गुणसंपन्न त्यागमूर्ती बाई | Latest Marathi Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman empowerment

गुणसंपन्न त्यागमूर्ती बाई

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

निडरता बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आपल्याला अनुभवायला येते. बाईच्या अगदी लहानपणी किराणा दुकान चालविणे असो, जंगलामध्ये जाऊन गोवऱ्या, लाकूडफाटा एकट्याने जाऊन आणणे असो की खडकजामहून वडाळीभोईला जाऊन किराणा सामान डोक्यावर वाहून आणणे असो... अशी बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निडरता सापडते.

बाईच्या पुढच्या गुणवैशिष्ट्याबद्दल बोलू या, तो म्हणजे निडरता ः निडरता बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आपल्याला अनुभवायला येते. बाईच्या अगदी लहानपणी किराणा दुकान चालविणे असो, जंगलामध्ये जाऊन गोवऱ्या, बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निडरता सापडते.

अगदी चौदाव्या वर्षी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेऊन बघायला आलेल्या मुलाला, त्याच्या वडिलांना, स्वतःच्या वडिलांना, परिवारातील सदस्यांना, नातेवाइकांना अत्यंत निडरपणे बाईने उत्तर दिले होते हे आपणास मागच्या लेखांमध्ये अनुभवास आलेच होते. बघायला आलेल्या सर्वांना एवढ्या हिमतीने निर्णय वजा निडरतेने सांगणे म्हणजे अक्षरशः आश्चर्यच नव्हे का? आणि वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंत अशा अनेक प्रसंगांना निडरतेने सामोरे जाऊन स्वतःच्या आयुष्याला सुंदर असे वळण बाईने त्या वेळी दिले होते.

लग्नानंतरच्या आयुष्यातदेखील बाई कधी कुठल्या गोष्टीला, कुठल्या प्रसंगाला घाबरली आहे आणि तिला आता काय करावे हे सुचत नाही, असे मी माझ्या उभ्या आयुष्यात एकदाही अनुभवलेले नाही. या संदर्भातील १९९७ मधील एक प्रसंग मला आजही आठवतो. भाऊसांच्या (वडिलांच्या) १९८६ मधील मृत्यूनंतर बाईने १९९७ पावेतो संपूर्ण घर स्थिरस्थावर करून स्वतःला संपूर्णपणे धार्मिक विषयाला वाहून घेतले होते.

याविषयी आपण सविस्तर नंतर बोलणार आहोतच, पण निडरतेसंदर्भात एक किस्सा घडलेला येथे सांगावासा वाटतो. त्या वेळी बाईने त्रिमूर्ती चौकातील समाजातील काही महिलांच्या मदतीने धर्मस्थानक बनविण्यास सुरवात केली होती.

जैन समाजामध्ये दानशूरता हा मोठा गुण आहे आणि ज्या वेळी असे धर्मस्थानक कोणी बनवीत असते त्या वेळी सर्व समाज अत्यंत सढळ हाताने आर्थिक व इतर मदत करीत असतो; परंतु आजवरच्या भारताच्या इतिहासामध्ये नेहमी पुरुषमंडळी या कामांमध्ये भाग घेत असते आणि अगदी ९९ नव्हे, तर १०० टक्के पुरुषमंडळीच धर्मस्थानक बनवीत असतात.

येथे मात्र बाई आणि त्रिमूर्ती चौकातील काही स्त्रिया धर्मस्थानक बनवायला निघालेल्या होत्या. त्या सर्व त्या वेळी नाशिकजवळील एका मोठ्या बाजारपेठेच्या गावी धर्मस्थानकासाठी वर्गणी गोळा करायला गेल्या होत्या. त्या वेळीही आणि आजही आमच्या जैन समाजामध्ये पद्धत रूढ आहे, ती म्हणजे, कुठल्याही गावामध्ये कुठल्याही श्री संघामध्ये वर्गणी गोळा करायला गेल्यानंतर त्या श्री संघाच्या अध्यक्षांकडे आधी जायला लागते.

ते जी काही वर्गणी देतील त्यापेक्षा कमीच समाजातील इतर सदस्य देतात. या परंपरेनुसार बाई आणि इतर महिला त्या गावातील श्री संघाच्या अध्यक्षांकडे वर्गणी घेण्यासाठी गेल्या. कदाचित समोरच्या अध्यक्षांना महिला आल्यामुळे तेवढा विश्वास त्यांच्यावर बसला नसेल. त्यांनी मोजून फक्त पन्नास रुपये वर्गणी देऊ केली. हे बघून सर्व महिला अवाक् झाल्या.

