गरज आणि लालसा (एकनाथ पाटील)

एकनाथ पाटील
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

सुतार सावरून बसले आणि सांगायला लागले : ‘‘अहो, माझा मुलगा विजय. इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष आत्ताच त्यानं पूर्ण केलंय. मुलगा हुशार आहे. दहावीत त्याला ८७ टक्के मार्क मिळाले. बारावीत ७० टक्के मार्क मिळाले. त्याची इंजिनिअरिंगची ओढ बघून माझी ऐपत नसताना त्याला इंजिनिअरिंगला घातला; पण आता मला माझी चूक झाली, की काय असं वाटतंय.’’ ‘‘का, असं का वाटतंय तुम्हाला?’’ मी त्यांना अजून बोलतं करायचं म्हणून बोललो. ते म्हणाले : ‘‘अहो, वर्ष झालं, तो स्पोर्टस्‌बाईकच पाहिजे म्हणून सारखा हट्ट करतोय.

सुतार सावरून बसले आणि सांगायला लागले : ‘‘अहो, माझा मुलगा विजय. इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष आत्ताच त्यानं पूर्ण केलंय. मुलगा हुशार आहे. दहावीत त्याला ८७ टक्के मार्क मिळाले. बारावीत ७० टक्के मार्क मिळाले. त्याची इंजिनिअरिंगची ओढ बघून माझी ऐपत नसताना त्याला इंजिनिअरिंगला घातला; पण आता मला माझी चूक झाली, की काय असं वाटतंय.’’ ‘‘का, असं का वाटतंय तुम्हाला?’’ मी त्यांना अजून बोलतं करायचं म्हणून बोललो. ते म्हणाले : ‘‘अहो, वर्ष झालं, तो स्पोर्टस्‌बाईकच पाहिजे म्हणून सारखा हट्ट करतोय. त्याचा शिक्षणाचा खर्च, इंजिनिअरिंगची फी यांनीच मी मेटाकुटीला आलोय, अन्‌ त्यात त्याची ही चैन मला कशी परवडणार बरं?’’

‘‘बाबा बाबा. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज ऐका ना.’’
अत्यंत अडचणीत असलेले आणि वारंवार विनंती करून माझ्याकडे आलेले एक त्रस्त पालक माझ्या सल्ल्यासाठी अभ्यासिकेत वाट पाहत बसले होते. तेवढ्यात माझा मुलगा संतोषची ही मागणी मी जरा नाराजीनंच ऐकली. ‘‘हं बोल संतोष, एवढं काय महत्त्वाचं बोलायचंय तुला? बोल एकदाचा.’’
‘‘अहो बाबा मला आत्ता गार्डनमध्ये ना, विजय भेटला होता.’’ ‘‘कोण विजय? मला काही आठवत नाही.’’
‘‘असं काय करताय बाबा? नाही का तो साधारण वर्षभरापूर्वी तुमच्याकडे समुपदेशनासाठी यायचा, त्याचे वैतागलेले बाबा, स्पोर्टस्‌बाईकचा त्याचा हट्ट आठवलं का?’’
‘‘हां. अरे आठवलं आठवलं, स्पोर्टस्‌बाईक आणि विजय हे कसं विसरेन मी. त्याचं आता नवीन काय?’’
‘‘सांगतो. आज मी जॉगिंग करीत असताना गार्डनमध्ये विजय मला भेटला. मला पाहताक्षणी हसत जवळ येऊन म्हणाला : ‘थॅंक्यू संतोषदादा.’
मी विचारलं : ‘थॅंक्‍यू कशाबद्दल?’ तो म्हणाला : ‘असं काय करतोस, विसरला का भावड्या, स्पोर्टस्‌बाईकच्या माझ्या हट्टानं हताश झालेले माझे बाबा. तुझ्या बाबानी किती मोठा वैचारिक बहुमूल्य व मानसिक आधार आमच्या कुटुंबाला दिला. अडचणीत तूसुद्धा मित्रत्वाच्या नात्यानं काही सूचना दिल्यास म्हणून आज मी भक्कमपणे, निर्धारानं आणि स्वाभिमानाने माझं इंजिनिअरिंगचं तिसरं वर्ष पूर्ण करू शकलो. नाही, तर मित्रा आज माझा वर्तमान आणि भविष्यकाळसुद्धा अंधःकारमय झालेला पाहायला मिळाला असता; पण आज मी शिक्षण करत करत एका फर्ममध्ये पार्टटाइम जॉब करतोय. पैशाचे मोल, कष्टाची किंमत आज मला कळाली आहे. त्याचबरोबर मी बाहेरचे ट्युशन क्‍लास लावलेले नाहीत. संपूर्ण सेल्फस्टडीवर भर देऊन पप्पांचे पैसेही वाचवले आहेत.’ मी म्हटलं : ‘अरे वा. अन्‌ त्या स्पोर्टस्‌बाईकचं काय झालं?’ तो म्हणाला : ‘बाईक ना? योग्य वेळी शिक्षण पूर्ण करून, कुटुंबाच्या निकडीच्या गरजा भागविल्यानंतर, स्वकष्टाच्या पैशातून स्पोर्टस्‌बाईक घेणार आहे. बाईकच्या खरेदीनंतर मला कुटुंबाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आणि समाधान पाहायचं आहे. थॅंक्‍यू पुन्हा भेटूच.’ असं म्हणून तो गेला, बाबा थोडा घाईतच होता तो.’’
‘‘अरे वा! विजयमध्ये एवढा चांगला बदल झाल्याचं ऐकून फार बरं वाटलं,’’ मी म्हणालो. साधारण वर्षभरापूर्वीचा काळ आठवला.

