पंचाहत्तरीतले ‘प्रयोगशील’ पालेकर! (महेंद्र सुके)

mahendra suke
mahendra suke

चित्रकार, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आणि संवेदनशील कलावंत अशी बहुआयामी ओळख असणारे अमोल पालेकर २५ वर्षांनंतर अभिनेता म्हणून रंगमंचावर दिसणार आहेत... ‘कुसूर’ या हिंदी नाटकातून. त्याचं दिग्दर्शन पालेकर यांनी स्वत: केलं आहे. लेखिका आहेत त्यांच्या पत्नी संध्या गोखले. त्यांच्यावर सहदिग्दर्शिका म्हणूनही जबाबदारी आहे. नाटकाची तालीम अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या रविवारी (ता. २४ नोव्हेंबर) पालेकर यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत होणार आहे. त्या निमित्तानं अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी ‘सकाळ’ला दिलेली ही खास मुलाखत...

आपण तब्बल २५ वर्षांनंतर अभिनेता म्हणून रंगभूमीवर येत आहात... तर काही खास कारण?
अमोल पालेकर :
दोन-तीन कारणं आहेत... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी वर्षं रंगमंच किंवा चित्रपटात अभिनेता म्हणून लोकांसमोर आलो नाही. तरीही लोक विचारत असतात, की ‘सर तुम्ही ॲक्‍टिंग का करत नाही? तुम्ही करायला पाहिजे. वूई मिस यू.’ माझाच विश्‍वास बसत नाही, की अनेक वर्षांपासून अभिनय करत नसतानाही प्रेक्षकांना मी का आठवतो? कसा आठवतो..? त्यामुळे असं वाटायला लागलं, की त्यांच्यासाठी करायला पाहिजे. मात्र, ते करण्यासाठी आव्हानात्मक असं काहीही हाताशी लागत नव्हतं. ऑफर्स तर आठवड्यातून किमान दोन-तीन येतच असतात. ॲड फिल्म करा, नाटक करा, सिनेमा करा. मात्र, मला हे जमेल की नाही, अशी एक भीती वाटायला पाहिजे तसं हाताशी काही येत नव्हतं. हे सुरू असताना संध्यानं हे ‘कुसूर’ नाटक लिहिलं. ते वाचल्यावर मला प्रकर्षानं वाटलं, की धिस इज द काइंड ऑफ चॅलेंज आय वूड लाईक टू टेक. ते आव्हान संध्यानं या नाटकातून दिलं. मला असं वाटलं की, हे घेऊन मी पुन्हा रंगमंचावर उभं राहावं. संपूर्ण ताकद पणाला लावून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येऊन त्यांनी दिलेल्या अतोनात प्रेमाची अंशत: परतफेड करावी...

संध्या मॅडम, आपण हे नाटक ठरवून अमोल पालेकर यांच्यासाठी लिहिलं, की तुम्ही लिहिल्यानंतर त्यांना आवडलं?
संध्या गोखले :
पाच वर्षांपूर्वी आम्ही अमोलजींच्या वयाची सत्तरी त्यांच्या सर्व नायिका, संगीतकार भूपिंदर, सोनू निगम, येसुदास - तेव्हा अमेरिकेतून आला होता तो खास- असं सगळ्यांना एकत्र बोलावून छान साजरी केली. तेव्हा त्यांनी त्यांचं पहिलं प्रेम- पेंटिंग, सुरू केलं होतं. त्यानंतरची पाच वर्षं त्यांनी छान एन्जॉय केली. जवळजवळ १२-१३ प्रदर्शनं झाली. खूप ठिकाणी त्यांची चित्रं विकली गेली. आता पंचाहत्तरीनिमित्त म्हटलं करू या काहीतरी... पण त्यांचा एक अवगुण आहे, खरं तर तो गुणच म्हणावा लागेल... त्यांना तेच ते करायला कधीच आवडत नाही. काही नवीन नसेल, चॅलेंजिंग नसेल, तर त्यांना नाही आवडत. अभिनय करायचा होता; पण वेगळेपण असलेली संहिता सापडत नव्हती. दरम्यान, मी गेल्या नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या नाटकांच्या शोधात होते. एखादं नाटक आणि त्याचं भाषांतर, असं करायचं नव्हतं. कारण त्याचे सांस्कृतिक छोटेछोटे तपशील असतात, ते आपण कुठंतरी विचित्र पद्धतीनं बसवायला बघतो. कशाच्या तरी भोवती आपली संहिता तयार पाहिजे, असं माझ्या डोक्‍यात होतं. अशाच शोधात एक गोष्ट मला आवडली. मी तिचे हक्क विकत घेतले. मी स्वत: लेखक असल्यामुळे त्या कथाकाराचं बौद्धिक स्वामित्व जपणं, हे माझं कर्तव्य होतं. त्याच्यामुळे ते त्यांना आवडलं. त्यांनी त्याचे हक्क मला दिले. भारतीय संस्कृतीत, इथल्या परिस्थितीत ती गोष्ट गुंफून मी हे नाटक लिहिलं. ते त्यांना पाठवलं. त्या गोष्टीचं मी काही गैर केलं असं त्यांना वाटू नये म्हणून. नसेल आवडलं, तर त्यांना नकार द्यायची संधी दिली. त्यांनाही ते आवडलं. त्यासोबतच अमोल पालेकर यांना यातली भूमिका करायला खूपच आव्हानात्मक वाटलं, म्हणून हे नाटक करायचं ठरवलं. हा माणूस ८०-९० मिनिटं विनामध्यंतर ते सगळं पेलणार आहे.

