घडू दे पुन्हां एकदा भारत: एक महाकाव्य!

Raja Badhe & Veer Savarkar
Raja Badhe & Veer Savarkaresakal

रसिका! आज ज्यांची कविता आपण पाहणार आहोत ते कवी, ती कविता, त्याचा काव्यविषय झालेला महापुरुष नि कविने उभारलेले त्याचे हुबेहूब काव्यशिल्प या चारही बाबी केवळ अद्भूत, अप्रतिम, अद्वितीय नि अलौकीक आहेत.

कवीचा साहित्यव्याप मोठा, कविता अत्यंत आशयघन, काव्यविषय झालेला महापुरुष, लोकोत्तरात लोकोत्तर अन कविने उभारलेले त्याचे काव्यशिल्प काव्यनायकाच्या जीवनाशी स्पर्धा करावे इतके उत्कट, भव्य नि तंतोतंत उभारलेले, त्यामुळेच माझ्यासारखा सोडूनच द्या पण एखादा सरस्वतीपुत्र तरी त्याला न्याय देऊ शकेल की नाही, शंकाच आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo in marathi poetry of raja badhe and savarkar nashik news)

Raja Badhe & Veer Savarkar
सतावणुकीची विकृती

कविवर्य राजा नीळकंठ बढे (१९१२ ते १९७७) हे कवी, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, चित्रपट अभिनेते व संपादक होते. त्यांचा जन्म नागपुरात, तर शिक्षण छिंदवाडा व नागपुरात झाले. कवीने सुमारे १८ काव्यसंग्रह लिहीले.

त्यात बिहारीची सतसई, हालाची गाथा सप्तशती या रसाळ व सुदीर्घ रचनांचा समावेश होता. सावरकरांची कमला योजनागंधा नावे पुन्हा काव्यरसात बांधली. ९ संगीतिका, ५ एकांकीका, ४ नाटके, एक कादंबरी लिहिली.

‘सकाळ’च्या माध्यमातून संपादकीय क्षेत्रात प्रवेश केला तर आकाशवाणीत निर्माता म्हणून काम केले. चित्रपट क्षेत्रात प्रवेश करत स्वानंद चित्रसंस्था उभारली. ‘रायगडचा राजबंदी ‘हा छत्रपती संभाजीराजांवरील चित्रपट वयाच्या तिशी पस्तीशीत प्रदर्शित केला.

अनेक चित्रपटात अभिनय केला. कवीचे ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत नुकतेच महाराष्ट्र गीत म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गीताला आवाज देणारे शाहिर साबळे लिहितात, ‘एखादी गोष्ट आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते, माझ्या बाबतीत मी आनंदाने हे श्रेय ‘राजा बढेंच्या या गीताला देतो’.

‘जय जय महाराष्ट्र’ या गीताने मला चिरंजीवित्व प्राप्त करुन दिले म्हणून या गीताचा व कविवर्य राजा बढे यांचा मी जन्माचा ऋणी आहे. या शब्दांत जर साबळेंसारखा गणमान्य शाहिर कवीच्या एका काव्याचा सन्मान करीत असेल तर त्यावर आणखी काय लिहावे?

कविचे एक नागपूरकर मित्र कृ. ग. पाठकांनी जेव्हा कवीला ‘तुम्ही आता मुंबईकर झालात, नागपूरकर राहिला नाहीत’ म्हटले तेव्हा त्यांना लिहिलेल्या पत्रांत कवी स्वतःचेच काव्यचित्र रेखाटताना लिहीतो,

टोपी किंचित उंच, नीट कलती, बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत
ओठांनी रसरंग फेकित सदा, वा मंगलाचे सडे
आहे कोण म्हणून काय पुसता? तो हा राजा बढे!


हा नागपूरकर राजा बढे मुंबईस गेल्यावर कसा बदलला, अन कसा नाही बदलला हे मजेदारपणे सांगताना

Raja Badhe & Veer Savarkar
भाषा व्यक्तिमत्त्वाचा पाया

‘टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा
आहे तोच विडा, अजूनही तसे, मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे !

यातील नर्म विनोद नि खुसखुशीतपणाची लज्जत कोणा सारस्वताला भावणार नाही? अशा या प्रतिभासंपन्न नि खेळकर कविचे मन देशप्रेमाने ओतप्रोत होते. भारताचे विभाजन त्याच्या मनाला खोलवर डाचत होते म्हणून एका ठिकाणी कळवळून तो लिहीतो,

अहो रुप, अहो ध्वनी स्वातंत्र्याचे सुस्वागत
मिळे स्वगंत स्वातंत्र्य आज आम्हा स्मशानांत

या पंक्तीतील पहिल्या चार अक्षरातून व्यक्त होणारे व्यंग संस्कृत जाणकारालाच कळेल नि विषण्णता एखाद्या सद्य देशभक्तालाच जाणवेल. याच तीव्र निराशेतून तत्कालीन नेत्यांवर आसूड

ओढताना कवी कर्तव्य कठोर तेने लिहीतो,
अशा दिवाळीत दिवाभितांना मिळे मोकळे रान
परमुंडीवर करि पांडेपण खादीचा सैतान
चरख्यावरती सूत वळोनी अलक्ष्य केल्या वाती
अंधभक्त स्नेहात भिजवुनी दिल्या नरोट्या हाती

यातील चिरव्यथा फाळणीत जळालेले, जळता जळता पुरते न जळाल्याने अर्धमेले जीवन वाट्याला आलेले जीवच जाणोत. खरेतर कोणत्याही विध्वंसास कोणी नेता एकटाच उत्तरदायी नसतो. समाजाचाही दोष असतोच पण दोषी नायकच ठरत असतो असो! कविला वाटते, या सा-या विध्वंसात वीर सावरकर एकटेच अविचल निष्ठेने उभे आहेत. त्यांच्याशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यांना तो ‘घडूं दे पुन्हा एकदा भारत!’ची आर्त तरी विजिगीषू जीवनवादाने भरलेले आवाहन करताना गातो,

मराठ्यांचिया मूर्त स्फूर्तीविकासा, नवोन्मेषशाली कवींच्या कवे!
महासाहसी त्यागवीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे ।।

Raja Badhe & Veer Savarkar
दुर्गम भाग आरोग्य व्यवस्थेपासून दूरच!

रसिका ! किती उत्फुल्ल अन् आशयसंपन्न पंक्ती आहेत या. सावरकरांचे वर्णन करताना कवी धृपदातच जी पाच विशेषणे लावतो, त्यावर एकेक काव्य वा लेख सहजी लिहिता येतील. कवी जेव्हा मराठ्यांचिया म्हणतो तेव्हा त्याला समर्थांचा महाराष्ट्र धर्म अपेक्षित असतो.

महाराष्ट्र धर्माचा अर्थ सांगताना न्या रानडे, ‘महाराष्ट्र धर्म हिंदूधर्माहून भिन्न आहे, त्याच्या तोडीचा जेमतेम इंग्रजी शब्द ‘पेट्रियाटिझम’ होईल’ असे सांगतात कवीला वाटते वीर सावरकर देशभक्तीच्या स्फूर्तिचा मूर्तिमंत स्त्रोत आहे,

पण तो त्यांच्यातच विरणारा नसून अनेक हुतात्म्यात अखंड प्रवाहीत होणारा असल्याने तो स्वतःच्या स्फूर्तितून अनेक स्फूर्तिदाते घडविणारा आहे, सावरकरांतून मदनलाल, मदनलालच्या हौतात्म्यातून कान्हेरे अशी ती चिरंतन मालिकाच असल्याने कवी स्फूर्तिविकास म्हणतो.

जणू परिसापासून परिसच घडतात हे कवीला सूचवायचे आहे. नवोन्मेषशाली म्हणजे चैतन्याचे नवनवे अविष्कार घडविणारी, खरेतर ठराविक लिखाणानंतर लेखणी साचेबध्द होते, तिच्यातील नूतनता संपून जाते, पण जेव्हा ती सदासर्वदा नवसंजीवन प्रदान करते, ते ही कार्यप्रवण करणारे तेव्हाच ती नवोन्मेषशालीनी होते.

