ते पाऊल कोणाचे ? | saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet rajkavi radhudas nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poet Sudhadas

ते पाऊल कोणाचे ?

राजकवी साधुदास (१८८४ - १९४८) यांचे मूळ नांव गोपाळ धोंडो पाटणकर. असे सांगतात की वडीलांच्या व्यवसायावरुन त्यांचे आडनाव मुजूमदार पडले. वयाच्या विसाव्या वर्षी ते चुलत चुलत्याला दत्तक गेल्याने त्यांचे नाव गोपाळ गोविंद मुजूमदार झाले.

येथे एक प्रश्न पडतो जर मुजूमदार आडनांव वडीलांच्या व्यवसायावरुन पडले होते तर ते धोंडो या जन्मदात्याच्या की गोविंद या दत्तक पित्याच्या? मला वाटते दत्तक पित्याच्या व्यवसायावरुन असावे, त्यामुळेच नंतरच्या काळात कवी वापरत असावा.

कवीचा जन्म सांगलीचा होता. प्राथमिक शिक्षण नि पुढील जीवन सांगलीतच व्यतीत झाले. दरम्यानच्या काळात शिक्षणासाठी ते पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात होते. पण बुध्दिबळाच्या छंदापायी शिक्षण अर्धवट सोडून सांगलीस परतले.

पुढे रामोपासक हनुमंत कोटणीस महाराजांचा अनुग्रह त्यांनी घेतला. त्याच संप्रदायातील साधुमहाराजांचा दास म्हणून ‘साधुदास’ हे टोपणनांव त्यांनी काव्यरचनेसाठी धारण केले. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi poet rajkavi radhudas nashik news)

गुरुविषयी आपल्या भावना व्यक्तविताना साधुदास लिहितात,

गुरुभजनविधानी वेचिलें आयु सारें ।
गृहविभवसुतादि तुच्छ केले पसारें ।।
वरि सहजसमाधि-ध्यान रात्रंदिसा रे ।
पुनरपि हनुमंत व्यक्त झाला असा रे ।।

उपरोक्त पंक्तीं त्यांचा गुरुभक्तीच्या नि ईशश्रध्देच्या दर्शन घडविणाऱ्या आहेत. त्यांचा संस्कृत नि जुन्या मराठी काव्याचा व्यासंग खूपच दांडगा होता. त्यांची काव्यरचना प्रासादिक, गेय नि छंदोबध्द होती.

त्यांच्या छंदशास्त्रावरील अधिकाराची प्रशंसा राजवाड्यांसारख्या विद्वानाने नि माधव ज्युलियनसारख्या कवीने केली होती. इतिहासाच्या ओढीतून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर सोळा कादंबऱ्या लिहिण्याचा संकल्प केला होता.

पण मराठी साम्राज्याचा वद्यपक्ष; प्रतिपदा, पूर्वरात्र व उत्तररात्र, द्वितीया पूर्वरात्र व उत्तररात्र, मराठेशाहीची अखेर-१ अशा पाच सहा कादंबऱ्याच त्यांना पूर्ण करता आल्या. यातील पौर्णिमा कादंबरीत त्यांनी केलेले शनिवारवाड्याचे वर्णन प्रमाणभूत मानले जाते.

मराठीची सजावट भाग १ नि २ हे नेमक्या मराठी लेखनासाठी उपयुक्त ठरणारे ग्रंथ त्यांनी लिहिले. यात गद्य पद्याची सजावट कशी करावी, हे सोदाहरण स्पष्ट करुन दाखविले आहे. याशिवाय ‘बुध्दिबळाचा मार्गदर्शक’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला. त्यामुळेच त्यांना सांगलीला 'बुध्दिबळाची पंढरी' बनविणार्‍या शिल्पकारातील एक म्हणून ओळखले जाते.

काव्याचा विचार करता, श्रीरामकथा चार विहारात आणण्याची त्यांची मनीषा होती. यापैकी १९१२ साली वनविहार हे सतरा सर्गातील महाकाव्य; ज्यात वनगमनापासून सीतेच्या शोधापावेतोचे प्रसंग चित्रित केलेले आहेत.