कारण त्या सर्वांच्या लगेचच लक्षात आले होते, की आता त्या गावामध्ये काहीही वर्गणी जवळपास गोळा होणार नव्हती. बाईने काही सेकंद विचार केला आणि स्वतःच्या पर्समधून एक हजार ९५० रुपये काढले आणि त्या अध्यक्षांना देऊ केले.

तेही त्यांना सांगून, की आपण जर फक्त ५१ रुपये दिले तर इतर लोक एकतर काहीच वर्गणी देणार नाहीत आणि फार झाले तर फक्त ११, २१ अशी वर्गणी देतील, मग आमचा फिरून काय उपयोग होईल, असे म्हणून त्यांच्या हातावर एक हजार ९५१ रुपये टेकवले आणि सांगितले आता आपण आम्हास दोन हजार एक रुपये द्या म्हणजे आमचे सर्व काम व्यवस्थित होईल. समोरचे सद्‌गृहस्थ अत्यंत खजील झाले.

त्यांना त्यांची चूक पूर्णपणे उमगली आणि त्यांनी बाईने देऊ केलेले पैसे न घेता स्वतः पाच हजार एक रुपयांची वर्गणी दिली आणि त्यामुळे त्या गावातील जैन समाजातील लोकांनी भरभरून वर्गणी दिली. अत्यंत निडरतेने बाईने ही गोष्ट केली होती आणि त्याची फलनिष्पत्ती आपणा सर्वांसमोर आहेच. आयुष्यातील स्वतःच्या खासगी जीवनातील गोष्टी असो, नातेवाइकांच्या बाबतीत असो, आई-वडिलांच्या बाबतीत असो, आम्हा मुला-मुलींच्या बाबतीत असो, समाजाबाबत असो; बाई कुठल्याही गोष्टीला, घटनेला अत्यंत निडरतेनेच सामोरे गेलेली आहे.

बाईच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा गुण मध्यवर्ती भूमिका ः बाईने आपल्या आयुष्यात अगदी लहानपणापासून तर आतापर्यंत संपूर्ण घरामध्ये मग ती माहेरी असो की सासरी मध्यवर्ती भूमिका निभावली आहे. लहानपणी बाईला एक प्रकारे अकाली प्रौढत्व खडकजामला आल्यानंतर आले होते. कारण आजोबांची ढासळत असलेली प्रकृती आणि बाईहून मोठ्या दोन्ही बहिणींचे झालेले लग्न या दोन्ही कारणांमुळे अगदी लहान वयामध्ये बाईवर जणू संपूर्ण घराची जबाबदारीच आलेली होती.

शाळेतदेखील ज्या वेळी इतर मुले-मुली शिकत होती त्या वेळी बाई चार वर्षांपैकी पावणेचार वर्षे इतर मुला-मुलींना शिकवत होती. बाई मोठी झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर सासरीदेखील मध्यवर्ती भूमिका निभावत होती, निभावत आहे, बाई आणि भाऊसाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसार सुरू केला, हे आपण वाचलेच आहे. अशा परिस्थितीतदेखील खंबीरपणे स्वतःच्या घराचे स्वप्न बघत ते पुरेदेखील केले. त्याबरोबरच मला डॉक्टर बनविण्याचा निर्णयदेखील तिचाच.

असे अनेक निर्णय तिने मध्यवर्ती भूमिकेतून आयुष्यभर घेतले आहेत, घेत आहे. मला दोन मोठ्या मावश्या आणि दोन छोट्या मावश्या. आमची बाई मधली; परंतु आम्हाला सख्खे मामा नाहीत. म्हणजेच बाईला सख्खा भाऊ नाही. आयुष्यभर बाईनेच नानाजी-नानीजींचा म्हणजेच तिच्या आई-वडिलांचा सांभाळ, देखभाल, सर्व प्रकारची काळजी घेतली.

आयुष्यभर नानाजी-नानीजी आमच्याकडेच राहिले. म्हणायला नानाजी-नानीजींचे चांदवडला असेपर्यंत स्वतंत्र घर होते; परंतु ते आमच्या जवळच राहत असत. नानीजी तर १०-१०-१० रोजी वयाची शंभरी गाठून संथारा व्रतामध्ये स्वर्गवासी आमच्याकडेच झाल्या. आमच्या नानाजी-नानीजींना मुलगा नसल्याची कमतरता बाईने कधीही जाणवू दिली नाही.

