...या घरट्यांना विणतो कोण? (हेमंत जोशी)

हेमंत जोशी
रविवार, 11 मार्च 2018

आपल्या भोवतालच्या अनेक वस्तूंचे आकार आणि त्यांची रचना ठरलेली असते. निसर्गातल्या फुलांचे विशिष्ट रंग-आकार पाहा....ते कैक पिढ्या जसे आहेत तसेच राहिले आहेत. अनेक फळांचंही असंच. सीताफळ, फणस, डाळिंब यांच्या तर आंतररचनेतसुद्धा केवळ थोडासाच फरक; बाकी सगळं तसच! 

अनेक प्रकारचे प्राणी-पक्षी तसेच दिसतात, त्यांच्या राहणीमानातही फारसा बदल होत नाही. सुगरण पक्षी तशीच घरटी बांधतो, कोळी तशीच कोळिष्टकं तयार करतो, मधमाश्‍या षटकोनी आकाराच्या चकत्या जोडलेली तशीच पोळी बनवतात (हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कसं शिकवलं जातं कोण जाणे). 

आपल्या भोवतालच्या अनेक वस्तूंचे आकार आणि त्यांची रचना ठरलेली असते. निसर्गातल्या फुलांचे विशिष्ट रंग-आकार पाहा....ते कैक पिढ्या जसे आहेत तसेच राहिले आहेत. अनेक फळांचंही असंच. सीताफळ, फणस, डाळिंब यांच्या तर आंतररचनेतसुद्धा केवळ थोडासाच फरक; बाकी सगळं तसच! 

अनेक प्रकारचे प्राणी-पक्षी तसेच दिसतात, त्यांच्या राहणीमानातही फारसा बदल होत नाही. सुगरण पक्षी तशीच घरटी बांधतो, कोळी तशीच कोळिष्टकं तयार करतो, मधमाश्‍या षटकोनी आकाराच्या चकत्या जोडलेली तशीच पोळी बनवतात (हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कसं शिकवलं जातं कोण जाणे). 

निसर्गातल्या अनेक रचना चित्रकार मंडळींना प्रेरक ठरत असतात. अनेक चित्रकारांच्या कलाकृतींमधून तुम्ही त्या पाहिलेल्या असतील. उदाहरणार्थ ः पानाच्या रेषारेषांत दगड रचलेल्या कुंपणाच्या भिंती... कासवाच्या पाठीवरच्या आकाररचनेत फुटबॉल इत्यादी. इथं रचनेतून सौंदर्यनिर्मितीची वेगळी वाट चोखाळलेली असते. 

चित्रकाराचं सोडा; अगदी साधं उदाहरण पाहा. फळं-भाजीमंडईतले विक्रेते त्या फळांची एकावर एक किती सुरेख रचना टोपल्यांमधून करतात. इथं अंतिम हेतू विक्री हा जरी असला, तरी पाहणाऱ्याच्या नजरेस ते आकर्षक आणि छान दिसावं हाही हेतू असतोच! मला तर पुस्तकांची शेल्फ, कपड्यांचे वॉर्डरोब, अंड्यांचे क्रेट, भट्टीत भाजण्यासाठी रचलेल्या विटा ही सगळी रचनाचित्रंच वाटतात. 

काही रचना शिस्तबद्ध असतात. उदाहरणार्थ : लष्करातल्या कवायती, कॅरमबोर्डवर रचलेला सोंगट्यांचा डाव...यातलं थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी नजरेला खटकतं. मात्र, कापलेलं फणस, कापलेलं डाळिंब पाहा... निसर्गतःच त्यातले गरे, दाणे हे त्या त्या जागेत कसेही घट्ट बसलेले असतात. मात्र, ते नजरेला सुंदरच दिसतात. 
आमच्या लहानपणच्या दोस्तांमधल्या एकानं मला मधमाश्‍यांचं एक सुकलेलं पोळ आणून दिलं होतं. 

आमच्या घरकामवालीचा हा मुलगा हरहुन्नरी (चोरून बेचकीनं कैऱ्या पाडणं, माळेच्या विहिरीत पोहणं, नारळाच्या पात्यांचे झाप विणणं, केळीच्या खांबाच्या फोकापासून सत्यनारायणाच्या पूजेचं मखर बनवणं हे शिकवणारा हा गुरू!) होता. त्याच्या घरचं कुणीतरी मधमाश्‍यांची ही पोळी काढून त्यातला मध बाटल्यांमध्ये भरून विकत असे. असलं काहीबाही जपून ठेवायला मला आवडायचं म्हणून त्यानं ते मला दिलं असेल कदाचित. कित्येक वर्षं मी ते जपून ठेवलं होतं. मधल्या काळात ते कुठंतरी गहाळ झालं. ('गहाळ झालं' असं मी रूढार्थानं म्हणतो; पण त्यातला गोडवा आठवणींच्या कप्प्यात खडीसाखरेसारखा घट्ट बसलेला असतो). 

तेव्हापासून त्या पोळ्यातल्या षटकोनी आकाराच्या रचनेनं माझ्यावर मोठं गारुड केलेलं आहे. ते एका गृहसंकुलाच्या प्रकल्पाच्या जाहिरातीच्या कॅम्पेनमध्ये 'इलस्ट्रेशन' म्हणून वेगळ्या रूपात आलं. 

सुंदर फुलांमधला गोडवा तेवढाच - त्या फुलांच्या पाकळ्या खराब न करता - काढून आणणारी ती मधमाशी आणि ते साठवून ठेवण्यासाठी तिनं केलेलं ते सुंदर घर...रचना आणि विचार यांचा सौंदर्यपूर्ण मेळ. मात्र, त्या मधमाशीचं 'सौंदर्यपूर्ण विश्व' म्हणजे 'ते घर आणि मध गोळा करण्यासाठीची फुलं' एवढंच. त्यांचा कार्यकाळ संपला की नव्या माश्‍यांचा जथा पुन्हा तसंच पोळ रचणार. हे चक्र सुरूच राहतं आणि त्या रचनेबाहेर मधमाश्‍या कधी जात नाहीत ही वस्तुस्थिती! ऋतू बदलतात, पिढी बदलते; परंतु त्याच रचना पुन्हा नव्यानं तशाच निर्माण होतात. 

निसर्गातल्या अशा सगळ्या रचना पाहिल्या की मला कॅलिडोस्कोप दिसायला लागतो. त्याच्या आरशाच्या कोनात (म्हणजे निसर्गानं घालून दिलेले नियम) अनेकांच्या आयुष्याचे रंगीत बांगड्यांचे तुकडे त्याच ठरवून दिलेल्या अवकाशात आपलं जीवनचित्र निर्माण करत राहतात, फिरून फिरून तेच! 

गंमत अशी की हा कॅलिडोस्कोप पाहताना आपल्याला एक डोळा बंद ठेवावा लागतो...परंपरेतून चालत आलेल्या, स्वीकारलेल्या गोष्टी पाहण्यासाठी. 

हा बंद डोळा असतो सगळ्या सृष्टीकडं वेगळ्या दृष्टीनं बघण्यासाठी! 
कदाचित, निसर्गाच्या या रचनेत हेच अपेक्षित असावं काय? 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Art Hemant Joshi