एज्यु कॉर्नर : ''स्कूल लायब्ररी''तून उत्तम आयुष्याचे दिशादर्शन | saptarang latest marathi article by KS Azad on guide to better life from School Library nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

K S Azad

एज्यु कॉर्नर : ''स्कूल लायब्ररी''तून उत्तम आयुष्याचे दिशादर्शन

लेखक : के. एस. आझाद

आपल्या जीवनात पुस्तकांचे फार महत्त्व आहे. आपल्याला जीवन जगायला एक तर वाचलेली पुस्तके शिकवतात अथवा भेटलेली माणसे. या विधानावरुन पुस्तक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे पटकन लक्षात येते.

पुस्तके जिथे उपलब्ध असतात, ते ठिकाण म्हणजेच लायब्ररी होय. जर आपले जीवन पुस्तक घडवत असेल, तर पुस्तके वाचण्याची सवय लहान वयापासून करायला हवी. जर ही सवय शालेय जीवनात निर्माण झाली तर निश्चितच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवणे सहज शक्य आहे.

म्हणूनच शालेय जीवनामध्ये ''स्कूल लायब्ररी'' हा फार महत्त्वाचा घटक आहे. बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार प्रत्येक शाळेत लायब्ररी असणे, हे सक्तीचे करण्यात आलेले आहे. (saptarang latest marathi article by KS Azad on guide to better life from School Library nashik)

व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथालये अर्थातच लायब्ररीचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून पुस्तकांची उपयोगितता सर्वश्रुत आहे.

बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणूनही लायब्ररीची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. प्राचीन भारतात तक्षशीला व नालंदा विद्यापीठे ग्रंथालयांसाठी जगप्रसिध्द होती.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास त्याकाळी ग्रंथालायाद्वारे सुयोग्य रितीने होत असे. प्राचीन काळ ते आधुनिक काळ ग्रंथालयाचा प्रवास पाहता ग्रंथालय हे शैक्षणिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. 

शैक्षणिक दृष्टीने अध्ययन अध्यापन व मूल्यमापन पध्दतीचा पाया हा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्य पुस्तकावर अवलंबून असतो. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हे शिक्षणाच्या तात्विक, मानसशास्त्रीय म्हणजेच लॉजिकल व सायकॉलॉजिकल आहे.

पुस्तकामधून देश व समाजाच्या गरजेनुरुप, उद्दिष्टानुरुप निवडलेले असतात. संदर्भ पुस्तके म्हणजेच रेफरन्स बुक व संदर्भ ग्रंथ हे केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच समाजजीवनासाठी उपयोगी असतात. पुस्तके व संदर्भ ग्रंथ प्रत्येक व्यक्ती, संस्था व शाळेच्या संग्रही असायला हवेत. 

समृद्ध ग्रंथालयांमधून जीवन समृध्द करणारी पुस्तके, संदर्भग्रंथ पाहावयास मिळतात. व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून लायब्ररी सेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी आहे.

ग्रंथालयविषयक हा दृष्टिकोन इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांत मान्य झाला. व ग्रंथालय–चळवळीचे मूळ सर्वप्रथम तेथे रुजले. इंग्लंडमध्ये एफ. ए. एबर्ट व एडवर्डझ यांच्या प्रयत्नांमुळे १८५० मध्ये सार्वजनिक ग्रंथालयविषयक पहिला कायदा मंजूर झाला.

या कायद्यान्वये जनतेकडून कर वसूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ग्रंथालये स्थापन करण्यात आली. तेथे सर्वांना मोफत ग्रंथालयसेवा मिळू लागली. १९६४ मध्ये पब्लिक लायब्ररीज अँड म्युझियम्स ॲक्ट मंजूर झाला.

या कायद्यान्वये सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था ही राष्ट्राची जबाबदारी होय, हे तत्त्व मान्य करण्यात आले.

भारतातील ग्रंथालय चळवळीचा प्रारंभ बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात केलेल्या योजनाबद्ध अशा मध्यवर्ती तसेच जिल्हावार, तालुकावार व ग्रामवार ग्रंथालयांच्या स्थापनेने झाला.

शालेय ग्रंथालय मुले बहुतेक नेहमीच बघतात. विद्यार्थ्यांना स्कूल लायब्ररीचे कमालीचे आकर्षणही असते. कारण लायब्ररीमध्ये आपल्याला समजते अथवा कळते की तुमच्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींपेक्षा वाचण्यासारखी पुस्तके प्रचंड संख्येने आहेत.

शाळेतील ग्रंथालयातून मुलांना पुस्तके कशी हाताळायची हे शिकायला मिळते. लायब्ररियन म्हणजेच ग्रंथपाल लायब्ररीत जेव्हा भेटतो, तेव्हा त्यास वर्गात काय शिकवले जात आहे, हे माहीत असते.

जो तुम्हाला एक व्यक्ती म्हणून ओळखू शकतो आणि तुम्हाला वाचायला आवडेल अशा गोष्टींची शिफारस तो करतो. आवड, क्षमता व काय उपयोगी पडेल अशी पुस्तके वाचण्याची तो शिफारस करतो.

शालेय ग्रंथालय असे असावे, जिथे मुले संशोधन आणि अभ्यास कसा करावा हे शिकू शकतील. शालेय शिक्षणात लायब्ररीचा उपयोग गुणवत्तावाढीसाठी होऊ शकतो.

लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांचा अधिकाधिक वापर करण्यास शिक्षक आणि विद्यार्थी यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना आवश्यक त्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देणे, हे स्कूल लायब्ररीचे उद्दिष्ट असते.

शालेय शिक्षणात स्कूल लायब्ररीचा अधिकाधिक वापर होणे ही शैक्षणिक गरज आहे. केवळ पाठ्य पुस्तकांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून शिक्षणाची उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकत नाहीत. त्या भागविण्याचे कार्य स्कूल लायब्ररी विविध सेवांच्या आणि उपक्रमांद्वारे पार पाडू शकते.

स्कूल लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर करण्याचे शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविकच ज्ञानार्जनाची आवड निर्माण होते.

म्हणून आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना लायब्ररीचा वापर करण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांची ज्ञानार्जनाची, जिज्ञासापूर्तीची नैसर्गिक भूक भागविण्याचे कार्य स्कूल लायब्ररीकडून अपेक्षित आहे. 

लायब्ररी या उपक्रमाचे यश विद्यार्थी ग्रंथालय साहित्याचा वापर किती व कसा करतात, यावर अवलंबून असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन त्याचा वापर करण्याचे शिक्षण ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना द्यायला हवे.

ग्रंथालयीन साधनांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक वापर करता यावा म्हणून ग्रंथालयाने विविध सेवांचे आणि उपक्रमांचे आयोजन करावयास हवे. उदा. विविध शालेय उपक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

यामध्ये चित्रकला, निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांचा समावेश असतो. लायब्ररीच्या माध्यमातून या सर्व स्पर्धांवर मार्गदर्शन करणारी पुस्तके उपलब्ध करुन देता येतात.

ऐतिहासिक संदर्भ, जॉग्रफी, नागरिकशास्त्र यावर देखील सखोल माहिती देणारी पुस्तके उपलब्ध करुन देता येतात.

शाळेतील सर्वच विषयाच्या अध्ययन अध्यापन व मूल्यमापनासाठी लायब्ररीची मदत होते. मात्र, शाळेतील ग्रंथालयाच्या अधिकाधिक वापरासाठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करत राहायला हवे. 

(लेखक क्लीफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत)