सप्तर्षी: सात हुतात्म्यांचे स्मरण!

Book
Book esakal

नारायण केशव बेहेरे (१८९० ते १९५८) मूळचे विदर्भातील नागपूरचे; पण अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापनाचे काम करीत. गद्य नि पद्य दोन्ही प्रकारच्या लिखाणात त्यांचा हातखंडा होता. त्यांचे लिखाण वैचारिक स्वरुपाचे असून राष्ट्रवाद त्यांचा आत्मा आहे. कवीची पत्नी लक्ष्मीबाई बेहेरे या सुध्दा कवयित्री होत्या. त्यांची ‘नाकळे’ ही कविता अत्यंत मधुर असून त्यातील

चालक तो देव जगाचा । परि अर्थ मला ‘देवाचा‘। नाकळे
अज्ञान पुरी मी वेडी! । सुटतील कशीं हीं कोडीं। नाकळे

या पंक्ती सरल सुगम असूनही गूढार्थ दर्शक आहेत. त्यांची बहुतेक कविता आता अनुपलब्ध आहे. ((saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet narayan behre nashik News)

Book
कोलाहल...

ना. के. बेहेरे यांच्या नावे नागपूर विद्यापीठाने मराठी विषयासाठी सुवर्णपदक ठेवलेले असून समीक्षक द. भि. कुळकर्णी व कवी ग्रेस यांना अनुक्रमे १९५९ व १९६६ साली ते मिळाले होते.

सुमारे सहा - सात वर्षे अध्ययन करुन त्यांनी सन अठराशे सत्तावन्न हा ग्रंथ १९२७ साली प्रकाशित केला. या ग्रंथाच्या संदर्भ यादीत वीर सावरकरांच्या १८५७चे स्वातंत्र्यसमर या विश्वविख्यात ग्रंथाचा उल्लेख नाही. त्यावर बंदी असल्याने तो उल्लेख टाळला असावा.

मात्र लेखकाने तो ग्रंथ वाचल्याचे संकेत प्रस्तावनेतील राष्ट्रवादी भुमिकेच्या साक्षेपी वर्णनावरुन व ‘जर असे असेल तर त्यास पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणण्यास प्रत्यवाय नसावा’ अशा मारलेल्या टीपेवरुन वाटते. लेखकाला बंड म्हणायचे नव्हते नि स्वातंत्र्ययुध्द म्हणण्याची प्राज्ञा नव्हती. म्हणून ग्रंथाचे ‘१८५७’ असे तटस्थ तरीही सूचक नाव ठेवलेले दिसते.

याशिवाय ‘शककर्ता शालिवाहन’, ‘पहिला बाजीराव पेशवा’ हे ग्रंथही त्यांनी लिहिले. ‘हिंदू कोण?’, ‘ध्येयाकडे’ इ विचारप्रवर्तक कादंबऱ्यांचे जनकत्वही कवीकडेच जाते. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात कवीने ‘हिंदुधर्मप्रकाश’ नाव्याचे काव्य लिहीले होते.

त्यात ‘देश हाच देव आणि त्याची सेवा हाच धर्म’ अशी विचारसरणी मांडली असून ‘जे जे हिंदुस्थानास आपली जन्मभूमी मानतील ते ते सर्व हिंदू आहेत.’ अस मतितार्थ काढला आहे.

कविच्या सुमारे ३०७ कविता 'मोत्यांची माळ' या संग्रहात प्रकाशित झालेल्या आहेत. कवीचा ओढा वाच्यार्थाकडे झुकणारा असल्याने कवीची कविता स्पष्टार्थ बोधक आहे. ती अ-गेय असल्याने तीत वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत कवी चोखंदळ नाही अन् वृत्तरचना सुध्दा निर्दोष नाही, असे असले तरी कवीच्या कित्येक काव्यातील कल्पना विलक्षण चित्ताकर्षक वाटतात. ‘सुताचे सर’ या कवितेत -

चंचलाच धनुकली । पिंजण्यास घेतली ।
            मेघखंड खंडुनी पेळु केले
हिमकण जणुं पसरले। आकाशहि  नाहलें |
         कापसांत रंगलीं देव-बाळें !
चरका मग फिरविला । गडगडाट बोलिला ।
           मेघदंड कातुनी सूत केलें
तेच तंतु लोंबले। भूलोकीं पातले ।
           गांधींतें वंदुनी धन्य झाले

Book
स्थलांतराची चढती कमान

इंद्रधनुषरुपी धनुष देवाने पिंजण्यासाठी घेतले पांढऱ्या शुभ्र ढगांचे पेळु केले. सूत कातताना जे पुंजके उडतात, त्याला कवी हिमकणाची उपमा देत, त्यात देव बाळे रंगल्याची साक्ष देतो. पाऊस पडताना होणारा गडगडाट म्हणजे चरख्याचा आवाज होय.

कातन्यासाठी ढगांचेच सूत केले, त्याचे तंतू लोंबत लोंबत भूलोकापर्यंत आले नि गांधीजींना वंदून धन्य झाले. कवीची ही कल्पना, त्यासाठी त्याने वापरलेली शब्दयोजना मनाला भावून जाते.

कवीच्या काही कवितांचा विषय तत्वचिंतनासाठी खर्ची पडलेला दिसतो. ‘नश्वर देह’ कवितेत कवी मानवी देहाची क्षणभंगुरता विविध उपमांनी वर्णन करीत ‘आयुष्य संपतां विसर पडे मनुजाचा।’ हा त्रिकालाबाधित सिध्दांत सांगून जातो.

तर काही कवितात पुरोगामी भूमिका मांडलेली दिसते. ‘हा कां महार दूर?’, ‘अस्पृश्यता राहिल कोठुनी?’ या वानगीदाखल काही कविता होत. यामागची भूमिका विशद करताना ‘गातां कां मग कुलथोरवी?’ या कवितेत जन्माने नव्हे तर गुणाने वस्तुंचे मोल केल्या जाते. याची कोळशात सापडणारा हिरा, चिखलात जन्मणारे कमळ अशी अनेक उदाहरणे देत अंतिमतः कवी,

जन्मा येणें दैवाहातीं करणी जग हांसवी । गातां कां मग कुलथोरवी?

असे विचारतो. ही कविता सन १९२४ची आहे. हे लक्षात घेतले तर कवीची पुरोगामी नि समतावादी दृष्टी आणखीनच ठळक होते. मराठीवर कवीचे नितांत प्रेम आहे. त्यामुळेच एका कवितेत तो गातो,

मराठी आमुची माता महाराष्ट्र ही प्राण
मराठा होतसे वेडा करी जीवास कुर्बान
मराठ्यांच्या धडाडीचें सदा राहे मनां ध्यान
मराठ्याला मराठीचें न हो केव्हाच विस्मरण
जगाची ही नसे भाषा न हिंदुस्थानची प्यारी
मराठा हा हिला मानी हिचीं गाणींच जिव्हारीं

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Book
पुनर्शोधाची गोष्ट

या पंक्ती वाचताना ‘न हिंदुस्थानची प्यारी’ म्हणण्यामागचे कारण सुजाण व्यक्तीलाच कळेल. मराठा नि मराठी हे जरी भारताचे अविभाज्य घटक असले तरी सुमारे दीड शतके मराठ्यांनी भारतावर एकाहाती अधिराज्य गाजवलेले होते.

त्यामुळे तत्कालीन आत्मविस्मृत हिंदुस्थानला मराठ्यांविषयी एकप्रकारची भाऊबंदकीची असूया वाटत होती. ती अमराठी मुलुखांत वास्तव्यास असल्याने कवीच्या प्रकर्षाने ध्यानात आली असावी. कवीच्या काव्याचा आणखी एक विशेष म्हणजे त्यात भरलेला दुर्दम्य राष्ट्रवाद होय. आपले ध्येय कथन करताना कवि सांगतो,

देश, देव तैसा धर्म । जीवाचे माझ्या वर्म । या माझ्या देवांवरुन । पंचप्राण ओवाळीन ।।

इतकेच कशाला इंद्रधनुतील सात रंगाचे वर्णन करताना जेंव्हा लाल रंगाचे वर्णन येते, तेंव्हा उचंबळून कवी सांगतो,

लाल रंग हा रक्ताचा । जसा इंग्रजी राज्याचा ।

हे पारतंत्र्यकाळी लिहिणं किती धोकादायक होते, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. निर्भेळ नि निडर देशभक्ती शिवाय हे संभवच नाही. याच देशभक्तीचे प्रत्यंतर कवीच्या सप्तर्षी या कवितेत दिसते.

सप्तर्षी ही कविता आकाशातील सप्तर्षींवर नसून १९३१ साली देशासाठी बलिदान झालेल्या भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, मल्लाप्पा घनशेट्टी, सारडा, जगन्नाथ शिंदे नि कुर्बान हुसेन या सात हुतात्म्यांना उद्देशून आहे. कवितेच्या आरंभीच कवी गातो,

जगिं कुबेर कीं धनशेठ । परि मल्ल तळपतो धीट । संगरी ।।
रगडलीं मोंगली सत्ता । शिद्यांचा अस्सल बेटा । शोभतो ।।
मुसलमान सच्चा जाण । जीवास करी कुर्बान । लिलया ।।
विद्येस शारदा पूजी । प्रसंगांत हो रणगाजी । पंडित ।।
रामदास गुरुराजांचा । आत्मत्याग बाणा त्याचा । केसरी ।।

रसिका ! कवितेच्या या ओळी अगदी वाच्यार्थानेही हुतात्म्यांची नावे सरळ कथन करत जातात. त्यात थोडी सावधानता हवी म्हणून कवी थोडाफार लक्ष्यार्थ वापरण्याचा प्रयास करतो.

