वळण (किशोर कर्वे)

kishor karve
kishor karve

देविका काही क्षण थांबली आणि एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलू लागली, ‘‘तुला खरं सांगू, विश्वास? मला तू आवडायचास, मला नेहमी वाटायचं, की जर आपलं लग्न झालं, तर मी खूप सुखी होईन, तुला पण खूप सुखात ठेवीन, पण माझ्या मनातल्या या भावना कोणाजवळ आणि कशा व्यक्त कराव्यात हे मला समजत नव्हतं. मी प्रमिलाजवळसुद्धा कधी बोलू शकले नाही. मग माझ्या आई-वडिलांशी बोलणं खूपच दूर. माझं मन तुझ्याजवळ कसं व्यक्त करावं हे मला कधीच कळलं नाही.’’

लग्नाच्या हॉलमध्ये विश्वासराव गर्दीपासून थोडेसे दूर बाजूला एका खुर्चीत जाऊन बसले आणि लोकांना न्याहाळू लागले. हॉलमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. छान नटलेल्या स्त्रिया गप्पागोष्टी करत होता, हसत होत्या. सारं काही आनंदमय होतं.
विश्वासरावांना दोन स्त्रिया त्यांच्या दिशेनं येताना दिसल्या. एक त्यांची धाकटी बहीण प्रमिला होती. दुसरी कोण हे कळेपर्यंत त्या विश्वासरावांपर्यंत येऊन पोचल्या.
‘‘विश्वास कुठं आहे म्हणून विचारत होतीस ना?’’ प्रमिला त्या स्त्रीला म्हणाली. ‘‘बघ, इथं बसला आहे. विश्वास ओळखलस का हिला? ही देविका.’’
विश्वासरावांनी देविकाकडे पाहिलं. वय झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसत होत्या. केसांना कलप लावून ते काळे केल्याचं कळत होतं, पण मूळचा मोहकपणा कायम होता. मान किंचित खाली करून, डोळे वर करून पाहण्याची लकबही तशीच होती.
‘‘देविका, हिला मी कसं ओळखणार नाही, ’’ विश्वासराव हसून म्हणाले.
‘‘तुम्ही बसा इथं गप्पा मारत. मी एक-दोन कामं उरकून येते,’’ असं म्हणून प्रमिला निघून गेली. विश्वासरावांनी बाजूची ख्रुची ओढून समोर ठेवली आणि ते म्हणाले, ‘’बस देविका इथं.’’
देविका बसली. विश्वासराव तिला न्याहाळत राहिले. काही क्षण शांततेत गेले. ‘‘किती वर्षांनी भेटतोय आपण.’’ देविका म्हणाली. ‘‘अधूनमधून तुझ्याबद्दल प्रमिलाकडून समजायचं, पण भेटीचा योग नाही आला कधी.’’
‘‘होय, खूप वर्ष झाली,’’ विश्वासराव म्हणाले. ‘‘लग्नानंतर तू बंगलोरला गेलीस आणि नंतर अमेरिकेला.’’
‘‘होय, लग्नानंतर मी बंगलोरला गेले. तिथं वर्षभर होतो आम्ही. नंतर यांनी दुसरां जॉब घेतला आणि आम्ही अमेरिकेला गेलो आणि पंचवीस वर्षे तिथंच राहिलो. मी दोन महिन्यांपूर्वी पुण्याला आले.’’
‘‘मी म्हणजे? तुझे मिस्टर....?’’ ‘‘माझे मिस्टर चार महिन्यांपूर्वी आम्ही अमेरिकेत असतानाच गेले. माझा मुलगा आणि सून आहेत तिथं, पण दोघंही त्यांच्या नोकरीत, त्यांच्या व्यापात गर्क. घरात ना मूलबाळ. त्यामुळे मी दिवसभर घरात एकटी. हे होते तोपर्यंत ठिक होतं, पण मग मला एकटेपणा जाणवायला लागला. शेवटी मी निर्णय घेतला, की आपण पुण्याला येऊन राहायचं. मुलाला फारसं पटलं नाही, पण मला तिथं राहणं अवघड झालं होतं. इथं कसं आपल्या माणसात आहोत, असं वाटतं. इथं माझा भाऊ आहे, गरज पडली, तर हाकेला ओ देणारे शेजारी आहेत. त्यामुळे मी आता इथंच राहायचं ठरवलं आहे.