दोनच वर्षांनी रणविहार; नावाप्रमाणे ह्यात रणसंग्रामाचे वर्णन आहे. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी गृहविहार त्यांनी पूर्ण केले. चवथा इप्सित पुरविहार त्यांच्या मनातच उरला. असे असले तरी कवीने पार पाडलेले काम सुमारे तीनचतुर्थांश आहे.

‘ही तीनही खंडकाव्ये अतिशय सुरस असून संस्कृत साहित्यातील महाकाव्यांशी स्पर्धा करणारी आहेत’ असा शांता शेळकेंसारख्या प्रतिभावान कवयित्रीचा अभिप्राय आहे. कवीने लिहीलेल्या स्फूट कविता निर्माल्यसंग्रह या नावाने भाग १ व २ मध्ये प्रकाशित झाल्यात.

कवीने अनेक स्तोत्रे रचली त्यातील जगन्नाथ पंडिताच्या गंगालहरीच्या धर्तीवर लिहिलेले 'कृष्णालहरी' अत्यंत सरस असल्याचा निर्वाळा समीक्षकांनी दिलेला आहे. खरे पाहता कृष्णालहरी सांगलीकरांसाठी भूषणावह ठरावे. असे असले तरी काही गद्य लिखाणाचा अपवाद वगळता कवीचे बहुतांश काव्य आज अनुपलब्ध आहे.

जाता जाता हे ही सांगणे गरजेचे वाटते की, एका कवितेसाठी त्यांना महाकवी सावरकरांसोबत विभागून पारितोषिक मिळाले होते. यावरुन त्यांच्या काव्याची जाती नि उंची ध्यानात यावी. सांगली संस्थानचे राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राजकवी यशवंत त्यांना गुरुस्थानी मानत.

आज आपण साधुदासांची ‘ते पाऊल कोणाचे ?’ ही निसर्गात ईशदर्शन घडविणारी चिमुकली तरी देखणी कविता पाहणार आहोत. ही कविता महाराष्ट्र रसवंतीच्या संग्रहात ५३ व्या क्रमांकावर आहे. कवितेचा आरंभ

 गगनाच्या अंगणी । उमटते पाउल शुभलक्षणी ।।
नाजुक गोंडस असे कुणाचे सांगा मजला कोणी ।।

या धृपदाने होते. जणु काही हा प्रतिभाशाली कवि कल्पनेने उंचच उंच गगनात उतरलाय. त्यामुळेच त्याला गगन हे अंगणरुप वाटते. त्या अंगणात उमटलेले शुभलक्षणी पाऊल त्याला दिसते, अर्थात ते रोजच दिसत असल्याने कवी त्यासाठी ‘उमटते’ असा शब्दप्रयोग करतो.

पावलाचे दोन प्रकार असतात, शुभलक्षणी नि अवलक्षणी!  पाऊल जर शुभलक्षणी असेल तर ते मनाला भावते. म्हणून कवी त्यास नाजूक नि गोंडस संबोधतो, व ते कोणाचे आहे, असे पुसतो. पण नीट पाहिले तर येथे प्रश्नार्थक चिह्न नाही.

म्हणजे ते पाऊल कोणाचे आहे ते कवीला ठाऊक आहे. ते वाचकांना सहज समजावे, म्हणूनच कवी ‘गगनाचे अंगण’, ‘शुभलक्षणी पाऊल’ अशा सूचक रचना करतो. गगन हे अंगणरुपी कोणाला आहे तर भगवंतालाच ! आणि यच्चयावत साऱ्या धर्मातील देव उंच आकाशातच वसतीला असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे अर्थघटन सोपे जाते. शिवाय सदा शुभ लक्षणी पाऊल भगवंताचेच असते. कवीला गगनांत दिसणारे हे पाऊल संध्याकाळी दिसणारे असल्याने कवी गातो,

संध्यारागातुनी । तयाचा तळ दिसतो साजणी ।।
स्वर्गंगेसम रेषा दिसती कधी कधी ज्यांतुनी ।।

हे वर्णन करताना कवी प्रतिभा क्षणात जमिनीवर अवतरते. त्यामुळे त्या पाऊलाचा तळ तिला दिसू लागला. हस्तरेषा आपल्याला ठाऊक असतात, दिसतातही. लोक त्यावरुन भविष्यही पाहतात. खरे तर ते भविष्य पुढे भूतकाळात कायमचे विलीन होणारे असते.