एका शनिवारी विजयचे वडील तानाजी सुतार आणि त्यांचे मित्र मंगेश देसाई अतिशय गंभीर चेहऱ्यानं माझ्यापुढं उपस्थित झाले. ‘‘हं बोला, काय समस्या आहे तुमची,’’ मी विचारलं. ते दोघंही एकमेकांकडं पाहत होते. बोलायला कशी सुरवात करावी हेच त्यांना कळत नव्हतं. मी म्हटलं : ‘‘बोला. काय असेल ते मोकळेपणी बोला.’’
‘‘त्याचं असं आहे साहेब, यांचा मुलगा विजय आजकाल नीट जेवत नाही. कॉलेजला जात नाही. ‘शिक्षण सोडतो’ म्हणून यांना धमक्‍या देतोय. एवढा हुशार मुलगा; पण सध्या फार त्रास देतोय. यांना तर काही कळेनाच झालंय...’’ मंगेश देसाईंनी थोडक्‍यात त्यांची समस्या मांडली. समस्या गंभीर असल्याची मला जाणीव झाली. परंतु, सुतार अजून गप्पच होते. त्यांच्या तोंडून मला समस्या ऐकायची होती.
‘‘हं. बोला सुतार, नेमका प्रॉब्लेम काय आहे ते बोला.’’

‘‘अहो काय सांगू साहेब, आमचं नशीबच फुटलंय, डोळ्यापुढं सारा आंधार पसरलाय. सगळं जणू संपलं असं वाटायला लागलंय, काय करावं काय सुचतच नाही,’’ बोलताबोलता त्यांचा आवाज पार बसला आणि त्यांनी आवंढा गिळला. मी त्यांना समोरच्या ग्लासातलं पाणी प्यायला दिलं. ‘‘प्या पाणी प्या अन्‌ आधी शांत व्हा बरं.’’
सुतारांनी पाणी प्यायलं. दोन मिनिटं शांततेत गेली. मग अंदाज घेऊन त्यांना धीर देत म्हणालो : ‘‘हे पाहा सुतार, प्रत्येक अडचणीवर उपाय आहे, कधी कधी वेळ लागतो; पण उपाय मात्र नक्की असतो. तुमची काहीही अडचण असू द्या. त्यावर आपण मिळून नक्की मार्ग काढू. बोला.’’

