ब्रिटनमधली आरोग्यसेवा (डॉ. विजय जोशी)

dr. vijay joshi
dr. vijay joshi

भारतातली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था क्षीण झाली असताना, ब्रिटनसारख्या देशात नॅशनल हेल्थ सर्व्हिसची (एनएचएस) अतिशय परिणामकारक अंमलबजावणी सुरू आहे. गेली वीस वर्षं ब्रिटनमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तज्ज्ञाला या सेवेबद्दल आलेले अनुभव, निरीक्षणं आणि त्या निमित्तानं भारतीय आरोग्यव्यवस्थेत कशी सुधारणा करता येईल याबाबत चर्चा.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS-एनएचएस) म्हणजे इंग्लडमधली प्रमुख आरोग्यव्यवस्था. ही इंग्लड, वेल्स आणि स्कॉटलंडमध्ये सर्व रुग्णालयांमधून ब्रिटिश नागरिकांना विनामूल्य पुरवली जाते. सन १९४८ मध्ये एक पत्रक सर्वांच्या घरी वाटून एनएचएसची सुरुवात झाली. या पत्रकाचा आशय असा होता, की ‘एनएचएस ही सर्वांना मेडिकल, डेंटल, नर्सिंग सेवा पुरवेल. त्यासाठी कुठलीही फी आकारण्यात येणार नाही. इन्शुरन्सचीसुद्धा गरज लागणार नाही. मात्र, ही चॅरिटेबल सेवा नाही. कर भरणाऱ्या सर्व नागरिकांचं यात पैशाद्वारे योगदान असेल आणि ज्याद्वारे आजाराच्या वेळी तुम्हाला पैशाची गरज पडणार नाही.’ ऍन्युरिन बेव्हन या लेबर पार्टीच्या आरोग्यमंत्र्यांनी ही सेवा साधारणतः सन १९४८ मध्ये सुरू केली.

एनएचएसची आरोग्यसेवा तीन प्रकारे पुरवली जाते. प्रायमरी हेल्थकेअर म्हणजे जनरल प्रॅक्टि‍स (G.P. service), सेकंडरी हेल्थकेअर ही प्रामुख्यानं डिस्ट्रिक्‍ट जनरल हॉस्पिटल्समधून (D.G.H.) आणि Tertiary हेल्थकेअर म्हणजे स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स, जी मुख्यत्वेकरून मोठ्या शहरांमध्ये असतात. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हेल्थकेअर अशी ही साखळी असते. ज्यामुळं रुग्णाचा व्यवस्थित पाठपुरावा आणि रिपोर्ट ठेवला जातो. हा रिपोर्ट कुठल्याही डॉक्‍टरला कुठल्याही रुग्णालयामध्ये आणि जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्‍टरांनादेखील बघता येतो. त्यामुळे रुग्णसेवेत आणि औषधोपचारात सातत्य राहतं.

या आरोग्यसेवेचा लाभ हा प्रत्येक ब्रिटिश नागरिकास विनामूल्य मिळतो. ही सरकारी योजना असल्यामुळे इंग्लडमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस अतिशय कमी आहे. यासाठी पहिल्यांदा ब्रिटिश नागरिकास जनरल प्रॅक्टिसमध्ये डॉक्‍टरकडे नावनोंदणी करावी लागते. यापासून पुढं तुमचा सविस्तर पोर्टफोलिओ ठेवला जातो. प्रत्येक आजारपण किंवा रुग्णालयामध्ये मिळालेले औषधोपचार याची नोंद या रेकॉर्डवर असते.
जनरल प्रॅक्टिशनर (जीपी) हा साधारणतः प्राथमिक आरोग्यसेवा पुरवतो. तुम्ही आजारी पडलात तर प्रथम जीपीकडं जाणं. त्याच्या तपासणीनुसार प्राथमिक चाचण्या, ब्लड टेस्ट इत्यादी गोष्टी आणि औषधोपचार होणार. काही मर्यादित स्वरूपाची औषधंच फक्त जीपी तुम्हाला देऊ शकतो.
त्यानंतर जर तब्येत सुधारली नाही किंवा अधिक चाचण्या करायची गरज असेल, तर डॉक्‍टर तुम्हाला रुग्णालयामध्ये जायला सांगतात. अशा रितीनं प्रायमरी केअरमधून सेकंडरी केअरमध्ये तुमची पाठवणी होते.

