
आशा आणि अनुभव', 'स्मृति' : भावनांचे कालिक चित्रण !
हरि सखाराम गोखले (१८९४ ते १९६२) पुण्यात अध्यापनाचे कार्य करीत. सन १९६१ साली त्यांचा 'शुद्ध लेखन, शुद्ध मुद्रण शब्दकोश' दी पुना प्रेस ओनर्स असोसिएशन लि. ने प्रकाशित केला होता. तेव्हापासून ते 'शुद्ध लेखन- शुद्ध मुद्रण कोषकर्ते गोखले' म्हणून ओळखले जाऊ लागले.
या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी 'दोष कोणाचा ?' या कृष्णाशास्त्री चिपळूणकर लिखित ग्रंथाचे प्रकाशन केले होते.
त्यांच्या नावे महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट काव्यसंग्रहाला ह. स. गोखले पुरस्कार देत होती. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet hari gokhale nashik)
कवीचा 'काहीतरी' हा एकच काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून त्यात सुमारे १५८ कविता समाविष्ट आहेत. याशिवाय कवीच्या आणखी काही स्फूट कविता उपलब्ध आहेत.
उपरोक्त काव्यसंग्रहाला प्रा. रामचंद्र कृष्ण लागू यांची मर्मज्ञ नि दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. कवीची कविता स्वतंत्र असून साधी असली तरी प्रसन्न असल्याचा निर्वाळा भवानीशंकर पंडितांनी दिला आहे.
कवितासंग्रहाच्या 'काहीतरी' या बहुअर्थी शीर्षकाविषयी लिहिताना कवी लिहितो,
ह्या मोठ्या जगतास अल्प इतुके हे होय ‘काहीतरी’
ज्ञानेशादि महान कवी खचित हे भाषेस ‘काहीतरी’
कोणाला खपले कुणास खुपले त्यांनाहि ‘काहीतरी’
माझे-मद्हृद्यातले--म्हणुनि जे ते हेच ‘काहीतरी’
काहीतरी या शब्दाचा अर्थ अर्थहीन ते भव्यदिव्य पावेतो कोणताही निघू शकतो. जगाचा व्याप बघता कवीचे हे लिखाण काहीतरीच म्हणजे क्षुद्र नि क्षुल्लक असेल पण ज्ञानेशादि सारख्या प्रज्ञावंतांच्या लिखाणाचा विचार करता ते भाषेस काहीतरी दिव्यभव्यत्वाचे लेणे चढविणारे आहे.
कवीचे काव्य सगळ्यांना आवडायलाच हवे, ही अपेक्षा कवी बाळगत नाही. इतकेच नाही तर कोणाकोणाला ते खुपणारे आहे, याचीही जाणीव त्यास आहे.
काहीजरी असले तरी कवीच्या हृदयातील भावणारे-खुपणारे, रुचणारे-रुतणारे सगळेच नाही पण काहीतरी कवीने जगासाठी आणले आहे, म्हणून कवितासंग्रहाचे नाव काहीतरी होय. कवी स्वतःला केशवसूतांचा शिष्य म्हणवितो व सांगतो की,
उंच तयाचा प्रतापशाली झेंडा फडकत राही
जीवेभावे करी पहारा चरणी एक शिपाई
केशवसुतांचा कवीने उचललेला झेंडा कवी कवितासंग्रहाच्या आरंभी यथातथ्य अनुकरणताना दिसतो. पण काही पदांतच त्याची प्रतिभा स्वतंत्रपणे विहरु लागते. याची जाण कवीला आल्याने कवितासंग्रहाच्या अंती तो ताठ मानेने सांगतो,
सर्व माझी संपत्ति-विपत्ती ही !
उसनवारी येथे न कुणाचीही !
कवितासंग्रहातील कविता वाचताना रसिकही कविच्या मताशी सहमत होत जातो. आपली कविता तमहरण करणारी आहे.
हे कथन करताना कवी 'दिवा आणि कविता' या कवितेत लिहितो, अंधार झाला की प्रत्यक्षात असलेल्या साऱ्या वस्तू असूनही दिसत नाहीत व प्रकाश येताच त्या दिसू लागतात तसेच कवितेचेही आहे.
ती दिव्य-ज्योत-कविता-ह्रदयी प्रकाशे
तीचा प्रभाव इतुका तम सर्व नाशे
जीवनातील तम म्हणजे अर्थहीनता, रटाळ रहाटगाडगे होय. ते सारे संपवित कविता जीवनाला सरस नि सुरस बनविते. यात कवितेची महती पटवून देण्यासाठी कवीने वापरलेली पद्धती अनोखी असून प्रभावी आहे.
