esakal | नात्याचा लोभस अनुबंध...
sakal

बोलून बातमी शोधा

book review

‘पंखी’ हे कांचन प्रकाश संगीत यांचं पाचवं पुस्तक. संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ उत्सुकता ताणत नाही, तर जागी करतं. शीर्षकात आणि मुखपृष्ठावर विराजमान ‘पंखी’ म्हणजे नाचण पक्षी हे मारुती चितमपल्ली यांच्या प्रस्तावनेमधून कळलं.

नात्याचा लोभस अनुबंध...

sakal_logo
By
माधुरी देवधर

‘पंखी’ हे कांचन प्रकाश संगीत यांचं पाचवं पुस्तक. संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ उत्सुकता ताणत नाही, तर जागी करतं. शीर्षकात आणि मुखपृष्ठावर विराजमान ‘पंखी’ म्हणजे नाचण पक्षी हे मारुती चितमपल्ली यांच्या प्रस्तावनेमधून कळलं. उडणारा, बागडणारा, बेभान करणारा पक्षी. स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या त्या पक्ष्याप्रमाणे कांचन प्रकाश संगीत यांचं लेखनही आपल्याला लेखिकेच्या भूतकाळात घेऊन जातं.
मनोगतात कांचन प्रकाश संगीत यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘अंतरीचे भाव समृद्ध आहेत,’ हे 'पंखी' वाचताना ठायी ठायी जाणवतं.

व्यक्तिचित्रण, स्थानचित्रण कौशल्य इतकं अप्रतिम आहे, की आपण थेट घटना प्रसंगातल्या - त्या घरात, पडवीत, गच्चीत, अंगणात, नदीवर तात्काळ जाऊन पोहोचतो. वाचकाला याची देही याची डोळा; चित्रित केलेला हरेक प्रसंग अनुभवण्याची मेजवानी सतत मिळत राहते.

'आई'विश्वाला समर्पित अनेक व्यक्तिचित्रं ‘पंखी’मध्ये असली, तरी प्रामुख्यानं संदर्भ हे आईच्या प्रेमळ शिकवणींचे आणि संस्कारांचे आहेत. प्रेमाचे, शिस्तीचे अनेक प्रसंग ते आपल्यासमोर उभे करतात. अन्वयार्थ, हरितायन, गहराणी, पारंब्या या आधीच्या सगळ्या पुस्तकांमधून लेखिकेचं कलासक्त निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व वाचकांच्या चांगलंच परिचयाचं झालं असेल. हे व्यक्तिमत्त्व घडताना नेमके झालेले संस्कार आणि आईचा त्यातला महत्त्वाचा सहभाग 'पंखी' या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो.
‘पंखी’मध्ये प्रामुख्यानं आईचे संस्कार, व्यक्तिमत्त्वावर असलेला आईचा ठसा याविषयी खूप बारकाईनं लिहिलेलं वाचायला मिळतं. हे सगळं वाचत असताना लहानग्या कनूचं एकूणच बालवयातही असलेलं दांडगं निरीक्षण आणि स्मृतिपटलावर कोरलेले अनेक क्षण आणि प्रसंग, जसेच्या तसे आजही कांचन प्रकाश संगीत ज्याप्रकारे शब्दबद्ध करतात, ते वाचून थक्क व्हायला होतं.

‘घडे’ या कथेमध्ये बालपणीच्या कीर्तन संस्कारांविषयी स्मृतिरंजन विस्तृतपणे रंगवलं आहे. निव्वळ कीर्तन आणि संगीत संस्कार नव्हे, तर मामांनी केलेला निसर्गसंस्कारही त्यात वाचायला मिळतो. मनोगतात म्हटलेले अंतरीचे समृद्ध भाव नेमके समृद्ध कसे झाले आणि कशाकशाने झाले त्याचा अनुभव वाचकाला अंतर्मुख करणारा आहे. इतक्या पारदर्शीपणे स्वत:ची जडण-घडण कोणत्या मूल्यांवर, संस्कारांवर झाली आहे, हे वाचकांना दाखवताना कांचन प्रकाश संगीत जराही मागं-पुढं पाहत नाहीत, हीच या लेखनाची ताकद आहे.

माय-लेकींच्या नात्यांमध्ये एक वेगळीच गंमत असते. चौथ्या वर्षी जी आई संपूर्ण विश्व असते, चोविसाव्या वर्षी तीच आई जुन्या विचारांची, सतत उपदेश करणारी अशी भासू लागते आणि चाळिशीनंतर त्याच आईचे सगळे शब्द खूपच मोलाचे आणि आयुष्यभर मार्गदर्शन करतील, असे होते - आहेत, असं वाटू लागतं. हे जागतिक सत्य, अनुभव अनेक स्तरांवर दिसतो.

कुठल्या तरी एका क्षणी माणसानं अंतर्मुख होऊन स्वत:च्या भावबंधांवर नजर टाकणं किती आवश्यक आहे, हे इतरांच्या अनुभवांवरूनही शिकता येतं! आणि असे अनुभव पारदर्शक सहजतेनं पुढं ठेवण्याचं धाडस, मोकळेपणा कांचन प्रकाश संगीत यांच्याकडून शिकावा असा आहे. थोडक्यात, अनेक जाणिवा समृद्ध होण्यासाठी कांचन प्रकाश संगीतलिखित 'पंखी'चं वाचन करणं आवश्‍यक आहे. वेगळेपणामुळं आणि त्याच्या संवेदनशीलतेमुळं लक्षात राहणारं असं हे पुस्तक आहे.

पुस्तकाचं नाव : पंखी
लेखिका : कांचन प्रकाश संगीत
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे (९८९०९५६६९५)
पृष्ठं : २५६, मूल्य : २८०