ॲलोपथी : वेगाने विस्तारणारी वैद्यकीय शाखा | saptarang latest marathi article by rajaram pangavane on Allopathy rapidly expanding medical discipline nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajaram Pangavane

ॲलोपथी : वेगाने विस्तारणारी वैद्यकीय शाखा

आजारांपासून सुटण्यासाठी आजतागयात माणसाची सतत धडपड चालू आहे. निरनिराळया लोकजीवनांत निरनिराळया उपचारपध्दती तयार झाल्या. मेंदूवरच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपर्यंत वैद्यकीय शास्त्राचा प्रवास झाला. ठळकरित्या अशी उदाहरणे पाहिली तर आयुर्वेद, होमिओपथी, ऍलोपथी (आधुनिक वैद्यक), अक्युपंक्चर, योगचिकित्सा, निसर्गोपचार, संमोहनशास्त्र, युनानी अशी अनेक शास्त्रे आहेत.

यापेक्षाही जगाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या उपचार पद्धतीही आहे. या सर्व उपचारांमध्ये ‘ऍलोपथी’ ही सर्वात वेगाने विस्तारणारी व अधिक प्राधान्य दिली जाणारी वैद्यकीय शाखा होणे. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on Allopathy rapidly expanding medical discipline nashik news)

मनुष्याला होणाऱ्या आजारांचा इतिहास हा माणसाइतकाच जुना आहे. थंडी आणि उष्णता, जीवजंतू, विषारी पदार्थ, अपघात, उपासमार, वाढते वय, कामधंदा, बदलते जीवनमान, ताणतणाव या सर्वांचा बरावाईट परिणाम अनेक वर्षापासून माणसावर होत आलेला आहे.

यामुळे अनेक आजार माणसाला कायम जडत गेले आहेत. त्या आजारांचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात बदलतही गेले. काही आजार इतिहास जमा झाले तर काही नव्याने झाले. त्याचे अत्यंत घातक स्वरूपही आपण अलिकडच्या काही वर्षात बघत आहोत.

या सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटण्यासाठी आजतागयात माणसाची सतत धडपड चालू आहे. निरनिराळया लोकजीवनांत निरनिराळया उपचारपध्दती तयार झाल्या. मंत्रतंत्रापासून ते मेंदूवरच्या अवघड शस्त्रक्रियेपर्यंत वैद्यकीय शास्त्राचा प्रवास झाला.

ठळकरित्या अशी उदाहरणे पाहिली तर आयुर्वेद, होमिओपथी, ऍलोपथी (आधुनिक वैद्यक), अक्युपंक्चर, योगचिकित्सा, निसर्गोपचार, संमोहनशास्त्र, युनानी अशी अनेक शास्त्रे आहेत. यापेक्षाही जगाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या उपचार पद्धतीही आहे.

आजच्या परिस्थितीत उपचार म्हणजे औषधोपचार असे समीकरणच झाले आहे. या सर्व उपचारांमध्ये ‘ऍलोपथी’ ही सर्वात वेगाने विस्तारणारी व अधिक प्राधान्य दिली जाणारी वैद्यकीय शाखा होणे.

औषधशास्राची शिस्त

होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे. ऍलोपथीमध्ये प्रभावी, निर्धोक अशी औषधे १९ व्या शतकाच्या अखेरीपर्यंतही फारशी नव्हती.

विसाव्या शतकात, विशेषतः गेल्या पन्नास-साठ वर्षांत मात्र या शास्त्रात अत्यंत वेगाने प्रगती झाली. गुणकारी अशी शेकडो औषधे आता बहुसंख्य रोगांसाठी उपलब्ध आहेत. याचे श्रेय एकतर सर्वसाधारण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आहे.

निरनिराळया विज्ञान-क्षेत्रातील प्रगतीच्या आधारेच आधुनिक औषधशास्त्र उभे राहिले आहे. त्याचबरोबर आधुनिक औषधशास्त्राची एक पध्दत, शिस्त तयार झाली आहे. जगभर ती शिस्त मानली जाऊन त्या आधारे संशोधन होते.