जी काही म्हणून मुलांची कर्तव्ये असतात मग ती आई-वडिलांप्रति असू देत किंवा छोट्या-मोठ्या बहिणींप्रति असू दे, मुलाची किंवा भावाची किंवा मामाची सर्व प्रकारची कर्तव्ये बाईने मध्यवर्ती भूमिका निभावत पार पाडली, पार पाडते आहे.

एवढेच नव्हे, तर मी म्हणजेच संपूर्ण ओस्तवाल परिवार आज जे काही नाशिकला स्थिरस्थावर होऊन प्रगतीच्या वाटेवर राहून यशाची फळे चाखत आहोत ते निव्वळ आणि निव्वळ बाईच्या मध्यवर्ती भूमिकेतून चांदवडहून नाशिकला सेटल होण्याच्या निर्णयामुळे शक्य झाले आहे. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून बाई स्वतः आणि आम्हीदेखील कोणीही सावरलेलो नसताना भाऊसा गेल्याच्या सव्वा महिन्यानंतर बाईने हा निर्णय घेतला होता, अन्यथा आम्ही आमच्या मूळ गावी चांदवडला स्थायिक झालेले असतो.

घरातच नव्हे तर समाजकार्य, धार्मिक कामांमध्येदेखील बाईने अत्यंत मोलाची मध्यवर्ती भूमिका आयुष्यभर निभावली, निभावते आहे. याची साक्ष त्रिमूर्ती चौक, नाशिक येथे उभे असलेले धर्मस्थानक देते आहे. त्रिमूर्ती चौकात धर्मस्थानक उभारावे हा संपूर्ण निर्णय बाईने आधी घेतला होता, नंतर तिने समाजातील काही स्त्रियांना (पुरुष नव्हे) यासाठी तयार केले होते. समाजामध्ये मध्यवर्ती भूमिका निभावत बाईने संपूर्ण समाजामध्ये इतिहास घडवत धर्मस्थानक उभे केले.

बाईच्या आयुष्यातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे समाजसेवा ः बाईच्या अगदीच लहानपणापासून तर अगदी आज या क्षणापर्यंत समाजसेवा बाईच्या रोमारोमांत भिणलेली आहे. समाजसेवेची सुरवात बाईने अगदी पहिलीत असतानाच इतर मुलांना शिकवून केली होती. कुणाच्याही घरी स्वयंपाक करायला अडचण असेल तर तो बाईने जाऊन करायचा, हे जणू समीकरणच चांदवड, खडकजाम येथे ठरलेले होते.

कित्येक बाळंतपणे बाईने घरोघरी जाऊन केलेली आहेत, जणूकाही बाई म्हणजे त्या काळातील उत्कृष्ट दाईच. त्यातील अनेक बाळे आज अत्यंत मोठमोठ्या स्थानांवर आहेत. कोणाच्याही घरी कुठलेही आजारपण आले तरी बाई त्यांच्या सेवेला तत्पर. आमचे भाऊसा म्हणजे पवन सर हे नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम या संस्थेत शिक्षक व सुपरिंटेन्डेंट असल्याने अनेक विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्यावर असायची.

त्यामुळे कित्येक वेळा वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडल्यावर त्यांची सेवाशुश्रूषा बाईने घरी केलेली आहे. कित्येक मुलांना बाईने शिक्षणासाठी मदत केलेली आहे. ज्या कोणा गरिबाच्या घरात चूल पेटलेली नसेल त्या वेळी बाई, भाऊसांनी तत्परतेने त्याला मदत करून त्याच्या पोटापाण्याची सोय केली असेल.

माझ्या नजरेसमोर अशी अक्षरशः असंख्य उदाहरणे आहेत, की ज्यातून मला बाईच्या समाजकार्याविषयी लिहिता येईल; परंतु जसे की आपणा सर्वांनाही माहिती आहेच, की येथे जागेची मर्यादा येते आणि म्हणून हा मुद्दादेखील आपण येथेच थांबू या.