कवीने बालपण, आई व मूल, गरीबी अशा अनेकविध विषयावर कविता केल्यात. प्रतिबिंबसारखी कविची कविता प्रेमाची पावती देऊन जाते. एकटी कवितेत आशा व उषा संगतीने जातात, पण तरीही ती लाटांत हरवते.
कवीने व्यक्ती चित्रणात्मक अनेक कविता लिहील्यात. त्यात विस्मयाची बाब म्हणजे नेपोलियन वर दोन तर न्यूटन वर एक कविता आहे. देश आणि देश स्वातंत्र्य यावरही काही कविता आहेत. जळजळ या कवितेतून तो
हिमालय अमुचा -- अमुचा उंच जगी !
अधोगत आम्ही हतभागी !
खंत मांडत जातो. तेव्हा त्याची पारतंत्र्याची पीडाच दिसून येते. याच व्यथेतून खैबरखिंड या कवितेत तो लिहितो,
हिने फोडिला हिमालयाच्या छातीचा कोट ।
गुलाम केले हिने जगातील लोक तीस कोट ।।
भूगोलाच्या विद्यार्थ्या, बघ ही खैबरखिंड ।
इतिहासाच्या विद्यार्थ्या, बघ ही आपली धिंड ।।
अत्यंत कमी शब्दांत अत्यंत अचूक वर्णन आहे हे ।
पण कवीचे वैशिष्ट्य म्हणजे साध्या साध्या विषयात तो मांडत असलेला सरस आशय होय. पागोळ्या, तगराचे फूल, पान या त्यातीलच काही लक्षणीय कविता होत. पागोळ्या म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या पन्हाळ्या होत.
त्यातून वाहणारे पाणी पाहताना कवीला वाटते, या घरावरून सोडलेल्या मुंडावळ्या होत. तर दुसऱ्याच क्षणी त्याला वाटते टपटप गळणाऱ्या सरीच्या माळेत जणू टपोरे मोतीच ओवले. अशा विविध कल्पनांनी त्याची कविता साध्या वस्तूंना फुलवत जाते.
या सर्वात मला भावतात मनो व्यापाराचा, त्यांच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाचा धांडोळा घेणाऱ्या 'आशा आणि अनुभव' व 'स्मृति" या दोन कविता. आशा आणि अनुभव या कवितेत कवी लिहितो,
आशा होती उभीच किंचित दुरी ती घेऊनी संनिध
संधी सांधुनि एकदा अनुभवे संबोधिले, ‘लाडके--‘
वरील पंक्तीत आशा किंचित दूर उभी होतीच. कवीने केलेला उल्लेख किती वास्तविक आहे. आशा नेहमीच पुढे नि थोड्या अंतरावर उभी असते आणि अनुभव तो नेहमी आपल्याजवळच असतो.
एखाद दुसरा विरळा अनुभव सोडला तर जगाचा नि जीवनाचा अनुभव हा प्रायः दुःखप्रद नि क्लेषदायीच असतो तर आशा नेहमीच सुखकर नि आनंददायीच असते. पण जीवनाची गंमत बघा दुःखप्रद असलेला अनुभव सुखकर आशेला ‘लाडके’ संबोधतो अन् त्याहूनही गंमत म्हणजे ती ही चटकन त्यास होकार देते.
नव्हे नव्हे ती त्याची पत्नीच आहे. आपल्या दुःखदायी, क्लेशकर जीवनाची झळ तिला बसू नये, असे त्याला वाटू लागते म्हणून तो तिला म्हणतो,
‘आशे, सौख्य तुला नसे-पण पुढे आशाही काही नसे
आहे हा सहवास त्रास सगळा तुते सदा कोमले !
मी कंगाल, तशी तुला बनविली जा सोड याला कसे
कां ऐसा वनवास काढिसी उगा तूं राजसे-प्रेमले?’
पहिल्या पंक्तीत कवीने साधलेला आशेवरचा श्लेष अत्यंत मधूर असून अर्थपूर्ण आहे. अनुभव म्हणतो, ‘ हे आशे ! माझ्यासोबत राहण्यात तुला कसले सुख तर नाहीच, पण काही आशाही नाही.