नाटकाची पात्रयोजना काय आहे?
संध्या गोखले :
आता आम्ही ते काही सांगायचं नाही, असं ठरवलंय. कारण ते थ्रिलर आहे. त्यातलं आता काही सांगितलं, तर त्यातून शंभर प्रश्‍न येतात. आणि थ्रिलरची हवा काढून घेतल्यासारखं होईल. काही सिनॉप्सिस साईटवर टाकले आहेत. त्यात अमोलजी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दंडवतेंची भूमिका साकारणार आहेत, असं नमूद आहे. त्यावरूनच लोक ‘हे असं आहे का, ते तसं आहे का’ वगैरे प्रश्‍न विचारत आहेत. ही उत्सुकता तशीच ताणून ठेवायची आहे. प्रयोगानंतरसुद्धा परीक्षणांतून गोष्ट येऊ नये, अशी अपेक्षा आहे. या प्रयोगात मिनिटागणिक जे काही उलगडत जाणार आहे, त्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा, हा हेतू आहे. या नाटकाला अनेक पदर आहेत- सामाजिक, राजकीय, व्यक्तिगत असे बरेच...

अमोलजी, बऱ्याच वर्षांनंतर तुम्ही रंगमंचावर अभिनेते म्हणून उभे राहणार आहात. तालमी सुरू आहेत, कसं वाटतं?
अमोल पालेकर :
धाकधूक, भीती इथपासून एक प्रचंड समाधान या सगळ्यातून मी आता जातोय. तालमीमध्ये ते जाणवलंय. मुळात म्हणजे इतक्‍या वर्षांचा चढलेला गंज पुसून टाकायला आधी काही वेळ जायला लागला. अभिनेता म्हणून उभं राहताना आपली जी आयुधं असतात, ती घासूनपुसून स्वच्छ करायला पाहिजेत. ती स्वच्छ केली. आता त्याच्या पुढे जाऊन जे आपण बालपणी शिकलो, ते विसरलो तर नाही ना, ते एकदा पुन्हा तपासून घ्यायचं. ते सगळं करून पुन्हा ताकदीनं उभं राहायचं. ते झाल्यानंतर मग आपलं सर्वस्व पणाला लावून आपण जे काही देतोय, ते लोकांना आवडेल का नाही, ही सगळी धाकधूक असतेच. मात्र, त्या धाकधुकीमध्येच मजा आहे. माझा एक छोटा प्रॉब्लेम माझ्या संबंध करिअरमध्ये राहिला आहे, की हे जमेल का, ते जमेल का, असं वाटत असतानाच ती गोष्ट आपल्याला मस्त जमली, भट्टी व्यवस्थित पेटली आणि प्रेक्षकांनीही ती कलाकृती डोक्‍यावर घेतली, की माझी एक्‍साइटमेंट संपून जाते. एखादी गोष्ट मला जमली असं म्हटल्यानंतर मला ती पुन्हा करावीशी वाटत नाही. मला जमलं. लोकांनाही खूप आवडलं. शाबासकी मिळाली. त्यानंतर वेगळे प्रयत्न करायलाच हवेत, नव्या प्रयोगांत गुंतायला हवं. आपल्याकडे असं होत नाही. एक फार्म्युला मिळाला, की मग तेच ते, पुन:पुन्हा देत राहायचं हे मला कधीही आवडलं नाही. ते न करता मी वेगवेगळे प्रयोग करत राहिलो. करू शकलो. आणि ते वेगळेपण लोकांना आवडलं. तेच वेगळेपण पुन्हा एकदा लोकांच्या पुढे घेऊन मी उभा राहणार आहे. स्वत:ला तपासून बघणार आहे, की आपल्याला कितपत जमतंय..?

