'नरक' साफ करणारी माणसं... (हेरंब कुलकर्णी)

heramb kulkarni
heramb kulkarni

"गटारसफाईच्या कामामुळं तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होतात,'' असं एका सफाई-कामगाराला विचारलं असता त्यानं वेगळ्या पद्धतीनं या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. तो म्हणाला ः 'आमच्या वस्तीत म्हातारा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा.'' यातल्या "सूक्ष्म'; पण दाहक विनोदावर सगळेच जण जोरात हसले. मात्र, त्या हसण्याला विषण्णतेची किनार होती.

हॉटेलच्या सेप्टिक टाकीची साफसफाई करताना सात मजुरांच्या मृत्यूची बातमी काही दिवसांपूर्वी वाचली. चटका लावून गेली.
ही दुर्घटना बडोद्याजवळची होती. अशा दुर्घटना अनेकदा घडततात;
ठिकाणांची नावं तेवढी वेगळी.

"कचराकोंडी' ही अतुल पेठे यांची फिल्म बघितल्यापासून सफाई-कामगारांच्या वेदनेनं काळीज हलवलं होतं. गटारात डुबकी मारणारे त्यातले केविलवाणे चेहरे अजूनही विसरता येत नाहीत. तेव्हा या समूहाच्या वेदना समजून घेण्याचं ठरवलं. सकाळी सकाळी पुणे शहराच्या महापौर बंगल्याजवळच्या वॉर्ड ऑफिसला पोचलो. जेसीबीनं काम सुरू होतं. शहरातून आलेल्या गाड्या मोठ्या गाडीत कचरा रिकामा करत होत्या. सकाळच्या शांत वातावरणात फक्त मशिनचा आवाज येत होता. सगळीकडं उठणारा धुरळा आणि पसरलेला वास. तो वास परिचित नसल्यानं सहन करणं कठीण. कुणी पाणी मारत होतं. कामगार येणं, कपडे बदलणं, सही करणं हे अनेक कामगारांचं सुरू होतं. आम्ही काहीजण वॉर्ड ऑफिसमध्ये बसलो होतो. पुणे महापालिका कामगार संघटनेचे (मान्यताप्राप्त) नामदेव लोंढे यांनी काही सहकारी एकत्र जमवले होते. कुणीतरी आपलं दुखणं समजून घ्यायला आलं आहे याचं त्यांना अप्रूप वाटत होतं. रोज सकाळी हे लोक तिथं जमतात आणि नागरिकांच्या तक्रारी दूर करायला वेगवेगळ्या ठिकाणी निघतात.
'तक्रारी कोण करतं?'' मी विचारलं. यावर सगळेच जण म्हणाले ः 'कोण करत नाही ते विचारा! तक्रारी ऑनलाईन येतात, फोनवरून केल्या जातात.''
नगरसेवक-कार्यकर्ते यांच्याकडं
वॉर्डातले लोक तक्रार घेऊन गेले की त्या तक्रारदारांसमोरच नगरसेवक-कार्यकर्ते इकडं फोन करतात. हे फोन सतत येत राहतात; पण त्याच वेळी दुसरीकडं कुठंतरी काम सुरू असतं. ते आधी पूर्ण करावं लागतं; पण कार्यकर्ते ऐकत नाहीत. ते सतत बोलावत राहतात.