कवीची ही उपमा कोठे खोटी ठरली? सावरकरांच्या मरणोपरांत सत्तावन्न वर्षांनंतरही त्यांची कविता, त्यांचा लेख, त्यांची कथा, कादंबरी, सारेसारे चिरतरुण भासतात, आकर्षक वाटतात म्हणून कवी सा-या सावरकर साहित्याची संभावनाच नवोन्मेषशाली काव्यात करतो. पण हा कवी नुसताच कवी नाही तर कवींचा कवी आहे.

कवींचा कवी म्हणजे ऋषिच होय. ज्याचे शब्द अर्थ धुंडाळत फिरत नाही तर अर्थच दास होऊन त्याच्या शब्दांचा आश्रय घेताना दिसतो हे तेव्हाच शक्य होते जेव्हा तो महासाहसी, त्यागवीर अन् उदार असा कृतीशूर पंडित असतो महासाहसी म्हणजे केवळ समुद्रात उडी मारणे नसते तर भर तारुण्यात कामादिंवर मात करणे असते.

सावरकरांच्या साहित्यात कामाची आसक्ती नि विरक्ती कुठेच जाणवणार नाही. आपण केलेल्या सर्वस्व नि सहकुटुंब त्यागाला सावरकर ‘कर्तव्य’ या तीन शब्दात विसर्जित करीत असल्याने कवीला ते त्यागवीर वाटतात. इतर क्षमाप्रार्थी क्रांतिकारकांना, सावरकरांवर टीका करणाऱ्या विरोधकांना समंजसपणे समजून घेणारे, इतकेच कशाला स्वातंत्र्याचे श्रेय उदारपणे साऱ्यांना वाटणारे असल्याने उदार वाटतात.

अशा या अलौलिक महायोग्याला किती आळवावे असा प्रश्न कवीला पडतो. लक्षात घ्या कवीचा स्वप्रतिभेवर विश्वास आहे म्हणूनच तो कसे आळवावे विचारत नाही तर किती प्रकारे, किती वेळा नि किती आळवावे असे विचारतो. हा प्रश्न नसून वारंवार आळविण्याचा निश्चय असल्याने कवी उद्गार चिन्हावर थांबतो.

Raja Badhe & Veer Savarkar
युद्धाची कंत्राटगिरी!

कवी पुढे सांगतो, ‘तुझी लेखणी चेतावनी देणारी आहे, अन चेतविणारी पण आहे. चेतावणी म्हणजे संभाव्य धोक्याची जाणीव करुन देणारी आहे हे धोके कोणते ते सांगताना सूचकपणे दास्य व धर्माबाबतचे असे सांगत नुसतीच ती चेतावनी देणारी नसून दास्य संहार नि धर्म अर्थात कर्तव्य संमुख करणारी चेतना फुलवणारी आहे ती ओजस्वी असली तरी आकांडतांडव नि पोकळ आवाज करणारी नसून धीरगंभीर आहे.

त्यामुळेच ती सदा यशोदायी नि ध्वांतविद्राविणी आहे. ध्वांतविद्र्राविणी म्हणजे सर्व प्रकारचा अंधःकार पळविणारी, सावरकरवाणी राजकिय, सामाजिक, बौध्दिक, साहित्यिक साऱ्याच क्षेत्रातील अंधःकार दूर करणारी आहे असे कवीला वाटते.

सावरकरांच्या अमोघ नि अप्रतिहत वक्तृत्वाचे वर्णन करताना कवी, ‘ तिचा मूळ धर्म सद्भावना असून ती हसत खेळत लीलया वाहते, तिच्यात वीरत्व ठासून भरलेले असून ती वक्तृत्व गंगा आहे असे कवीला वाटते गंगा म्हणजे जी जनोध्दारासाठी आकाशातून धावत पृथ्वीवर येते व पतित अपतित असा भेदभाव न करता

सा-यांचेच कल्याण करते हे वर्णिताना कवीला येथे सावरकरांच्या वाणीने देशभक्तीच्या गंगेत पावन झालेले पांगळ्या गोविंदापासून महापंडीत हरदयाळांपावेतोचे सारे महाभाग असतील तितक्यात त्याच्या कानावर पडणारी वैनायक वाणी तिचे आरोह अवरोह वाद्याशिवाय संगीत निर्माण करणारे वाटतात

