काळवंडलेलं आयुष्य... (हेरंब कुलकर्णी)

heramb kulkarni
heramb kulkarni

कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर रुपये वाट्याला येणार होते. एका बाजूला कोळशाचे मोठे ढीग आणि दुसरीकडं हे काम. उष्णतेनं ढिगावरचा कोळसा आपोआप पेट घेत होता आणि एक कामगार पाणी मारून ते विझवत होता, यावरून त्या उष्णतेची कल्पना यावी. त्या धगीत ही माणसं वर ऊन आणि शेजारी तापलेला कोळसा अशा स्थितीत भाजून निघत होती... आणि या कामाचे त्यांना मिळणार होते फक्त शंभर रुपये! ते बघून गलबलून आलं.

दगडी कोळसा मोठ्या ट्रकमध्ये भरणं आणि त्याची वाहतूक करणं याचा मोठा रोजगार विदर्भात आहे. त्याचप्रमाणे चुनाभट्टीही आहेत. कोळसा आणि चुना यात काम करणं हे अमानुष तर असतंच; पण त्याचबरोबर आरोग्यावर थेट परिणाम करणारं असतं. यवतमाळ जिल्ह्यात वणी परिसरात ही दोन्हीही कामं मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळं विदर्भात गेल्यावर वणी तालुक्यात गेलो. वणीजवळ लालपुलिया गावात दगडी कोळसा भरण्याचा व्यवसाय आहे, त्यामुळं आवर्जून त्या गावात गेलो. बहुसंख्य मजूर हे छत्तीसगडचे आहेत. अनेक वर्षांपासून हे मजूर हे काम करत आहेत. काही जणांचे जन्म इथंच झाले आहेत. काही मजूर दिवाळी झाल्यावर येतात आणि उन्हाळ्यात निघून जातात. मुळात इतक्या दूर ते का येतात, ही उत्सुकता होती. शेती खूपच कमी आहे, असं ते सांगत होते. ज्यांना शेती जास्त आहे असे लोक येत नाहीत; पण तीन एकरखालचे शेतकरी स्थलांतर करतात. शिवाय आहे ती जमीन फारशी उत्पादक नाही आणि पिकाला भाव मिळत नाही. एकजण म्हणाला : ‘‘हमारे गांव मे सबकुछ सुविधा है- सिर्फ कमाने की सुविधा नही है!’’

तुम्ही काय खाता, असं विचारलं तेव्हा भात जास्त खातो असं ते सांगत होते. ‘‘रोटी कभी कभी करते है शौकसे,’’ असं उत्तर दिलं. हिरवी भाजी आणि डाळी खाण्याचं प्रमाण कमी आहे. दिवाळी ते होळीपर्यंत हे काम वेगात सुरू असतं. २५ मजूर ८० टनांची गाडी भरतात. तेवढी ट्रक भरायला सकाळी ८ ते रात्री ८ इतका वेळ लागतो. रेशन मिळत नाही. त्यामुळं तांदूळ आणि डाळ स्वत: विकत घेतात. मजुरीचा बराचसा हिस्सा त्यावर खर्च होतो. घरात लाईट नाही; पण तरीही हे लोक विजेच्या खांबांवर आकडे टाकत नाहीत. आम्ही ऐन उन्हाळ्यात गेलो होतो; पण पंखा नसलेल्या पत्र्याच्या खोलीत ते झोपत होते. रात्री डास खूप चावतात, म्हणून बाहेरही झोपता येत नाही. इतकी अमानुष जगण्याची रीत. शिवाय गाडी भरण्याचं काम रोज मिळतंच असं नाही. अशा वेळी हे कामगार गवंड्याच्या हाताखाली काम करायला जातात किंवा नदीतली वाळू भरण्याच्या कामाला जातात. तिकडं फारतर दोनशे रुपये मिळतात. हे सर्व मजूर तिकडच्या मागास जातीतले आहेत.