रुग्णालयाच्या मदतीनं जीपी डॉक्‍टर्स हे स्क्रीनिंग प्रोग्रॅम पण कार्यरत ठेवतात. या स्क्रीनिंग प्रोग्रॅमद्वारे कॅन्सर (ब्रेस्ट, कोलॉन), श्‍वसनसंस्था कॅन्सर, डायबेटिस इत्यादी गोष्टींचं स्क्रीनिंग केलं जातं. याद्वारे संबंधित आजारांचे रुग्ण लवकर शोधून त्यावर त्वरित उपचार केले जातात. प्रत्येक बाळाचं लसीकरण आणि व्यवस्थित वाढ याची जबाबदारी पेडियाट्रिक डॉक्‍टर्स आणि जीपी डॉक्‍टर्सवर असते.
सेकंडरी केअरमध्ये प्रामुख्यानं डिस्ट्रिक्‍ट जनरल हॉस्पिटल्स येतात. जो खऱ्या अर्थानं एनएचएसचा कणा आहे. या रुग्णालयांमध्ये ॲडमिट व्हायचं असेल, तर ते काम एकतर जीपी करू शकतो किंवा तुम्ही जर खूपच आजारी असाल तर ९-९-९ डायल करून स्वतःहून ॲडमिट होऊ शकता. ९-९-९ ही हॉटलाईन वापरली, तर इमर्जन्सी ऍब्युलन्स (रुग्णवाहिका) पाच मिनिटांत तुमच्या घरी पोचते. यामध्ये अत्याधुनिक सोयी तर असतातच; पण अतिशय नावाजलेले, अनुभवी असे पॅरामिडिकल्स असतात. हे पॅरामेडिक्‍स प्रथम तुमची तपासणी करून गरज लागल्यास तत्काळ तुम्हाला रुग्णालयामध्ये ॲडमिट करतात.

रुग्णालयांमध्ये प्रथम ऍक्‍सिडेंट आणि इमर्जन्सी विभागात प्रथम तपासणी होऊन चेस्ट एक्‍स-रे, ब्लड तपासण्या इत्यादी गोष्टी केल्या जातात. त्यानुसार गरज असेल, तर स्पेशालिस्ट डॉक्‍टर्सद्वारे तुम्हाला परत तपासलं जातं. यामध्ये physician, surgeon, paediatrician असे तज्ज्ञ डॉक्‍टर असतात. या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार मग सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, सर्जिकल किंवा मेडिकल प्रोसिजर (उदा. अँजिओप्लास्टी, ब्रॉंकोस्कोपी, एंडोस्कोपी इत्यादी) केल्या जातात. अशा रीतीनं औषधोपचार झाल्यावर डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया चालू होते.

वयस्कर लोकांसाठी डिस्चार्जच्या आधी ऑक्‍युपेशनल आणि फिजिओथेरपीद्वारे तपासणी होते. असे रुग्ण जर फिजिकली आणि मेंटली फिट असतील तरच ते डिस्चार्ज केले जातात. अन्यथा गरजेनुसार त्यांना मदतनीस, केअरर्र देऊन रुग्णालयामधून सोडण्यात येतं. दिवसातून चार वेळा मदतनीस घरी येऊन मदत करून जातात. ज्यांना घरी ठेवणं जमत नसेल, तर मात्र अशा रुग्णांची रवानगी Nursing Home/ Residential Home होते. काही वेळा डिस्चार्ज झाल्यानंतर नर्सेस घरी येऊन आवश्‍यक तपासण्या करून फॉलोअप ठेवतात. गरजेनुसार रिहॅबिलेटशनही करण्यात येतं. तरुण रुग्ण जो ठणठणीत बरा असेल, तर मात्र तो लगेच घरी जाऊ शकतो. डिस्चार्ज झाल्यानंतर सर्व रुग्णांची चार ते सहा आठवड्यांमध्ये परत रुग्णालयात तपासणी केली जाते. यावेळी आजार संपूर्ण बरा झाला असेल, तर हॉस्पिटल केअरमधून संपूर्णपणे डिस्चार्ज दिला जातो. याबाबतचं सर्व रेकॉर्ड जीपीकडे एका पत्राद्वारे सुपूर्द करण्यात येतं. रुग्णालयांमध्ये वयस्कर लोकासाठी (७५ वर्षांपुढले) खास Geriatric (जेरियाट्रिक) विभाग असतात. जिथं या रुग्णांसाठी खासकरून रिहॅबिलिटेशन, मेमरी क्लिनिकची सोय असते. असे रुग्ण साधारणतः तीन-चार महिने रुग्णालयात बरे होईपर्यंत राहतात.

