जळमाणूस आणि परी! (प्रवीण टोकेकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

विज्ञान-परिकथेच्या अंगानं जाणाऱ्या 'शेप ऑफ वॉटर' या चित्रपटानं चित्ररसिकांच्या मनात ठाव घेतला आहे. या चित्रपटानं यंदाचे चार ऑस्कर पुरस्कार पटकावले असून, कित्येक रसिकांनी ते त्याला मनातल्या मनात आधीच देऊन टाकले होते. डझनभर ऑस्करच्या बाहुल्या दिल्या तरी कमी पडतील, असा हा चित्रपट आहे. 

जळमाणसाबद्दल कधी काही ऐकलंय? जळमाणसं पाण्यात राहतात म्हणे. विहिरींमध्ये आसरा असतात, तशी जळमाणसाची वस्ती नद्या किंवा समुद्राबिमुद्रात असते. जळमाणसं कुणाला दिसत नाहीत. दिवसा पाण्यात राहतात, रात्री अंधार पडला की हळूच जमिनीवर येतात. जेमतेम गुडघ्याएवढी उंची असते त्यांची. कानबीन नसतात त्यांना. हाताच्या बोटांमध्ये पडदा असतो. शेपूटही असावं माशासारखं. ही जळमाणसं आपल्याला काही करत नाहीत, घाबरट असतात; पण एखादं पोर फारच वाभरेपणा करू लागलं की सरळ उचलून घेऊन जातात म्हणे...लहानपणी आज्जीनं सांगितलेल्या या प्रजातीबद्दल काहीसा धाक वाटायचा. 

'त्या अमकीचा नवरा पाहिलास?...अगदीच जळमाणूस' अशा चर्चा माजघरात कानावर पडत. रस्त्यातनं एखादा बुटबैंगण इसम दिसला की वाटायचं, हा जळमाणूस दिवसा इथं काय करतोय? पाण्यात जा म्हणावं! सर्कशीत तीनेक फुटी जोकर दिसला तर त्याच्याबद्दलही संशय वाटायचा. होडीत बसून नदी पार करण्याची वेळ आली की लाटांच्या खाली एखादा जळमाणूस दिसतोय का, ते बघत बसायचं. वय वाढलं तशी जळमाणसाची मनातली ही वस्तीही नामशेष झाली. 

परवा ऑस्करसोहळ्यात सर्वोत्कृष्ट ठरलेला 'शेप ऑफ वॉटर' बघितला आणि पुन्हा एकदा बालपणीचा जळमाणूस आठवला. ही एका जळमाणसाची विलक्षण गोष्ट आहे. त्याहीपेक्षा ती एका परीची गोष्ट आहे. परिकथाच; पण मोठ्या माणसांची. बच्चेकंपनीसाठी हा सिनेमा नाही. विज्ञान-परिकथेच्या अंगानं जाणाऱ्या या चित्रपटानं मनात गहिरा ठाव मांडला. 'शेप ऑफ वॉटर'नं चार ऑस्कर पुरस्कार पटकावले. कित्येक रसिकांनी ते त्याला मनातल्या मनात आधीच देऊन टाकले होते. डझनभर ऑस्करच्या बाहुल्या दिल्या तरी कमी पडतील, असा हा चित्रपट आहे. 
* * * 

गोष्ट घडली ती बाल्टिमोरमध्ये. इलायझा इस्पोसितोचं एका शब्दात कुणीही वर्णन केलं असतं ः बिचारी. ही तरुणी भाळावर कसली उफराटी रेषा घेऊन जन्माला आली होती कुणास ठाऊक. जन्मादारभ्य मुकी. किडकिडीत. काहीशी खुळचटच. शिवाय अनाथ. जन्मत:च आई-बापांनी तिला बहुधा पॅटाप्स्को नदीच्या काठावर टाकून दिली असावी. कुणीतरी उचलून अनाथालयात नेली म्हणून जगली. तिथंच ती वाढली. कशीबशी. 

