
मजुराची सांज : भयाण वास्तवाचा उद्घोप!
विनायक लक्ष्मण बर्वे (१८९६ ते १९४८) हे मूळचे खेड तालुक्यातील सोनगावचे राहणारे होते. त्यांचा जन्म चिपळूणचा. त्यांचे पुढील सर्व जीवन चिपळूणमध्येच व्यतीत झाले. त्यांनी अनेक कविता, कादंबऱ्या, नाटके लिहिली.
वीर सावरकरांच्या सुधारणा चळवळीत ते आघाडीवर होते. त्यांच्या कविता कोकण नि कोकणी समाजजीवनावर आधारलेल्या होत्या. त्यामुळे कवी माधव त्यांना कोकण कवी म्हणत. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on poet vinayak barve Majurachi Sanj emergence of terrible reality nashik news)
या कवीच्या काव्याचा मुख्य हेतू गोरगरीब, वंचितांची दुःखे उजागर करणारा होता. त्यामुळेच मजुराची सांज, नाविकाची जात, नाविक, नंदकरी, गोपाल, वडाराचा संसार असे त्यांच्या काव्याचे विषय असत. गरीबाला देवाच्या दारीही कशी उपेक्षा सहन करावी लागते, याचे हुबेहुब वर्णन कवी शिवामूठ या कवितेत करतो.
शिवामूठ म्हणजे मूठभर धान्य शिवाला अर्पण करणे होय. एक गरीब अन भीरु नवविवाहीता शिवामूठ वहायला जाते, पण तेथे श्रीमंत बायकांची पूजा चाललेली असते. त्यामुळे तिला तिष्ठत उभे रहावे लागते.
अन् जेंव्हा तिच्या पूजेची वेळ येते, तेंव्हा गुरव देऊळ बंद करायची वेळ झाल्याचे सांगत तिला बाहेर काढतो. तो दुर्दैवी जीव शिवामूठ न वाहताच घराकडे परततो. त्याचे वर्णन करताना कवी लिहितो,
भीरु बाला निघे त्वरेने पूजन केल्याविना ।
आणुनि थेंब थेंब लोचना ।।
असे असले तरी निसर्ग नि निसर्गाला असणारा ईशस्पर्श कवीला कधी कधी खुणावून जायचा. पाऊस या कवितेत कवी लिहितो,
धुळ पाऊस धुळ । दिव्य देवतांचे कुळ । नभातून पिस्कारीती अमृताची चूळ ।।
नभातून देवता अमृताची चूळ फेकतात, असे त्याला वाटते. तितक्यात कोसळणाऱ्या सरीवर सरी बघून त्याला देवनारी धरतीवर सपासप उड्या घेताना दिसतात. तर मोर नाचतांना नि चातक पक्ष्यांना लागलेला घोर दिसतो. ढगावरील वीज ढाल तलवारीसारखी भासते. हिरवीगार होणारी शेती नि तीतून उगवणारे मौक्तिकाचे हार दिसायला लागतात, ही संपूर्ण कविता गेय असून प्रासादीक आहे.
याशिवाय कवीने थॉमस ग्रेच्या एलेजीचे पारिजात या शीर्षकाने सन १९३४ साली भाषांतर केले आहे. मात्र त्याला देशी साज चढवायला कवी विसरला नाही. एलेजी म्हणजे शोकगीत होय. या शोक गीतातील काही कडव्यात तो स्मशानातील विवेक कथन करताना थडग्यावर कोरलेली नावे, सनावळया पाहून तो सांगतो,
अज्ञातांमधि विरुन जाया सिध्द नसे मानव ।
गुंतुन राही मोहमयी कायेंत स्वयें अभिनव ।।
न तोडवे अभिलाष पसारा जडता ये अंतरी ।
लोलुप नयनें खिळुनी बैसती भरल्या जगतावरी ।।
रसिका ! कवी किती मोठं सत्य सांगून जातो. प्रत्येकाला वाटते मेल्यावर सुध्दा आपलं नाव राहावं. याच मोहात तो अडकलेला राहतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यांना कवी लोभाने पछाडलेला म्हणतो व त्याला वाटते जणु थडग्यातील ती सारी सृष्टी भरल्या जगाकडे पाहत राहते.
आज आपण कवीची मजुरांची सांज कविता पाहूत दिवसभर राबराबून दमलेला मजूर घरी येतो.
दिसाभऱ्याच्या थकून आलों, चुलीपशी धावलों
चुलीपशी धावलों, सयेच्या संबुर म्या बैसलों
हताळीता भाकरी सयेच्या, मुखात चंद्रमा डुले
चुलवैलाचीआगिनलाली निबार गालीं खुलें
थकून आलेला तो भूकेने व्याकूळ होऊन चुलीपाशी धावला, त्याची सखी चुलीजवळ बसलेली आहे. नि हा तिच्या समोर बसला तिला पाहताच त्याचा शीण सरला सखीला पाहताच सारा शीण गळून जात असेल, तरंच खरे प्रेम नि खरा संसार होय.
