‘वेध’ ग्रहणाचा (डॉ. प्रकाश तुपे)

डॉ. प्रकाश तुपे prakashrtupe@gmail.com
रविवार, 15 डिसेंबर 2019

येत्या २६ तारखेला एक दुर्मिळ आणि अद्‌भुत असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र-सूर्याचा लपंडाव रंगणार असून, त्यामुळं आपल्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहणाचा’ आविष्कार अनुभवता येईल. भारतात फक्त केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातल्या अवघ्या शे-सव्वाशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून कंकणाकृती सूर्य पाहायला मिळेल. इतर भारतात सूर्यबिंबाचा काहीच भाग चंद्राआड लपला जात असल्यानं तिथं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसेल. या ग्रहणाची नक्की वैशिष्ट्यं काय, ते कसं होतं, ते कसं पाहावं, त्याचं महत्त्व काय आदी सर्व गोष्टींचा वेध.

येत्या २६ तारखेला एक दुर्मिळ आणि अद्‌भुत असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र-सूर्याचा लपंडाव रंगणार असून, त्यामुळं आपल्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहणाचा’ आविष्कार अनुभवता येईल. भारतात फक्त केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातल्या अवघ्या शे-सव्वाशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून कंकणाकृती सूर्य पाहायला मिळेल. इतर भारतात सूर्यबिंबाचा काहीच भाग चंद्राआड लपला जात असल्यानं तिथं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसेल. या ग्रहणाची नक्की वैशिष्ट्यं काय, ते कसं होतं, ते कसं पाहावं, त्याचं महत्त्व काय आदी सर्व गोष्टींचा वेध.

येत्या २६ तारखेला एक दुर्मिळ आणि अद्‌भुत असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र-सूर्याचा लपंडाव रंगणार असून, त्यामुळं आपल्याला ‘कंकणाकृती सूर्यग्रहणाचा’ आविष्कार अनुभवता येईल. हे सूर्यग्रहण सूर्योदयानंतर तासाभरातच सुरू होत असून, सकाळी आठच्या सुमारास अमावस्येचा चंद्र चोरपावलानं येऊन सूर्यबिंबाला झाकू लागेल. हळूहळू तेजस्वी सूर्यबिंबाचा प्रकाशित भाग कमी होत जाऊन तासाभरातच संध्याकाळसारखं वातावरण निर्माण होऊ लागेल. तास- सव्वा तासात सूर्यकोर चंद्रकोरीप्रमाणं दिसू लागेल. काही मिनिटांतच चंद्र संपूर्णपणे सूर्यबिंबावर जाऊन सूर्याची कड वगळता सूर्य काळसर दिसू लागेल. सूर्याचं हे कंकण नक्कीच आपल्याला अचंबित करेल. सूर्याची ही कंकणाकृती अवस्था अवघी तीन मिनिटभर दिसेल. हा काळ कधी संपूच नये, असं वाटत असताना चंद्र सूर्यबिंबावरून हटताना दिसू लागेल. पुढील दीड तासात अमावस्येचा चंद्र आपला सूर्यबिंबावरचा प्रवास पूर्ण करून सूर्यास ग्रहणमुक्त करेल. अगदी क्वचित दिसणारं हे सूर्याचं रूप मात्र पृथ्वीच्या फारच छोट्या भागांतून पाहता येईल.

