Latest Marathi Article | खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Father Figure

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे!

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल   

पवन सर अर्थातच आमचे भाऊसा यांनी काबाडकष्टातून गरिबीवर मात केली होती. त्यांनी शिक्षणातही नाव कमावले. त्यांच्या नोकरीतील कमाईवर त्यांनी अनेकांना आपल्या पायावर उभे केले. त्यांच्या निधनानंतर गावातील आदिवासी वस्तीतील लोकांनी जो शोक व्यक्त केला, तेव्हा आम्हाला भाऊसांची खरी कमाई कळाली. (Saptarang Latest Marathi Article by Dr Hemant Ostwal Nashik News)

हेही वाचा: गोष्ट माझ्या बायपासची

भाऊसा आणि बाईचा संसार म्हणायला स्थिरावत होता खरा; परंतु आर्थिकदृष्ट्या भेडसावणारी चणचण फारशी कमी होत नव्हती. व्हायचे कारणही नव्हते. कारण भाऊसांना जरी दोन पगार येत असले तरी ते किती होते बरे! शिक्षकाचा पगार ११३ रुपये अधिक संस्थेच्या व्यवस्थापकाचा पगार १०० रुपये, असे दोन्ही मिळून फक्त २१३ रुपये असले तरीही भाऊसांचे आणि अर्थातच बाईचेही लक्ष नेहमीच शिक्षणावर राहत होते. आता शिक्षण म्हणजे सर्वांत पहिले भाऊसांचे स्वतःचे शिक्षण... भाऊसा नोकरीला लागलेले होते, तरीही भाऊसांची शिकण्याची इच्छा काही कमी होत नव्हती. त्याकाळी आजच्यासारखे करस्पाँडन्स कोर्स नव्हते किंवा मुक्त विद्यापीठही नव्हते.

वडिलांची नोकरी तर अशी होती, की सकाळी साधारणतः पावणेसातच्या सुमारास वडील घरातून बाहेर पडायचे. मध्ये दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या तासाचा अपवाद वगळता रात्री साधारणतः साडेआठ ते नऊच्या दरम्यान घरी परत पोचायचे. हे सर्व अव्याहतपणे चाललेले असायचे. म्हणजे भाऊसांना ना कधी रविवारची सुटी माहिती ना कधी दिवाळी-दसरा, ना कधी संक्रांत-गुढीपाडवा. अगदी कित्येक जवळच्या नातेवाइकांच्या लग्नांना शक्यतो मी आणि बाईच जात असू. अगदीच जिथे गरज असेल तिथे भाऊसा आले तरी दोन-चार तास. एक ते दोन दिवस भाऊसा फारच क्वचित कोणाकडे लग्नकार्याला किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला आलेले असतील.

ते फार फार तर एक-दीड दिवस; याच्यावर मी भाऊसांना कुठे गेलेले बघितले नाही. संस्थेच्या कामाशिवाय त्यांनी आम्हालादेखील कधी बाहेरगावी फिरायला नेल्याचे आठवत नाही. जवळपास नाहीच. संस्था, शाळा आणि ते अगदी घट्ट असे ते नाते होते. दिवाळीच्या दिवशी ९९ टक्के नव्हे, तर शंभर टक्के संस्थेचे कर्मचारी सुटीवर असायचे. फक्त आणि फक्त भाऊसा एकटे तेथे ड्यूटीवर असायचे. एवढी मोठी ती संस्था आणि त्या संपूर्ण परिसरात भाऊसा अक्षरशः एकटे असायचे आणि भरीस भर म्हणून रात्री मला एकट्याला एवढ्या मोठ्या संस्थेत झोपण्यासाठी, ऑफिस सांभाळण्यासाठी पाठवून देत असत. मुळात त्या काळी एकदा सायंकाळ झाली, की संस्थेच्या रस्त्यालाच कोणी जात नसेल.