बाईचा सहावा गुण त्याग ः त्याग आणि बाई म्हणजे जणूकाही अतूट समीकरण. बाईने जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःपासून इतर अनेकांसाठी मोठमोठे त्याग केलेले आहेत. बाईने अगदी लहानपणी इतर मुलांना शिकविण्याकरिता स्वतःच्याच शिक्षणाचा त्याग नाही का केला? बाईचे बालपण सगळे घर सांभाळण्यासाठी, सगळ्यांची काळजी घेण्यासाठी गेले. जणू बालपणाचा बाईने त्यागच केला आणि बाई अकाली प्रौढ झाली.

बाईने इतरांसाठी सेवा करताना स्वतःच्या सुखांचा त्यागच केला. कधी तहानभूक बघितली नाही न बघितला कधी वेळ काळ आणि आता या वयातदेखील बाईच्या त्यागाची असंख्य उदाहरणे देता येतील. एखादी स्त्री जेव्हा अकाली विधवा होते, तिचा आयुष्याचा आधार जीवनसाथी निघून जातो त्या वेळी ती स्त्री स्वतःला खूप असुरक्षित समजायला लागते.

तिला उतारवयाची चिंता भेडसायला लागते. मला कोणी सांभाळेल का, ही चिंता तिच्या मनामध्ये घर करून बसते आणि म्हणून ती तिच्या गाठी जास्तीत जास्त पैसा जमवून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि दुर्दैवाने हे असे करणे कित्येक वेळा खरोखर प्रॅक्टिकल ठरते. असे पैसे जवळ असल्याने कित्येक वेळा मुलगा, सून, इतर नातेवाईक त्या स्त्रीकडे लक्ष देत असतात.

अशी कितीतरी उदाहरणे माझ्या नजरेसमोर आहेत; परंतु आमची बाई या सगळ्या जगरहाटीला नक्कीच अपवाद आहे. तिने तिच्या आयुष्यात जे जे काही पैसे भाऊसांच्या मृत्यूनंतर हातात आले ते कधीही तिने तिच्या गाठी बांधून ठेवले नाहीत. तिला आजही भाऊसा शाळेत शिक्षक असल्याकारणाने फॅमिली पेन्शन मिळते. सुरवाती-सुरवातीला तिने तो पैसा संपूर्ण कुटुंबासाठी वापरला आणि जसे एकदा कुटुंबातील सर्व जण स्थिरस्थावर झाले त्या वेळी तिने त्यातील बराचसा पैसा धर्मकार्यासाठी, समाजकार्यासाठी वापरला.

आजही वापरते आहे. तिचा हात नेहमी दान करण्यासाठी तत्पर राहिला, मग ती कितीही कठीण प्रतिकूल परिस्थिती असू दे की आजची स्थिरस्थावर झालेली परिस्थिती असू दे आमच्या बाईचा हात नेहमी देण्यासाठी तत्पर राहिला. बाईच्या आयुष्यावरून माझ्या लक्षात एक गोष्ट ही कायमची ठसली, ती म्हणजे, जेव्हा आपण कोणासाठीही दान देण्यासाठी हात वर ठेवतो त्या वेळी भगवंतदेखील आपणास भरभरून देतो.

आमच्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्येदेखील बाईला कधीही पैशांची कमतरता जाणवली नाही. ज्या ज्या वेळी म्हणून बाईला पैसे लागायचे त्या त्या वेळी कुठून ना कुठून ते बाईकडे येऊनच जायचे. बाईला कधीही कमी पडले नाही. आपणास आश्चर्य वाटेल, आमची बाई कधीच स्थितप्रज्ञ स्थितीत निघून गेलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बाई स्वतःकडे गरजेव्यतिरिक्त जसे की कुठे जायचे असेल तर भाड्याला लागणारे तेवढेच पैसे किंवा रिक्षाला लागणारे मोजकेच पैसे, याव्यतिरिक्त बाई स्वतःकडे कुठलेही पैसे ठेवत नाही.

बाईकडे एक मिलिग्रॅमदेखील सोने ना चांदी ना कुठली स्थावर मालमत्ता आहे. बाई नवे कपडे वापरत नाही. अत्यंत कमीत कमी कपडे बाईला लागतात. थोडक्यात काय, तर बाईला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. बाईच्या गरजा अत्यंत मर्यादित आहेत. खाण्यापिण्याचा विषय पुढच्या मुद्द्यांमध्ये येणार आहेच म्हणून खाण्यापिण्याच्या त्यागाबद्दल मी येथे लिहीत नाही. बाई गादीवरदेखील झोपत नाही. बाईला कुठल्याही लक्झरिअस सोयीसुविधा देऊ केल्या तरीही बाई त्या स्वीकारत नाही. बाई रोज धर्मस्थानकात जाते.