‘कुसूर’चे किती प्रयोग करणार, हे निश्‍चित झालंय?
अमोल पालेकर :
फक्त २५ प्रयोग करायचे आहेत. त्यातही मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा मोठ्या शहरांतच नाही, तर त्याच्या बाहेर जाऊन चंडीगड, गुवाहाटी, जयपूर, अहमदाबाद, सुरत अशा देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग करायचे आहेत. ती २५ शहरंही जवळजवळ ठरलेली आहेत. म्हणजे एका गावात एक किंवा फारतर दोनच प्रयोग होणार.

हे नाटक मराठीतही करणार?
संध्या गोखले :
होय. तो विचार सुरू आहे. त्यात अमोलजी काम करणार नाहीत; पण लोकांना जर आवडलं तर एखाद्या समर्थ नटाला घेऊन या नाटकाचे प्रयोग मराठीत करू.

सत्तरीमध्ये चित्रकार म्हणून बऱ्याच काळानंतर कॅन्व्हॉससमोर जाणं आणि आता रंगमंचावर येणं, या दोन्ही माध्यमांत कलावंत म्हणून तुम्हाला काही साधर्म्य वाटतं?
अमोल पालेकर : प्रवास अगदी तोच आहे. म्हणजे जेव्हा मी कोऱ्या कॅनव्हाससमोर उभा राहतो आणि पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतो... नाटकातही तेच आहे. सिनेमातही तेच आहे... पुन्हा एकदा कोऱ्या कॅनव्हाससमोर उभं राहायचं आणि स्वत:ला पणाला लावायचं. ते जे काही होईल, ते चांगलं होईल, अशी आशा बाळगायची. ते लोकांनाही आवडलं, तर आणखीच छान!

नाट्यनिर्मितीकडेही तुम्ही एक चित्र म्हणूनच बघताय...
अमोल पालेकर :
अगदी. मी म्हटलं तसं. मी जेव्हा एका कोऱ्या कॅनव्हाससमोर उभा राहतो आणि हळूहळू त्याच्यात रंग भरायला लागतात, त्यास वेगवेगळे पोत यायला लागतात, त्याचे फॉर्म्स यायला लागतात, ते सगळं होता होता ज्या क्षणी असं वाटतं, की झालं आता पूर्ण. तो क्षण जो असतो ना, ते सत्य असतं. मला जे पाहिजे होतं, ज्या टप्प्यावर जाऊन पोचायचं होतं, तिथं मी पोचलो की नाही, याचा शोध अंतर्मनात सुरू असतो... जिथं पोचायचं होतं, तिथपर्यंत जाऊ शकलो नाही, हे प्रांजळपणे सांगतो. मी पोचलो असेन, तर मी अभिमानानं म्हणेन, होय मी पोचलो. ती सगळी प्रोसेस आहे, ती माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. रोज तालमी करतो, तेव्हा ही प्रोसेस आम्ही एन्जॉय करतो. आम्ही सगळे ‘हे असं करून करून बघू, तू जरा या सुरात बोलतोयस ते चांगलं नाही वाटत...’ इथपर्यंत आम्ही रोज एकमेकांना तासतो. याच्यातूनच आणखी पुढे जातो.

नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा कलावंतासाठी नवीनच असतो. तेच ते करणं; पण त्यातही नावीन्य शोधणं, असं रंगकर्मी मानतात...
अमोल पालेकर :
बहुतेक लोक नाही मानत. एक तर मग ते संहिता बदलतात. मी अगदी माझ्या वेळेपासून बघतोय, की लेखकांनी लिहिलेला शब्द आणि तिकडे रंगमंचावर उच्चारलेला शब्द यात जमीन-अस्मानाचा फरक व्हायला लागतो.

हा फरक तर लेखकानं लिहिलेला विराम, शांतता न घेतल्यानंही पडतोच ना?
अमोल पालेकर :
हो अगदी बरोबर... पण मी त्या जुन्या स्कूलमधून आलेलो. जिथं लेखकाचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. तो शब्द त्यानं वा तिनं लिहिलेला आहे, तो जसाच्या तसा प्रत्येक प्रयोगांत मी तोच म्हणतो. तोच म्हणायचा प्रयत्न माझ्या सगळ्या अभिनेत्यांचा असतो. कारण आम्ही त्या शिस्तीत वाढलो. हे सगळं असतानासुद्धा ते पुन्हा एकदा नवीन कसं वाटेल, ताजं कसं वाटेल, हे पाहायचं असतं... इथंच तर तुमचा कस लागतो.