कारण संस्थेच्या रस्त्यावर आदिवासी वस्ती सोडली की चिंचबन लागत असे. तेथे भरपूर मोठमोठी चिंचेची झाडे होती. त्या काळी चिंचबनामध्ये चिंचेच्या झाडांवर भूत-पिशाच्च राहतात, असा समज होता. त्यामुळे एकदा सायंकाळ झाली, अंधार पडला, की त्या रस्त्याला कोणी जायचा प्रश्नच येत नव्हता. कोणीही सहसा तिकडून जात नसे. याला आमचे भाऊसा अपवाद होते आणि अर्थातच त्यांच्यापाठोपाठ मीही अपवाद होतो. अमावास्येच्या दिवसांत दिवाळी असते.

चिंचबनामध्ये पथदीप वगैरे असा काही प्रकार त्या काळी नव्हता. संपूर्ण काळाकुट्ट अंधार असे. अगदी आपला हातदेखील डोळ्यासमोर आणला तरी तो दिसत नसे इतका भीतिदायक असा अंधार असे. एका बाजूला मुस्लिम समाजाची दफनभूमी होती. म्हणजे भीतीमध्ये अजूनच भर पडत असे. अशा ठिकाणाहून जाताना ना कधी भाऊसा घाबरले ना मला कधी घाबरू दिले. कशालाही, कुठेही, कधीही न घाबरण्याची शिकवण मला माझ्या भाऊसांनी त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनक्रमामधून दिली. अशा सकारात्मकतेचे अनेक धडे, वस्तुपाठ त्यांनी आपल्या जीवनक्रमामधून दिला.

हेही वाचा: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

आजही मला सुटी घ्यायला आवडत नाही. मीदेखील रविवार असो की दिवाळी-दसरा, संक्रांत असो की गुढीपाडवा... मी रोज अगदी सकाळी आठ-साडेआठपासूनच आमच्या सुयश हॉस्पिटलला जाणार म्हणजे जाणार; परंतु ही हजेरी नुसती शारीरिकच लावायची का? नाही. वडील दिवसाचे १४-१४ तास कामावर संस्थेमध्ये जात होते. १४-१४ तास शारीरिक हजेरी असायची; परंतु त्या बरोबरीने भाऊसा त्या वेळेचा खूपच चांगला सदुपयोग करून घेत होते. त्या काळी त्यांनी श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल या संस्थेचे नाव रोशन करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता.

असो, त्यांची एवढी व्यस्त दिनचर्या असूनही त्यांची शिक्षणाची आवड जरादेखील कमी झालेली नव्हती. त्या काळी बाहेरून हिंदीच्या परीक्षा देता यायच्या. बालप्रबोधिनीपासून पंडित वगैरे त्याच्याही पुढच्या परीक्षा हिंदीत असायच्या. अशा जवळपास सर्व परीक्षा भाऊसांनी दिल्या. सर्व परीक्षांमध्ये भाऊसांना खूपच छान घवघवीत यश मिळत गेले. भाऊसांची मेहनत सफल होत गेली आणि त्यांना केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे हिंदी पारंगत या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी १९७१ च्या तुकडीमध्ये प्रवेश मिळाला. ही परीक्षा पदवीधर + बी.एड. म्हणजे जसे बीएस्सी बी.एड., बी.ए. बी. एड. समकक्ष होती. कोर्स फक्त एक वर्षाचा होता.

हा कोर्स झाल्यानंतर भाऊसांच्या पगारातदेखील चांगला फरक पडणार होता. सर्वांना खूप आनंद झाला; परंतु भाऊसांना नाइलाजास्तव हा अभ्यासक्रम सोडावा लागत होता. कारण अर्थातच आर्थिक होते. भाऊसांची नोकरी राहणार होती; परंतु बारा महिने पगार बंद राहणार होता आणि हाच सर्वांत मोठा अवघड प्रश्न भाऊसा आणि बाईसमोर उभा ठाकला होता. त्यात आम्ही चार बहीण-भावंडे, सोबत आमच्या बाईचे आई-वडील म्हणजे आमचे नानाजी-नानीजीदेखील आम्हाला मामा नसल्याने आधीपासूनच आमच्याबरोबर राहत होते. एवढ्या जणांचे पोट आमच्या भाऊसांच्या नोकरीवर म्हणजेच पगारावर अवलंबून होते.