‘‘आय सी’’ विश्वासराव म्हणाले. देविका गप्पा झाली. तिच्याकडे पाहताना विश्वासरावांच्या डोळ्यासमोरून जुने प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे झरझर जाऊ लागले.
देविका विश्वासरावांच्या धाकट्या बहिणींची, प्रमिलाची मैत्रीण. सर्व एकाच कॉलेजमध्ये. प्रमिला आणि देविका दोन वर्षं मागे. कधी मधी कॉलेजमध्ये देविका दिसायची, प्रमिलाबरोबर घरी आली, तर दोघांची नजरभेट व्हायची. एक-दोन वाक्यांचं संभाषण व्हायचं. तो काळ असा होता, की मुलांनी मुलांशी मैत्री करायची आणि मुलींनी मुलींशी. मुलांचा ग्रुप वेगळा, मुलींचा ग्रुप वेगळा. अशा परिस्थितीत मुलानं आणि मुलीनं बोलणं, एकत्र येणं, किवा मैत्री करणं जवळजवळ अशक्य होतं. तो काळ असा होता, की एखादा तरुण मुलगा आणि तरुण मुलगी एकत्र दिसले, तर संशयानं पाहिलं जायचं. मुलाची मैत्रीण किंवा मुलीचा मित्र ही कल्पनाच अस्तित्वात नव्हती.
जेव्हा जेव्हा विश्वासची देविकाबरोबर नजरानजर व्हायची, तेव्हा तेव्हा त्याला तिच्या नजरेतून काही तरी वेगळं जाणवायचं. असं वाटायचं, की ती तिच्या नजरेतून त्याला काही तरी सांगायचा प्रयत्न करत आहे. पण दोघांमध्ये कधी बोलणं होऊ न शकल्यामुळे पुढं काहीच घडायचं नाही.
विश्वासचं कॉलेज संपल्यावर, कॉलेजमध्येच कुठल्याशा समारंभात देविकाची आणि त्याची भेट झाली होती. थोड्या गप्पा झाल्या होत्या. त्यावेळी विश्वासला तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचं तिथं असणं खूप हवंहवंसं वाटलं होतं, पण लगेचच देविकाची एक मैत्रीण देविकाचा हात ओढून तिला घेऊन गेली होती.
या प्रसंगानंतर विश्वासची आणि देविकाची भेट झाली ती देविका तिच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका प्रमिलाला देण्यासाठी घरी आली तेव्हा. त्या वेळी प्रमिला घरात नव्हती आणि त्यामुळे देविकानं निमंत्रणपत्रिका विश्वासला दिली. देविकानं लग्न ठरल्याचं सांगताच, अभावितपणे विश्वासच्या तोंडून निघून गेलं होतं- ‘हू इझ द लकी बॉय?’ आणि त्यावर देविकानं चमकून त्याच्याकडे पाहिलं होतं. पत्रिका देताना, देविकाचे डोळे भरून आले होते. तिचे ते पाणावलेले डोळे पुढचे अनेक दिवस त्याला अस्वस्थ करत राहिले होते.

विश्वास लग्नाला गेला नाही. काही दिवसांनी त्याला समजलं, की देविका बंगलोरला गेली आहे. मग पुढं केव्हा तरी कानावर आलं, की ती अमेरिकेत असते. त्या दिवसानंतर अनेक वर्षानंतर आज पुन्हा त्यांची भेट होत होती....
‘‘हेलो, अरे कुठे हरवला आहेस तू?’’ देविका म्हणाली. विश्वासरावांनी चमकून तिच्याकडे पहिले आणि कसनुसं हसून म्हटलं, ‘‘काही नाही. काही जुन्या गोष्टी आठवत होत्या.’’
देविकानं हास्य विनोदात गर्क असलेल्या तरुण मुलामुलींकडे निर्देश केला आणि म्हटलं, ‘‘ही मुलं-मुली किती मोकळेपणाने वागताहेत, टाळ्या देताहेत, गळ्यात हात टाकताहेत, आणि पाहणाऱ्यांनाही ते खटकत नाहीये. आपल्या वेळी असं नव्हतं. असं असतं, तर किती बरं झालं असतं?’’
‘‘काय बरं झालं असतं?’’ ‘‘आपणही आपल्या मनातल्या भावना मोकळेपणानी व्यक्त करू शकलो असतो.’’
विश्वासराव ऐकत राहिले. देविका काही क्षण थांबली आणि एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलू लागली, ‘‘तुला खरं सांगू, विश्वास? मला तू आवडायचास, मला नेहमी वाटायचं, की जर आपलं लग्न झालं, तर मी खूप सुखी होईन, तुला पण खूप सुखात ठेवीन. पण माझ्या मनातल्या या भावना कोणाजवळ आणि कशा व्यक्त कराव्यात हे मला समजत नव्हतं. मी प्रमिलाजवळसुद्धा कधी बोलू शकले नाही. मग माझ्या आई-वडिलांशी बोलणं खूपच दूर. माझं मन तुझ्याजवळ कसं व्यक्त करावं हे मला कधीच कळलं नाही. तुला सांगायची कधी संधी मिळाली नाही किंवा माझा कधी धीरच झाला नाही. शिवाय मनात कुठं तरी ही पण भीती होती, की तुला माझ्याबद्दल तसं काही वाटत नसेल तर! मनात अशा अनेक शंका, त्यामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम मी माझ्या मनातच कुठं तरी खोलवर दडवून ठेवलं. वडिलांनी माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली, तेव्हाही त्यांना माझ्या मनातलं सांगण्याचा मला धीर झाला नाही. माझं लग्न झालं, पण कधीकधी वाटायचं, की आपलं चुकलं का? माझ्या मनात जे होतं, ते मी सांगायला हवं होतं का? आयुष्याच्या आता या वळणावर मला हा प्रश्न सतावतो आहे. जे केलं ते बरोबर की चूक? कधीकधी वाटतं, की आपलं चुकलंच! जर मी बोलले असते, तर कदाचित माझं आयुष्य...’’
‘‘तुझं काहीही चुकलेलं नाही,’’ विश्वासराव म्हणाले. ‘‘किंवा तुझं जर काही चुकलं असेल, तर माझंही चुकलं. आता सांगतो. मला पण तू आवडायचीस. मी तू दिसण्याची, माझ्याशी बोलायची वाट पाहायचो, पण मीही फक्त तुझा विचार करत राहिलो. तुझ्याजवळ माझं मन व्यक्त करण्याचा माझाही कधी धीर झाला नाही.’’
‘‘तुझ्याप्रमाणं मलाही भीती वाटायची, की मला जे जाणवतं आहे, तो जर माझ्या मनाचाच खेळ असेल तर? कधी वाटायचं, आत्ता बोलण्याऐवजी योग्य वेळ येईल तेव्हा आपण आपलं मन व्यक्त करू, पण ती योग्य वेळ येण्यापूर्वीच तू तुझ्या लग्नाची पत्रिका घेऊन आलीस.’’