केरळ, कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग
भारतात फक्त केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातल्या अवघ्या शे-सव्वाशे किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून कंकणाकृती सूर्य पाहायला मिळेल. इतर भारतात सूर्यबिंबाचा काहीच भाग चंद्राआड लपला जात असल्यानं तिथं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसेल. मुळातच सूर्यग्रहणं कमी दिसतात आणि कंकणाकृती तर दुर्मिळच. त्याचमुळे येत्या २६ तारखेचं ग्रहण पाहायलाच हवं.
पुरातनकाळी ग्रहणं कधी, कशी आणि का होतात हे ठाऊक नसल्यानं त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अंधश्रद्धा समाजात होत्या. अचानकपणे चंद्र, सूर्याचं नाहीसं होणं पाहून लोक भयभीत न झाल्यास नवल ते काय! बऱ्याच ग्रहणांचा संबंध रोगराई, दुष्काळ आणि युद्धांशी लावला गेल्यानं ग्रहणांना अशुभ मानलं गेलं. आपल्या भारतीयांमध्ये राहू-केतू या दानवांमुळं ग्रहण घडत असल्याचा गैरसमज होता. पुराणांतल्या कथेनुसार समुद्रमंथनावेळी निर्माण झालेलं ‘अमृत’ राहू-केतूनं कपटानं मिळवलं. मात्र, चंद्र-सूर्यानं राहू-केतूची ही लबाडी विष्णूला सांगितल्यावर त्यांचा शिरच्छेद विष्णूनं केला. मात्र, अमृत प्राशन केल्यानं राहू-केतूला अमरत्व प्राप्त झालं असल्यानं त्यांचा मृत्यू झाला नाही. तेव्हापासून राहू-केतू चुगली करणाऱ्या चंद्र-सूर्यास अधूनमधून गिळतात आणि त्याचमुळे चंद्र-सूर्याला ग्रहण लागतं. राहूच्या तडाख्यातून चंद्र-सूर्याची सुटका व्हावी म्हणून मंत्रतंत्र, जपजाप्यासारखे विधी पुरातनकाळी केले जायचे. महाभारतात ग्रहणांचे अनेक उल्लेख आढळतात. असं म्हणतात, की जयद्रथाच्या वधावेळी खग्रास सूर्यग्रहणामुळंच अर्जुनानं जयद्रथाला मारलं असावं. दुर्योधनवधावेळीदेखील ग्रहण दिसलं होतं, असं म्हणतात. पुरातनकाळच्या गोष्टी बाजूला ठेवून आर्यभट्टानं ग्रहणं राहू-केतूमुळं नाही, तर चंद्र-सूर्यामुळं होतात, असं सांगितलं होतं. महाराष्ट्रीयन खगोलविद भास्कराचार्यांनी तर ग्रहणांची शास्त्रीय चिकित्सा आपल्यासमोर मांडली. ग्रीक आणि मायन संस्कृतीमध्ये ग्रहणांविषयी अनेक उल्लेख आढळतात. खाल्डीयन, चिनी आणि बॅबिलोनियन खगोलविदांनी ग्रहणांची वारंवारिता शोधून ग्रहणं कधी घडतील यांची भाकितं केली होती. खाल्डीयन लोकांनी सांगितलं होतं, की एकदा ग्रहण घडलं, की पुन्हा १८ वर्षं ११ दिवसांनी त्याच प्रकारचं ग्रहण घडतं. या ग्रहणांच्या आवर्तनास ‘सारोसची ग्रहणशृंखला’ म्हणून ओळखलं जातं.

चंद्र, सूर्य, पृथ्वीचा लपंडाव
ग्रहण हा निसर्गाचा अद्‌भुत चमत्कार असून तो चंद्र, सूर्य आणि पृथ्वी या तिघांच्या लपंडावामुळे दिसतो. चंद्र आणि पृथ्वी स्वयंप्रकाशित नसल्यानं सूर्यप्रकाशामुळं त्यांच्या अवाढव्य सावल्या अंतराळात पडलेल्या असतात. पृथ्वीच्या शंकवाकृती सावलीत चंद्र आल्यास चंद्रग्रहण घडतं, तर अमावस्येचा चंद्र सूर्यासमोरून जाताना त्याची सावली पृथ्वीवर ज्या भागात पडते, तिथून सूर्यग्रहण दिसतं. ग्रहण घडण्यासाठी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका ओळीत यावे लागतात आणि ही गोष्ट तर दर अमावस्येला, पौर्णिमेला घडतेच. मात्र, दर अमावास्या, पौर्णिमेला ग्रहण घडत नाही. कारण हे तिन्ही ग्रहगोल प्रत्येक वेळी एका प्रतलात (पातळीत) नसतात. त्यामुळं बऱ्याच वेळा पृथ्वीच्या सावलीच्या वरून किंवा खालून चंद्राचा प्रवास झाल्यानं चंद्रग्रहण घडत नाही. तसंच दर अमावस्येला चंद्राच्या सावलीच्या बाजूनं पृथ्वी गेल्यानं चंद्र सावली पृथ्वीवर न पडल्यानं सूर्यग्रहण होत नाही. ते तिन्ही ग्रहगोल सतत एका पातळीत नसतात. कारण चंद्राच्या कक्षेनं पृथ्वी सूर्य पातळीशी (आयनिक वृत्त) पाच अंशाचा कोन केलेला आहे. या दोन्ही कक्षा जिथं छेदतात, त्याच ठिकाणी चंद्र-सूर्य आल्यास ग्रहण घडतं आणि या छेदन बिंदूस आपण ‘राहू-केतू’ म्हणतो. थोडक्‍यात, चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका ओळीत आणि विशिष्ट स्थानी आल्यासच ग्रहण घडतं.

