चांगले विचार, सकस आहार (मंदार जाधव)

mandar jadhav
mandar jadhav

व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रींना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपण प्रत्येकानं स्वत:ला वेळ द्यायला हवा. चित्रीकरणाच्या व्यग्र वेळेतही मी व्यायामासाठी वेळ काढतोच. व्यायाम, आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रीचा प्रत्येकानंच जाणीवपूर्वक अवलंब करायलाच हवा. याच गुरुकिल्लीचा प्रत्येकानं अवलंब केल्यानं निश्‍चितच त्यांचंही आरोग्य उत्तम राहील, यात तिळमात्रही शंका नाही.

वेलनेस म्हणजे मन आणि शारिरिकदृष्ट्या निरोगी असणं. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. सकारात्मक विचार तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं चांगले विचार आणि सकस आहार हीच माझ्यासाठी वेलनेसची व्याख्या आहे. याच गुरुकिल्लीचा प्रत्येकानं अवलंब केल्यानं निश्‍चितच त्यांचंही आरोग्य उत्तम राहील, यात तिळमात्रही शंका नाही.

व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रींना माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपण प्रत्येकानं स्वत:ला वेळ द्यायला हवा. चित्रीकरणाच्या व्यग्र वेळेतही मी व्यायामासाठी वेळ काढतोच. आपल्या आरोग्याची किल्ली आपल्याच हातात आहे. त्यामुळं स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढायलाच हवा. वरील त्रिसूत्रीचा प्रत्येकानंच जाणीवपूर्वक अवलंब करायलाच हवा. कारण धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी काहीतरी वेळ देणं गरजेचं आहे.

मी खाण्यापिण्याचं पथ्य पाळतो. एक कलाकार म्हणून ही काळजी घ्यायलाच हवी. तुम्ही जे खाता ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळं पौष्टिक आहार घेण्यावर माझा भर असतो. दररोज सकाळी उठल्यानंतर मी एक ग्लास पाणी पितो. त्यानंतर चहा घेऊन जिमला जातो. जिममधून आल्यानंतर खूप भूक लागते. त्यामुळं मी ब्राऊन ब्रेड, पीनट बटर खातो. त्याचबरोबर पोहे, उपमा, इडली-वडा सांबर असे पदार्थ नाश्‍त्यामध्ये असतात. मात्र, मैद्याचे पदार्थ आहारात कधीच घेत नाही. सेटवर आल्यानंतर सीझनल फळं खातो. त्याचबरोबर केळी, सफरचंद, चिकूचा आस्वाद घेत असतो. दुपारच्या जेवणामध्ये डाळ-भात अन् चपाती असते. विशेष म्हणजे मी सेटवरचं जेवण घेत नाही. घरातला डबाच बरोबर असतो. पांढरा भात मी कधीच खात नाही. भात खावासा वाटल्यास ब्राऊन भातच खातो. दुपारच्या वेळी चहा-बिस्कीट खातो. मिड-डे स्नॅक्‍स माझ्याबरोबर असतात. त्याचप्रमाणं ड्रायफ्रूट्‍ससुद्धा असतात. त्यामध्ये काजू आणि बदामाचा समावेश असतो. सायंकाळी सात-आठच्या वेळी पिनट बटर, ब्रेड खातो. चित्रीकरण संपल्यानंतर रात्री घरी गेल्यावर भाजी-चपाती, डाळ खातो. विशेष म्हणजे दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. कधी भाजी, कधी पनीरचाही समावेश असतो. हिरव्या पालेभाज्या दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ शिजू देत नाही. तसंच कमी तेल, कमी साखरेचा आहारात वापर करतो. दही आणि योगर्ट मला खूप आवडतं. त्यामुळं हे दोन्ही पदार्थ माझ्या आहारात नियमित असतात. मी बाहेरचे पदार्थ खाणं शक्‍यतो टाळतो. बाहेर खाण्याची वेळ कधी आलीच, तर हेल्दी पदार्थच खाण्याकडे माझा कल असतो. विशेष म्हणजे दिवसभरात मी पाच ते सहा लिटर पाणी अवश्‍य पितो. त्यामुळं पचनक्रियाही सुधारते.