’आशेचा संबंध असतो भविष्याशी आणि अनुभवाचा वर्तमानाशी ! दाहक अनुभवांचा खच जमला की भविष्य अंधःकारमय होऊन आशा उरतच नाही म्हणून तो तिला म्हणतो, ‘जिथे भविष्यच नाही, तिथे आशे तुझे कसे होणार? ‘तो तिला कोमले संबोधतो कारण आशा नेहमीच कोमल, विमल असते आणि अनुभव कितीही संपन्न असला तरी तो कंगाल असतो.
हे जरा नीट समजून घ्यायला हवे ! एकतर अनुभव वर्तमानात जगत असतो, तिथे त्याचे हातपाय बांधलेले असतात. दुसरे तो भूतकाळाच्या कर्तृत्वावर उभा असतो. भूतकाळात आपल्याला काहीच करता येत नसल्याने एकापरीने अनुभवसंपन्नही तिथे कंगालच ठरतो.
म्हणून तो तिला सोडून जा म्हणून सांगतो बरे सोडून जा सांगताना ही तो तिला प्रेमले, राजसे ! संबोधतो याचे कारण तिने सोडून जाऊ नये, असे कुठेतरी त्यालाही वाटते.
कारण ती त्याच्या मनात वास करत असते, तीच त्याचे भविष्य आहे. पण सोबत राहताना तिचा होणारा वनवासही त्याला नकोसा वाटतो. तिचा वनवास संपणे याचा अर्थ याला वर्तमानात सुख मिळणे, असा होतो हे सांगायला हवे का ?
आणि ती आशा? ती तर इतकी कुलीन आहे की त्याला सोडायलाच तयार नाही. ती म्हणते मी ‘जन्मापासून सुखे विसरल्ये’ खरच आशेला सुख कसे मिळणार? कितीही मिळाले तरी तिची तृप्ती होतच नाही ‘आणखी, आणखी’ची मागणी सरतच नाही.
त्यामुळे ती त्याला सोडायला तयार नाही. त्यालाही मनातून तिला सोडायचे नव्हतेच. कारण ती असल्यानेच त्याच्या जीवनात रंगत आहे, मजा आहे त्यामुळेच कवी उद्घोषितो,
‘आशा हीच खरी मदीय, असली आशा कुणाला नको?’
‘’आशा मी अपुली प्रभो अनुभवा, अव्हेर तिचा नको!’’
येथे आशा अनुभवाला ‘प्रभो’ म्हणते कारण त्याच्याच पायी तिचे अस्तित्व आहे. तो जर निराशेत गेला तर तिला कोणते जीवन राहणार? म्हणून ती तिचा अव्हेर न करण्याची त्याला विनवणी करते. स्मृति म्हणजे घडून गेलेल्या घटनेची आठवण होय.
ती राहण्यासाठी आधी घटना घडावी लागते, त्या घटनेची धारणा टिकावी लागते. या साऱ्या मनोव्यापाराचे सुंदर दर्शन कवीच्या स्मृति या कवितेत वाचायला मिळते. काव्यारंभी तो म्हणतो,
सखा अनुभव तो आज कुठे गेला
जीव स्मृतीचा व्याकूळ फार झाला !
बसुनी दारी कर ठेवुनिया भाली
वाट बघता पातले अश्रु गाली !
असा स्मृती व्याकूळ होऊन स्वतःला पुसते माझा सखा ! अनुभव ! कोठे गेला? अन ती त्याची वाट पहात कपाळावर हात ठेवून दारात बसते.
वाट पाहताना माणूस इतका उत्सुक असतो, की घरात बसणे त्याला शक्य होत नाही तो वा ती दारात बसते, अंगणात येरझाऱ्या घालते या वाट पाहण्याने येणारा लवकर येणार नसतो. पण वाट पाहणाऱ्याची तगमग, उतावीळपणा त्याला वा तिला स्वस्थ बसू देत नाही. तीच कथा स्मृतीची होते तितक्यात तिला स्मरते,
वियोगाचा सुमुहूर्त नियोजून
ब्रह्मदेवा म्हटलेस सावधान
गांठ पडली, घडली न पुन्हा भेट
दुष्ट नाही का हे असे ललाट?
कवी किती समर्पक शब्दयोजना करतो बघ ! वियोगाच्या मुहूर्तावर स्मृतीचे नि अनुभवाचे लग्न झाले. वियोग म्हणजे ‘ताटातूट होण्याचा क्षण’ त्या मुहूर्तावर संबंध जुळला.