तो साधारणत: सन 1962 चा सुमार असावा. ओक्‍कॅम एअरोस्पेस रिसर्च सेंटवरवर ती सफाईकामगार म्हणून जायची. लादी पुसणं-धुणं असली कामं. प्रयोगशाळा चकचकीत ठेवणारा कर्मचारीवर्ग होता, त्यातली एक. इलायझा एका जुन्या इमारतीत पोपडे उडालेल्या घरात एकटीच राहायची. इमारतीच्या खालीच थिएटर होतं. वर काही भाडेकरू. शेजारचा गाइल्स हा चांगला माणूस होता. पन्नाशी उलटलेला दरिद्री चित्रकार, शिवाय एकटा आणि समलिंगी. साठीच्या दशकात बाल्टिमोरमध्ये समलिंगी हे हेटाळणीचाच विषय होते; पण गाइल्सचं आणि इलायझाचं छान जमायचं. गाइल्सला तिच्यात 'तसा' इंटरेस्ट नव्हता आणि इलायझा तर परिराज्यात रमलेली एकुटवाणी मुलगी. मग खाणाखुणांनी गप्पा तेवढ्या होत असत. 

ओक्‍कॅम प्रयोगशाळेत झेल्ड फुलर नावाची जरा सीनिअर सफाईकामगार होती. काळी होती. स्वभावानं सालस नि गोड. देवाला भिणारी. ती इलायझाची एकमेव सख्खी मैत्रीण. बाकी एकांडं जिणं जगण्याचं कसब तिनं आत्मसात केलं होतं. रात्रपाळ्या करायच्या. दिवस थोडा झोपेत, थोडा एकट्यानंच मजा करण्यात घालवायचा. सिनेमे बघायचे...आणि उरलेल्या वेळात मस्त मस्त स्वप्नं! स्वप्नांच्या दुनियेत इलायझा ही राणीच होती. तिथं कुणाची आडकाठी नसे. 

कॅलेंडरची पानं उलटल्यासारखे दिवस जात असताना एक दिवस ते घडलं. 

* * * 

ओक्‍कॅम प्रयोगशाळेचा सुरक्षाप्रमुख कर्नल रिचर्ड स्ट्रिकलॅंडच्या देखरेखीखाली एक स्पेसिमन तिथं बंदोबस्तात आणला गेला. पाण्यानं भरलेलं भलं-थोरलं भक्‍कम पिंप. त्याला काचेच्या खिडक्‍या. जणू एखादा दुर्मिळ शार्क पकडून आणलेला असावा; पण शार्कबीर्कसोबत इतके सैनिक नसतात. त्यात काय आहे? इलायझानं काचेतून डोकावून पाहिलं. थाडकन आतून एक जबरदस्त धक्‍का बसला. 

...कडेकोट बंदोबस्तात तो स्पेसिमन ठेवला गेला. एवढं गोपनीय काय आहे त्या दारापाठीमागं? कुणालाच कळू शकत नव्हतं. टॉप सीक्रेट होतं ते. तिथं कुणाला फिरकायचीही परवानगी नाही. हे जित्राब दक्षिण अमेरिकेतल्या एका नदीत मिळालं, असं स्ट्रिकलॅंड सांगायचा. खरं-खोटं तोच जाणे. एका रात्री मात्र स्ट्रिकलॅंड स्वत: घाईघाईनं तिथं गेला आणि थोड्या वेळानं बोटं तुटलेल्या रक्‍तबंबाळ अवस्थेत बाहेर आला. झेल्डा आणि इलायझा रात्रपाळीलाच होत्या. जास्त चौकश्‍या न करता तिथलं रक्‍त साफ करून घेण्याची सूचना त्यांना करण्यात आली. तेव्हा इलायझानं 'त्याला' पाहिलं... 