व्यायाम खूप महत्त्वाचा
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. व्यायाम म्हणजे फक्त वजन उचलणं नाही. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार व्यायामाची पद्धत ठरवू शकतात. कुणाला कार्डिओ करायला आवडतं, तर कुणाला वेट ट्रेनिंग आवडतं. चांगल्या लाईफस्टाईलसाठी व्यायामाला पर्याय असूच शकत नाही. माझ्या आयुष्यात व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. गेली दहा ते बारा वर्षं मी व्यायाम करतो आहे. अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळं तुम्ही प्रेझेंटेबल असणं महत्त्वाचं असतं. प्रेक्षक तुम्हाला टीव्हीवर पाहत असतात. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘श्रीगुरुदेव दत्त’ या मालिकेत मी श्रीदत्तांची भूमिका साकारतो आहे. त्या भूमिकेला साजेसा असा माझा पेहराव असतो. त्यामुळे फिटनेस कायम राखण्याकडं माझा कल असतो. व्यायामाची माझी वेळ ठरलेली नसली, तरी दिवसातला एक तास मी आवर्जून काढतो. चित्रीकरणाला जाण्यापूर्वी किंवा चित्रीकरणानंतर मी व्यायाम करतो. शक्‍य झाल्यास सेटवरही व्यायाम करतो. ‘श्रीगुरुदेव दत्त’ या मालिकेच्या संपूर्ण टीमची यासाठी मला खूप मदत होते. व्यायामासोबतच योग्य आहाराची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तज्ज्ञांकडून आणि इंटरनेटवरुन मी यासंदर्भात माहिती मिळवत असतो. रोज एकाच प्रकारचा व्यायाम मी करत नाही. त्यात बदल करतो. कधी पोटाचा, कधी कार्डिओ अशा प्रकारे व्यायामाची पद्धत मी बदलत असतो. दररोज आठ तास पुरेशी झोप घेतो. निरोगी राहण्यासाठी झोप ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझला फिटनेसच्या बाबतीत मी माझा गुरू मानतो. या दोघांनीही स्वतःला खूप छान पद्धतीनं मेंटेन केलंय.

आवडती गाणी, सकारात्मक विचार
मानसिक आरोग्यासाठी आवडीची गाणी ऐकणं हाच माझा छंद आहे. आवडत्या गाण्यांमुळं माझा मूड फ्रेश राहतो. मी नेहमी सकारात्मक विचार करतो. लहानपणापासूनच तसे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आता ‘श्रीगुरुदेव दत्त’ या मालिकेमुळं अशाच सकारात्मक वातावरणात मी दिवसभर असतो. फिल्मसिटीमध्ये आमच्या मालिकेचा भव्य असा सेट आहे. खास गोष्ट म्हणजे मुंबईत असूनही निसर्गाच्या सानिध्यात हा सेट उभारला आहे. आजूबाजूला दाटीवाटीनं असणारी वनराई, सेटवरचे आश्रम आणि कुटी एक वेगळीच ऊर्जा देतात. सेटवरचं वातावरण खूपच धार्मिक आहे. सहकलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम खूपच छान आहे. मानसिक आरोग्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातून मन ताजतवानं राहतं. आता तर मालिकेचा सेट म्हणजे माझं दुसरं घरच झालंय.

पाच मिनिटं प्राणायाम
मी सकाळी उठल्यानंतर पाच मिनिटं तरी प्राणायाम करतो- जेणेकरून मी दिवसभर फ्रेश राहू शकेन. ही पाच मिनिटं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेत. यासोबतच जेवणानंतर वज्रासन आवर्जून करतो. पचनासाठी हा उत्तम व्यायाम आहे. योगासनांबद्दल सध्या जनजागृती वाढतेय. प्रत्येकानंच योगाला आपल्या आयुष्यात प्रथम प्राधान्य द्यायला हवं, असं मला वाटतं. त्यामुळं आपली मानसिक स्थितीही उत्तम राहते.

‘श्रीगुरुदेव दत्त’ या मालिकेत श्रीदत्तांची भूमिका मी साकारतो आहे. दत्तगुरूंची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. कारण, ही खूप मोठी जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी मी वजन वाढवलं आहे. चित्रीकरण सुरू होण्याआधी दोन महिन्यांचा अवधी माझ्याकडे होता. त्यामुळं योग्य व्यायाम आणि पौष्टिक आहाराच्या मदतीनं मी फिट राहण्याचा प्रयत्न केला. या मालिकेत माझा बेअर बॉडी लूक आहे. त्यासाठी फिट राहणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीनं माझा प्रयत्न असतो. या भूमिकेशी प्रेक्षकांच्या भावना जोडलेल्या आहेत. दत्तगुरूंच्या रूपात प्रेक्षक मला पाहतात. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय.

वातावरणाचा वेलनेसवर परिणाम
खरं तर कुटुंबव्यवस्था आणि मित्र-मैत्रिणींचा वेलनेसवर निश्‍चितच परिणाम होतो. मित्र-मैत्रिणींचा नकळतपणे आपल्यावर प्रभाव पडत असतो. मी व्यायामाला सुरवात केल्यापासून माझा भाऊ आणि माझे मित्र-मैत्रिणी खूपच इम्प्रेस झाले आणि त्यांनीही व्यायामाला सुरवात केली आहे. माझ्यामुळं जर कुणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असतील, तर ती नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.
फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत मी माझ्या बाबांना आदर्श मानतो. ते नेहमी जॉगिंगला जातात. लहानपणापासून मी ते पाहात आलो आहे. हेल्दी खाण्याची सवयही त्यांच्यामुळंच मला लागली. त्यामुळं बाबांसारखंच मला फिट राहायचं आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com