लेखकाला जेव्हा काही सुचतं ते सारं नाटक तो स्वतः १०० टक्के बघतो. त्यानंतर तो ते कागदावर उतरवतो तेव्हा ते ९० टक्‍क्‍यांपर्यंत उतरतं. त्यानंतर दिग्दर्शक त्यातलं ६०-७० टक्के कलावंतांच्या साह्यानं करून घेतो आणि कलावंत ते प्रेक्षकांपर्यंत साधारणत: ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात. असं ढोबळ मानानं मानलं जातं. त्यातली टक्केवारी मागेपुढे होतही असेल कदाचित. प्रयोगानुसारही ती बदलतही असेल; पण आता तुमच्या नाटकात लेखिका, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेताही असे सारे घरातलेच आहात. समविचारी आहात. त्यामुळे तुम्ही ‘पाहिलेलं’ नाटक आमच्यापर्यंत किती टक्के पोचेल, असं तुम्हाला वाटतं?
संध्या गोखले : मी लेखक आणि अमोलजी दिग्दर्शक असे आम्ही आजवर आठ-नऊ सिनेमे केले. मला असं वाटतं, की माझंच व्हिज्युलायजेशन मला १०० टक्के हवं असेल, तर मीच दिग्दर्शक व्हायला पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्या माणसाला दिग्दर्शक म्हणून स्वीकारलं, तर तो फरक तुम्हाला मान्यच केला पाहिजे. आमच्या बाबतीत तसं नाही होत. एकतर आमची संवेदनशीलता सारखी आहे. विचार सारखे आहेत. समकालीन आहेत. त्याच्यामुळे आमचे वैचारिक खटके उडत नाहीत... या बाबतीमध्ये. मात्र, छोट्या बाबतीत होऊ शकतात. आमच्या वीस वर्षांच्या प्रवासात एकदाच अशी वेळ आली होती, की मी त्यांना म्हटलं होतं, माझं ते स्क्रिप्ट नाही घ्यायचं तुम्ही. त्यांना हवं तसं माझी नायिका नाही करणार, असं सांगावं लागलं होतं... पण असं एकदाच झालं. या नाटकामध्ये ते दिग्दर्शक आणि मी सहदिग्दर्शिका आहे. त्यातही माझी जबाबदारी त्यांच्या भूमिकेपुरतीच आहे. त्यात ‘अदर पॉलिटिक्‍स’ काही नाही. खरं तर हा त्यांचा फारच मोठेपणा आहे, की काहीच अनुभव नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीवर त्यांचा पूर्ण विश्‍वास आहे.

अमोल सर, तुम्हाला काय वाटतं?
अमोल पालेकर :
लेखकाचा शब्द माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, हे एकदा मान्य केल्यानंतर तो शब्द ती कसा उच्चारते आणि मी कसा उच्चारतो, यात फरक असू शकतो. तो फरक शोधणं हीच एक एक्‍सायटिंग प्रोसेस आहे. हेच वाक्‍य ती कसं म्हणते किंवा तिनं कसं व्हिज्युलाइज केलं आहे, हे शोधलं पाहिजे. आता याच्यामध्ये मतभेद असू शकतात. वाद होऊ शकतात. परंतु ही मतभिन्नता जपणं, त्याचा आदर करणं हे कलावंत म्हणून आम्ही अतिशय मानतो. मग तिकडे ती बायको, मी नवरा नसतो. ती एक लेखिका आणि मी दिग्दर्शक असतो. जे खटकतंय त्यावर वाद व्हायलाच हवा. हे खटकण्यामध्ये पर्सनल इगो नसतात. तिला जर खटकतंय तर काहीतरी, कुठंतरी चुकतंय किंवा काहीतरी कमी आहे. काय कमी आहे, काय खटकतंय, ते फाइंड आऊट करायचं असतं. म्हणून मी संध्याला तिकडे सहदिग्दर्शिका म्हणून राहा आणि मला आणखी तास, ही माझी भावना आहे. कारण शेवटी ही संहिता जास्तीत जास्त ताकदीनं लोकांपुढे जावी, हाच आमचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com