कोळसा भरण्याची मजुरी किती मिळते, असं विचारलं. २५ टनचा ट्रक रिकामा करण्याचे एकेकाला चारशे रुपये मिळतात. २५ टन कोळशाचं वजन आणि त्याची विषारी धूळ झेलत ट्रक रिकामा करायला लागणारा वेळ आणि त्याचा हा अत्यल्प मोबदला. या कामगारांची संघटना होत नाही, त्यामुळं मजुरीचे दर वाढत नाहीत. गेल्या पाच वर्षांत फक्त पन्नास रुपये दर वाढला आहे. म्हणजे एका वर्षाला फक्त दहा रुपयाची वाढ. पुन्हा हे काम करताना पन्नास रुपये नाश्त्यावर खर्च होतो. उन्हात तोंड सुकून जातं, त्यामुळे सतत खर्रा खाल्ला जातो. दिवसाला किमान तीन खर्रे हे मजूर खातात. त्यात रोज साठ रुपये जातात आणि त्याचा परिणाम हे व्यसन वाढण्यात होतं. त्यातून हातात फार तर दोनशे रुपये उरतात आणि पुन्हा हे काम रोज नसतं ते वेगळंच. कोळसा भरताना नाका-तोंडात कोळशाची धूळ जाते. त्यातून विविध आजार होतात. पुन्हा त्यांना प्रत्येक प्रकारचे पैसे मोजावे लागतात. राहण्याच्या जागेचे पैसे द्यावे लागतात. लाईटचे महिन्याला तीनशे रुपये द्यावे लागतात, तर पाणी जिथून आणतात तिथं अडीचशे रुपये द्यावे लागतात. मला खरं तर तहान लागली होती; पण पाणी मागावंसं वाटेना. पुन्हा चुलीत इंधन म्हणून दगडी कोळसा ट्रकमधून भरताना उचलून आणतात म्हणून किमान तो इंधन खर्च तरी वाचतो. भात हेच मुख्य अन्न असल्यानं महिन्याला पन्नास ते सत्तर किलो तांदूळ लागतो. रेशनकार्ड नसल्यानं रेशनचे तांदूळ मिळत नाहीत, त्यामुळं रेशन दुकानदार तांदूळ काळ्या बाजारात विकतात आणि ते तांदूळ या गरिबांना खूप चढ्या भावानं घ्यावं लागतात. त्यावर त्यांचा खूप खर्च होतो. रेशनकार्डं त्यांना हवी असतात. यासाठी दलालांनी त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतल्याचं काहीजण सांगत होते. दिवसभर उन्हात राबून मिळालेली अल्प मजुरी जमा करून पाच हजार रुपये देऊनही त्यांच्या वाट्याला फसवणूक आली आहे. उघड्यावर राहताना स्वच्छतागृहं नसतात. महिलांची खूप गैरसोय होते. याउलट शासनानं नेमलेलं पथक या गरिबांना सतत कॅमेरे घेऊन कारवाई करण्याची धमकी देतं- यामुळं महिला आणि या गरीब लोकांची खूप गैरसोय होते. या स्थितीत लहान मुलं सोबत आणत नाहीत. अनेकांनी मुलं शिक्षणासाठी तिकडं गावाकडं ठेवली होती. महिलांना भेटलो. सोबतचे कार्यकर्ते दिनानाथ वाघमारे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्न विचारले. कुपोषित लहान मुलांची काळजी घेण्यास आणि गरोदर महिला आणि बाळंत महिला यांची काळजी घेण्यास कोणीच येत नाही. कोणतंच कागदपत्र जवळ नाही. बाळंत असलेल्या महिलांना दूध येत नव्हतं आणि मुलांना विकतचे दुध देऊ शकत नव्हत्या.

कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. ऐन मे महिना. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर रुपये वाट्याला येणार होते. लांब रांग करून ते उभे होते. टोकरीत कोळसा भरून तो पुढं पुढं दिला जात होता. एका बाजूला कोळशाचे मोठे ढीग आणि दुसरीकडं हे काम. उष्णतेनं ढिगावरचा कोळसा आपोआप पेट घेत होता आणि एक कामगार पाणी मारून ते विझवत होता, यावरून त्या उष्णतेची कल्पना यावी. त्या धगीत ही माणसं वर ऊन आणि शेजारी तापलेला कोळसा अशा स्थितीत भाजून निघत होती. आणि या कामाचे त्यांना मिळणार होते फक्त शंभर रुपये. ते बघून गलबलून आलं. अवघ्या शंभर रुपयासाठी स्वत:ला त्या भट्टीत भाजून घेणारी ती माणसं आज काम मिळत होतं म्हणून समाधानी होती. पुन्हा कोळशाचा ट्रक रिकामा करताना बघितलं. दोघंजण लांब दांडा घेऊन त्यात पाठमोटी उभी होती. दोन पायांतून कोळसा पाठीमागं ढकलत राहावं लागतं. ते करताना हात आणि पाय खूप भरून येतात.
***