पण तिथे वाद्य दृष्टीला दिसत नसल्याने संगीताशिवाय वीणावादनी शारदाच अवतरली असे भासून जाते तेवढ्यात त्याला जाणीव होते, ही शारदा असली तरी ती महाकालीने व्याप्त आहे. त्यामुळेच त्याच्या मुखातून,

सह्याद्रिचा सिंह तो गर्जतांना थरारे मनी धैर्यमेरु महा
भरे कांपरे शांतीच्या भ्रांतिदुर्गा नव्या क्रांतिचा लोळ येताच हा


या सिंहाच्या गर्जनेने राष्ट्रकारणात शांतीचा घोळ घालणा-यांना कापरे भरले होते, याचे स्मरण देणा-या पंक्ती बाहेर पडतात. त्यामुळे कळत नकळत त्याच्या वाणीला तेज चढून ती गाते,

जळे जीवहि घातकी कैतवाचा विपत्काल दे सारखे हुंदके
उभी आसवें लोचनी वंचकांच्या अहंकार विव्देष होती फिके
विरोधास अंधत्व ये प्रेमभावे असूया हसे साहसा भाळूनी
तुझ्या पौरुषाची करायास पूजा पहा पातल्या आपदा लाजूनी

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Raja Badhe & Veer Savarkar
साक्षेपी समीक्षक

रसिका ! केवळ या एका कडव्यासाठी ज्ञानपीठ वा नोबेल मिळावे एवढे हे कडवे विलक्षण नि अद्भूत आहे. कवी सांगतो, ‘ज्यांनी छळ-कपटाने सावरकरांचा घात केला, त्यांचेच पाशवी मन सावरकरांचा पशुवत होणारा छळ पाहून हळहळू लागले. येथे कवी कैतव शब्दाचा वापर करतो. कैतव म्हणजे शनि- शनिची पीडा दीर्घकाल नि निःष्करुण असते.

परजनाकडून असहनीय छळ नि स्वजनांकडून अक्षम्य उपेक्षा या दोहोंचा समावेश निष्करुणेत होतो. सावरकरांनी दोन्ही बाबी लिलया पचविल्या होत्या. याअर्थी पाहिले तर पीडकाला वश करणारी पीडिताची अजेय मानसिकताच अधोरेखित करुन जाते.

संकटकाळ आला कि मी मी म्हणणारे गलितगात्र होत हुंदके देऊ लागतात पण अत्यंत कठीण संकटकाळात सावरकरांची वर्तणूक पाहून त्या विपत्कालालाच हुंदके येऊ लागले जणू त्याला वाटायला लागले माझी धीरांना रडवायची ताकदच संपली जणू विरोधातून घडणा-या सततच्या ध्यासातून प्रेम जन्मावे तसेच घडले विनायकाच्या साहसावर भाळून असूया हसू लागली ‘ हे पाहून राजा बढेंची वाणी गर्जून तात्यारावांना सांगते,

‘ तुझ्यावर कोसळणा-या आपदा अर्थात संकटाच्या मालिकांच्या मालिका, राशिंच्या राशी तुला स्थिरचित्त नि खंबीर पाहून स्वतःवरच लाजल्या अन् लाजत लाजत तुझ्या पौरुषाची पूजा बांधायला आल्या’ त्यामुळेच असेल,‘

तुला ती काळकोठरी बंदिशाळा न वाटता काव्यमंदिर वाटले असावे आणि ‘जोपासली तू छळाने कला’ कोकीळेचा गळा करकचून पिळला तरी त्यातून मधूर ध्वनी उमटावा तसेच आक्रीत घडले. छळाने गाळण उडावी तो तू कला जोपासू लागलास.