या प्रकारात कामगारांची खूप ओढाताण होते. आम्ही बसलो होतो तिथं आनंद नावाचा तरुण पकडलेला साप घेऊन आला होता. तो
सफाई-कामगार असून सर्पमित्रही होता. तो म्हणाला ः 'अनेक ठिकाणी जुन्या गटारांमध्ये उंदीर-घुशी होतात व तिथं साप निघतात.'' असा कुठं साप निघाला की आनंदला अनेक ठिकाणी बोलावलं जातं. एकूणच, सफाई-कामगारांचं हे काम वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमींचं होतं, हे जाणवलं.
प्रत्यक्ष गटार साफ केलं जात असताना मला बघायचं होतं. त्यासाठी मी कामगारांसोबत निघालो. सगळे आपापल्या स्वयंचलित दुचाक्‍यांवरून निघाले. प्रत्येक दुचाकीवर दोघं दोघं होते. गर्दीतून जाताना आमचा रस्ता चुकत होता. एकानं हातात मोठा दांडा घेतला होता. "त्या दांड्यावर लक्ष ठेवा म्हणजे बरोबर आमच्या मागं मागं याल व रस्ता चुकणार नाही', असं कामगारांपैकी एकानं सुचवलं. त्यानुसार केलं. अखेर संगमवाडी पुलाजवळ पोचलो. त्या पुलाच्या आजूबाजूला अनेक वस्त्या होत्या. एके ठिकाणी गटार तुंबलं होतं. डोक्‍यावर मे महिन्यातल्या 12 वाजताचं कडक ऊन्ह होतं. आजूबाजूची घरं बंद होती. हे लोक दिसताच काही दारं किलकिली झाली. काही लोक बाहेर आले व "किती गटार तुंबलंय' असं सांगत ते लांबूनच दाखवत त्यांनी दारं पुन्हा बंद करून घेतली.

गटाराचं प्रचंड जड झाकण उचलून बाजूला टाकण्यात आलं. ते उचलून टाकणं हे मोठं कठीण काम होतं. ते पायावर पडण्याची शक्‍यता असते. सफाई-कामगारांनी घामाघूम होत ते झाकण उचलून टाकलं. प्रत्येकी पाच फुटांच्या 20 गजांचा संच सोबत होता. त्यांना स्क्रू असतात. एकेका गजाला स्क्रू लावून लांबी वाढवली जाते. अशा प्रकारे गज 25 ते 30 फूट लांब केले जातात व त्या गजांच्या आधारे गटारं स्वच्छ केली जातात. तीन-चार जणांनी एकदम काम सुरू केलं आणि गटारीच्या तोंडात अडकलेला कचरा बाजूला काढला...हे काम बराच वेळ चाललं. कडाक्‍याच्या उन्हात असं बराच वेळ काम करत राहिल्यानं आता सगळेच घामाघूम झाले होते.. ऊन्ह वाढल्यानं तिथं थांबणं मला अशक्‍य झालं. मी दूर एका घराच्या सावलीत जाऊन उभा राहिलो व तिथून गटारसफाईचं काम पाहू लागलो.

कामगारांना तहान लागली होती. आजूबाजूच्या घरांतून पाणी मागून त्यांनी ते प्यायलं. घाम पुसला आणि ते पुन्हा कामाला लागले. निघालेला गाळ त्यांनी बाजूला टाकला. कचरा हटताच पाणी वाहतं झालं. घामेजलेल्या चेहऱ्यांवर हसू दिसलं. पुन्हा एकदा ताकद लावून ते प्रचंड जड झाकण कामगारांनी गटारावर बसवून टाकलं. मोठ्ठा आवाज झाला. "काम झालं आहे,' असं कामगारांनी आजबाजूच्या लोकांना सांगितलं आणि ते पुढच्या कामासाठी निघाले. त्यांच्या गाडीमागं आमची गाडी. एका कॉलनीच्या टोकाला गटाराचं मोठं झाकण. हे गटार खूप खोल होतं. त्यामुळे कामगारांना थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले. पुन्हा गजाला गज जोडून लांब गज तयार करण्यात आला आणि अडकलेला कचरा काढण्याचं काम सुरू झालं. कचरा बाहेर येऊन पडू लागला. हा कचरा प्लास्टिकचा आणि हॉटेलच्या पदार्थांचा, अन्नपदार्थांचा
असल्याचं स्पष्ट झालं.