त्याचा फायदा सर्व मानवजातीला मिळतो हेही महत्त्वाचे आहे. नवीन औषध शोधताना ते प्रभावी व तुलनेने योग्य आहे, याची खात्री एका समान पध्दतीच्या आधारे करतात. औषध उत्पादक कंपन्यांनीही संशोधन करून अनेक नवी औषधे तयार केली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रोगनिदानानंतरच औषध बनवत

पुरातन कालापासून निरनिराळे रोग, आजार, जखमा इ. बरे करण्यासाठी औषधांचा वापर करण्यात येत आहे. औषधे पूर्वी प्रामुख्याने वनस्पती व प्राणींपासून, क्वचित प्रसंगी खनिज यांचा वापर केला जायचा.

औषधे सामान्यत: रोगाचे निदान केल्यानंतर वैद्य स्वत: तयार करून देत. औषधे तयार करून ठेवणे, साठविणे व टिकविणे या गोष्टी अवघड असल्याने पूर्वी रोगनिदान झाल्यावरच औषधे तयार करून देण्यात येत.

औषधे साठवून व टिकवून ठेवण्याची क्रीया माहित झाल्यावर तयार औषधांचा जलद वापर करता येऊ लागला. अशा रितीने मोठ्या प्रमाणावर औषधनिर्मिती होऊ लागली. पूर्वी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी या पध्दतींत औषधे तयार होत असे.

औषधनिर्मितीत प्रगतीला सुरवात

पाश्चात्त्य देशांत सोळाव्या शतकापूर्वी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेली औषधी वस्तू दळून ती आवश्यक तितकी बारीक करीत असत. औषधांतील क्रियाशील घटकाची संहती (प्रमाण) व शुध्दता अधिक असणे आवश्यक आहे, असे आढळून आल्यानंतर इतर प्रक्रियांचा वापर करण्यात येऊ लागला.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पाश्चर इत्यादींच्या सूक्ष्मजीवशास्त्रविषयक शोधांमुळे औषधनिर्मितीसाठी शास्त्रज्ञांचे लक्ष सूक्ष्मजैव पदार्थांवर (सूक्ष्मजीवांपासून मिळालेल्या पदार्थांवर) केंद्रीत झाले. त्याच सुमारास काही रसायनेही औषधे म्हणून वापरात होती.

त्यांचा पुरवठा प्रामुख्याने जर्मनीकडून होत असे. पण पहिल्या महायुध्दात तो पुरवठा बंद झाल्याने रसायन निर्मितीचे कारखाने इतर देशांत निघाले. विसाव्या शतकात औषधनिर्मितीत बरीच प्रगती होऊन जंतूनाशके, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, विविध घटकांचा वापर औषधोपचारासाठी उपयोग करण्यात येऊ लागला. औषधनिर्मिती यांत्रिक पध्दतीने केली जाऊन औषध पुरवठा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.

औषधनिर्मिती आज संघटीत

एकोणिसाव्या शतकापर्यंत औषधपुरवठा हा वैयक्तिकरीत्या होत होता. याच सुमारास औषधनिर्मितीवरील सरकारी बंधने, वाहतुकीच्या साधनांतील प्रगती, संदेशवहनाच्या सोई, पेटंट व बोधचिन्ह याबाबत संरक्षण इत्यादींमुळे युरोप खंडात बऱ्याच औषधनिर्मितीच्या कंपन्या स्थापन झाल्या.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतही त्यांना अशाच सवलती मिळाल्याने या कंपन्यांनी आपले उत्पादन तेथे सुरू केले. वैद्यांनी अथवा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सूचनांनुसार औषधे बनवून व ती वापरण्यास योग्य आहेत असा अभिप्राय त्यांच्याकडून घेऊन मगच ती विकण्याची प्रथा प्रथम फ्रेडरिक स्टर्नस कंपनीने १८७६ मध्ये सुरू केली.