तो पगार एक महिना, दोन महिने नव्हे, तर तब्बल बारा महिने बंद राहणार होता. त्यामुळे भाऊसांनी आणि बाईंनी खासकरून भाऊसांनी आपल्या आयुष्यातील एवढी मोठी सुवर्णसंधी सोडायची ठरविली. शिक्षणाला तिलांजली द्यायचे ठरविले आणि त्यांनी आग्रा येथील हिंदी पारंगतला जायचे रद्द केले. हा त्यांचा निर्णय तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष (स्व.) जितमलजी छाजेड यांना समजला. त्यांनी भाऊसांना त्याच सेकंदाला संस्थेचा निर्णय दिला.

‘‘पवन, तू बिनधास्त जा. तुझ्या कुटुंबाची, कोणाचीही काळजी करू नकोस. आम्ही ती काळजी घेऊ. तुझा संपूर्ण पगार बिनदिक्कतपणे सुरू राहील याची तू खात्री बाळग.’’
भाऊसा आणि बाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. भाऊसांचे शिक्षणही सुरू राहणार होते आणि सोबत पगारदेखील. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ या उक्तीचा अनुभव त्या वेळी बाई-भाऊसांना नक्कीच आला. अशा रीतीने भाऊसा आपल्या पुढील शिक्षणासाठी आग्रा येथे एक वर्षाकरिता रवाना झाले.

हेही वाचा: कुणालचे हात का भाजले?

भाऊसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही कष्टांची पराकाष्ठा करीत सकारात्मकतेने आतापर्यंत संस्थेकरिता जे काही काबाडकष्ट २४×७×३६५ × वर्षानुवर्षे करीत होते दैवानेदेखील त्याचे फळ पूर्ण सकारात्मकतेने त्यांच्या पदरात टाकले होते आणि आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या हिमतीने, कष्टाने सकारात्मकतेने सुरू ठेवलेला शिक्षणाचा गाडादेखील दैवाने सुरू ठेवायचा ठरविला होता. यावरून आपणा सर्वांना अंदाज आलाच असेल, की भाऊसा स्वतःच्या शिक्षणासाठी एवढ्या गरिबीमध्ये, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, जवळपास अशक्य अशा परिस्थितीमध्ये किती सजग होते आणि म्हणूनच निव्वळ आणि निव्वळ त्यांच्या सकारात्मकतेच्या जोडीला अत्यंत काबाडकष्ट यामुळेच त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत व्यवस्थित पार पडले.

भाऊसा जसे स्वतःच्या शिक्षणाबाबत सजग होते त्याहूनही जास्त ते इतरांच्या खासकरून समाजातील, तळागाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाबद्दल सजग होते. याविषयी जर मी लिहायला सुरवात केली तर मला जागाच पुरणार नाही, यात काहीही शंका नाही. कारण याविषयीच्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. मग तो विद्यार्थी श्री नेमिनाथ जैन बोर्डिंगचा असू दे, की श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचा की संस्थेच्याच आर्ट्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजचा की इतर कोठे उच्चशिक्षण घेत असलेला किंवा इतर कोणत्याही शाळेचा असू दे; भाऊसांनी प्रत्येकाला मनापासून सर्वार्थाने आधार दिला.

कित्येकांचे शिक्षण निव्वळ आणि निव्वळ भाऊसांच्या सकारात्मक प्रयत्नांनी शक्य झालेले आहे. याचे शेकडो साक्षीदार आज संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात नक्कीच सापडतील. गरज असायची ती त्या विद्यार्थ्यांमधील शिक्षणाच्या आवडीची ज्यांनी म्हणून आपल्या हुशारीची चुणूक दाखविली, हुशारी दाखविली त्याला भाऊसांनी शंभर टक्के मदतीचा हात सर्वार्थाने दिला. भाऊसांची पक्की खात्री होती, की कुठल्याही घरामध्ये एक जण जरी शिक्षित झाला, सुशिक्षित झाला, तर त्या संपूर्ण कुटुंबाची घडी व्यवस्थित बसू शकते. त्याच्यापाठोपाठ खासकरून पुढच्या पिढीचे शिक्षण नक्कीच व्यवस्थित होते.