'अडकलेला कचरा कोणकोणत्या प्रकारचा असतो? '' असं विचारल्यावर त्यांच्यापैकी एक सफाई-कामगार म्हणाला ः 'साहेब, सांगताना लाज वाटते; पण लोकांनी काही गोष्टी व्यवस्थितपणे करायच्या ठरवल्या तर आमचं काम कमी होईल. अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स स्वच्छतागृहात किंवा गटारांमध्ये टाकले जातात. ते वाहत येऊन गटारांच्या तोंडाशी अडकतात व सांडपाण्याचा प्रवाह रोखला जातो. महिलांनी हे टाळायला हवं. याशिवाय, थर्मोकोल, चिंध्याही गटारात खूप वेळा सापडतात.''

हॉटेलांविषयी हा कामगार खूप वैतागून बोलत होता. जिथं जिथं हॉटेलं आहेत तिथं तिथं गटार तुंबतं, हा या कामगारांचा अनुभव आहे.
वास्तविक, हॉटेलचं गटार जिथं जोडलं जातं तिथं एक जाळी बसवणं आवश्‍यक असतं जेणेकरून हॉटेलातले टाकाऊ अन्नपदार्थ तिथंच अडकून राहतील व गटाराचा प्रवाह तुंबणार नाही. मात्र, सगळ्याच हॉटेलांकडून हे पाळलं जातं असं नाही आणि त्यामुळे अन्नपदार्थ, धुलाईची पावडर, कचरा असं सगळं एकमेकांना चिकटून मोठे लगदे तयार होतात. असे लगदे तसंच आणखीही बऱ्याच प्रकारचा कचरा त्या कामगारानं मला दाखवला.

हा कामगार पुढं म्हणाला ः ' याशिवाय, चौकाचौकात असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या उरलेले खाद्यपदार्थ, कचरा, खरकटं गटारात टाकत राहतात व गटारं तुंबतात व आमचं काम वाढतं. पूर्वी वॉर्डमधली लोकसंख्या कमी होती. आता ती कित्येक पटींनी वाढली आहे. मोठ्या इमारतींची संख्या वाढली; पण तेव्हा असलेली कामगारसंख्या मात्र त्या प्रमाणात पुढच्या काळात वाढली नाही. त्यामुळे कामाचा खूपच ताण येतो. अनेकदा ड्युटी आठ तासांपेक्षाही जास्त होते. कामावरून घरी निघताना फोन येतो व मग जावंच लागतं. कधी कधी तुंबलेल्या गटारातला कचरा साफ केल्यानंतरही गटार मोकळं होत नाही. नेमकी समस्या काय असावी ते सापडत नाही, अशा वेळी ते काम अर्धवट सोडून जाता येत नाही. पुढचे कित्येक तास काम सुरूच राहतं. दिवाळी किंवा महत्त्वाच्या सणावारांनाही कामाच्या ड्युट्या असतातच. पावसाळ्यात तर खूपच तणाव असतो. गटारात न उतरता जेटकिंग मशिननं सफाई होऊ शकते; पण ती मशिन्स संख्येनं कमी आहेत. त्यामुळे आम्हाला गटारांत उतरावंच लागतं.''

पुणे महापालिका कामगार संघटनेविषयी सर्वांच्याच मनात खूप आस्था आणि कृतज्ञता दिसली. संघटनेमुळे गणवेश, बोनस, वेतन, भत्ते, वारसांना कामावर घेणं, 25 वर्षांच्या नोकरीनंतर घर अशा अनेक सुविधा मिळाल्याचं
कामगारांनी सांगितलं. आरोग्यविषयक सुविधाही संघटनेमुळेच मिळतात. कामगार कल्याण निधीचीही स्थापना झालेली आहे.
कधी अपघात झाला, कुठं अन्याय झाला तर संघटना मदतीला धावते. शिष्यवृत्ती मिळते; पण तरीही कामगारांच्या मुलांची शिक्षणातून गळती मोठ्या प्रमाणात होत राहिली आणि पुढची पिढी पुन्हा याच कामात येत गेली. मात्र, आता चित्र हळूहळू बदलत आहे. मुलं-मुली शिकू लागल्या आहेत.

'तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार या कामामुळं होतात,'' असं एका सफाई-कामगाराला विचारलं असता त्यानं वेगळ्या पद्धतीनं या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. तो म्हणाला ः 'आमच्या वस्तीत म्हातारा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा.'' यावर सगळेच जण जोरात हसले. मात्र, त्या हसण्यात एक प्रकारची विषण्णता होती. या कामाच्या स्वरूपामुळं सफाई-कामगार जास्त वर्षं जगत नाहीत. त्यांना विविध प्रकारचे आजार जडतात. गटारांत मेलेले उंदीर आणि घुशी असतात. त्यांच्या संसर्गानं आजार जडतात. त्वचेचे आजार होतात. खरुज आणि गजकर्ण होतो. क्षयरोग तर अनेकांना हमखास गाठतो. रक्ताच्या गाठी होतात. घाणीत काम करताना ती घाण सहनीय व्हावी यासाठी काहीजण नशेचा मार्ग अवलंबतात आणि मग पुढं ते व्यसनच जडतं. या आणि अशा अनेक कारणांमुळे या सफाई-कामगारांचं आयुर्मान कमी होऊन जातं.

एक कामगार म्हणाला ः 'गटारीत तारा, इंजेक्‍शनच्या सुयाही वाहत आलेल्या असतात. त्या हाता-पायांत घुसतात. अशा प्रकारे जखम होऊन एका कामगाराच्या पायाला नंतर गॅंगरिन झालं होतं.'' गेल्या काही वर्षांत कोणकोणते सहकारी मरण पावले याविषयी ते कामगार एकमेकांत चर्चा करू लागले. ती चर्चा ऐकल्यावर या कामातली भयावहता लक्षात आली.
तो कामगार पुढं म्हणाला ः 'इतकं करूनही आम्हाला कुणीच आदरानं वागवत नाही. प्रशासन, नगरसेवक आणि लोक असे सगळेच आम्हाला कामचुकार समजतात. काही कारणांमुळं तक्रार दूर करायला लवकर पोचता आलं नाही तर शिवीगाळ केली जाते. काही ठिकाणी लोकांनी चेंबरवर घरं बांधलेली आहेत. गटारसफाई अथवा त्यासंदर्भातल्या अन्य दुरुस्तीच्या वेळी हे रहिवासी घराला कुलूप लावून निघून जातात. त्यामुळे अनेक चकरा माराव्या लागतात. "गटारातला कचरा साफ करताना खराब झालेली फरशी धुऊन द्या', असं आम्हाला सांगितलं जातं. अशा कितीतरी अडचणी असतात.''
आणखी एक कर्मचारी म्हणाला ः ' हे सांगताना लाज वाटते; पण लोक साधाही विचार करत नाहीत. एकदा आमचे लोक मोठ्या गटारात दुरुस्तीसाठी उतरले होते. जवळच्या घरातल्या लोकांनी ते बघितलं होतं तरी त्यांनी त्या वेळी संडास वापरला आणि ती घाण कर्मचाऱ्याच्या अंगावर पडली.''
या कामगारांच्या घरच्या स्थितीविषयी विचारलं असता त्याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांच्या बायका इतरांकडं धुणी-भांडी करायला जातात, तर काहीजणी गृहिणीच आहेत. मुलं मात्र आता सगळ्यांचीच शिकतात.