नंतर बहुतेक सर्व कंपन्यांनी ही प्रथा प्रचारात आणली. मानकीकरणाचे (प्रमाणित स्वरूपात निर्मिती करण्याचे) तत्त्व प्रथम १८७९ मध्ये वापरण्यात आले. निर्मितीची गुणवत्ता अगोदर ठरविणे व तयार केलेल्या औषधींची या मानक गुणवत्तेबरोबर रासायनिक पद्धतीने तुलना करणे या पध्दतीचा वापर प्रथम पार्क डेव्हिस अँड कंपनीने केला.

एकेकाळी विस्कळित स्वरूपात असलेल्या औषधनिर्मितीचे आज एका सुसंघटित, सुव्यवस्थित, सुस्थापित व जटिल अशा उद्योगधंद्यात रूपांतर झाले आहे.

औषधी दोन प्रकारची...

आज मिळणाऱ्या तयार औषधांत दोन प्रकारची औषधे आहेत. एक प्रकार म्हणजे वैद्यांच्या सूचनांनुसार तयार केलेली व दुसरी सामान्य मलमे, बाम, डोकेदुखीवरील गोळ्या यांसारखी नित्य वापरातील औषधे.

औषधांच्या विविध प्रकारांमुळे, त्यांसंबंधीच्या ज्ञानाचा प्रसार वाढल्यामुळे व ती वापरल्याने येणाऱ्या अनुभवामुळे दुसऱ्या प्रकारची औषधे सर्व बंधने सांभाळून तयार केली जातात. ही औषधे विविध कंपन्यांच्या संशोधन विभागांच्या सल्ल्यानुसार किंवा जुन्या अनुभवसिद्ध सूत्रांवरून तयार केली जातात.

वनस्पतींचाच वाटा मोठा

औषधे अथवा मेडिसिन तयार करताना वनस्पतीचा मोठा वाटा आहे. बऱ्याच वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असलेले घटक असतात. या घटकांचा औषध म्हणून फार पूर्वीपासून उपयोग करण्यात येत आहे.

आयुर्वेदात अशा प्रकारची विविध औषधे तयार करण्याच्या पद्धतींचे वर्णन दिलेले आहे.पाश्चात्य देशांत गेलेन या ग्रीक वैद्यांनी दुसऱ्या शतकात प्रथमच अशी औषधे तयार करण्याचे सविस्तर वर्णन केले.अशा औषधांना पाश्चात्त्य देशांत ‘गेलेनिकल्स’म्हणतात.

अशी असते औषधनिर्मितीची प्रक्रिया

वनस्पती, प्राणी, जीवजंतू, क्षार, खनिज यांवर गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया करून आधुनिक औषधे तयार केली जातात. प्राण्यांमध्ये विशिष्ट विकार निर्माण करून त्यावर एखादे औषध उपयोगी पडते का ते पाहिले जाते.

एकाच वेळी अनेक उंदीर वा तत्सम प्राणी निवडले जातात. त्यापैकी निम्म्यांना हे नवीन औषध दिले जाते तर निम्म्यांना वरून तशाच दिसणा-या कॅपसूलमध्ये निरुपद्रवी पदार्थ घालून दिली जाते. आजार बरे होण्याचे प्रमाण हे औषध दिलेल्या गटामध्ये जास्त आढळले तरच हे औषध प्रभावी ठरते.

औषधाच्या नेहमीच्या डोसच्या अनेकपट डोस प्राण्याला देऊन त्याचे दुष्परिणाम अभ्यासतात. सध्या अस्तित्त्वात असलेल्या औषधांच्या मानाने हे नवीन औषध प्राण्यांमध्ये प्रभावी व तुलनेने निर्धोक ठरले तरच संशोधक पुढे जातात.

यानंतर मानवी स्वयंसेवकांमध्ये त्याची चाचणी घेतली जाते. या चाचणीत ते पुरेसे परिणामकारक, पुरेसे निर्धोक ठरले तरच सर्वसामान्य वापरासाठी ते खुले केले जाते. या सर्व चाचण्या योग्य पध्दतीने पार पाडण्याचे, त्याचे निष्कर्ष तपासण्याचे शास्त्रशुध्द निकष असतात. या सर्व निकषांना एखादे औषध उतरले तरच ते शास्त्रीयदृष्टया सिध्द झाले असे समजतात.