कॅन्सर विभाग हे इथलं वैशिष्ट्य. प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला निदान आणि उपचार हे मल्टिडिसिप्लिनरी टीमद्वारे (एमडीटी) दिले जातात. कॅन्सर पेशंटना वेगळी नर्स उपलब्ध असते आणि हॉटलाईन नंबरसुद्धा दिलेला असतो. काही इमर्जन्सी आली, तर ते त्वरित रुग्णालयांमधल्या नर्सबरोबर बोलून ॲडमिट होऊ शकतात. एमटीडीटीमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्‍टरांचा समावेश असतो. कॅन्सरवरच्या तपासण्या आणि औषधोपचार हे इतर रुग्णांप्रमाणंच विनामूल्य असतात. शेवटच्या स्टेजमधले रुग्ण हे ‘हॉस्पिस’मध्ये पाठवले जातात- जिथं डिग्निटी आणि कंफर्ट केअर याला प्राधान्य असतं.

रुग्णालयांमधे अनेक विविध प्रकारची क्‍लिनिक असतात. उदाहरणार्थ, मेडिसिन, सर्जरी, पेडियाट्रिक्स, गायनिक, कॅन्सर, फॉल्स क्‍लिनिक इत्यादी. ज्याद्वारे पेशंटचा फॉलोअप केला जातो. कम्युनिटी केअर हे इथलं अजून नावीन्य. लहान मुलांसाठी किंवा ज्या रुग्णांना घरी औषधं देऊन (उदा. दम्याचे रुग्ण, हार्ट फेल्युअर पेशंट) स्टेबल ठेवू शकतो, अशा रुग्णांची तपासणी नर्सेस घरी जाऊन करतात. याद्वारे त्याची रुग्णालयांमध्ये अनावश्‍यक ॲडमिट होणं टाळलं जाऊ शकतं. ज्या पेशंटना रुग्णालयामध्ये येणं जमत नाही, त्यांना नेण्या-आणण्याची सोय एनएचएस अँब्युलन्सद्वारे करते.

टर्शरी हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिस्ट सर्व्हिसेस आणि अत्याधुनिक औषधोपचार, इंटरव्हेंशन्स‌ केली जातात. डिस्ट्रिक्‍ट हॉस्पिटलमधून इथं पेशंट पाठवले जातात. सर्वच रुग्णालयांमध्ये Intensive care unitची सोय असते. टर्शरी हॉस्पिटलमधे अत्यंत दुर्मिळ अशा आजारांवर औषधोपचार होतात. अनेक चर्चासत्रं, व्याख्यानमाला इथं भरवल्या जातात. ज्याद्वारे सर्व डॉक्‍टर्सना अद्ययावत माहिती पुरवली जाते. बहुतांशी अद्ययावत संशोधनं अशा रुग्णालयांमध्येच होतात. यापैकी बहुतांशी रुग्णालयांना Air Ambulance ची सोय असते. विशेषतः अपघातांमधले अत्यवस्थ रुग्ण किंवा ट्रान्स्प्लॅंटची (Transplant) गरज असणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा उपयुक्त ठरते.