दगडी कोळसा बघितल्यावर मग आम्ही चुना तयार करतात ती भट्टी बघायला गेलो. दूर गावाबाहेर चुना बनवण्याची भट्टी होती. पान खाताना आणि बांधकाम करताना इतकाच आपला चुन्याशी संबंध येतो; पण हा चुना बनतो कसा, हे बघण्याची उत्सुकता होती. मजूर परभाषिक होते. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडवरून आलेले होते.
चुनखडीचे अगदी मोठेमोठे डोंगर असतात तिथून चुनखडीचे ट्रक भरून आणले होते आणि ते ढिगारे दुरून दिसत होते त्याच्या शेजारी दगडी कोळशाचे ढिगारे होते. चुना कसा बनतो, हे बघितलं. चार मोठ्या आकाराच्या ट्रॉलीमधून चुनखडीचे दगड आणि एक ट्रॉली दगडी कोळसा असं प्रमाण असतं. उंचावर असलेल्या भट्टीत या ट्रॉली क्रेननं नेल्या जातात आणि ओतल्या जातात. १४०० डिग्री सेल्सियस तापमानात हे मिश्रण भाजलं जाते आणि मग त्याचा चुना बनतो. आम्ही वर चढून ती भट्टी बघितली, तेव्हा त्या भट्टीजवळ इतक्या आगीत ते मजूर कसे जात असतील, याची कल्पनाच करवेना. ऐन मे महिन्याच्या त्या विदर्भातल्या सर्वांत तीव्र उन्हात मजूर वेगवेगळी कामं करत होते. एकीकडं आलेला कोळशाचा ट्रक रिकामा केला जात होता. दुसरीकडं अगोदर रिकामा झालेल्या ट्रकमधला कोळसा टोकरींमध्ये भरून काही महिला तो ट्रॉलीच्या जवळ नेत होत्या. काही मजूर चुन्याच्या दगडांचा ट्रक रिकामा करत होते, तर काही मजूर त्या चुन्याचे दगड त्या ट्रॉलीत आणून टाकत होते. काही मजूर ती ट्रॉली वर नेणं, भट्टीत पाडणं, तापमान बघणं अशी कामं करत होते आणि दुसरीकडं तयार झालेला चुना पोत्यात भरण्याचं काम सुरू होतं. मी उत्सुकतेनं कामगारांना कोणत्या कोणत्या कामाची किती मजुरी मिळते, हे विचारत होतो, तेव्हा ते अल्प रकमा सांगत होते. चुनाभट्टीच्या खाली तयार झालेला चुना गोणीत भरून उचलण्याची मजुरी तीन रुपये गोणी. एका गोणीत तीस किलो चुना असतो. पैसे मिळावेत म्हणून बिचारे मजूर दिवसाला दोनशे गोण्या उचलण्याचा प्रयत्न करतात; पण मजुरी पाच रुपये करावी, असं काही मालकाला वाटत नाही. कोळसा आणि चुन्याच्या दगडानं ट्रॉली भरायची शंभर रुपये मजुरी. २५ टोकरी टाकल्यावर एक ट्रॉली भरते आणि १५ ते २० मजूर एकत्र हे काम करीत राहतात. कोळसा टोकरींत भरून ट्रॉलीपर्यंत नेण्याचे कष्ट उन्हात बघवत नाहीत. अगोदर तो मोठ्या आकाराचा कोळसा घणानं फोडावा लागतो. मी ते अनुभवायला घण हातात घेऊन दोन- तीन घण मारून बघितले, तर एक कोळसाही नीट तुटेना. तेव्हा त्या कष्टाची कल्पना आली. आपण शारीरिक कष्टापेक्षा बौद्धिक कष्ट श्रेष्ठ म्हणत आपल्या पगाराचं समर्थन करत राहतो; पण शारीरिक कष्ट करून बघितल्यावर त्यातला फोलपणा लक्षात येतो. टोकरी उचकून बघितली, तर एका टोकरीचं वजन २० ते २५ किलो असतं. ती उन्हात घेऊन चालायचं. इतक्या उन्हात किमान नऊ तास ही सर्व कामं केल्यावर दिवसाला तीनशे ते चारशे रुपये मिळतात. या मालकानं मजुरांसाठी पक्क्या खोल्या बांधून वीज-पाणी उपलब्ध करून दिलं होतं, एवढीच काय ती समाधानाची गोष्ट होती.

ऐन उन्हाळ्यात पंख्याखाली उन्हाची चर्चा करताना या माणसांच्या वाट्याला येणारे हे अमानुष कष्ट आणि अल्प मोबदला बघून गलबलून येत होतं आणि ते बिचारे काम मिळतं आहे, यानंच समाधानी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com