विश्वासराव गप्प झाले आणि पुन्हा बोलू लागले. ‘‘देविका यात कोणाचंही काहीही चुकलेलं नाही. आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात, की तुम्हाला दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा असतो. तुमच्यापुढं दोन मार्ग असतात आणि तुम्हाला एक कोणता तरी निवडायचा असतो. तुम्ही निर्णय घेता, एक मार्ग निवडता, किंवा परिस्थिती तुम्हाला एक मार्ग निवडायला भाग पाडते किंवा तुमच्या नकळत एक मार्ग तुमच्याकडून स्वीकारला जातो. मग मार्गक्रमणा करताना, मागं वळून पाहताना, तुम्हाला प्रश्न पडत राहतो, की दुसऱ्या मार्गानं गेलो असतो, तर योग्य झालं असतं का? दुसऱ्या मार्गानं मी अधिक चांगल्या ठिकाणी पोचलो असतो का? माझा प्रवास अधिक सुखदायक आणि आनंददायक झाला असता का?
‘‘हे म्हणजे कसं असतं सांगू? तुम्ही संध्याकाळी कारनं घरी परतत असता, खूप ट्रॅफिक असतं. घरी जाण्यासाठी दोन रस्ते असतात. तुम्ही एक निवडता आणि जात राहता, तुम्ही निवडलेल्या रस्त्यावरही तुम्हाला खूप ट्रॅफिक लागतं, वेळ लागतो, उशीर व्हायला लागतो आणि तुम्हाला सारखं वाटत राहतं, की आपला निर्णय चुकला तर नाही ना? आपण दुसऱ्या रस्त्यानं जायला हवं होतं का? गमतीची गोष्ट अशी, की तुम्ही दोन्हीपैकी कोणताही रस्ता निवडलात, तरी हेच आणि असंच घडतं. खरं म्हणजे मी दुसऱ्या रस्त्यानं जायला हवं होतं का, या प्रश्नाला उत्तर नसतं आणि असलंच तरी आपण ते शोधायचं नसतं. नाही तर निवडलेल्या रस्त्यानं जाताना त्या रस्त्यावरच्या चांगल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला लागतो, प्रवासातला आनंद आपण गमावू लागतो.’’

‘‘देविका, त्या वेळी जे घडलं ते घडलं. तुझं कुणाशी तरी लग्न झालं, माझंही कुणाशी तरी लग्न झालं. मला खात्री आहे, तू तुझं आयुष्य सुखात जगली असणार. मीही माझं आयुष्य सुखात, आनंदानं जगलो. दुःखाचेही प्रसंग आले असणार, पण ते सर्वांनाच येतात. समजा आपल्या दोघांचं लग्न झालं असतं, तर आपल्या आयुष्यात काय वेगळं घडलं असतं? आपलं आयुष्य अधिक सुखी झालं असतं का? अधिक आनंदी झालं असतं का? या प्रश्नांची उत्तरे, देविका, माझ्याकडे, तुझ्याकडे किंवा कोणाकडेही नाहीत.
‘‘अशा परिस्थितीत जे घडलं तेच घडणार होतं, असं समजून जे वाट्याला आलं आहे, त्याचाच आदर करून आयुष्य चांगल्या प्रकारे जगणं हेच योग्य आणि श्रेयस्कर नाही का?’’
प्रमिलाला आलेले पाहून विश्वासराव गप्पा झाले.
‘‘काय, गप्पा संपल्या वाटतं? प्रमिला हसत म्हणाली. ‘‘देवकी, चल, अजून काही ओळखीचे लोक दाखवते तुला.’’
देविका उठली. ‘‘देविका, जायच्याआधी तुझा मोबाईल नंबर देऊन जा, म्हणजे पुन्हा भेटता येईल,’’ विश्वासराव म्हणाले.
देविकानं हसून होकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com