बाईला मी रोज ड्रायव्हर आणि कार घेऊन जा, असे सांगत असतो; परंतु बाई कधीही कार घेऊन जात नाही. ती नेहमी सांगते, ‘माझ्यासाठी खासकरून अजिबात कार पाठवायची नाही.’ कित्येक वेळा ती चार-पाच किलोमीटर अंतर सहज आजही या वयात पायी पायी सहज निघून जाते.

इतर गावीही कुठे बाई जाणार असेल तर ती स्वतःसाठी कार नेत नाही. आपण कोणी जाणार असू तरच बाई त्या गाडीमध्ये बसते. स्वतःसाठी म्हणून तिने या सर्व गोष्टींचा कधीच त्याग केला आहे. थोडक्यात काय, तर बाई म्हणजे त्यागाचे मूर्तिमंत प्रतीकच आहे.

आता वळू या बाईच्या शेवटच्या म्हणजे माझ्या लेखी शेवटचा सातवा गुण म्हणजे धर्म ः या मुद्द्यामध्येही आपणास दोन प्रकार करायला लागतील. पहिला म्हणजे स्वतःकरिता करणारा धर्म आणि इतरांकरिता करावयाचा धर्म. पहिले आपण बाईच्या स्वतःच्या धर्माबद्दल बोलू या. आमची बाई अगदी लहानपणापासूनच खूप धार्मिक.

खडकजाम हे गाव मुंबई-आग्रा महामार्गावर असल्याकारणाने तेथे नेहमी गुरू महाराजांची ये-जा सुरू असायची आणि ज्या ज्या वेळी तेथे गुरू महाराज असायचे, बाई स्वतःला संपूर्णपणे धार्मिक कार्यामध्ये गुंतवून घ्यायची. जैन समाजातील सर्व धार्मिक विधी बाईला अगदी लहानपणापासूनच मुखोद्‍गत होते. तिच्या आवडीच्या कितीतरी खाण्याच्या वस्तूंच्या न खाण्याच्या शपथा तिने लहानपणापासूनच घेतलेल्या होत्या.

या सर्व गोष्टींमध्ये ना तर चांदवडला आल्यानंतर ना तर लग्नानंतर काही खंड पडला होता. बाई अखंडपणे धार्मिक कार्य करत आली, आजही करते आहे. उपवास म्हणजे खाऊन-पिऊन होणारे उपवास नव्हे, तर आमच्या जैनांमधील अत्यंत कडक असे उपवास. त्यातली अत्यंत मोठी मोठी व्रते जसे की रत्नावली तप, वर्षी तप अशी जी काही म्हणून मोठी, अवघड उपवासाची व्रते आहेत ती बाई अगदी सहजपणे, अखंडपणे करतेच आहे.

जेव्हा की आम्ही डॉक्टर मंडळीसुद्धा सांगायचा प्रयत्न करतो, की बाई एवढे उपवास चांगले नाहीत. तर बाई आम्हालाच उलट शिकवते. एवढे उपवास करते म्हणूनच मी फिट आहे. नाहीतर तुम्ही स्वतःकडे बघा, असे म्हटल्यानंतर आम्हीसुद्धा निरुत्तर होतो. कारण बाई बोलते ते अक्षरशः खरे असते. या उपवासाच्या व्रतांमध्ये मी अनेक लोकांना स्वतःची काळजी घेताना बघितलेले आहे.

जसे की ज्या दिवशी पारणा असतो, म्हणजे एक उपवास म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी तोंड बंद केले, की तिसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास ३६ ते ४० तासांनी सकाळीच तोंड खाण्यासाठी उघडायचे. अशा वेळी आपल्याला फक्त आज आठ ते दहा तासच खायचे आहे, उद्या परत उपवास आहे म्हणून खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेत खाणपान करत असतात; परंतु आमची बाई ती बाईच, कधीही तिने अशा प्रकारे स्वतःची काळजी घेतली नाही.

पारण्याच्या दिवशी खायला मिळाले तरी ठीक, नाही मिळाले तर अजून जास्त ठीक, या प्रकारची धारणा बाईची आजही असते. आपण सर्व आयुष्यामध्ये खाण्याच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीची शपथ घेत असतो, म्हणजे ते खाणे सोडून देत असतो. अशा वस्तू फार तर दोन-तीन असतात. बाईचे मात्र उलटेच आहे. बाई ज्या गोष्टी खाते ती यादी फार छोटी आहे.

