देखरेख हवी काटेकोर!

देखरेख हवी काटेकोर!

रस्तेसुरक्षा ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि प्रत्येकानं आपलं कर्तव्य चोख पार पाडलं, तरी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरच्या अपघातांचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल; पण लक्षात कोण घेतो?

‘भाररतातला पहिला द्रुतगती मार्ग’ म्हणून ओळखला जाणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सध्या गाजतोय तो मात्र त्यावर रोज होणाऱ्या प्राणघातक अपघातांमुळं. गेल्या १६ वर्षांत १४ हजार अपघात आणि जवळपास दीड हजार बळी ही आकडेवारी सुन्न करून टाकणारी आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे, अभिनेता आनंद अभ्यंकर, अभिनेता अक्षय पेंडसे हे कलावंत या मार्गावरच्या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. या सगळ्याला जबाबदार कोण, हे थांबणार कधी, असे प्रश्‍न आता विचारले जाऊ लागले आहेत. मात्र, एकंदरच यंत्रणांचा ढिसाळ कारभार आणि वाहनचालकांची वेगाची ‘नशा’ या दोन गोष्टींबाबत मूलभूत फरक पडल्याशिवाय हे दुष्टचक्र थांबणं अवघड आहे.

या द्रुतगती मार्गावरील अपघातांचे विवरण पाहिलं असता, बहुसंख्य अपघात हे कारचे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो वेगाची ‘नशा.’ गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या कारची नवनवीन अत्याधुनिक मॉडेल बाजारात आली आहेत. ‘पोटातलं पाणी’सुद्धा न हलता ताशी १४० किलोमीटर वेगानं सहज जाऊ शकणारी ही वाहनं या वेगाने पळवण्याची संधी फक्त द्रुतगती मार्गावरच उपलब्ध होत असल्यानं ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ अशा पद्धतीनं या रस्त्यांवर कार धावत असतात. बस/ट्रक ही वाहनंसुद्धा सुसाट जातात. ‘आम्ही सव्वा तासात पुणे ते वाशी प्रवास करतो,’ असं अभिमानानं सांगणाऱ्यांची फौज तयार झाली आहे. या रस्त्यावरची वेगमर्यादा ८० किलोमीटर असली तरी सर्रास १२०-१३० किलोमीटरनं जाणारी असंख्य वाहनं या रस्त्यावरून रोज धावताना दिसतात आणि ८० किलोमीटरच्या गतीनं जाणाऱ्या वाहनांकडं ती अत्यंत तुच्छतेनं आणि ‘कोण हा बावळट या द्रुतगती मार्गावर आलाय?’ या पद्धतीनं पाहतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. या वेगाच्या ‘नशे’पायीच बहुसंख्या अपघात होत असल्याचं आकडेवारी दाखवत असूनही हा वेगाचा आवेग कमी होत नाही, हे दुर्दैव.

आणखी दुर्दैवाचा भाग म्हणजे या वेगाच्या स्पर्धेत बस आणि ट्रक/ टॅंकरसारखी अवजड वाहनंही हिरीरीनं भाग घेत असतात आणि मग वाहनांचा तोल न सांभाळता आल्यानं अपघातग्रस्त होतात. टायर फुटून अपघात होण्याचं प्रमाणही खूप मोठं आहे. टायरमधली हवा वेळच्या वेळी तपासण्याचेसुद्धा कष्ट वाहनचालक घेत नाहीत. या काँक्रिट रस्त्यावर अतिवेगानं जाण्यामुळं टायर हे घर्षणानं खूप गरम होतात व आतली हवा प्रसरण पावल्यामुळं टायर फुटून अपघात होतात, या वस्तुस्थितीचासुद्धा वेगाच्या नशेत बुडालेल्या वाहनचालकांना विसर पडतो.