संगम पुलाजवळचं काम आवरलं. या कामगार संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर यांना भेटलो. त्यांनी या कामगारांना आत्मविश्वास दिला आहे, त्यामुळे त्यांना भेटावंसं वाटलं. त्या म्हणाल्या ः 'हे काम अमानुष आहे; पण लोक सहजपणे "सफाई-कामगारांना सवय झालेली असते' असं असंवेदनशीलतेनं बोलतात. या कामात कंत्राटीकरण ही नवीच समस्या आली आहे. या कामगारांना मॅनहोलमध्ये उतरायला भाग पाडलं जातं. या कामगारांना नोकरी आणि मोबदला या दोन्हींची शाश्वती नाही आणि त्यांना संघटित करणं हेही तसं खूप कठीण आहे. कायमस्वरूपी कामगारासारखेच याही कामगारांचे प्रश्न सोडवणं हे संघटनेला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सफाई-कामगारांना आजवर 563 घरं मिळवून देण्यात आली आहेत. आता उर्वरित घरं मिळवून देण्यासाठीचा लढा सुरू आहे.''
मेहतर कामगारांना भोगाव्या लागणाऱ्या वेदनांचं वेगळंच जग
मुक्ताताईंनी मांडलं. त्या म्हणाल्या ः 'झोपडपट्ट्यांजवळ लोक अजूनही उघड्यावर संडास करतात. या महिलांना ती रस्त्यावरची, रस्त्याकडेची घाण साफ करावी लागते. तिथले महापालिकेचे संडास पाण्याअभावी घाणच राहतात. ही अशी कामं वारंवार करावी लागत असल्यानं महिला सफाई-कामगार नैराश्‍यानं, वैफल्यानं वेढल्या जातात.''

निघताना सोबतचे मित्र अशोक व्यवहारे म्हणाले ः 'शिकलेल्या माणसांनी घाण करायची आणि निरक्षर माणसांनी ती साफ करायची...यात शिकलेला कोण, असा प्रश्न पडतो.''
सॅनिटरी नॅपकिन्स, थर्मोकोल, हॉटेलांमधले, हातगाड्यांवरचे उरलेले टाकाऊ खाद्यपदार्थ याबाबत महिला, कामगार, हॉटेलचालक या सर्व घटकांनी व्यवस्थित काळजी घेतली तर या जित्या-जागत्या माणसांना या नरकात विनाकारण उतरावं लागणार नाही, असं सहजच वाटून गेलं.
आपल्या बेफिकिरीमुळे, आपण करत असलेल्या घाणीमुळे काहींचं आयुष्य पणाला लागतं ही जाणीव लज्जित करून गेली. "आरक्षण हटवा' अशी मागणी करताना दलितांसाठीच पिढ्यान्‌पिढ्या असलेलं गटारसफाईचं हे आरक्षित काम कधी संपणार?
"कचराकोंडी' फिल्म मधली जयंती मकवाना यांची अंगावर येणारी कविता आठवली ः
- मॅनहोलचं झाकण उघडताना घुसत येणारा
सहस्र सडलेल्या सुंदर शवांचा सु-वास
सवलीच्या आईनं उपडं केलेलं मळाचं डबड
नि दूर नागडा फिरणारा माझ्या पिढीचा वारसदार
बस्स "हेच' आमच्यासाठी "आरक्षण'?

National commission for safai workers च्या माहितीनुसार, दर पाच दिवसांनी एका सफाई-कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू होतो. ही आकडेवारी केवळ बातम्यांवर आधारित आहे. संघटनेच्या मते ही संख्या याहूनही कितीतरी जास्त आहे. "राष्ट्रीय ग्रामीण अभियाना'तल्या सर्वेक्षणनुसार, 15 ते 25 वयोगटातले 37 टक्के, तर 35 ते 45 वयोगटातले 23 टक्के सफाई-कामगार मृत्यू पावतात. त्यातले 94 टक्के सफाई-कामगार दलित आहेत.'

पत्रकार अमर शैला यांच्या अभ्यासानुसार, या कामगारांना मलेरिया, क्षयरोग, डेंग्यू, त्वचेचे विकार, कावीळ यांसारखे आजार सतत होत असतात. पायाला जखमा होऊन इन्फेक्‍शन होण्याचं प्रमाणही मोठं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com