Latest Marathi Article | शालेय अभ्यासक्रमात करावा गारगोटी मिनरलचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gargoti museum nashik

शालेय अभ्यासक्रमात करावा गारगोटी मिनरलचा समावेश

लेखक : के. सी. पांडे  

देशाच्या विकासात कृतिशील आणि कार्यप्रवण तरुणांची गरज असते. शिक्षणपद्धतीत बदलामध्ये वेळोवेळी याचा उल्लेख होता आणि काही बदलही होतात. देशासाठी असा सक्षम युवक घडविण्याच्या प्रक्रियेमध्ये भूगर्भस्थित गारगोटीचा समावेश झाल्यास रोजगाराच्या अनेक संधी असलेल्या या क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांना बालवयापासूनच माहिती मिळू शकेल आणि या क्षेत्रातील करिअरच्या अनेक वाटाही आपोआप तयार होत जातील, शासनाने यादृष्टीने विचार केल्यास गारगोटीचा अभ्यासक्रमात समावेश ही एक रोजगाराची मोठी संधी तयार करू शकते.

आ पल्या देशात विद्यार्थी व युवक ही फार मोठी शक्ती आहे. आपले हे सर्वांत मोठे बलस्थान आहे, शिवाय आपल्याकडे त्या सर्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपली शिक्षणपद्धती योग्यच आहे. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ शिक्षणपद्धती अवलंबविण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करतच असते. पण यात अजूनही सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. निसर्गातील दुर्मिळ घटक जे फार कमी वर्गांपर्यंत पोचलेले आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

यापैकीच एक भूगर्भातील गारगोटीचे हे होय. निसर्गाची ही किमया त्याचा उपयोग, त्याची अनुभूती ही विद्यार्थ्यांना विद्यार्थिदशेतच सक्रिय पद्धतीने अनुभवास मिळाल्यास त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील आणि त्यांना भविष्यात करिअरसाठी एक विस्तृत, व्यापक व नावीन्यपूर्ण क्षेत्र उपलब्ध असेल. म्हणूनच भूगर्भातील गारगोटीचा समावेश विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात करावा. (Saptarang Latest Marathi articles by K C Pandey on gargoti museum Nashik News)

हेही वाचा: चित्त्यांना ‘वनवास’

शासकीय पातळीवर असे प्रयत्न होणार असतील तर आमचा गारगोटी परिवार हा पुढाकार घेण्यासाठी तयार आहे. याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असलेल्या अनेक वास्तू देशभरात आणि जगभरात आहेत, या सर्व वास्तूंची शासन काळजी घेतेच; पण यात काही खासगी व्यवस्थापनाचे आहेत आणि त्या देशासाठी, जगासाठी भूषण आहेत. अशा वास्तू विद्यार्थ्यांना लहानपणापासून नियमितपणे भेट घडवून आणण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेने उचलण्याची गरज आहे.

या माध्यमातून हेरिटेज पर्यटन अर्थात स्थानिकांना रोजगार उद्योगाच्या संधी असे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतील. त्याने करिअर, तसेच शासनाचाही फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात यांचा समावेश करावाच; पण याचबरोबर नियमितपणे त्यांना याची अनुभूती प्रत्यक्ष स्वरूपात मिळाली पाहिजे. अभ्यासक्रमातून तर मिळेलच; पण जे प्रत्यक्ष बघितल्यानंतर घडते, प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्याच्या सौंदर्याकडे पाहण्याची आणि अभ्यासण्याची दृष्टीही खऱ्या अर्थाने बदलते. त्याच्यातील खरे वैशिष्ट्य बालवयातच लक्षात येऊ शकते म्हणून यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजे.