सूर्यग्रहणात अमावस्येचा चंद्र सूर्यासमोरून प्रवास करतो आणि यावेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ही सावली शंकवाकृती असल्यानं पृथ्वीपर्यंत पोचेपर्यंत तिचा व्यास अवघा २५० ते ४०० किलोमीटर एवढा छोटा होतो. यामुळं या छोट्याशा भागात सूर्य पूर्णपणे झाकला गेल्यानं खग्रास सूर्यग्रहण दिसतं. मात्र, चंद्राची विरळ सावली काही हजार किलोमीटरची असल्यानं मोठ्या भागात खंडग्रास ग्रहण दिसतं. म्हणजे तिथून सूर्यबिंब पूर्णपणे झाकलं न जाता काही प्रमाणात ते झाकलं जातं. चंद्र आणि पृथ्वी स्थिर नसून त्या फिरत असल्यानं चंद्राची सावली सेकंदाला जवळजवळ एक किलोमीटर वेगानं पुढं निघून जाते आणि त्यामुळं खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त साडेसात मिनिटंच दिसू शकतं. सूर्यग्रहणाचा अजून एक प्रकार म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण. या ग्रहणात चंद्रबिंब पूर्णपणे सूर्याला झाकू शकत नसल्यानं सूर्यबिंबाची कड प्रकाशित राहून सूर्याभोवती कंकण दिसतं. या ग्रहणासाठी चंद्राचा आकार महत्त्वाचा ठरतो. प्रत्यक्षात चंद्र आणि सूर्य यांचे आकार वेगवेगळे असले, तरी आपल्याला डोळ्यानं ते एकसारखे दिसतात. याला कारण म्हणजे चंद्राच्या व्यासापेक्षा सूर्याचा व्यास सुमारे चारशेपट जरी मोठा असला, तरी सूर्य चंद्रापेक्षा चारशेपट दूर आहे. याचमुळं चंद्र-सूर्याची बिंबं साधारणपणे एकाच आकाराची दिसतात. या आकार साधर्म्यामुळं चंद्रबिंब पूर्णपणे सूर्याला झाकू शकतं आणि खग्रास सूर्यग्रहण घडतं. मात्र, चंद्र कधी पृथ्वीजवळ येतो आणि कधी दूर जात असल्यानं त्याचा आकार लहान-मोठा दिसतो. यामुळं चंद्र दूर गेल्यास सूर्यबिंब पूर्णपणे झाकलं जाण्याऐवजी बिंबाचा मधला भाग झाकला जाऊन सूर्यबिंबाची कड प्रकाशित राहते. याचमुळं कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं. थोडक्‍यात चंद्रबिंब पृथ्वीपासून दूर गेल्यास छोटं दिसतं आणि त्यामुळं ते पूर्णपणे सूर्यबिंबाला झाकू शकत नाही. यावेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोचू न शकल्यानं खग्रास ग्रहणाऐवजी सूर्यबिंबाभोवतालचं कंकण दिसू लागतं.