इथे कवी भगवंताच्या पाऊल रेषा पाहतो. कारण तो सदासर्वकाळ स्थिर असतो, जे त्याचे कालातीतत्व दर्शविते. कवीला संध्याकाळी होणारे हे पाऊलांचे दर्शन, पाऊलातील गुलाबीपण अधोरेखित करताना त्यातील पदरेषांना जेंव्हा कवी आकाशगंगा संबोधतो, तेंव्हा उपमेय उपमान होऊन बसते.

कवीची ही करामत सुजाण रसिकांची मति गुंग करणारी आहे, यात शंकाच नाही. हे वर्णन वाचताना कुसुमाग्रजांच्या ‘प्रकाश-प्रभू’ कवितेतील  

घट तेजाचे भवती ओतित
असंख्य रवि-राजाचे प्रेषित
महाद्वार पूर्वेचे खोलुन क्षितिजावर येती !
चराचरांचे घेऊन जीवन
करात, उदयाद्रीवर मागून
टाकित पद गंभीर येतसे परमेश्वरमूर्ती

या पंक्ती स्मरतात. साधुदासांना सायंकाळी दिसणारे परमेश्वराचे पाऊल भक्तीचे प्रतीक ठरते. तर कुसुमाग्रजांना उषःकाळी दिसणारे परमेश्वराचे पाऊल विश्वाचे दायित्व सांभाळणार्‍या शक्तीचे प्रतीक ठरते म्हटल्यास वावगे ठरु नये.

पुढील पंक्तीत कवी सांगतो कि त्याने पाऊल टाकताच, त्याच्या पायातील पैंजण तुटले. अन् त्यातून विखुरलेले मणी आकाशात नक्षत्र होऊन चमकू लागली. येथे सावरकरांच्या ‘तयाचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले’ म्हणत तारकांना अनेक उपमांनी गौरवणाऱ्या कवितेची याद येते.

पण सावरकरांनी त्यांच्या कवितेत जी दिली नाही, ती पैंजणाची उपमा सावरकरांचे सहाध्यायी असलेले साधुदास देऊन जातात. याचे महत्वाचे कारण त्यांना तो परमेश्वर चिरबाल - चिरकाळ बालकच राहणारा वाटतो.

त्याशिवाय का तो पैंजण घालणार आहे? शिवाय दूसरे कारण कवीला त्याच्याकडे काही मागायचे ही नाही, कारण तो बाल आहे. त्याने जे दिले तेच कवीला आनंदमय वाटते.

येथे कुसुमाग्रजाची ‘पाऊल-चिन्हे’ ही कविता स्मरते. तीत ते तारकांना विचारतात, ‘तुम्ही चिरंतन गगनगामी प्रवास करतात. तुम्हाला परमेश्वराचे चरण कधी दिसले का?’ त्यावेळी त्या मंदस्मित करीत त्या उत्तरतात, ‘तो तर मुक्त प्रवासी आहे आणि,

उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही

अर्थात त्याची पाऊल चिन्हे म्हणजेच तारका, नक्षत्रे होत. कवी साधुदासांना मात्रं ती पायातील पैंजण वाटतात कारण ती आवाज करतात. कवी सांगतो काही मणी विखुरले, काही दोऱ्यात अडकून पायातच राहिले,

कांही उरले गुणी । तयांतुनि रुणझुण उठतो ध्वनि ।।
कानी येतो अव्यक्ताच्या तो अवकाशातुनि ।।

पायातील दोऱ्याला, ज्याला गुणी म्हणतात त्यात अडकून राहिलेल्या मण्यांतून रुणझुणू ध्वनि उठत असतो. तो अव्यक्ताच्या आकाशाला व्यापून उरलाय. अव्यक्ताचा ध्वनि अनाहत असतो, अनाहत म्हणजे विना आघाताने उत्पन्न होणारा ध्वनि. ज्याला नानक ‘एक ओंकार सतनाम’ म्हणतात तर कबीराला तो ‘गगन में आवाज हो रही है झिनीझिनी.... झिनीझिनी.. ।’