आता मात्र ते सावरून बसले. ‘‘अहो, माझा मुलगा विजय. इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष आत्ताच त्यानं पूर्ण केलंय. मुलगा हुशार आहे. दहावीत त्याला ८७ टक्के मार्क मिळाले. बारावीत ७० टक्के मार्क मिळाले. त्याची इंजिनिअरिंगची ओढ बघून माझी ऐपत नसताना त्याला इंजिनिअरिंगला घातला; पण आता मला माझी चूक झाली, की काय असं वाटतंय.’’
‘‘का, असं का वाटतंय तुम्हाला?’’ मी त्यांना अजून बोलतं करायचं म्हणून बोललो.
‘‘अहो, वर्ष झालं, तो स्पोर्टस्‌बाईकच पाहिजे म्हणून सारखा हट्ट करतोय. त्याचा शिक्षणाचा खर्च, इंजिनिअरिंगची फी यांनीच मी मेटाकुटीला आलोय, अन्‌ त्यात त्याची ही चैन मला कशी परवडणार बरं? मी एमआयडीसीत छोट्या कंपनीत काम करणारा साधा कामगार, घरात खाणारी चार-पाच तोंडं, त्यातच आईचं आजारपण, उपचार खर्च, मुलगी आत्ताच दहावी पास झाली, तिचा शिक्षणाचा खर्च... हे सगळं भागवण्यासाठी गेली दोन-तीन वर्षं झाली, मी रोज बारा तास काम करतोय, तेव्हा कसं तरी भागतंय. या पोरांना कळत कसं नाही? भारी कपडे पाहिजेत, महागडे मोबाईल पाहिजेत, वडिलांच्या पैशातूनच यांना गाड्यासुद्धा पाहिजेत, ही आजची पोरं आईवडिलांचा आपल्या परिस्थितीचा विचारच करत नाहीत का?’’ सुतारांनी एकदाचं मन मोकळं केलं.

‘‘माझ्या मुलांची पण हीच तऱ्हा आहे बघा,’’ बराच वेळ शांत बसलेले देसाई म्हणाले. ‘‘मी प्राध्यापक आहे. माझी पत्नी बॅंकेत नोकरी करते, दोघांची कमाई चालू आहे, तरीसुद्धा या आधुनिक काळातल्या सगळ्या गोष्टी पुरवताना आमचीही दमछाक होते. खरंच गरज आहे, की इतरांकडे आहे म्हणून मलाही पाहिजे हा विचार हल्ली कोणी करेनासं झालंय. ही ऊर फुटेपर्यंतची स्पर्धा हाव आपल्याला कुठं घेऊन जाणार? मी सुतार यांचा मित्र आणि शेजारीसुद्धा. एक-दोनदा मी विजयला समजावून सांगितलं; पण तो काही ऐकण्याच्या स्थितीत नाही. ‘गाडी घेतली तर ठीक, नाही तर घर सोडून जाईन’ अशी धमकी देतोय. संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावात वावरतंय. तेव्हा मीच सुतार यांना आपल्याकडून या समस्येवर नक्की मार्गदर्शन मिळेल असा सल्ला दिला. तेही सहज तयार होईनात. आपल्या घरची समस्या चारचौघांत न्यायची कशी, असं त्यांचं मत; पण अशा अडचणींवर, कौटुंबिक समस्येवर आजकाल समुपदेशन हा खात्रीशीर मार्ग आहे, असा विश्‍वास मी त्यांना दिला तेव्हा कुठं ते तयार झाले.’’

‘‘बरं का देसाई, तुम्ही फार चांगला विचार केलात. मी तुम्हाला खात्री देतो, तुमची ही समस्या आपण लवकरच सोडवू, त्यासाठी तुम्ही थोडा संयम राखायला हवा. सुतार, तुम्ही आता मुलांसमोर हा आर्थिक विवंचनेचा विषय टाळा. मुलानं गाडीचा विषय काढला तर हो, बघू प्रयत्न चालू आहेत असं म्हणून विषय थोडक्‍यात संपवा. अजिबात ताण घेऊ नका. दुसरी गोष्ट मला त्याच्याशी थेट चर्चा करावी लागेल. परंतु, तुम्ही त्याला माझ्याबद्दल अथवा भेटीबद्दल लगेच काही सांगू नका.’’
‘‘पण तो तुम्हाला कसा भेटणार आणि मार्ग कसा निघणार?’’ अधीरतेनं देसाई म्हणाले. संमतीदर्शकपणे सुतारांनीही मान हलवली.
‘‘हे पाहा सुतार, घरात काही दिवस एकदम आनंदी व सकारात्मक वातावरण ठेवा. पत्नी आणि मुलीबरोबर सर्व गोष्टी मोकळेपणी बोला, त्यांना विश्‍वासात घ्या आणि घरातसे सर्व जण विजयबरोबर अगदी नॉर्मल आणि मोकळेपणे वागा, त्याला सध्या कोणतेही सल्ले, उपदेश देणं टाळा आणि पुढील आठ दिवसांत त्याला गोड बोलून सहज म्हणून माझ्याकडे घेऊन या. बाकी आपण नंतर बोलूच.’’
‘‘ठीक आहे. आता फक्त तुमचाच आधार आहे. तुम्ही सांगितलं तसं करतो आणि आठ दिवसानंतर विजयला घेऊन येतो,’’ असं म्हणून सुतार आणि देसाई निघून गेले. जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण बराच कमी झालाय असं मला वाटलं.
ते गेले अन्‌ माझं विचारचक्र सुरू झालं. समोरच्या डायरीत विजय आणि त्याच्या कुटुंबाबाबत काही मुद्दे नोंद केले, त्याचबरोबर विजयपेक्षा तीन वर्षांनी मोठा असलेला माझा मुलगा संतोषशी काही मुद्द्यांवर चर्चा केली. दोघे समवयस्क असल्यामुळे संतोषची मदत घ्यायची ठरवलं.