मग ते कुटुंब मागे वळून बघत नाही. याचा प्रत्यय मला स्वतःला अनेकदा आला आहे. शेकडो विद्यार्थ्यांची घरे सेटल होताना मी बघितली आहेत आणि येथे मला सार्थ अभिमानाने नमूद करावेसे वाटते, की भाऊसांनंतर त्यांचा हाच वारसा आम्हा बहीण-भावंडांच्या पिढीने आणि आता आमच्या आलेल्या नवीन पिढीनेदेखील समर्थपणे शिक्षणासाठी अनेक गरजवंतांना मदत करीत सुरू ठेवला आहे. भाऊसांच्या शिक्षण या विषयातील योगदानाबद्दल आणखी खूप काही लिहिण्यासारखे आहे. अर्थातच अडचण आहे ती नेहमीप्रमाणे जागेची.

आपण भाऊसांच्या पुढच्या पैलूकडे वळू या. भाऊसांनी संस्थेचे नाव तर मोठे केलेच, त्याचबरोबर अनेक गरजू, होतकरू अशा कितीतरी लोकांना भाऊसांनी नोकरीला लावले. अशा गरजू लोकांच्या कुटुंबामध्ये एकाला जरी नोकरी मिळाली, तरी ते संपूर्ण घर स्थिरस्थावर होत असे. मी याचा साक्षीदार आहे. अनेक घरे स्थिर करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मला अशा अनेक घटना आठवतात, त्यातलीच एक घटना प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो.

हेही वाचा: एक अन्याय होता होता वाचला

मला आठवतो तो एक रविवार होता. (आठवण्याचे कारण असे की फक्त त्याच दिवशी आमच्या भाऊसांबरोबर आम्ही बहीण-भावंड जेऊ शकत असू. कारण इतर दिवशी आम्ही शाळेत गेलेलो असू आणि मग भाऊसा घरी येऊन मोजून अर्धा तासात जेऊन परत संस्थेत जात असत.) चांदवडजवळच्या एका गावातून सहावीत शिकणारा मुलगा भाऊसांना शोधत शोधत घरी आला. भाऊसांना विनंती करू लागला, ‘‘सर, कृपया मला नादारीमध्ये म्हणजे फ्रीशिपमध्ये संस्थेमध्ये प्रवेश देऊन शिकण्याची संधी द्या. माझ्या घरी माझे शिक्षण पैशाअभावी बंद करण्यात आले आहे. मी आज घरून अक्षरशः घरच्यांना न विचारता पळून आलो आहे.

माझ्याकडे पुढील शाळा शिकण्याकरिता दुसरा काहीही पर्याय नाही; अन्यथा मला गावातील रोजंदारीवरच्या कामाला जाण्यासाठी माझ्या घरचे मला भाग पाडतील आणि म्हणून मी पळून आलो आहे. कृपया मला मदत करा.’’ शिक्षण हा मुळातच भाऊसांचा अत्यंत नाजूक विषय असल्याने त्यांनी त्वरित त्याला मदतीचा हात दिला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सर्व सत्य परिस्थिती समजावून सांगत त्याची ॲडमिशन त्वरित नादारीमध्ये करून घेतली. कपड्यालत्त्यांपासून वह्या-पुस्तकांपर्यंत सर्व काही त्याला घेऊन दिले.

अशा रीतीने एक मुलगा जो शिक्षणापासून वंचित राहत होता, ज्याचे आयुष्य अन्यथा दुसऱ्यांच्या शेतांवर मोलमजुरी करण्यात गेले असते तो मुलगा तर मागे राहिलाच असता, सोबत ते संपूर्ण घरदेखील नक्कीच मागे राहिले असते. मला सांगायला आनंद होतो, हा मुलगा खूपच चांगला शिकला. मी इथे मुद्दामहून संपूर्ण तपशील लिहित नाही. कुणाचेही नाव अशा पद्धतीने उघड करणे म्हणजे भाऊसांनी जे आयुष्यभर जपले ते म्हणजे एका हाताने कोणालाही मदत केली असेल, तर ते मदतकार्य दुसऱ्या हातालादेखील ते कळू देत नव्हते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो, हजारो लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली.