त्याचा संसार तसाच आहे, कारण तो नवीन आहे. त्याला तिच्या मुखात चंद्रमा दिसतो नि हातात थापत असलेली भाकर ही तशीच दिसते. चुलीची लाली सयीच्या गाली खुलून दिसते आहे. त्यामुळेच त्याला वाटते घरात पडलेला उजेड हा तिचाच आहे, पण तितक्यात दारिद्र्याची बोचरी जाणीव येऊन तो सांगतो,
दिवा घराचा - सईच माझी - उजेड माझ्यावरी !
उजेड माझ्यावरी, तेलाचा टिपूस नाही जरी
घरात दिवा जाळायला तेल नाही, याची जाणीव त्याच्या मनाला जाळायला लागते. त्यातही तो स्वतःच स्वतःवर व्यंग करत आपली व्यथा व्यक्त करतो,
मलाच झाकी सदा सयीच्या पिरतीची कांबळ
पण सयेला धडुत घ्याला मला न पैकाबळ !
ती तिच्या प्रीतिच्या वाकळीखाली मला झाकीत असली, तरी तिला जाडभरड का होईना पण अंग झाकायला धडुत अर्थात कापड घ्यायला आपल्याकडे पैशाचे बळ नाही, ही जाणीव बोचायला लागते. लगेच त्याच्या ध्यानात येते तिला दिवस राहिलेले आहेत.
आता प्रसुतीला केवळ तीन महिने उरलेत. पाहता पाहता तीन महिने सरतील, बाळ जन्माला येईल. म्हणजे जबाबदारी वाढेल तिघांची निगा राखणं आपल्याला जमेल का? या काळजीने त्याचा जीव झुरायला लागतो. याचे वर्णन करताना कवी
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
मजुराच्या ओठी, भयाण ही काळजी करी कणखर जीवाचा भुगा
अशी समर्पक शब्दयोजना करतो. यातील कणखर जीवाचा भुगा होणे शब्दप्रयोग अत्यंत बोलका आहे. तो देवाला उद्देशून म्हणतो ‘देवा ! आम्हासारख्या भणंगांच्या पोटी कशाला पोरे जन्माला घालतोस. कुणाला वाटेल यात देवाचा काय संबंध ? पण डोळे उघडून सभोवताली पाहिले तर मुलांविना ओस मोठमोठे वाडे अन् श्रीमंताचे संसार दिसतील.
मग कवीचे बोल चुकीचे वाटणार नाहीत. जर मुलांमागून मुले होत राहीली तर? तर आज हवी हवीशी सई उद्या नको नकोशी वाटायला लागेल. त्यामुळे त्याची जीभ कोरडी पडली अन् ताटातील भाकरी तशीच राहिली.
खरंच चिंतेच्या आहारी गेलेल्या माणसाला स्वतःचा आहार कसा धकावा ? दिसाभराचा शीणलेला, भूकेने व्याकूळ झालेला तो मजूर काळजीने पोखरुन गेला. जणु उरात सूरी खुपसल्यापरीस त्याला झाले तीव्र व्यथेने तो उद्गारला,
जळोत शहरें, जळोत राज्यें, जळो तिजोरीघरें
खपून वर्सावरीस जेंथें जरि न शेती तरें !
कवीच्या या ओळी आज ही प्रासंगिक नाही असे कोण म्हणू धजेल ? नीट पाहिले तर सांज ही दिवसभराच्या श्रमानंतर विश्रांतीरुपी सुखाची असायला हवी, असे अपेक्षित असते. कवितेच्या आरंभी दिवसभर काबाडकष्ट करणारा हा मजूर घरी परततो, तेंव्हा दिवसभराचा शीण विसरुन घरात वावरताना दिसतो.
पण घरात दिव्याला नसलेले तेल, सईला नसलेले पातळ त्याला व्याकूळ करायला लागतात. त्यात तीन महिन्यांनी घरात बाळ येणार हे ध्यानात येताच आनंदापेक्षा काळजीने जीव पोखरुन निघतो. खरेतर घरांत नवीन बाळ येणे हा खूप मोठा आनंदाचा क्षण होय.
आणि शंभर वर्षापूर्वी तर तो आणखीनच भाग्याचा समजला जात असे. पण दारिद्र्याने पिचलेल्या या गरीब मजुराला त्या आनंदापेक्षा जबाबदारीची जाणीव होऊन आनंदाचेही दुःख वाटायला लागते येथे हे ही ध्यानात घेणे गरजेचे आहे.
हा मजूर काबाडकष्टाला घाबरत नाही, पण ते वांझ ठरतात ही त्याची व्यथा आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते कि, प्रस्तुत कविता दारिद्र्यात प्रियदर्शन दुख;द ठरते. नि वांझ परिश्रम व्यथित करतात. या दोन चिरस्थायी वास्तवांना अधोरेखित करत जाते. अन् मजुराची सांज सुखापेक्षा व्यथा, काळजीनेच भरलेली असते, हे भयाण वास्तव उद्घोपित जाते.
(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएच.डी समतुल्य पुरस्काराने गौरवान्वित आहेत. )