जसे मल्लाप्पा धनशेट्टीचा उल्लेख करताना ‘कुबेर’, ‘धनशेठ’ असे वर्णन करीत असताना, तो संगरी तळपणारा ‘मल्लपण’ आहे असे सांगून जातो. तर 'जीव कुर्बान करणे' वाक्प्रचाराचा वापर करीत, त्याला मुसलमान असल्याचा संकेत देत, कुर्बान हुसेनचे नांव वाचकाच्या मनावर हलकेच उठवतो.

Book
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे...

याच तंद्रीत तो सांगतो,

राष्ट्रास । प्राण वाहिले । धन्य जाहले ।
सातचे सात । स्वातंत्र्यदेविचे भगत । सिंह हे ।।

यात कवीने स्वातंत्र्यदेवीचे हे सात भक्त असे वर्णन करताना त्यात भक्त शब्दासाठी 'भगत' शब्द जाणून बुजून वापरत तिथे अर्ध विराम देत, पुढे ते सिंह आहेत सांगताना भगत सिंहांचे नाव खुबीने गोवतो.

ज्याकाळी सशस्त्र क्रांतिकारकांना राजसत्ता, राजद्रोही, बंडखोर घोषित करत असताना, देशाचे पुढारीपण लाभलेले नेते, आतंकवादी, अत्याचारी म्हणत असताना नि सामान्य जनता सुध्दा आत्मघातकी म्हणून संभावना करीत असताना; कविला त्यांच्यातील ‘ऋषित्व’ दिसते.

यातच कवीची भविष्यगामी दृष्टी ही येते नि इंग्रज सरकार, तत्कालीन काँग्रेसी,  पुढारी यांच्याविरुध्द जाऊन आपले विचार मांडण्याचे धाडसही येते. ‘ऋषि’ म्हणजे जगाच्या कल्याणासाठी लवलेश स्वार्थ न बाळगता, स्वतःच्या सर्वोच्च त्यागाने जगाला अखंड मार्गदर्शन करणारे संत होत.

ही व्याख्या लक्षात घेता हुतात्म्यांना कवी लावत असलेली उपमा किती समर्पक नि सूचक आहे ते चटकन ध्यानांत येईल.  

हे सातही ऋषि आता आकाशात नांदत असून ते कधीही वक्री होत नाहीत. कधीही अस्ताचलाला जात नाहीत. जणू काही ते देशभक्तीच्या नभांगणांत निश्चल निश्चयाने ऊभे राहिलेले सात धृवच आहेत अशी ग्वाही कवी देतो. ते तरुणपणांतच मृत्युला वरणारे असल्याने त्यांना कधीच वृद्धत्व येणार नसल्याने ते सदैव तरुणच राहणारे आहेत. ते अवकाशातून परतंत्र भारत राष्ट्राला तेजस्वीतेचा पुरवठा करत -

आयुष्यपुष्प अर्पावे । भारता ।।

दिव्य संदेश देत नि तसा आशिर्वादही देत ऊभे आहेत. त्यांच्या दर्शनाने नि स्मरणमात्रे जनतेत चैतन्य पसरावे, या सातांचे धैर्य जनतेत खेळावे नि लवकरात लवकर - स्वातंत्र्या पोचाे हात । आमुचा ।।

अशी कामना करत कवी कविता संपवितो. कोणी म्हणेल काय विशेषसे आहे या कवितेत? या कवितेत धैर्य आहे, नीडर देशभक्ती आहे, देशशत्रूला आवाहन देण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच फेब्रुवारी १९३२ च्या चित्रमय जगतात ही कविता प्रकाशित होते न होते.

तोच इंग्रज सरकारने कवीला कामावरुन काढून टाकले. या कवितेचे मोल कवीला गलेलढ्ढ पगाराची नोकरी गमावण्यात मिळाले. कवीचा हा त्याग मोठाच आहे. माणूस शारिरीक कष्ट सहजपने देतो, मन हे थोड्या विचाराने देतो नि धन हे क्वचित नि मोठ्या कष्टाने देतो.

म्हणून आपण तन, मन आणि धन अशा क्रमाने दानाची प्रतवारी करतो. कवीने येथे देशप्रेमासाठी धन हा उच्च प्रतीचा त्याग स्वीकारला होता. पण त्याच्या सुप्त देशभक्तीचा या प्रसुप्त अविष्काराला आजवर कोणाही लेखकाने आदरांजली दिल्याचे वाचनांत नाही.

त्यामुळेच रसिका ! ही कविता मी हटकून निवडली व या सात हुतात्म्यांचा गौरव करण्याऱ्या कवितेचे रसग्रहण करण्याच्या मिषातून कवीच्या देशभक्तीलाही वंदन केले आहे.

(लेखक हे प्रख्यात मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएच.डी समतुल्य पुरस्काराने गौरवान्वित आहेत.)

Book
बिनीचे कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com