ती सांगणे सहज सोपे आहे. कारण बाईने शपथ घेतलेल्या वस्तूंची यादी प्रचंड मोठी आहे. बाईची धार्मिकता म्हणजे नुसत्या खाण्यापिण्याच्या गोष्टी नाहीत. बाई आपल्या आचाराविचारांमधून सर्वार्थाने प्रचंड धार्मिक असल्याचे पदोपदी जाणवते. ती स्थितप्रज्ञ स्थिती म्हणजे काय हे जर समजून घ्यायचे असेल तर बाईचे रोजचे जीवनमान बघायचे. सगळ्यांसाठी दयाभाव, मदतीचा हात, कुणी कसेही वागले तरी त्यासाठी सदैव चांगल्या भावना, इतरांसाठी नेहमी कार्यरत राहणे, कुठलाही अहंभाव न ठेवणे, सदैव लो प्रोफाइल राहणे, जो जो काही म्हणून वेळ मिळेल तो धार्मिक विधींमध्ये वापरणे.

आपणास आश्चर्य वाटेल, बाईचे आजही वाचन खूप चांगले आहे. अनेक प्रकारचे धार्मिक ग्रंथ तिचे वाचून झालेले आहेत. सोबत वर्तमानपत्रदेखील ती रोजच्या रोज वाचत असते. गुरू महाराजांच्या सेवेमध्ये राहणे, त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणे, त्यांच्या विहारांमध्ये हमखास सामील होणे हा सर्व तिचा नित्यक्रम आहे.

कुठल्याही संघाबरोबर धार्मिक पदयात्रेत ती हमखास सहभागी असते. मग ते अगदी १००, २००, ३०० किलोमीटरचा प्रवास का असेना. कित्येक वेळा काही अपवादात्मक साधू-संत दीक्षा घेऊनदेखील संसारातच असतात; परंतु बाई संसारात राहूनदेखील साधू-संतांसारखेच जीवन व्यतीत करते आहे. हे सर्व झाले बाईच्या स्वतःच्या धार्मिकतेबद्दल.

आता बघू या बाईने इतर सर्वांसाठी धर्म या विषयात काय काय योगदान दिले. बाईने माझ्यासहित घरच्या सर्व बालगोपाळांना या प्रवाहात तर आणलेच; परंतु जे जे म्हणून ओळखीचे, जवळचे नातेवाईक या सर्वांनादेखील प्रोत्साहित करून धर्माच्या प्रवाहात आणण्याचे मनापासून शंभर टक्के प्रयत्न केले. कित्येक वेळा त्यासाठी पदरचे पैसेदेखील खर्च केले आहेत. धर्मस्थानकात बाईची नेहमी ॲक्टिव्ह भूमिका राहिली आहे.

भाऊसा स्वर्गवासी झाल्यानंतर आम्ही नाशिकला शिफ्ट होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर बाईने स्वतःला पूर्णपणे धार्मिक कार्यात झोकून दिले. बाईने स्वतःला सर्वार्थाने झोकून दिल्यानंतर बाई स्वतः जिथे जिथे गुरू महाराज आहेत तेथे जायची. त्या वेळी बाईच्या मनामध्ये असा विचार आला, की मी मोकळी आहे, मला पैशांचीही अडचण नाही, मी पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या गुरू महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ शकते;

परंतु आपल्या समाजबांधवांना, भगिनींना हे सर्व शक्य होईलच असे नव्हे आणि एक वेळ सर्व मोठी मंडळी गुरू महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकतील; परंतु समाजाच्या नवीन येणाऱ्या भावी पिढीचे काय, हे सर्व बालगोपाळ कुठे जाऊ शकतील, त्यांच्या शाळेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अगोदरच वेळ कमी असतो आणि म्हणून आपण असे काहीतरी केले पाहिजे, की जेणेकरून आपल्या त्रिमूर्ती चौक परिसरातील सर्व समाज बांधव-भगिनींना आणि येणाऱ्या भावी पिढीलाही धर्म आराधना करता येईल.