वर्षातलं शेवटचं ग्रहण
या महिन्यातलं कंकणाकृती सूर्यग्रहण वर्षातलं शेवटचं ग्रहण असून, ते २६ तारखेला सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत दिसेल. हे ग्रहण सूर्योदयाच्या वेळी सौदी अरेबियामध्ये सुरू होत असून, तिथून चंद्र सावली कतार, ओमानमधून भारतात सकाळी आठच्या सुमारास येईल. चंद्राची १२० किलोमीटर रुंदीची दाट छाया केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूचा प्रवास करून श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूरमार्गे सूर्यास्तास प्रशांत महासागरात पोचेल. चंद्राची सावली जवळजवळ तेरा हजार किलोमीटर्स लांबीचा प्रवास ३.३ तासात पूर्ण करेल. या ग्रहणात सूर्यबिंबाचा ९७ टक्के भाग चंद्राआड लपत असून, जास्तीत जास्त ३ मिनिटं ४० सेकंदभर सूर्याचं कंकण दिसू शकेल. या ग्रहणावेळी सूर्यबिंब त्याच्या नेहमीच्या आकारापेक्षा १.७ टक्के मोठं, तर चंद्रबिंब नेहमीपेक्षा १ टक्‍क्‍यानं छोटं असल्यामुळं ते पूर्णपणे सूर्याला झाकू शकत नाही आणि याचमुळं कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. ग्रहण पाहण्यासाठी भारतातल्या बेकल फोर्ट, कन्नूर, मंगळूर, पोलवी, उटी, कोईमतूर, निरपूर यांसारख्या शहरांच्या परिसरात आकाशप्रेमी गर्दी करतील. या परिसरात सकाळी ९.२८ वाजता सुमारे सव्वातीन मिनिटभर सूर्याचं कंकण पाहता येईल. दक्षिण भागातला छोटा भाग वगळता संपूर्ण भारतभर सूर्यबिंबाचा काही भाग चंद्राआड लपल्यानं ‘खंडग्रास ग्रहण’ दिसेल. या ग्रहणानंतर अवघ्या सहाच महिन्यांनी म्हणजे २० जून २०२० रोजी पुन्हा याच प्रकारचं कंकणाकृती सूर्यग्रहण होत असून, ते राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तराखंडच्या काही भागांतून पाहता येईल. मात्र, यावेळी मान्सून सुरू होत असल्यानं ग्रहण दिसण्याची शक्‍यता कमी. याचमुळं या महिन्यातलं कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी चुकवू नये.

 

महाराष्ट्रात ग्रहण कसं दिसेल?

 

शहर किती टक्के सूर्य झाकला जाईल
पुणे ७८.६ टक्के
मुंबई ७९ टक्के
सोलापूर ८१ टक्के
कोल्हापूर ८४ टक्के
नाशिक ७४ टक्के
नागपूर ६२ टक्के
जळगाव ६८ टक्के
औरंगाबाद ७४ टक्के
अकोला ६८ टक्के
पणजी ८८ टक्के

ग्रह कसं पाहाल?
- दुर्बिणी किंवा बायनॉक्‍युलरमधून सूर्याकडे पाहू नका. तसं केल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते.
- विशिष्ट आणि योग्य ‘ग्रहण-चष्मा’ वापरून ग्रहण पाहा.
- काळ्या केलेल्या काचा, गॉगल्स, एक्‍स-रे फिल्म्स, सीडी यांच्यामधून ग्रहण पाहू नका. या गोष्टी सूर्याची धोकादायक किरणं अडवू शकत नाहीत. ‘ग्रहण-चष्मा’च वापरण्याचा प्रयत्न करा.
- सूर्याकडे जास्त वेळ आणि टक लावून पाहू नका.
- ग्रहण हा ग्रहगोलांचा लपंडाव असून ती एक नैसर्गिक घटना असल्यानं त्यावेळी कोणतेही वायू/ किरणं निर्माण होत नसल्यानं सर्वांनी ग्रहणाचा आनंद घ्यावा.
- गर्भवती महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांनीदेखील डोळ्यांची योग्य काळजी घेऊन ग्रहण पाहण्यास हरकत नाही.

ग्रहणं किती आणि कशी दिसतात?
- एका वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणं दिसतात. यापैकी पाच किंवा चार सूर्यग्रहणं आणि दोन किंवा तीन चंद्रग्रहणं असू शकतात.
- एका वर्षात किमान दोन ग्रहणं घडतातच; मात्र दोन्ही सूर्यग्रहणं असतात.
- सूर्यग्रहणाची सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणं :
खग्रास : २६.९ टक्के
कंकणाकृती : ३३ टक्के
खंडग्रास : ३५.२ टक्के
खग्रास कंकणाकृती : ४.८ टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang dr prakash tupe wirte eclipse article