कारागृहाच्या कराल भिंती तूं काव्यलेण्या रेखाटत सजवून काढल्या, तेथला तो मिट्ट काळोख तुझ्या धैर्यरुपी, काव्यरुपी तेजाने जाळून टाकलास, अरे! आणखी काय सांगू ? बेंड्याच्या तालावर सुकुमार, सुहृदभावाने झुलणारा समबुध्दी, समचित्त, स्थिरप्रज्ञ धैर्यात्मा तूच होतास’

‘तुझ्या देशसेवेत इतरांनी देशसेवा करावी असा दिव्य आदेश आहे. तुझ्या वेदनेत स्वदेश प्रीतिची अदम्य नि प्रस्फूर्त संवेदना आहे, ती सतत ‘जगोनी मरावे, मरोनी जगावे’ असा मृत्युंजय मंत्राची दीक्षा देत असते. जगोनी मरावे याचा अर्थ देशासाठी मरण्याच्या सिध्दतेत जगावे नि मरोनी जगावे म्हणजे जर ते कारणी मरण आले तर ते चिरजीवन देणारे असल्याने चिरकालाचे जगणे ठरते.

तू स्वातंत्र्याच्या मंत्राने असा काही भारुन टाकतोस, मृत्यूतही मोहिनी वाटायला लागते. खरेतर लुळापांगळा, दुःखीकष्टी जीवही जगण्यासाठी धडपडत असतो, पण इथे पारतंत्र्यात जिणे मरणे वाटते अन स्वातंत्र्यासाठी मरणे जगणे ठरते त्यामुळेच अकाली नि भर तारुण्यात येणारा मृत्यू मोहिनी घालणारा ठरतो ‘

तो असा हुतात्म्यांचा स्फूर्तिदाता असल्याने कवी पुसतो, ‘ तू झुंजार स्वातंत्र्य शाहिर आहेस तुझी नुसती स्फूर्तिगीते गायिली तरी दास्यबंध तोडायची ताकद शिर नसलेल्या शरीरातही उत्पन्न होते अरे ! इतकेच कशाला ?

मेली मनें नाचती प्राणज्योती स्फूरे स्नेहभावे तुटे आतडी
जरी मोडिली ही कुडी सूड घ्याया उडी टाकती मराठे गडी

मेलेल्या मनांत चैतन्य निर्माण करणारा स्फूर्तिचा स्त्रोत तुझाच आहे ‘ सावरकरांचे हिंदुत्व, हिंदुत्वाला ते देत असलेला सर्वोच्च दर्जा ओळखल्यानेच सावरकरांच्या हाडाहाडांतून उठणारा

‘हिंदू , हिंदू’ चा नाद कवीला ऐकू येतो नि त्याच तालावर पुढे जात तो
पहा हालती सुड संदेश द्याया सुमांच्या खुल्या पाकळ्या पाकळ्या
झंकारीती मंत्र तो तो कधीचा तुरुंगातल्या साखळ्या साखळ्या

ज्याकाळी भारतात ब्रिटिशांच्या संगीन तलवारींना उत्तर द्यायला शांतिपाठाचे स्तोम माजविले जात होते, इंग्लिश राणीला आई म्हणत येथल्या राष्ट्रपितामहापासून राष्ट्रपित्यापावेतो सारे वाकून मुजरे करत होते तेंव्हा नरपुंगव त्या सत्य, अहिंसादि शांतिपाठाची सद्गुण विकृतीत गणना करीत सूडाचा संदेश देत होता सूडाचा हा संदेश मदनलाल, कान्हेरे, कर्वे,पिंगळे, करतार सिंह, भगत सिंह इ सारख्या फुलांहून कोमल असणा-या नवयुवकात उचंबळून वर येत होता.

हा भाव व्यक्तविताना कवी करत असलेली सुडाचा संदेश देण्यासाठी हालणा-या फुलांच्या पाकळ्यांची कल्पना अद्भूतच नाही. देशभक्तीचा परमोत्कर्ष साधणारी आहे, इतकेच नव्हे तर जगात कोठेही न्याय्य कारणासाठी सूड सूड गर्जत शत्रूला कंठस्नान घालणा-या यच्चयावत सर्वच हुतात्म्यांचा गौरव करणारी आहे.