जर त्रिमूर्ती चौकातच आपण धर्मस्थानक केले तर सर्वांना त्याचा धर्मासाठी उपयोग करता येईल, या विचाराने बाईच्या मनामध्ये ठाण मांडले. सर्वांत पहिले तिने परिसरातील महिलांना एकत्र केले, त्यांना सर्वांना प्रोत्साहित केले. सगळ्यात पहिली धर्मस्थानकासाठीची पावती बाईने स्वतःची फाडली. त्यामुळे आपोआपच परिसरातील महिलांनीदेखील आपल्या परीने देणगी दिली आणि अशा रीतीने बाईचे ‘मिशन धर्मस्थानक, त्रिमूर्ती चौक, नाशिक’ सुरू झाले. जैन समाजाच्या इतिहासामध्ये आजतागायत कुठल्याही महिलांनी अशा धर्मस्थानकाचे निर्माण तर सोडा परंतु प्रयत्नदेखील केल्याचे कुठेही ऐकिवात नाही. रेकॉर्डवर नाही.

या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बाई आणि दोन-तीन इतर महिला ज्या आज या दोन-तीन तर परवा त्या दोन-तीन अशा एकत्र येऊन पहिले तर त्रिमूर्ती चौक आणि परिसरातील जैन समाजाचे एकूणएक घर पालथे घातले आणि जेवढी म्हणून शक्य आहे तेवढी वर्गणी गोळा केली. हा परिसर संपल्यानंतर नाशिक शहरामध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केले.

त्या बरोबरीने जिल्ह्यातील ग्रामीण भागदेखील पिंजायला सुरवात केली. ग्रामीण भागातीलच वर्गणी गोळा करतानाचा एक किस्सा मी बाईच्या लेखांमध्ये वरती लिहिला आहे. अशा अनेक बऱ्यावाईट गोष्टींचा अनुभव घेत बाई आणि टीमने बऱ्यापैकी पैसा जमविला आणि भारतातील जैनांच्या इतिहासामध्ये प्रथमतःच महिलांनी एकत्र येऊन धर्मस्थानकाची निर्मिती केली.

त्या धर्मस्थानकाचे नाव नेहमीपेक्षा आश्चर्यकारकरीत्या अत्यंत वेगळे होते, ते म्हणजे, ‘श्री वर्धमान स्थानकवासी श्राविका संघ, त्रिमूर्ती चौक, नाशिक’. हे असे अत्यंत आगळावेगळा ऐतिहासिक विक्रम घडविणारे काम बाईने केले होते. इसवीसन २००० मध्ये या धर्मस्थानकाचे उद्‍घाटन आचार्य परमपूज्य शिवमुनींच्या उपस्थितीत झाले.

हे धर्मस्थानक सुरू झाले तोपर्यंत त्रिमूर्ती चौक व परिसरातील पुरुषांचा यामध्ये फारसा सहभाग नव्हता. हळूहळू तो सहभाग वाढायला लागला आणि मग काही दिवसांनी हे नाव थोडे बदलले. ते असे झाले, ‘श्री वर्धमान स्थानकवासी, जैन श्रावक-श्राविका संघ, त्रिमूर्ती चौक, नाशिक.’ सांगायला आनंद वाटतो, की संघस्थापनेच्या आधीपासून ते आजतागायत म्हणजे तब्बल २४-२५ वर्षे बाई या श्री संघाची अध्यक्षा म्हणून कामकाज करते आहे.

हा जैन समाजातील आगळावेगळा विक्रम आहे. स्त्रियांनी येऊन धर्मस्थानकाची निर्मिती करावी आणि एक स्त्रीच अध्यक्ष असणे, यातून आपल्या लक्षात आले असेलच, की बाईने स्वतःच्या आयुष्यात धर्मध्यान केलेच; परंतु समाजातील इतर सर्व घटकांनादेखील धर्मध्यान करता यावे म्हणून न भूतो न भविष्यती असे ऐतिहासिक कामदेखील केले.

बाईबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. जागेचीही मर्यादा आहे, अन्यथा बाईच्या आयुष्यावर खरे म्हटले तर एक पुस्तकदेखील लिहिता येईल. हे सर्व लिहिण्याचा उद्देश म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात सकारात्मकता अंगी बाणून आपले आयुष्य सुखकर, आरोग्यदायी करावे. याचसाठी या सकारात्मकतेच्या धगधगत्या अग्निकुंडाचा आपल्याला परिचय करून देण्याचा अट्टाहास.

(लेखक नाशिकमधील प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)