हिरवट-निळ्या, मोरपंखी रंगाचा उंचापुरा उभयचर प्राणी तिच्याकडं मिटमिट्या डोळ्यांनी बघत होता. माणसासारखे दोन हात, दोन पाय; पण हाता-पायाच्या बोटांमध्ये काळसर पडदे. गळ्याशी माशांना असतात तसे कल्लेही होते. श्‍वासोच्छ्वासागणिक त्याच्या अंगावर हिरवे-निळे रंग लुकलुकत. त्याला दोन श्‍वसनसंस्था होत्या. पाण्यात श्‍वासोच्छ्वासासाठी एक, दुसरी माणसासारखी नाकापुड्यांसहित. उंची सुमारे सात फूट. प्रमाणबद्ध शरीर. माणसाच्या जगात असता तर त्यानं शरीरसौष्ठवाचे सगळे गुण मिळवले असते. मोठा विचित्र प्राणी होता. बहुधा घाबरलेलाही असावा. रानटी प्राणी घाबरला की आक्रमक होतो. तसंच झालं. त्याच्या कर्कश खरखराटानं इलायझाला पळायला भाग पाडलं. जळमाणूस...जळमाणूसच तो. 

स्ट्रिकलॅंडच्या हातात विजेचा शॉक देणारं एक दांडकं असे. ते घेऊनच तो त्या प्राण्याला छळत असे. त्याला जायबंदी ठेवलं तर तो कह्यात राहील, अशी त्याची समजूत होती. जखडलेल्या अवस्थेत तो त्याला डागण्या देई. प्राण्याची हालत बिघडत चालली होती. अशानं तो फुकाफुकी मरेल, असं सांगूनही स्ट्रिकलॅंड ऐकत नव्हता. 

...जगावेगळा उभयचर सापडल्याची ही घटना सरकारनंही कमालीची गोपनीय ठेवलेली होती. साहजिकच होतं. 1960 चं दशक म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या शीतयुद्धाचा ऐन भराचा काळ. विज्ञान-तंत्रज्ञानात एकमेकांवर कुरघोडी करणारी अनेक संशोधनं उभयपक्षी चालत. हा स्पेसिमन नीट अभ्यासून मारून टाकायचा किंवा अवकाश-संशोधनात वापरायचा, अशा जनरल हॉइट या लष्करी अधिकाऱ्याच्या कल्पना होत्या. बाब बाहेर फुटता कामा नये, असं त्यानं स्ट्रिकलॅंडला बजावलंही होतं; पण सोव्हिएत गुप्तहेर संस्था- केजीबीकडं ही बातमी फुटलीच. कुठंतरी कळ फिरली आणि डॉ. रॉबर्ट हॉफस्टेटलर नावाचा एक ढोरडॉक्‍टर प्रयोगशाळेत नियुक्‍तीवर हजर झाला! तो अर्थातच रशियन गुप्तहेर (मूळ नाव दिमित्री) होता. आल्या आल्या तो कामाला लागला. काही नाही जमलं तर सरळ इंजेक्‍शन टोचून तो स्पेसिमन मारून टाकायचा केजीबीचा डाव होता; पण एजंट हॉफस्टेटलरला हे मात्र पटत नव्हतं. एवढा दुर्मिळ जीव मारून टाकायचा? 

