्वाला कवित्वाची किनार लाभलेली असते. त्यांच्या काव्यरचना जशा आपसूक आणि अपापपणे जन्म घेतात तसंच उत्स्फूर्त त्यांचं वक्तृत्व आहे... ‘आघात’ या चित्रपटाच्या गीतलेखनाबद्दल रणदिवे यांना राज्य पुरस्कार लाभला. ‘बहुमोल जीवन’ या त्यांच्या कवितेचा पाठ्यपुस्तकात समावेश झाला. येशू ख्रिस्त यांचा विनम्र भक्त असलेल्या रणदिवे यांना हे सगळं भावसंपृक्त करून गेलं आहे.

कविकुलगुरू गोविंदाग्रज म्हणतात : ‘काव्य कराया जित्या जिवाचे जातिवंत करणेच हवे’
काव्यनिर्मितीसाठी संवेदनशीलता...जी जातिवंत असते...म्हणजे जन्मतःच प्राप्त झालेली असते...ती जगवणं आणि जागवणं अतिशय महत्त्वाचं. ती प्राणपणानं जपणं अगत्याचं! रणदिवे हे नित्य करत आलेले आहेत.
कोण म्हणेल कवीचं वय वाढत जातं...?
कवीला तर वयच नसतं...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang dr cecilia carvalho write raman randive article