भारताचा ‘अरुणो’दय (डॉ. उदयन दीक्षित)

dr udayan dixit
dr udayan dixit

पुण्याच्या नेत्ररोगतज्ज्ञ पती-पत्नीनं अरुणाचल प्रदेशातल्या दुर्गम गावांमध्ये जाऊन नेत्रशिबिरं आयोजिली. तिथल्या अनेकांना उजेडाची ओळख करून दिली! महाराष्ट्र किंवा इतर राज्यांऐवजी अरुणाचल प्रदेशासारख्या दुर्गम राज्यातल्या खेड्यापाड्यांत जाऊन त्यांना हे का करावंसं वाटलं, कसा होता तो अनुभव...याविषयी.

डोळ्यांवर उन्हाची तिरीप पडली आणि खडबडून जागा झालो. गजर लावल्याशिवाय रोज पहाटे साडेचार वाजता उठण्याची सवय आणि त्याविषयीचा अभिमान कोलमडून पडला. आठ वाजता नेत्रशिबिराच्या कार्यस्थळी पोहोचायचं होतं. अंथरुणातून उठताना घड्याळाकडे नजर टाकली. पहाटेचे सव्वापाचच वाजले होते. थोडा विचार केला आणि मग डोक्यातही प्रकाश पडला. भारतात सर्वप्रथम सूर्योदय होणार्‍या ‘डाँग’ या गावापासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या ‘खाँनसा’ या गावात आम्ही काल रात्री पोहोचलो होतो. अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व सीमेजवळ, म्यानमार देशाच्या जवळ असणारं हे गाव. त्यामुळे इतक्या पहाटे लख्ख उजेड होता.

पुणे ते कोलकता, कोलकता ते दिब्रुगड, दिब्रुगड ते तिनसुखिया आणि शेवटी तिनसुखिया ते खाँनसा असा २१ तासांचा प्रवास करून आम्ही आदल्या रात्री या गावात पोहोचलो होतो. पर्वतरांगांनी वेढलेलं आणि दरीमध्ये वसलेलं असं हे टुमदार गाव आहे. म्यानमार देशाची काहीशी विस्कळित सीमा आणि शेजारच्या नागालँडसारख्या राज्यांमधून घुसखोरांनी आणि अतिरेक्यांनी काही वर्षांपूर्वीपर्यंत या भागाला भंडावून सोडलं होतं. खाँनसा ज्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे त्या तिराप जिल्ह्यातल्या व शेजारील चांगलांग आणि लाँगडिंग जिल्ह्यांतल्या नागरिकांनी तब्बल बारा वर्षं डोळ्यांच्या डॉक्टरांचा चेहराही पाहिला नव्हता. खाँनसा गावात जिल्हा रुग्णालय आहे; परंतु त्या ठिकाणी नेत्ररोगविभाग तर सोडाच; इतर वैद्यकीय सुविधादेखील खूपच मर्यादित स्वरूपाच्या होत्या. नेत्रशिबिराला निघण्याआधी आम्ही दोघांनी - मी व पत्नी नैना - सकाळी गावात फेरफटका मारला. भरपूर चढ-उतार असणारे रस्ते, डोंगरांवर पायर्‍यांसारखी वसणारी छोटी घरं, पाठीवर सामान किंवा गोंडस मुलं घेऊन कामावर निघालेल्या स्त्रिया दिसल्या. कुणीतरी चष्मा पुसून दिला आहे अशी जाणीव व्हावी इतकं स्वच्छ वातावरण...शंभर टक्के प्राणवायूचा सिलिंडर जोडला आहे की काय असं वाटावं इतकी प्रदूषणमुक्त आरोग्यदायी हवा...शाळेचा गणवेश घालून, हातात हात गुंफून लांब पल्ल्यापर्यंत चालत जाणारी गोरी-गोमटी मुलं आणि मुली...हे दृश्य मनात घर करून बसलं. सगळ्यांच्या चेहर्‍यांवर आनंदी भाव होता. मनात विचार आला, ‘शिक्षण, आरोग्य आणि काही मूलभूत सुविधा इथं पुरवायला हव्यात. बस्स. तेवढ्या सुविधा वगळता या समाजाला उगीचच आधुनिकतेचा संसर्ग न झालेलाच बरा!’