बघताबघता आठवडा निघून गेला आणि सुतार यांचा फोन आला. ‘‘नमस्कार, मी सुतार बोलतोय. उद्या विजयला घेऊन येतो.’’ ‘‘हो. उद्याची वेळ तुमच्यासाठी राखून ठेवतो, उद्या दहा वाजता या. मी वाट पाहातो.’’
मंगळवारचा दिवस उजाडला. सकाळची ठरलेली बैठक लवकरच संपवून मी विजयची वाट पाहत बसलो होतो. मलासुद्धा विजयशी संवाद साधायची उत्सुकता लागली होती. तेवढ्यात ऑफिसची बेल वाजली.
‘‘या सुतार, या बसा.’’
‘‘नमस्कार साहेब, हा माझा मुलगा विजय.’’ ‘‘असं होय गुड मॉर्निंग विजय,’’ ‘‘गुडमॉर्निंग सर.’’
विजय मला स्मार्ट आणि चुणचुणीत वाटला. ‘‘हं बोल विजय, काय चाललंय सध्या.’’ ‘‘काही नाही सर. इंजिनिअरिंगचं सेकंड इअर पासआऊट झालोय.’’
‘‘अरे वा. छान. तुझ्या वडिलांनाही तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे.’’ हे बोलताना मी विजयचा चेहरा बारकाईनं न्याहाळत होतो. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह वाढला; पण काही क्षणच- कारण तो उत्साह लपवण्याचा प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात आलं. आता हीच योग्य वेळ आहे असं समजून मुख्य विषयाला हात घातला.
‘‘मग, कॉलेजला कसा जातोस? स्पोर्टस्‌बाईक वगैरे घेतली की नाही?’’ हे ऐकून मात्र त्याचा चेहरा गोरामोरा झाला.
‘‘न... नाही म्हणजे घ्यायची आहे; पण...’’
‘‘पण तुझे बाबा घेत नाहीत. हो ना?’’
‘‘हो.’’
‘‘पण विजय, ते का घेत नाहीत याचा तू कधी विचार केलास का.’’ आता मात्र तो पूर्ण अस्वस्थ झाला.