मी येथे जर त्यांची नावे घेतली तर एक प्रकारे भाऊसांनी आयुष्यभर पाळलेल्या व्रताचा भंग होईल, असे मला वाटते. म्हणून हा मुलगा पुढे जाऊन काय शिकला, काय झाला हेसुद्धा सांगायचे मी कटाक्षाने टाळले आहे. एवढेच मला आनंदाने सांगावेसे वाटते. हा मुलगा म्हणजे हे कुटुंब आजही आमच्या संपर्कात आहे. वेळोवेळी सणावाराला बाईचा आशीर्वाद घेण्यासाठी, बाईला भेटण्यासाठी ते आवर्जून येत असतात. आता त्यांचा मुलगा अमेरिकेला शिकण्यासाठी गेला आहे. असो. ही एक वेगळी गोष्ट झाली. भाऊसांना जेथे म्हणून ज्या प्रकारची अडचण दिसली मग भलेही ती शिक्षणासाठी पैशांची असू दे, पैशांअभावी वह्या-पुस्तकांची असू दे, राहण्याची गैरसोय असू दे सर्व प्रकारच्या अडीअडचणींमधून भाऊसांनी प्रत्येक अडलेल्या मुलाला मदतीचा हात देऊन त्याचे शिक्षण पूर्ण करण्यास मोलाची मदत केली आहे. सिंहाचा वाटा उचलला आहे.

भाऊसांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने भरीव प्रयत्नांनी जसे बाहेरच्या अगदी कित्येक अनोळखी लोकांचेदेखील शिक्षण पूर्ण झाले तसेच आमच्या जवळपास प्रत्येक नातेवाइकाचा मुलगा अथवा मुलगी आमच्याकडे शिकून आज आपापल्या आयुष्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने स्थिर होऊन सुखाने जीवनक्रम जगत आहेत. अगदी लग्नानंतर जवळपास सव्वा ते दीड वर्षानंतर जसे घर मांडले तसे पहिल्या दिवसापासून अगदी १९८६ मध्ये भाऊसा स्वर्गवासी झाल्यानंतरदेखील आमच्या बाईने तो वारसा चांदवडला समर्थपणे म्हणजे १९८८ पर्यंत चालवला. आमचे घर असेपर्यंत आमच्याकडे हमखास एकाच वेळी तीन ते चार मुले-मुली सहज असत.

आमच्या बाई, भाऊसांचे वैशिष्ट्य असे होते, की आमच्याकडे जी जी मुले-मुली राहत होती त्यांची काळजी पोटाच्या मुलापेक्षाही भाऊसा-बाई शंभर टक्क्यांहून अधिक घेत होते. अगदी त्यांचे खाणे-पिणे, शिक्षण, धार्मिक शिकविण्यापासून वेळच्या वेळी त्यांच्या सर्व गोष्टी करून देणे या सर्व गोष्टी बाई-भाऊसा प्राधान्यक्रमाने करीत असत. अगदी आमच्याकडे त्यामध्ये दुर्लक्ष झाले तरीही अशी यादी करावयाची म्हटली, तर ती सहजच दीड-दोन डझनाच्या पुढे जाते.

हेही वाचा: तू टिकली लाव...

या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये भाऊसा शिस्तपालनाच्या बाबतीतदेखील खूपच जागरूक होते. संस्थेतील विद्यार्थ्यांना हे चांगल्या पद्धतीने माहीत असल्याने विद्यार्थ्यांना पवन सरांची आदरयुक्त भीती वाटत असे. ‘आदरयुक्त’ या शब्दावर आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण मी स्वतः अशा अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे, की शिस्तपालन करण्याकरिता भाऊसा वेळप्रसंगी अत्यंत कठोर होत. कोणी विचारदेखील करू शकत नाही एवढ्या कठीण शिक्षादेखील भाऊसांनी केल्या आहेत. किती कठीण केल्या असाव्यात, तर विद्यार्थ्यांच्या अक्षरशः दहावीच्या परीक्षेचे काही पेपरदेखील या शिक्षांमुळे बुडालेले आहेत.