कोणत्याही देशाच्या विकासाला गती देण्यात तरुण पिढी आणि युवा ऊर्जा यांची मोठी भूमिका असते. पण त्या तरुण पिढीची निर्मिती ही बालपणापासून सुरू होते. मुलांच्या बालपणावरच भविष्यातील जीवनातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मुलांचे शिक्षण, त्यांना मिळणारे वातावरण हे भविष्य काळात तो एक चांगला माणूस म्हणून कसा बनेल, त्याचे व्यक्तिमत्त्व कसे घडेल यावर अवलंबून असते. अनेक मोठ्या देशात हे याच विद्यार्थी दशेमध्ये निश्चित होते. त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारावर त्याची भविष्यातील वाटचाल ठरते. राष्ट्रीय शिक्षणाच्या धोरणात यामुळेच मुलांच्या शिक्षणावर खूप भर दिला आहे. पण यात अजून सुधारणा करण्याची गरज आहे.

आपण प्रत्येक जण आपले बालपण कधीही विसरू शकत नाही. बालपणी बघितलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी, तसेच विद्यार्थिदशेत घडलेले अनेक अनुभव आपल्या संपूर्ण आयुष्याच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणारे असतात. बहुतेक जणांचे तर करिअर हे बालपणामध्ये आकलन झालेल्या आणि कुतूहलातून निर्माण झालेल्या गोष्टींवरच भविष्यात होते. लहानपणी आपली वृत्तीशोधक असते. आपल्याला कुतूहल असते आणि त्यातच जर आपल्याला गारगोटीसारख्या अद्‍भुत अशा निसर्गाने निर्माण केलेल्या सौंदर्याचा कौंदण असलेल्या गारगोटी दगड बालवयात आपल्याला नियमितपणे अभ्यासक्रमातून प्रत्यक्ष दर्शनातून बघायला मिळाले तर निश्चितच त्याबद्दल आकर्षण वाटेल.

हेही वाचा: लाखो हृदयांची राणी

यात तिळमात्र शंका नाही. लहानपणी आपण कधी न बघितलेल्या सर्वश्रुत अशा वस्तू प्रथम बघितल्या तरी आपणास आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्याला त्याबद्दल प्रचंड कुतूहल वाटेल, अशी ही भूगर्भातील गारगोटी आहे. तिच्यामधील चमक बघून निश्चितच आपल्या भविष्यालाही चकाकी मिळेल. म्हणूनच लहान वयातील शिक्षणातसुद्धा भूगर्भातील सौंदर्य हे विद्यार्थ्यांना शासनाने दाखवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. ही स्पर्धा जीवघेणी आहे. दिवसेंदिवस ती अधिक तीव्र होत जाणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांत रोजगाराच्या, करिअर घडवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. गारगोटी वैश्विक स्वरूप प्राप्त झाले आहे; पण अजूनही विद्यार्थीपासून गारगोटीचे सौंदर्य हे थोडे दूरच आहे, ते जवळ आले पाहिजे.

मनुष्य घडविण्यासाठी शिक्षण ही स्वामी विवेकानंदांची मध्यवर्ती कल्पना आजच्या काळात प्रत्यक्ष उतरवण्याची गरज आहे. औपचारिक शिक्षणासाठी उभ्या केलेल्या अभ्यासक्रमास कशाकशाची जोड दिली पाहिजे, याचा विचार प्राध्यापक, पालक आणि समाज यांनी केली पाहिजे. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये कोणत्या भूमिका बजावण्याची गरज आहे याचा ऊहापोह झाला पाहिजे.

विद्यार्थ्यांना गारगोटीचा अमूल्य सौंदर्याचा ठेवा त्याबद्दलचा विस्तृत रूपरेषा तयार करून मांडणारा अभ्यासक्रम राष्ट्राच्या जडणघडणीच्या विकासात आपल्या सोबत सहभाग नोंदविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी विशेष करून शिक्षणासंबंधी पुढे आले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकास म्हणजे काय तो निश्चितच यामधून प्रेरणासंपन्न राष्ट्रभिमुख व समृद्ध व्यक्तिमत्त्वात निर्माण निश्चित होईल.
( लेखक सिन्नरस्थित गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)