एनएचएसद्वारे पुरवली जाणारी long term care/सेवा हे सगळ्यांत मोठं वरदान आहे. पॅरालिसिसचे रुग्ण, डायलिसिसचे पेशंट, रिहॅबिलिटेशन लागणारे रुग्ण, डिमेंशियाचे रुग्ण- ज्यांना २४ तास सेवेची गरज असते, अशा लोकांना रुग्णालयांमध्ये सहा ते आठ महिने राहता येतं. आयसीयूमधून डिस्चार्ज झालेले पेशंट ज्यांना (Tracheostomy) ट्रॅकिओस्टॉमी असते, अशा लोकांना इथं चांगली सेवा मिळते. आता तर टेलिमेडिसिनद्वारे घरी आलेल्या रुग्णावरही रुग्णालयांमधून लक्ष ठेवलं जातं. या सर्व सोयी विनामूल्य असल्यामुळे इंग्लडमध्ये प्रायव्हेट प्रॅक्‍टीस जवळजवळ नगण्यच आहे. पॅलिएटिव्ह (Palliative) care मेडिसिनद्वारे अतिशय कमी काळ जगणाऱ्या रुग्णांना अतिशय कंफर्टेबल असं ठेवलं जातं.

प्रत्येक डॉक्‍टरला जीएमसी नियम पाळणं बंधनकारक असतं आणि दर पाच वर्षांनी त्यांना परीक्षा द्यावी लागते. चूक केली असेल, तर जीएमसीद्वारा कारवाई होऊ शकते. हीच गोष्ट नर्सेस आणि इतर मेडिकल स्टाफबद्दल. त्यामुळे एक प्रकारची वैद्यकीय शिस्त असते. काही औषधं फक्त स्पेशालिस्ट डॉक्‍टरच देऊ शकतात. तसंच मेडिकल प्रिस्क्रिप्शनशिवाय (Prescription) औषधं मिळू शकत नाहीत. त्यामुळे अँटिबायोटिक्‍सचा गैरवापर टाळला जातो. रुग्णालयामधल्या प्रत्येक स्टाफची (डॉक्टरसह) गुणवत्तेवर निवड केली जाते. त्यामुळे गुणवत्ता जोपासली जाते. रुग्णालयामध्ये स्वच्छतेविषयी बरेच कडक नियम असतात. या रुग्णालयांमध्ये विविध देशांतले डॉक्‍टर काम करत असतात. त्यामुळे पेशंटकडे बघण्याचा दृष्टिकोनही व्यापक होतो.

या अनुषंगानं भारतातल्या आरोग्यव्यवस्थेत अजून बरीच सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यासाठी खालीलप्रमाणं प्रयत्न करणं गरजेचं आहे :
१. सरकारी रुग्णालयांमार्फत आजारांचं निदान लवकर होण्यासाठी स्क्रीनिंग उपक्रम राबवले पाहिजेत.
२. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जनजागृती मोहीम आखली पाहिजे.
३. असाध्य रोग आणि कॅन्सरची औषधोपचार प्रणाली ही विनामूल्य अथवा अतिशय नाममात्र दरात द्यायला हवी.
४. एनएचएसच्या धर्तीवर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी (Tertiary) केअर अस्तित्वात यावी. ज्यायोगे पेशंटचा फॉलोअप व्यवस्थित राहील.
५. अद्ययावत शोध/रिसर्च विभाग प्रत्येक रुग्णालयात सुरू केला पाहिजे.
६. रुग्णालयांचे स्वच्छतेचे नियम आणि गुणवत्ता यात शिथिलता असू नये. ज्यायोगे रुग्णास खासगी रुग्णालयाची शक्‍यतो गरज पडू नये.
सध्या आपल्याकडे उत्तम दर्जाची सेवा ही बहुतांशपणे खासगी रुग्णांलयातच मिळते. ज्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. एनएचएसच्या धर्तीवर सरकारी रुग्णालयात वरीलप्रमाणं बदल घडवून आणले, तर या रुग्णालयामधली सेवा ही अतिशय दर्जेदार होईल.
यामुळेच गुणवत्ता आणि वैद्यकीय शिस्त या जोरावर आजतरी एनएचएस ही संस्था इंग्लडमध्ये वरदानच आहे. दुर्दैवानं ब्रिटिश नागरिकांशिवाय याचा कुणीही लाभ घेऊ शकत नाही.
- डॉ. विजय जोशी, लंडन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com