काही क्षण शांततेत गेले. ‘‘हे बघ विजय, निसर्गसुद्धा प्रथमिकतेचा क्रम पाळतो. म्हणजे बघ हं. एखादं रोप उगवतं हळूहळू मोठं होतं. त्याला फुलं, फळं येतात. हळूहळू त्याचा प्रचंड विकास होतो, ते जीर्ण होत नंतर लय पावतं. माणसाच्या आयुष्यातसुद्धा असेच टप्पे असतात. बालपण, किशोरावस्था, शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय, कर्तृत्व सिद्ध करणं, नंतर लग्न, मुलं ही निसर्गानं निर्माण केलेली प्राथमिकताच आहे. ती बहुतांशी खरीही आहे. सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहायचं, तर ऊर्जा निर्माण होण्यासाठी कोळशाला जळावं लागतं, पाण्याला उंचावरून कोसळावं लागतं, वाहन धावण्यासाठी इंजिनला इंधनरूपी पुरवठा सतत द्यावा लागतो, हे जग असंच चालतं. इथं आपोआप काही घडत नाही तर घडवावं लागतं, तेही उपलब्ध साधनसामग्रीतच.’’
‘‘विजय, समज तुला कॉलेजमध्ये छोटं क्षेपणास्त्र बनवायला सांगितलं, तर तू काय करशील?’’
‘‘ते कसं शक्‍य आहे सर? त्याचं तंत्रज्ञान माझ्याकडे नाही, पायाभूत सुविधा नाहीत.’’
‘‘अगदी बरोबर. त्यासाठी तुला सर्व गोष्टींची जुळवणी करावी लागेल, तयारी करावी लागेल. मग मला सांग, आता तू लगेच तयारीला लागशील?’’
‘‘नाही सर मला आधी माझं बेसिक इंजिनिअरिंग पूर्ण करावं लागेल, बाकी कितीही इच्छा असली, तरी मला आत्ता ते शक्‍य नाही.’’
‘‘एकदम बरोबर. मग मला सांग, आज तुझ्या कुटुंबाची प्राथमिक गरजा म्हणजेच बेसिक नीडस्‌ काय आहेत?’’ तो विचारात पडला. ‘‘मी सांगतो, संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह, घरखर्च, तुझं, तुझ्या बहिणीचं उच्चशिक्षण या अत्यंत निकडीच्या गरजा अथवा आव्हानं, तुझ्या कुटुंबापुढे आहेत. की हे सर्व सोडून ‘क्षेपणास्त्र’ पाहिजे?’’
‘‘म्हणजे सर?’’

‘‘अरे, वाऱ्याशी स्पर्धा करणारी तुझ्या स्वप्नातली स्पोर्टस्‌बाईक म्हणजे क्षेपणास्त्रच नाही का?’’ आता मात्र विजयचा चेहरा खजिल आणि केविलवाणा झाला. त्याचा संपूर्ण मूडऑफ होण्यापूर्वी मी उठून त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हटलं : ‘‘हे बघ बेटा, नाराज होऊ नको, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते. तुझ्या बाबांनाही खूप आवडेल तुला स्पोर्टस्‌बाईक चालवताना पाहून; पण त्यांनाही मर्यादा आहेत रे. रोज बारा तास काम करतायत, तेव्हा कुठं सगळ्या खर्चाचा मेळ कसातरी बसतोय. त्यांच्या जागी तू असतास, तर स्वतःबरोबर, बाबांचा कुटुंबाचा विचार केला असतास.’’
आता मात्र तो भानावर आला, डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्‍वास दिसू लागला.
‘‘सगळं समजलं सर तुम्हाला काय म्हणायचे आहे, लक्षात आलंय माझ्या.’’
‘‘हे बघ विजय, आपल्याला खूप काही हवं असतं; पण आपण गरज आणि लालसा यांतला फरक ओळखून वागावं लागतं. लालसांची लिस्ट कधीच संपत नसते. मग पटतंय का विजय, की माझं काय चुकतंय.’’ ‘‘सर मला आता माझी चूक समजली आहे, आता स्वार्थी वागणं बंद करणार, प्रॉमिस सर.’’

तेवढ्यात दरवाजावर नॉक झालं. आधी ठरल्याप्रमाणं संतोष दोन कॉफी घेऊन आता आला. मी बळेच विचारलं : ‘‘अरे दोनच कॉफी?’’ ‘‘बाबा, मी आणि विजय गप्पा मारत कॉफी बाहेरच घेतो, चालेल?’’ ‘‘हो, चालेल ना.’’ विजयही उठायची जणू वाटच पाहत होता. दोघं बाहेर गेले आणि एवढा वेळ शांत बसलेले सुतार आनंदाश्रू लपवत माझे हात हातात घेऊन कपाळाला लावत ‘‘खूप खूप धन्यवाद,’’ एवढंच म्हणाले.
महिन्याच्या अंतरानं पुन्हा दोन वेळा विजयशी चर्चा केली. संतोषही विजयशी मोकळेपणी बोलायचा. एका कुटुंबात येऊ घातलेलं वादळ शांत होईल, अशा आशा निर्माण झाली होती आणि आज संतोषकडून, विजयमध्ये झालेला सकारात्मक बदल ऐकून फार समाधान झालं. एका भरकटलेल्या जहाजाला आज दिशा सापडली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang eknath patil write kathastu article