अनुभव घडून गेल्यावरच त्याची स्मृती निर्माण होते. म्हणजे संबंध घटना घडून गेल्यावरचा आहे. त्यामुळेच गाठ पडली, संबंध जुळला नि भेट संपली. हे सारे विचित्रच नाही का?
चक्रवाकीला रात्रीचा वियोग
दिवसरात्री मज दोन्हीही कुयोग
कुठे दयिता, गेलात असे दूर
कसा अनुभव मम जाहला कठोर !
यात कवीने केलेला चक्रवाक पक्षाचा उल्लेख त्याचा संस्कृत नि प्राचीन मराठी साहित्याचा गाढा अभ्यास दाखवतो. संस्कृतात चक्रवाक अर्थात एका विशिष्ट जातीच्या बदकाला जीवनसाथीवरील प्रगाढ प्रेमाचे व अद्वैताचे प्रतीक मानले जाते.
महाभारतात असा उल्लेख आहे, की रात्रीच्या समयी एका पानाआड लपलेली त्याची प्रिया सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करत असतो. हीच उपमा कालिदासाने मेघदूतात वापरलेली सापडते.
‘दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकां’ अर्थात चक्रवाकी प्रमाणेच माझी पत्नी एकटीच असेल. ज्ञानेश्वर नि नामदेवसुद्धा चक्रवाकाचे प्रतीक वापरताना दिसतात. नामदेव तर सरळ सरळ ‘चक्रवाक पक्षी वियोगे बहाती।’ असे म्हणतात.
येथे कवी चक्रवाकाला रात्रीचाच वियोग आहे. मला अर्थात स्मृतीला तर दिवसरात्री दोन्हीही वेळी वियोग असल्याचे कथन करीत, प्रियकर कोठे गेलायचा शोक करत पुसते,
कसा अनुभव मम जाहला कठोर !
त्यावेळी ‘अनुभवाचा अनुभव’ कठोर झाल्याची तिची काव्यमय कैफियत वाचताना रसिक मन कवीच्या प्रतिभेवर फिदा होते. शोक करता करताच स्मृतीला कळून येते तिचा प्रियकर कठोर नाही. त्याचे हृदयीचे भाव उदार आहेत.
ते पुन्हा पुन्हा वाचताना तिचा जीव तुटायला होतो. जीवनाची गंमत हीच आहे. घडून गेलेली गोष्ट, घटना, इतिहास वाचताना मन त्यात रमून जाते.
त्याचा पुनःप्रत्यय यायला लागतो. पण तितक्यात लक्षात येते ‘गेला ! तो क्षण गेला !’ आणि इतिहासात रमणारा तो हळहळून, दीर्घ उसासा सोडत म्हणतो ‘एक काळ ऐसा होता ।’
तो परत येणार नाही हे लक्षात आल्यावर ती मरणाची वाट पहात थांबली. बरोबर आहे ना स्मृतिलाही मरण असते, ज्याला विस्मरण म्हणतात.
तोच मरणरुपी अनुभवाची स्वारी आली. ज्या कोणाची ती स्मृती होती ती त्याबरोबर निघून गेली, स्मरणरुपी कलेवर मात्र मागे उरले. याचे सुभग वर्णन करताना कवी
कलेवर ते राहिले करामाजी
जीव गेला बिलगून जिवामाजी !
सांगत कविता थांबवितो
नीट पाहिले तर प्रस्तुत कवितेत कवी भूत, भविष्य आणि वर्तमान काळाचा परस्पर संबंध मानवी मनोव्यापारातून चितारतो. काळ ही संकल्पनाच मूळी मनः विचार सापेक्ष आहे. ते बाजूला सरकवले तर भूतकाळ नि भविष्यकाळचे मूल्यच राहणार नाही.
अनुभव वर्तमान असून स्मृती भूतकाळाचे प्रतिनिधित्व करते तर आशा भविष्याचे । भूतकाळ नेहमी वर्तमानाची आंस बाळगतो तर वर्तमान भविष्याच्या भरवशावर जगतो. त्यामुळेच स्मृतीला अनुभवाची सय येते तर अनुभव आशेत गुंततो.
मात्र आशेचे भवितव्य वर्तमानाच्या हातात असते. त्यामुळे ती त्याला सोडू शकत नाही. हे सारे कवी समर्थपणे चितारतो. या साऱ्यांचा आस्वाद घेताना रसिक कविच्या कल्पनाविलासाला दाद द्यावी की विचारकल्पनेला या विचाराने अचंबित होतो. पण मधल्या काळात नि नंतरही तो कवीच्या रसगंगेत न्हात राहतो.
(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)