..इकडं इलायझानं नको तो आगाऊपणा आरंभला. उकडलेली अंडी घेऊन ती त्या जळमाणसाच्या जवळ जायची. त्याला खायला शिकवायची. तिची भाषा अर्थात खाणाखुणांची. तिनं ती त्यालाही शिकवायला घेतली. हरखून गेलेली इलायझा त्याच्यासाठी सुंदर संगीताच्या रेकॉर्डस लावायची. जेरबंद अवस्थेतला तो असहाय जळमाणूस इलायझाशी शब्देविण संवादू लागला. तोही मुकाच. इलायझासुद्धा मुकीच. दोघंही एकुटवाणे. अनाथ. असहाय. आधी भय, मग सहवासाची ओढ...वाट बघणं, हे टप्पे भराभरा ओलांडत दोघंही एकमेकांत एकही शब्द न उच्चारता गुंतत गेले. अर्थात अशा नात्याला भाषेची गरज नसतेच. प्रेमाला जात-धर्म-प्रांत-देश यांच्या सरहद्दी नसाव्यात इतपत ठीक आहे; पण या प्रेमाला तर जळा-स्थळाचीही पर्वा नव्हती. तो जळीचा, तर ही स्थळीची. 'हृदया हृदय भेटले। हे हृदयींचे ते हृदयी घातले...' अशी विशुद्ध अवस्था. 

झेल्डा फुलरला या जगावेगळ्या प्रेमकहाणीची काळजीही वाटायची. उत्सुकताही. इलायझा तिला खाणाखुणांनी सगळं काही सांगायची. घरी येऊन गाइल्सचं डोकं खायची. ''तो माझ्याकडं बघतो...अशा नजरेनं बघतो की...माझ्यातलं न्यूनत्व त्याच्या गावीही नाहीए...तो असं बघतो की...मी खूप सुखावते...तोही सुखावतो...मी त्याला वाचवू शकते...शकते?...बहुतेक...वाचवावं की मरू द्यावं...?'' खाणाखुणांच्या बोलीनं इलायझा सांगत गेली, गाइल्स भाषांतरं करत गेला. इलायझाच्या मनस्वी प्रेमाचा त्याला हेवा वाटला. तो उभयचर प्राणी आणि आपण वेगवेगळ्या प्रजातीचे आहोत, हे साधं भानदेखील इलायझाला नव्हतं. 

गाइल्सला हाताशी धरून इलायझानं जळमाणसाला पळवून न्यायचं ठरवलं आणि पठ्‌ठीनं ते खरंच घडवून आणलंही. आधी प्रयोगशाळेतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोंडं फिरवण्यात आली आणि मग लॉंड्रीच्या मोठ्या ट्रॉलीत कपड्यांच्या ढिगाखाली झाकून तो प्राणी प्रयोगशाळेबाहेर विनासायास काढण्यात आला. बाहेर गाडी घेऊन गाइल्स उभा होताच. हे सगळं झेल्डानं नीट बघितलं; पण ती काही बोलली मात्र नाही. तिचा पाठिंबा होताच. 

इलायझानं घरच्या बाथटबमध्ये पाणी आणि थोडं शेवाळ भरून जळमाणसाला तिथं आणून ठेवलं. त्याला जगणं सोपं जावं म्हणून रत्तलभर मीठ त्या पाण्यात कालवलं. हॉफस्टेटलरनं तिला काही औषधं दिली होती. तीही घातली. समुद्रातळीचा जळमाणूस एका शहरातल्या घरात राहू लागला. 

...प्रयोगशाळेत मात्र अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. 

* * * 

नरमगरम तब्येतीच्या जळमाणसाला असं शहरी जीवनाशी जुळवून घेणं अवघड होतं. साधी माशांची टाकी घरी आणून ठेवली तरी त्यातलं पाणी आठ-पंधरा दिवसांनी बदलावं लागतं. इथं तर अखंड जळमाणूस होता. गाइल्सला लक्ष ठेवायला सांगून इलायझा कामावर जायची. प्राणी गायब झाल्यानं स्ट्रिकलॅंड बेभान झाला होता. त्यानं कसून चौकशी आरंभली. त्याचा बॉस जनरल हॉइटनं 'गुमान ते जनावर छत्तीस तासांत पकडून आण, नाहीतर नरकात धाडीन' असा त्याला दम भरला होता. केजीबीच्या कारनाम्यांकडं संशयाची सुई वळली. इलायझा आणि झेल्डा मात्र शहाजोगपणे फरश्‍या पुसायचं काम करत राहिल्या. 
गाइल्सचा डोळा चुकवून जळमाणूस बाथटबमधून बाहेर पडला. पुढल्या खोलीत इलायझाचं मांजर पकडून त्यानं चक्‍क खाल्लं. गाइल्सलाही त्यानं जखमी केलं. इलायझा धावत परत घरी आली. तिनं जळमाणसाला समजावलं. तोही खजील झाला. जखमी गाइल्सच्या टकलावर हात ठेवून त्यानं बहुधा क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी सकाळी गाइल्स उठला, तेव्हा त्याच्या टकलावर केस उगवले होते आणि जखम पूर्ण बरी झाली होती. 