खाँनसा गावातील जिल्हा आयुक्त पी. एन. थुगाँन यांनी फेब्रवारी २०१९ मध्ये व लाँगडिंग येथील श्रीमती यादव यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये नेत्रशिबिरांसाठी आम्हाला मोठं सहकार्य केलं. आम्ही कुणाकडूनही आर्थिक साह्य न घेता पुण्याहून इतक्या दूर आल्याचं समजल्यावर त्यांनी आपल्या कार्यालयांकडून चष्म्यांचा पूर्ण खर्च आणि विविध गावांमध्ये जाण्यासाठी स्वत:ची गाडी दिली. ‘सरकार काहीही करत नाही,’ अशी तक्रार सदैव करण्यापेक्षा आपण निःस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम केल्यास,
सरकारी यंत्रणेतले
अनेक कार्यक्षम व सद्सद्विवेकबुद्धी असणारे अधिकारी मदत करतात याचं प्रत्यंतर दोन्ही वर्षी आलं.
पोलीस अधीक्षक जितेंद्र मीनाह यांच्या हस्ते नेत्रशिबिराचं औपचारिक उद्घाटन झालं. त्यानंतर लगेचच रुग्णतपासणीला सुरुवात झाली. तपासणीसाठी लागणारी अनेक उपकरणं व शक्य होतील तेवढी औषधं व चष्मे
आम्ही पुण्याहून बरोबर आणले होते.
त्यासाठी एंटोड कंपनीचे किशोर मासुरकर व शिबिरांचं आयोजन करणार्‍या विवेकानंद केंद्राचं साह्य होतं.
प्रत्येक विमानतळावर आमच्या सामानाची छाननी केली गेली. सर्व सुरक्षा-अधिकार्‍यांनी समजूतदारपणा दाखवला. कुठंही आडकाठी न आणता त्यांनी संपूर्ण सहकार्य केलं. ‘चांगलं काम प्रामाणिकपणे करण्याच्या हेतूनं निघाल्यावर सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडतात,’ याचं आम्हाला प्रत्यंतर आलं.

अगदी काटेकोरपणे तपासणी केल्यास दिवसाकाठी ४० ते ५० रुग्ण तपासता येतील असा अंदाज केला होता. तपासणीच्या खोलीबाहेर रुग्णांची झुंबड होती. एका रुग्णाला आत घेण्यासाठी दरवाजा उघडला की सात ते दहा रुग्ण एकदम आत घुसत. त्यांना सांभाळताना नाकी नऊ आले. शाळांमध्ये जाणार्‍या कित्येक मुलांचे डोळे कधी तपासले गेलेच नव्हते. आपल्याला जेवढं दिसत आहे तेवढीच सगळ्यांची नजर असते ही त्यांची समजूत होती. डोळे तपासून चष्म्याच्या नंबरच्या काचा लावल्यावर, स्पष्ट व स्वच्छ दृष्टी म्हणजे काय, हे त्यांना जाणवलं तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेलं अविस्मरणीय हास्य वेगळाच आनंद देऊन गेलं.

दोन्ही डोळ्यांत पूर्णपणे पिकलेला मोतिबिंदू आणि त्यामुळे कुणाची तरी मदत घेऊन अनेक वृद्ध रुग्ण शिबिरात आले होते. नजर पूर्णपणे गेलेली असली तरी शस्त्रक्रिया करून ती पुन्हा मिळवता येते ही बाब त्यांना माहीतच नव्हती. एखाद् दुसर्‍या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकाला मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल थोडीशी माहिती होती; परंतु शस्त्रक्रियेसाठी आणि त्यासाठी लागणार्‍या प्रवासासाठी खर्च करणं त्यांना शक्य नव्हतं. तिथं अगदी शंभर किलोमीटरचं अंतर पार करायला काही ठिकाणी आम्हांला तेरा तास लागत होते. मेंचुकासारख्या अत्यंत दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’नं तयार केलेले रस्ते पाहिले. त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच. जिवावर उदार होऊन तिथले कामगार रस्त्यावर वारंवार पडणारे मोठमोठे कातळ दूर करताना पाहिले.
तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या रुग्णांना, तसंच मोतिबिंदू-काचबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असणार्‍या रुग्णांना शिबिरानंतर नियोजनबद्ध पद्धतीनं दिब्रुगड इथं पाठवून विवेकानंद केंद्रानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून घेतल्या.

