अव्यक्ताची रेषांतरे! (हेमंत जोशी)

हेमंत जोशी
रविवार, 4 मार्च 2018

खरं तर निसर्गाच्या प्रत्येक लीलेमध्ये चित्र आहे. निसर्ग हा स्वयंसिद्ध चित्रकार आहे. रेषांविषयीचा चित्र-अभ्यास करता करता निसर्गातल्या अनेक रेषांविषयीच्या कल्पनांची मला जाणीव होऊ लागली आणि माझं कुतूहल आणखीच वाढलं. तुम्हीसुद्धा तुमची 'रेषादृष्टी' जागी करून पाहा...मग हे अनुभव तुम्हालाही नक्कीच वेगळा आनंद देतील! 

खरं तर निसर्गाच्या प्रत्येक लीलेमध्ये चित्र आहे. निसर्ग हा स्वयंसिद्ध चित्रकार आहे. रेषांविषयीचा चित्र-अभ्यास करता करता निसर्गातल्या अनेक रेषांविषयीच्या कल्पनांची मला जाणीव होऊ लागली आणि माझं कुतूहल आणखीच वाढलं. तुम्हीसुद्धा तुमची 'रेषादृष्टी' जागी करून पाहा...मग हे अनुभव तुम्हालाही नक्कीच वेगळा आनंद देतील! 

मध्यंतरी मी एक 'विव्हर बर्ड'वरचा लघुपट पाहिला. एका झाडावर तो पक्षी गवताचं एकेक तण आणून त्या फांदीला गुंडाळतो. हळूहळू आणखी एक तसाच पक्षी - त्याची जोडीदारीण असावी किंवा तिचा जोडीदार असावा- आधीच्याच्या मदतीला येऊ लागतो. त्या तणाच्या गुंफण्यातून एक छानसं घरटं तयार होतं. त्या दोघांचं त्या घरट्यात राहणं सुरू होतं. काही दिवसांनी त्या घरट्यात दोन-तीन अंडी दिसायला लागली... 

हे पाहताना मला ते तण म्हणजे एकेक रेषाच भासू लागली...त्या तणाच्या कौशल्यपूर्ण जोडले जाण्यातून एका सुंदर आकाराची (घरटं) निर्मिती झाली...त्या रेषागृहात दोन-तीन बिंदूंचा जन्म झाला...काही दिवसांनी त्या बिंदूंना पंख फुटणार होते...आकाराचे, आशयाचे. आणि ते उडून जाणार होते नव्या अवकाशात स्वच्छंद विहार/आविष्कार करण्यासाठी. हे चक्र असंच सुरू राहणार... 

ऋतु-मासाप्रमाणे निसर्गाचं चक्र असंच सुरू राहतं आणि त्याच्या बदलत्या छटांमधून रेषेचं अस्तित्व जाणवतं...कधी विलोभनीय, तर कधी विदारकही! 

ग्रीष्म ऋतूत सूर्याची दाहकता अधिक वाढू लागते. सगळी सृष्टी होरपळून निघते. झाडांची पानगळ सुरू होते...पानांमधलं हरितद्रव्य सुकून जातं...उरतात रेषारेषांची जाळीदार पानं. जेवढी हिरवी-लाल पानं सुंदर दिसतात तेवढीच ही जाळीदार पानंही. अनेकांनी आपल्या पुस्तकांतून अशी सुंदर जाळीदार (रेषांकित) पानं कित्येक वर्षं जपून ठेवली असतील नक्कीच! 

कारव्या बांबूची जंगलं तर सुकलेल्या काड्याकाड्यांची होऊन जातात. सूर्याच्या उष्णतेमुळं जमीन शुष्क होऊन जाते. कित्येक ठिकाणी जमिनीला तडे पडतात. जमिनीवर रेषारेषांचं जाळं पसरतं. 

चराचराच्या तोंडचं पाणी पळून जातं. डोंगर-दऱ्यांतून एरवी खळखळून वाहणारे ओहोळ, धबधबे, नद्या अगदी रोड होऊन जातात. अक्षरशः पांढऱ्या रेषेसमान भासतात. 

***कविकुलगुरू कालिदासानं हा दृश्‍यानुभव 'मेघदूता'त वर्णन करून ठेवला आहे ः 'हे मेघा, तू जेव्हा विंध्य पर्वतावरून मार्गक्रमण करशील तेव्हा तो खडकाळ पायथा आणि त्यावरून रोड होऊन वाहणारी पांढऱ्या रेषेसमान दिसणारी रेवा/नर्मदा नदी अशी भासेल, जणू हत्तीच्या पाठीवर पांढऱ्या रेषेने केलेलं नक्षीकामच.' 

एखादी रात्र अधिकच काळोखी वाटते. उन्हाचा दाह शिगेला पोचलेला असतो आणि तिच्या आगमनाची आरोळी उठते! कSSडा Sड कSड! भयंकर आवाजानं धरणी हादरून जाते. काळोखाचा पडदा टरकन्‌ फाडून प्रचंड आकाराची विजेची लखलखती रेघ सरसरत आकाशभर पसरते. तिला अनेक उपरेषा फुटत जातात. सगळी झाडं, पानं, घरं, सगळं सगळं तिच्या प्रकाशानं लखलखून जातं. तिचं रूप काळजाचं ठाव घेणारं, भयावह...ताकद तरी किती! सगळं काही भस्मसात करण्याएवढी...तरीही विलोभनीय! सगळ्या आकाशाला चित्रांकित करून टाकणारी...रेषासौदामिनी! 
*** 
दाटलेले ढग विरघळायला लागतात, पावसाच्या तुटक्‍या रेषा जमिनीच्या भेगाभेगांत (रेघा) जातात, त्या भेगा घळाघळा वाहायला लागतात. ओढ्यांत, नाल्यांत, धबधब्यांत, नद्यांत त्यांचं रूपांतर व्हायला लागतं. या जाड बारीक रेघा कुठंतरी जमिनीच्या आत दडलेल्या बीजापर्यंत (बिंदू) पोचतात. 

निर्मितीची प्रक्रिया सुरू होते आणि पुन्हा एक रेष उगवते. जमिनीचं अवकाश भेदून बाहेर पडते. 

नवसंजीवनी घेऊन. दृश्‍यपटलावर रेषांचे कोंब वर येऊ लागतात... एक...दोन...तीन...अनेक...आणि 
बाह्यावकाश फुलून जातो. 

गडद आकाशातून जमिनीवर आलेली निळसर करड्या रंगाची रेघ आता हिरवी होऊन बाहेर येते...अनेक रंग फुलवण्यासाठी! 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Art Hemant Joshi