...त्यांनी ५१ मध्ये मराठी गाणं निवडलं ! (हर्षित अभिराज)

harshit abhiraj
harshit abhiraj

दक्षिणेकडील प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं नुकतंच (२५ सप्टेंबर) निधन झालं. विविध भाषांमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत. मराठीमध्ये देखील ‘निशिगंध’ या अल्बमसाठी त्यांनी तीन गाणी गायली, या अल्बमचे संगीतकार हर्षित अभिराज यांनी तो अनुभव सांगितलाय. ए.पी.बालसुब्रह्मण्यम यांनी ‘साजन’ या हिंदी चित्रपटासाठीही गायन केलं होतं. त्याचे संगीतकार श्रवण राठोड यांनीही त्यांच्या सहवासातील क्षणांना उजाळा दिलाय...

स्थळ अमेरिकेतलं एक शहर, एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची संगीत रजनी सुरू आणि त्यांनी खास मराठी प्रेक्षकांसाठी म्हणून ‘लहरत लहरत, बहरत बहरत आली माझी प्रिया’ हे भावगीत म्हटलं आणि टाळ्याचा कडकडाट झाला, त्यानंतर तिथल्या माझ्या मित्रानं मला फोन करून याची माहिती देत खूप कौतुक केलं. या गाण्याच्या कौतुकाची ही दुसरी वेळ होती त्याआधी एका कार्यक्रमात एस पी. सरांनी त्यांच्या आवडीची ५१ गाणी सादर करायची म्हणून जी गाणी सादर केली त्यात हे गाणं सादर केलं होतं. ज्या व्यक्तींनं वेगवेगळ्या भाषांतली २५ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत, त्यांनी एका मराठी भावगीताला इतका मान दिला आणि त्या गाण्यावर प्रेम केलं. एक संगीतकार म्हणून आपल्याकडून हे काम झालं याबद्दल मला आजही कृतार्थतेची भावना आहे. कलाकारानं खरंतर आपल्या कलाकृतीवर समाधानी असता कामा नये, पण ज्या गायकांच्या कारकिर्दीकडं पाहत मी मोठा झालो तो गायक आपण संगीतबद्ध केलेल्या अल्बममध्ये गाईल असं कधी वाटलं नव्हतं, मात्र ते स्वप्न सत्यात आलं आणि संगीत रसिकांनी ते उचलूनही धरलं.

संगीतकार म्हणून मी वेगवेगळे प्रयोग करत होतो. त्यात एकदिवस माझे सांगलीचे मित्र शांतीवन तोडकर माझ्याकडं आले आणि त्यांनी माझ्याकडं एका मराठी भावगीतांच्या अल्बमचं काम सोपवलं. आम्हा दोघांना जोडणारा दुवा म्हणजे सांगली. मराठी एफ एम वाहिन्या आणि तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून तोडकर यांनी मराठी भावगीतांचा अल्बम तयार करण्याचं नियोजन केलं होतं. त्यांना गायकही वेगळे हवे होते. त्यांची आणि एसपी. सरांची ओळख होती त्यांनी मला त्यांच्याशी फोन लावून दिला, त्यांच्याशी बोलताना माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यांना आम्ही आमचा प्लॅन सांगितला. त्यावेळी माझ्याशी बोलताना ते म्हणाले, ‘‘ तुमच्याकडंची भावगीताची परंपरा मला माहित आहे,’’ त्यांनी ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांची नाव घेतली. त्याचबरोबर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर यांच्या अभंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले ‘‘ मला तुम्ही गाण्यांचा पायलट ट्रॅक पाठवून द्या त्यानंतर आपण मग रेकॉर्डिंग ची तारीख ठरवूया.’’ आम्ही ट्रॅक पाठवल्यावर त्यांनी चार महिने मराठी भावगीतं आणि मराठी गाण्यांचा बारकाईनं अभ्यास केला. मग रेकॉर्डिंगची तारीख ठरली आम्ही दोन दिवसाचा प्लॅन करून चेन्नईला गेलो. आदल्या दिवशी तिथं पोहचल्यावर एसपी. सरांनी आमची आस्थेनं चौकशी केली, आमची राहण्याची नीट व्यवस्था झाली आहे ना? याची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी चार साडेचारच्या सुमारास रेकॉर्डिंगला सुरवात केली आणि त्यांची तीन गाणी रेकॉर्ड करूनच रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही काम संपविले. या अल्बममधील गाण्याचं संगीत संयोजक संदेश हाटे यानं माझ्या मूळ चालींना कुठेही धक्का न लावता नेटकं आणि उत्तम संगीत संयोजन केलंय , साऊंड इंजिनिअर नदीमनं या अल्बमचं उत्तम मिक्सिंग आणि साउंड डिझाइन केलंय. हे काम सुरू असताना मी त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले, ‘‘ तु जो पायलट ट्रॅक केला होतास, तो खूप छान होता माझं निम्मं काम त्यामुळं सोपं झालं.’’ त्यांच्याकडून अशी दाद मिळणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. त्यांची कामाची पद्धत आणि त्यांची शिस्त हे सगळंच वेगळं होतं. निर्माते तोडकर यांच्यामुळं हा अल्बम आमचा खरोखर वेगळा झाला. गीतकार इलाही जमादार यांची सर्व गीतं असलेल्या ‘निशिगंध’या अल्बममध्ये अन्य भावगीतं साधना सरगम आणि वैशाली सामंत तसेच सुदेश भोसले यांच्या आवाजात आहेत. चेन्नईत रेकॉर्डिंग केलेले गाण्याचे ते दोन दिवस आणि एसपी. सरांचा लाभलेला सहवास हे माझ्यासाठी आजही आयुष्यातले अद् भूत क्षण. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत असे ते ४८ सुरेल तास होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com