नेत्रविकार असणार्‍या अशा रुग्णांची अगदी हलाखीची परिस्थिती प्रत्येक राज्यात, अगदी महाराष्ट्रातल्या काही खेड्यापाड्यांतही आहे; मग अरुणाचल प्रदेशासारख्या एवढ्या दूरच्या राज्यात जाऊन काम करण्याचा एवढा खटाटोप कशासाठी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवेल आणि तो रास्तही आहे.
गरजू जनतेसाठी काम करण्याची इच्छा होण्यामागं तीन प्रकारच्या भावना असू शकतात, त्या म्हणजे सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम आणि आध्यात्मिक भावना.
अरुणाचल प्रदेशात जाऊन काम करण्यामागं राष्ट्रप्रेम व देशासाठी योगदान देणं याला आम्हा पती-पत्नीचं प्राधान्य होतं. माझी पत्नी नैना हिचे वडील कर्नल मदन गोरे यांनी सन १९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पश्चिम सीमेवर प्राणांचं बलिदान दिलं. त्यांच्या जवळपासचाही त्याग आम्ही करू शकत नाही; परंतु देशासाठी काही काम करण्याची ही अनमोल संधी आम्हा दोघांना दवडायची नव्हती.

बरोबर सर्व उपकरणं असल्यानं, शिबिराखेरीज; आम्ही प्रवासादरम्यान वास्तव्य केलेल्या वाक्का, आलोंग, मेंचुका यांसारख्या प्रत्येक छोट्या गावात रुग्णांची रीतसर तपासणी करता येत होती. आम्ही त्या त्या कुटुंबांच्या घरीच राहायचो. यजमान, आम्ही, ड्रायव्हर, काम करणारे लोक रोज एकत्रच जेवायचो. या मुक्कामात विचारांची देवाण-घेवाण झाली, खूप शिकायला मिळालं.

गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं ईशान्येकडच्या राज्यांचा विकास करण्याचा निर्धार केला आहे हे प्रसारमाध्यमांद्वारे कळत होतंच. काही ठिकाणच्या प्रवासाला पूर्वी सात तास लागायचे. ते अंतर आता पुलांच्या बांधणीमुळं अवघ्या वीस मिनिटांत आम्ही जेव्हा पार पाडलं तेव्हा त्या बातम्यांची सत्यता पटली. आसामच्या सीमेजवळचा ‘भूपेन हजारिका सेतू’, देबांग नदीवरील दांबोक पूल, देगारू, लोहित नदी (जिचं रूपांतर पुढं ब्रह्मपुत्रा नदीमध्ये होते) आणि कामलांग यांच्या त्रिवेणीसंगमावरचा पूल, बर्फानं व्यापलेल्या ‘मायोडिया पास’पर्यंत ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ नं तयार केलेला खडतर; परंतु उत्कृष्ट रस्ता ही सगळी उदाहरणं सरकारच्या प्रयत्नांची ग्वाही देतात.
‘अरुणज्योती’ या उपक्रमाद्वारे ‘विवेकानंद केंद्र या संस्थेचं अरुणाचल प्रदेशातलं काम चालतं. विवेकानंद केंद्राच्या ‘जीवनव्रतीं’ नी व इतर सभासदांनी या कार्याला वाहून घेतलं आहे.

डॉ. देवाशिष अधिकारी नावाचा तिशीतला तडफदार डॉक्टर हा या केंद्राच्या सर्व गुणांचं चालतं-बोलतं उदाहरणच म्हणता येईल.
माझ्या मते अरुणाचल प्रदेश हा पूर्वेकडचा काश्मीर आहे! तितक्याच सुंदर बर्फाच्छादित शिखरांनी व्यापलेलं हिमालय पर्वतरांगांचं हे राज्य. ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे’ या कवितेचं इथल्या दर्‍याखोर्‍यांत प्रत्यंतर येतं.
इथल्या नागरिकांना आपल्या प्रेमानं, आपुलकीनं, शक्य होर्इल त्या मदतीनं आपण आपलंसं केलं पाहिजे, त्यांना प्रेमबंधनात बद्ध केलं पाहिजे.
अरुणाचल प्रदेशातल्या छोट्या गावांमध्ये आयोजिलेली ही नेत्रशिबिरं आमच्या अत्यल्प योगदानाची पहिली पायरी ठरेल. या ठिकाणी पुनःपुन्हा येऊन समाजसेवा व त्यायोगे देशसेवा करायची हा निश्चय करूनच आम्ही अरुणाचल प्रदेशचा निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com