कित्येकांना त्या काळी हाड फ्रॅक्चर्सदेखील झाले आहेत. कोणाचे शैक्षणिक वर्षदेखील वाया गेलेले आहे; परंतु एवढी कठोर अशी शिक्षा पवन सर केव्हा द्यावयाचे हे त्या वेळी सगळ्यांनाच माहिती होते. कोणीही चुकत असेल, तर त्याला भाऊसा एक-दोन-तीनदा अत्यंत चांगल्या पद्धतीने गोडीगुलाबीने समजावून सांगत. आली वेळ तर चौथ्या वेळीदेखील सांगायचे. तरीही कोणी वारंवार त्याच त्या चुका मुद्दामहून करत असेल तर मात्र त्याची शंभरी भरलीच म्हणून समजा! अशा प्रकारच्या कठोर शिक्षा देण्याचे त्यांचे उद्देश अतिशय स्वच्छ, प्रामाणिक जे की त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे कल्याण होवो असे असायचे.

त्याचे भले करणे, त्याच्या आयुष्याला वळण लावणे आणि अशा शिक्षांमुळे खरोखरच ९५-९९ टक्के नव्हे, तर शंभर टक्के त्या मुलांच्या आयुष्यात भलेच झाले आहे. याची साक्ष नुसत्या उत्तर महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच सोबत गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतील त्या वेळची मुले आजही देतील. देत आहेत. आज जरी मी प्रथितयश डॉक्टर असलो, उत्तर महाराष्ट्रातील नामवंत अशा सुयश हॉस्पिटलचा व्यवस्थापकीय संचालक असलो तरीही आजही कित्येक ठिकाणी माझी आयडेंटिटी, ओळख म्हणजे अगदी एका छोट्या वाक्यात असते, ती म्हणजे, पवन सरांचा मुलगा.

आणि विश्वास ठेवा ही एवढी छोटी आयडेंटिटी देखील माझ्या आजच्या वाटत असलेल्या मोठ्या आयडेंटिटी पेक्षाही कितीतरी मोठी आयडेंटिटी होती की जी मला अगदी लहानपणापासून ते आजतागायत पुरत आहे. भाऊसा जेवढी कठोर शिक्षा द्यायचे, जेवढे वागताना कठोर, करारी वाटायचे त्यापेक्षा भाऊसा आतमधून मनाने अतिशय कोमल, दयाभावी, स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याने इतरांप्रति खासकरून गरिबांप्रति, प्रतिकूल परिस्थितीत झगडणाऱ्यांसाठी अतिशय संवेदनशील होते. म्हणजे बाहेरून नारळ आणि आतून गोड पाणी, कोवळे खोबरे! या संवेदनशीलतेतूनच अनेकांच्या आयुष्याचे कल्याण झाले, भले झाले. पराकोटीच्या कठोर शिक्षेचे मूळदेखील कोणाचे तरी भले करणे हेच होते.

भाऊसांच्या या पराकोटीच्या संवर्धनशीलतेमुळेच भाऊसांच्या अनेक पैलूंपैकी एक फार महत्त्वाचा पैलू मी बघितला आहे, अनुभवला आहे, तो म्हणजे, कुठल्याही आजारी विद्यार्थ्याची, माणसाची अथवा कुठल्याही रुग्णाची सेवा. आमचे घर म्हणजे चांदवड गावातील गुजरात गल्लीतील छोटेसे मातीचे घर. एक-दीड खणाचे घर. छोट्या छोट्या तीन खोल्या आणि मागे एक वाडा. या तीन खोल्यांमध्ये आम्हालाच झोपायला जागा पुरायची नाही. तिथे अनेक वेळेला संस्थेतील आजारी मुले आमच्या घरी राहिलेले आहेत.

त्यांची सेवाशुश्रूषा बाई-भाऊसांनी केलेली आहे. तीही अगदी पोटच्या मुला-मुलीप्रमाणे इथपासून तर मला आठवते आमची शाळा म्हणजे नेमिनाथ जैन हायस्कूलमध्ये जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडूनच जायला लागायचे. त्या वेळी रस्ता ओलांडताना तिसरीच्या मुलाला एका ट्रकचा जोरदार धक्का लागला तो मुलगा म्हणजे संस्थेतीलच शिक्षक आणि भाऊसांचे अगदी जवळचे बंधूसम मित्र गांधी मुथा सर यांचा नरेश होता. त्या काळी आजच्यासारखी दुचाकी, चारचाकी अशी कुठलीही वाहने जवळपास उपलब्ध नव्हती आणि भाऊसांनी रक्तबंबाळ अशा नरेशला कुठलाही विचार न करता त्वरित खांद्यावर घेतले आणि जवळपास अक्षरशः पळत पळत अडीच-तीन किलोमीटरवरील सरकारी दवाखान्यात ते घेऊन गेले.