...इथून पुढचे काही दिवस इलायझाचं आयुष्य सुखानं ओसंडून जात होतं. इवल्याशा माशांच्या स्पर्शानं अलौकिक रंगांची प्रवाळपुष्पं भराभर फुलावीत आणि त्यांनी सारा समुद्रतळ बहरून जावा तसं घडलं. तिचं माणूस तिच्याजवळ राहत होतं. त्याचा स्पर्श तिला मोहरून टाकत होता. भाव-भावनांचा तो लाटांचा खळाळ तिला गुदमरवून टाकत होता. त्याचं अस्तित्व तिच्या अस्तित्वात कोंदून गेलं होतं; पण माणसाच्या जगातले नियम वेगळे असतात. अशा जगण्याला मर्यादा होती. बाथटबमधलं ते संकुचित आयुष्य समुद्राला सरावलेल्या जळमाणसाला जड गेलं असतं. कुणालाही सुगावा लागू न देता जगणं तर अशक्‍यच. स्ट्रिकलॅंड आणि त्याची शिकारी कुत्री मागावर होतीच. वातावरण कमालीचं गढूळ आणि संशयाचं होतं. झेल्डाला त्याची झळ लागली. हॉफ्टस्टेटलर तर जिवानिशी गेला. शेवटी इलायझानं मनावर दगड ठेवून परिपक्‍व निर्णय घेतला. जळमाणसाला समुद्रात सोडायचं... 

...दहा ऑक्‍टोबरला पावसाचा जोर पाहून शहरातला कालवा समुद्रात खुला करतील. त्या तारखेला जळमाणसाला कालव्यात सोडून द्यायचं. नंतर त्याचा तो समुद्रात जाईल, असं इलायझानं ठरवलं. कुणालाही सुगावा लागू न देता त्याला असं बंदिस्त ठेवणं तिला मंजूर नव्हतं...त्यालाही. 

पुढं काय झालं? ते पडद्यावर बघून मनात साठवणं यापरता सुंदर अनुभव नाही. 

* * * 

सॅली हॉकिन्स या सामान्य चेहऱ्याच्या असामान्य अभिनेत्रीनं साकारलेली इलायझा पुन्हा कुठंही बघायला मिळणं केवळ अशक्‍य आहे. इतकी बिनतोड भूमिका हजारात एखादीच बघायला मिळते. ऑक्‍टाविया स्पेन्सरनं साकारलेली झेल्डा फुलर कमालीची आश्‍वासक आहे. 'द शॅक'मध्ये तिला थेट ईश्‍वराची भूमिका होती. 'हिडन फिगर्स'मधली तिची भूमिकाही गाजली होती. 'गुलर्मोच्या चित्रपटासाठी मी टेबलाची भूमिका करायलाही तयार आहे,' असं म्हणत ती धावून आली आणि तिनं इलायझाच्या मैत्रिणीची दुय्यम भूमिका स्वीकारली. रिचर्ड जेनकिन्सनं उभा केलेला गाइल्स म्हणजे खरं तर प्रेक्षकाचंच प्रतिमास्वरूप आहे. मायकेल शॅनननं पेश केलेला स्ट्रिकलॅंड प्रसंगी राक्षस वाटतो. 