वाटतो, तोच होय. हा ध्वनि मन जेंव्हा निर्वात होते तेंव्हाच ऐकू येतो. मन जेंव्हा ईशगामी होते नि आपूर्ण भक्तीने व्यापते तेंव्हाच ते निर्वात होते. येथे भक्ती म्हणजे जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त ! असाच अर्थ घ्यावा लागतो. कवीच्या या पंक्ती कवितेला अत्यंत उंचीवर घेऊन जातात. कवितेचा संदर्भ गहन करतात. कविता संपवताना कवी पुसतो,

गगनी एके क्षणीं । दुज्या तें उठतें क्षितिजातुनी ।।
पाऊल दिसतें परी तयाचा कोण असावा धनी ? ।।

खरे म्हणजे अनाहताचा नाद, अव्यक्ताचा ध्वनि ऐकल्यावरच कविता संपविली असती तरी चालले असते. पण या पंक्तीत कवी क्षणांत गगनात, क्षणात क्षितिजावर उमटणारे ते पाऊल मला दिसते पण त्याचा धनी कोण असावा? असा प्रश्न पुकारत कविता संपवतो.

यामागे दोन कारणे असावीत. पहिले कवी पेशाने शिक्षक असल्याने शिक्षक जसा धडा शिकविल्यावर विद्यार्थ्यांना धडा समजला की नाही पहायला प्रश्न विचारतो, तसाच हा प्रश्न असावा.

आणि दूसरे महत्वाचे कारण म्हणजे, आपण चेहऱ्यावरुन साऱ्यांना ओळखत असतो, चरणावरुन नाही. त्यामुळेच एखादा गोड आवाज ऐकला की तिचा किंवा त्याचा चेहरा पाहण्याची तीव्र इच्छा जागृत होते. तोच न्याय इथे लागू होतो.

माणूस भगवंताला फक्त चरणांवरुन ओळखतो. मग जरा त्या चरणांची ओळख झाली, अव्यक्ताचा तो अखिलं मधुरं ध्वनि कानी पडला की, त्याचे श्रीमुख कसे आहे ते पाहण्याची तीव्रतर इच्छा जागृत होते.

तीच कवीची झाली. म्हणून कवीने त्याच जिज्ञासेने हा प्रश्न पुसला, हेतू हा की त्याने श्रीमुख दाखवावे. कोणी म्हणेल, ‘अहो ! हे कसे शक्य आहे? नुसते विचारल्याने का परमेश्वर मुख दाखवत असतो?’ त्यांना बाल मानसशास्त्र कळत नाही.

एखाद्या अर्धवट लपलेल्या मुलाला म्हणा, ‘हा हात, हा पाय कोणाचा आहे ?’ की खळखळून हसत ते मूल बाहेर येईलच. तेच शास्त्र कवी येथे वापरतो. ईश्वर चिरकालासाठी बालकासारखा निरागस, निष्पाप आहे हे कवीला ठाऊक असल्यानेच, कवी ‘हे पाऊल कोणाचे ?’ पुसत त्याला समोर यायला प्रेरित करतो. थोडक्यात शेवटचे हे कडवे आवाहनाचे आहे, म्हटल्यास चूकीचे ठरु नये.

नीट पाहिले तर निसर्गात ईशस्वरुप पाहणारी ही कविता ईशदर्शनाची आंस व्यक्तवित विराम घेते. ही कविता रचना, पदलालित्य नि अर्थगौरव या तीनही अंगांनी फुललेली आहे, अन तीस ईश अनुभूतीचा स्पर्श केल्याने प्रफुल्लीत झाली आहे. कवीची ही एकच रचना त्याच्या चिंतनाची गहनता नि काव्यरचनेची सकसता दाखवायला पुरेशी आहे.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएच.डी समतुल्य पुरस्काराने सन्मानीत आहेत.)