हेही वाचा: अजूनही नाटक जिवंत आहे!

आजच्या काळात ज्याला आपण ‘प्लॅटिनम अवर’ ही कन्सेप्ट म्हणतो म्हणजे कुठलीही मोठी मेडिकल सर्जिकल इमर्जन्सी झाली आणि अशा वेळी जर वीस मिनिटांच्या आत वैद्यकीय मदत मिळाली तर त्याला ‘प्लॅटिनम अवर’मध्ये ट्रीटमेंट मिळाली असे म्हणतात आणि यामुळे जगण्याचा रेशो हा ७० टक्क्यांपर्यंत पोचतो जो की गोल्डन अवर म्हणजेच एक तासाच्या आत वैद्यकीय मदत मिळाली, तर जगण्याचा रेशो हा ५० टक्क्यांपर्यंत असतो अर्थातच अत्यंत खराब क्रिटिकल पेशंटच्या बाबतीत आपण बोलतो आहोत. येथे तर सुदैवाने भाऊसांनी ‘प्लॅटिनम अवर’ फॉलो केला होता. तरीही अत्यंत दुर्दैवाने वीस मिनिटांच्या आत वैद्यकीय मदत मिळूनही नरेश वाचू शकला नाही, असे एक ना अनेक प्रसंग सांगता येतील. वळू या तर पुढच्या भाऊसांच्या संवेदनशील अशा कलागुणाकडे, तो म्हणजे, अडल्या-नडल्यांची सेवा करायची आणि तीही स्वतःची आर्थिक कुवत नसताना.

आमचे भाऊसा ज्या वेळेला स्वर्गवासी झाले म्हणजे ३० मे १९८६ ला. भाऊसांचा शिक्षकाचा शेवटचा पगार किती असावा बरे. फक्त अडीच हजार रुपये! त्या काळातदेखील अडीच हजार रुपयांत काहीही होत नव्हते आणि असे असूनही भाऊसांनी आयुष्यामध्ये शेकडो, हजारो लोकांना मनापासून मदत केली आहे. मग त्यामध्ये अनेक गरजू विद्यार्थ्यांचा समावेश होतो. त्यामध्ये अनेक खासकरून तिसऱ्या आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. अकुशल कामगार जे संस्थेमध्ये होते त्यांचा समावेश होतो. हा भाग म्हणजे त्यांच्याशी संस्थेमध्ये डायरेक्ट संबंधित असणाऱ्यांचा झाला. काही पलीकडे ज्यांचा अर्थ भाऊसांचा काडीचाही संबंध नसायचा अशादेखील अनेक गरजू लोकांचा समावेश होतो.

जसे की आमची संस्था ते आमचे घर यामध्ये संस्थेकडून येताना चिंचबनानंतर आदिवासी वस्ती लागायची आणि मग चांदवड गाव सुरू व्हायचे. आदिवासी वस्तीतील लोकांचे जिणे म्हणजे रोज कमवायचे आणि खायचे. त्यामधील कित्येक लोक जंगलातून लाकडे तोडून मोळी विकून आपली गुजराण करीत असत, तर कित्येक लोक कुठे गवंड्याच्या हाताखाली, कुठे सुताराच्या हाताखाली, कुठे रोजगार हमीच्या कामावर थोडक्यात काय तर मिळेल ते काम ही मंडळी करीत असे. अर्थातच ही सर्व कामे करताना स्त्री समानता आदिवासी वस्तीमधील लोकांमध्ये त्या वेळीही होती. म्हणजे काय, जशी पुरुषमंडळी बाहेर कामावर जायची तशीच त्या वस्तीमधील सर्व महिला मंडळदेखील कामावर जात असे. असे असले तरी त्यांना रोज काम मिळेलच असे नसायचे.