मेक्‍सिकन दिग्दर्शक-लेखक गियर्मो देल तोरो हा आधुनिक चित्रकथा-कथनातला दादा मानला जातो. 'हेलबॉय', 'पॅसिफिक रिम'सारखे गल्लाबाज सिनेमेही त्यानं केले आहेत. त्याच्या 'शेप ऑफ वॉटर'च्या कहाणीला मात्र अनेक पदर आहेत. कधी ती विज्ञानजगताशी घट्ट नातं सांगते, तर कधी परिकथेचा जादूई झगा घालून अवतरते. कधी कवितेत रमते, तर कधी कधी भयंकर अमानुष हिंसाचाराकडं बोट दाखवते. गियर्मो देल तोरो याला ही कथाकल्पना (म्हणे) सुचली सुमारे दहा वर्षांपूर्वी. कागदावर चित्रबित्र काढून तो वेगवेगळ्या निर्मात्यांना भेटायचा. कुणीही त्या आचरट कल्पनेला भाव देत नव्हतं. शेवटी उधार-उसनवारी करून त्यानंच निर्मितीची सुरवात करून टाकली. 

वास्तविक पॉल झिंडेलनामक एका नाटककारानं सन 1969 मध्ये एक नाटक लिहिलं होतं. त्याचं नाव होतं ः 'लेट मी हिअर यू व्हिस्पर'. नाटकाची नायिका एका प्रयोगशाळेत सफाईकामगारच होती. तिथं एक डॉल्फिन आणला जातो. त्या डॉल्फिनशी तिचं नातं जुळतं. शेवटी ती त्याला नदीत सोडते...असं काहीसं कथासूत्र होतं. 'शेप ऑफ वॉटर' आणि 'लेट मी हिअर यू व्हिस्पर'च्या कथासूत्रात धक्‍कादायक साम्य आहे, हे मान्य करावं लागेल; पण जळमाणूस आणि डॉल्फिन यात फरक आहे. शिवाय, या चित्रपटात शारीरिक ओढीचंही चित्रण गियर्मो देल तोरोनं केलं आहे. नाटककार पॉल झिंडेल यांचे चिरंजीव डेव्हिड यांनी तूर्त गियर्मो देल तोरो याच्यावर कथाचौर्याचा दावा ठोकला आहे. 'मी हे नाटक अद्याप पाहिलेलंच नाही,' असं देल तोरो म्हणतो. काय असेल ते असो, त्याचा निकाल यथावकाश लागेलच. पडद्यावर जे काही दिसतं ते थोर आहे, हे निश्‍चित. 

परिकथा या स्वभावत:च सुखान्तिका असतात. इलायझाची परिकथा ही सुखान्त की दु:खान्त हे तुमचं तुम्ही ठरवा. चित्रपट 'शेप ऑफ वॉटर' ही कविताच आहे म्हणा ना...गाइल्सच्या स्वगतांमधून हा चित्रपट उलगडताना दिसतो. चित्रपटाच्या शेवटी एका कवितेच्या सुंदर ओळी आहेत. त्या ओळी प्रसिद्ध पर्शियन कवी रूमी याच्या आहेत, असं म्हटलं जातं; पण त्याचाही धड पुरावा नाही. ओळी अशा आहेत : 

Unable to perceive the shape of you 
I find you all around me 
Your presence fills my eyes 
with your love 
it humbles my heart 
for you are everywhere
 

...गाइल्सच्या आवाजात या ओळी ऐकू येत असताना पडद्यावर निळंशार पाणी भरतं. गूढगंभीर प्रतिमांचा अद्भुत खेळ मांडला जातो. निळसर, काळोख्या पाण्यातलं ते अद्वैत पाहता पाहता मनाचा समुद्र होतो. पडद्यावरचं पाणी डोळ्यात कधी येतं हे समजतच नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com