तत्कालीन निर्वीय निस्तेज स्थिती पाहून हळहळत तो विनायकाला प्रार्थितो,‘ या शूरवीरांच्या विख्यात भूमीवर देशभक्त मनाचे मळे फुलावेत, त्यावर सुकुमार यौवनाची फुले उधळली जाऊन मृत्युचा सोहळा साजरा केल्या जावा’ अन् विनायकाला विनंती करत कवी आवाहन करतो,

Raja Badhe & Veer Savarkar
मूळ शोधण्याचा उद्योग

अतां फेक रे वज्र ते मानवेंद्रा खुल्या इंद्रजालास या घालवी
कोषांतल्या सुप्त संन्यस्त खड्गा ! पुन्हा एकदा नृत्य ते दाखवी

कवी कविता करतोय तो स्वातंत्र्यानंतरचा अगदी लगतच्या ६/८ वर्षांनंतरचा काळ आहे. ‘स्वातंत्र्य मिळाले, सगळे मिळाले आता काहीही करायचे राहिले नाही’ अशा भ्रमाचा तो काळ होता, त्यास कवी इंद्रजाल संबोधतो व ते भेदण्याची अर्थात जनतेस सत्यस्थिती लक्षात आणून देण्याची विनंती तो करतो,

पण त्याच्या लक्षांत येते दशकभरापासून सावरकर राजनीतिपासून दूर आहेत, म्हणून तो त्यास कोषातला व सुप्त संन्यस्त खड्ग संबोधत प्रकट होण्याचे आवाहन करतो. त्याकाळची सत्यस्थिती वर्णिताना कवी सांगतो,

झुकावी पुढे मान अन् हार खावा, अशी चालली सारखी उन्नती
पहा केवढा मान अन् हार कंठी, असे मानभावी जरी मानती

वरील पंक्तीत कवीने किती चपखल शब्दांत तत्कालीन राजकीय परिस्थितीचा उपहास केलाय तो वाचून रसिक व्यथित होता होता कवीच्या उपहासदर्शक या पंक्तींवर कौतुकाने मानही डोलावतो. शत्रूपुढे झुकणारी मान तत्कालीन राजकर्त्याना ‘मान’ मिळविण्यासारखी आणि मिळणारी हार ‘हारा’सारखी वाटते असा कवीचा आक्षेप आहे. इतकेच नाही तर नवजात स्वातंत्र्य मिळालेल्याभारताची राजनीति पाहून त्याला वाटते,

पूरे द्यूत हे निंद्य गांधारनीती सुतासंगती अंधलीला रत

राजकारणात केवळ द्यूत व गांधारनीती चाललीय, द्यूत म्हणजे रामभरोसे चाललेले काम तर गांधारनीती म्हणजे राष्ट्रहिताचा विचार दुय्यम मानून केवळ मुलेमुली, कुटुंबाच्या स्वार्थाचा विचार होय. हे सारे थांबावे यासाठी त्याला वाटते कि, एकटे सावरकरच यावर उपाय करु शकतात म्हणून तो सावरकरांना उद्देशून आवाहन करतो,

प्रतापे तुझ्या रे महाराष्ट्र भीमा ! घडू दे पुन्हा एकदा भारत

महाराष्ट्र धर्म देशभक्ती धर्म आहे, मराठी माणूस ‘पहिल्यांदा भारत’ चाच विचार करत असतो. सावरकर त्याच मराठीमनाचे अग्रदूत असल्याने तो त्यास महाराष्ट्र भीमा म्हणत पुन्हा एकदा भारत अर्थात महाभारत घडविण्याचे आवाहन करतो.

येथे एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे कि सावरकरांना इंग्रजांशी शत्रूशी लढण्याचा जसा अभ्यास आहे तसाच स्वजनांना हाताळण्याचेही कौशल्य आहे असा ठाम विश्वास कविला वाटतो सावरकरांवर शेकडो कदाचित हजारो कविता असतील पण राजा बढेंची ही कविता त्यासर्वात उजवी आहे.

इतकेच नव्हे तर तिची रचना, आशय अन परिणामकारकता ध्यानात घेता ती मराठी साहित्यातील प्रथम श्रेणीतील कविता ठरते. सावरकरांचे उत्तुंग व्यक्तित्व काव्यात हुबेहुब रेखाटण्यात कवी कमालीचा यशस्वी ठरलाय. प्रस्तुत केवळ नऊ कडव्यांचे काव्य, नऊ सर्गांच्या महाकाव्याशी नि अडतीस ओळींचे काव्य हजारो पंक्तिच्या महाकाव्याशी स्पर्धा करणारे आहे.

Raja Badhe & Veer Savarkar
उन्हाळ्यातील हिरवळ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com