अर्थात या मार्गावरच्या अपघातांना अन्यही अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे ‘पोलिस यंत्रणे’चं दुर्लक्ष. गेल्या आठवड्यात ‘सकाळ’नं यासंदर्भात केलेल्या पाहणीत पुढं आलेल्या गोष्टी डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. लेनकटिंग, ओव्हरलोडिंग, ओव्हरस्पीडिंग या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी नेमलेले पोलिस दुर्लक्ष करत असल्याचं उघड झालं होतं. या रस्त्यावर ‘स्पीड गन’ घेऊन अतिवेगानं जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करणं अपेक्षित असताना त्याचा मागमूसही दिसत नाही. अवजड वाहनांनी फक्त डाव्या लेनमधून जाणं आणि सगळ्यात उजवीकडची लेन फक्त ओव्हरटेकिंगसाठी वापरणं या मूलभूत गोष्टी या मार्गावर मुख्यत्वे अवजड वाहनांकडून सर्रास धाब्यावर बसवल्या जाताना दिसत असूनही त्यांच्यावर जरब बसेल अशी कारवाई करणारे पोलिस दिसतच नाहीत, असा सार्वत्रिक अनुभव आहे. या रस्त्यावर महामार्ग पोलिस मदत केंद्र, खंडाळा, बऊर पोलिस चौकी, कामशेत बोगद्याजवळची पोलिस चौकी व रिसवडी गावाजवळचं पोलिस मदत केंद्र या चार ठिकाणी पोलिसांचं अस्तित्व अभावानंच आढळतं. या सगळ्यामुळं हा मार्ग पूर्णपणे बेवारस असल्याचं चित्र आहे. संध्याकाळपासून सकाळपर्यंत या रस्त्यावर खोपोली ते लोणावळा या ‘घाट’ सेक्‍शनमध्ये तीनही लेनमधून अवजड वाहनं २०-३० च्या गतीनं घाट चढत असतात आणि मग बस, कार यांना अक्षरशः नागमोडी पद्धतीनं अत्यंत धोकादायक अवस्थेत ओव्हरटेकिंग करण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, तरीही या पट्ट्यात ना पोलिस दिसतात ना टोल कंत्राटदाराची माणसं. त्यातूनच एखादा ट्रक बंद पडण्याच्या व वाहतुकीची कोंडी होण्याच्या घटना रोज घडतात. मुळातच ओव्हरलोड ट्रक या रस्त्यावर येतातच कसे, त्यांना टोल नाक्‍यावरच का अडवलं जात नाही या अत्यंत साध्या प्रश्‍नांची उत्तरंसुद्धा यंत्रणांकडून मिळत नाहीत.

राज्य रस्ते विकास मंडळानं हा रस्ता टोल कंत्राटदाराकडं टोलवसुलीसाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी दिला आहे. मात्र, कंत्राटदार यातले फक्त टोलवसुलीचं काम इमानेइतबारे करताना दिसतो आणि देखभाल-दुरुस्ती आणि देखरेख या कामांत कंत्राटदार करत असलेल्या हलगर्जीपणामुळं अनेक अपघात होतात. मात्र, राज्य रस्ते विकास महमंडळाचे अधिकारी व कर्मचारी या मार्गावर कधीच दिसत नाहीत. या मार्गाच्या दोन्ही बाजूंचं कुंपण अनेक ठिकाणी तुटलेलं असल्यानं गाई, शेळ्या या रस्त्यावर सहज प्रवेश करताना दिसतात. माणसं रस्ता ओलांडत असताना दिसतात, तर या मार्गावर दुचाकी वाहनांना बंदी असूनही दुचाकी वाहनं अनेकदा रहदारीच्या उलट दिशेनं सर्रास येताना दिसतात. मात्र, कंत्राटदाराकडून काही केलं जात नाही आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी लक्षही देत नाहीत. गेल्या वर्षी या मार्गावर आडोशी बोगद्याच्या अलीकडं दरड कोसळली तेव्हापासून या बोगद्याच्या अलीकडची एक लेन एक किलोमीटरपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळं ऐन घाटात या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी होते आणि त्या कोंडीतून सुटल्यावर गेलेला वेळ भरून काढण्यासाठी वाहनं भरधाव जातात. म्हणजेच वाहनांना भरधाव जायला भाग पाडणारी परिस्थिती यंत्रणेनंच निर्माण केलेली आहे. अनेकदा टोल नाक्‍यांवर वाहनांच्या रांगा लागतात. १५-२० मिनिटं या टोल नाक्‍यांवर थांबावं लागलेली वाहने तो वेळ भरून काढण्यासाठी भरधाव जातात. या ठिकाणी तीन मिनिटांत वाहन टोल नाक्‍यावरून पुढं गेलं नाही तर टोल घ्यायचा नाही, या मूलभूत नियमाचं पालन केलं जात नाही आणि रस्ते विकास महामंडळाचं याकडं लक्षही नाही.