कधी-कधी सलग दोन-चार दिवस किंवा एखादा आठवडादेखील या गरीब बिचाऱ्या लोकांना काम मिळत नसे. मग मात्र यांची खाण्यापिण्याचीदेखील पंचाईत होत असे. अशा वेळी त्यांचा एकच अक्षरशः देवदूत असे, तो म्हणजे, अर्थातच पवन सर. तसेही भाऊसांच्या येण्या-जाण्याच्या वेळा या वस्तीतील लोकांच्या अगदी तोंडपाठ होत्या. ज्या घरामध्ये चूल पेटलेली नसेल त्या घरातील व्यक्तीने या देवदूताची संध्याकाळी रात्री चातक पक्ष्याप्रमाणे वाट बघायची. हे अगदी रोजचेच होते. भाऊसा रात्री साडेआठ-नऊच्या दरम्यान जेव्हा घरी यायचे त्या वेळी हमखास कोणता न कोणता त्या वस्तीतील माणूस भाऊसांची सायकल पकडून घ्यायचा.

अर्थातच काही बोलण्याची, कोणत्याही शब्दांची गरजच नसायची. भाऊसांना माहिती असायचे की त्यांची सायकल का पकडली आहे आणि मग त्या काळामध्ये पाच-दहा रुपये जे काही खिशात मिळतील ते त्याला देऊन टाकायचे. अर्थात, जसे की मी वर नमूद केले आहे, की मुळात आमच्या घरीच अठराविश्व दारिद्र्य असायचे. मग भाऊसांकडे असे कितीसे पैसे रोज असतील? मग ते असतील, नसतील ते खिशातले पैसे त्याला देऊन मोकळे व्हायचे अर्थातच त्याकाळी ही पाच-दहा रुपयांची रक्कम म्हणजे देखील त्यामानाने मोठी होत असे आणि हा प्रश्न एखाद्या दुसऱ्या दिवसाच्या असेल तर काही वाटत नाही. परंतु जवळपास रोजच किंवा आठवड्यातून पाच-सहा वेळेला आपण विचार करू शकता आणि मग त्या माणसाची चूल फेटायची. असे पैसे परत घ्यायचा काही विषय नसायचा.

असे एक, दोन, चार वेळा करायचा विषय आहे का? नाही. दिवस दिवस, आठवडे आठवडे, महिने महिने आणि अनेक वर्षे तब्बल दोन दशकांवूनही जास्त हे भाऊसा अव्याहतपणे करीत राहिले. जे की संपूर्णपणे आम्हालाही माहीत नव्हते. याची प्रचीती आम्हा ओस्तवाल परिवाराला केव्हा आली माहिती आहे? ज्या वेळी ३० मे १९८६ ला भाऊसा स्वर्गवासी झालेत त्या दिवशी. भाऊसांचा अकस्मात मृत्यू हा त्या वेळी पूर्ण चांदवड गावालाच दुःखाच्या महासागरात लोटणारा होता. आम्ही सर्व प्रचंड शोकात होतोच. त्या वेळी आमच्या दुःखाची कोणीही कल्पनादेखील करू शकत नव्हतं आणि आजही करू शकणार नाही.

संपूर्ण आदिवासी वस्ती त्या वेळी अक्षरशः उलटली होती आणि प्रत्येक जण भाऊसांच्या कलेवरावर पडून हंबरडा फोडत शोक व्यक्त करीत होता. या सर्व लोकांना कसे सांभाळायचे, यांचे सांत्वन कसे करायचे, यांना कसे आवरायचे, हा मोठाच प्रश्न तेवढ्या दुःखामध्येदेखील आमच्यासमोर उभा ठाकला होता. त्या वेळी आम्हाला भाऊसांनी त्यांच्या आयुष्यात काय केले, काय कमावले, पुण्याई कशाला म्हणतात, खरा धर्म कशाला म्हणतात, माणसाने सेवा कशी करावी, या हाताची त्या हाताला कळू न देता सेवा कशी करावी हे आम्हाला कळले. साने गुरुजींच्या शब्दांना
'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे'
भाऊसांनी अक्षरशः खरे करून दाखवून आपल्या जीवनाचे सोने केले.
*(क्रमशः)*
*(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)*

हेही वाचा: भिडेंची ॲटॉमिक टिकली