मला यासंदर्भात अहमदाबाद-बडोदा व पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची तुलना करावीशी वाटते. हे दोन्ही मार्ग ९० किलोमीटर लांबीचे आहेत; दोन्ही एकाच कंत्राटदाराकडं आहेत. मात्र, अहमदाबाद-बडोदा द्रुतगती मार्गावर जाणारी व येणारी वाहनं यांच्या मधल्या जागेत उंच वाढलेली झाडं आहेत, ही मेडियन उत्तम राखलेली आहे. तिच्यावर कुठंही अधिकृत/अनधिकृत ‘कट’ नाहीत. मार्गावर गुरं, माणसं, दुचाकीचालक अजिबात आढळणार नाहीत. मार्गाचा दर्जा अप्रतिम आहे आणि तरीही या ९० किलोमीटरच्या रस्त्यावर कारसाठी ९५ रुपये टोल आहे आणि रिटर्न टोल सुविधा उपलब्ध असून, तो टोल १४० रुपये आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ९० किलोमीटर रस्त्यावर कुठलीही रिटर्न टोलसुविधा उपलब्ध नाही; एकेरी टोलच १९५ रुपये आहे. शिवाय इतर कोणत्याच बाबतीत हा मार्ग अहमदाबाद-बडोदा मार्गाच्या जवळपासही नाही. मात्र, असं का याचं उत्तर कोणतीच यंत्रणा देणार नाही.

एकुणातच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा वाहनचालकांसाठी रामभरोसे प्रवास करणारा मार्ग ठरत आहे. कंत्राटदाराचं सगळं लक्ष केवळ टोलवसुलीवर आहे, तर पोलिस, रस्तेविकास महामंडळ या यंत्रणांचा तर या रस्त्याकडं बघण्याचा दृष्टिकोनच ‘इदं न मम’ असा निर्विकार आहे. यासंदर्भात तातडीनं हालचाल करण्याची गरज आहे. वाहनचालक, कंत्राटदार, पोलिस व रस्तेविकास महामंडळ या सर्व घटकांनी आपापली कर्तव्यं चोख पार पाडली तरी परिस्थितीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. मात्र, यामध्ये दिखाऊपणापेक्षा प्रामाणिकपणा गरजेचा आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पोलिस, आरटीओ सगळ्या यंत्रणा एकदम कामाला लागल्या आहेत आणि वेगमर्यादेचं उल्लंघन करणं, लेनकटिंग, ओव्हरलोडिंग यांसारख्या बाबींबद्दल दंड/ गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढलं आहे. मात्र, हे तात्कालिक राहू नये. मुख्य गरज आहे वाहनचालकांच्या मानसिकतेत बदलाची; अन्यथा या मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्यातल्या गाड्यांनीच ८० किलोमीटरची वेगमर्यादा ओलांडल्याच्या बातम्या आल्या नसत्या. रस्तेसुरक्षा ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि प्रत्येकानं आपलं कर्तव्य चोख पार पाडलं, तरी अपघातांचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल... पण लक्षात कोण घेतो?

(विवेक वेलणकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com