होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक...

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे. एक तळं होतं. तळ्यात बदकांची पिलं होती. त्यातलं एक पिलू कुरूप होतं. इतर पिलं त्याला चिडवत. मारत. बिचारं ते पिलू रडे. मनातल्या मनात कुढे...पण एक दिवस त्याला तळ्यातलं प्रतिबिंब पाहताना कळलं की आपण वेगळे आहोत, कारण आपण बदकच नाहीओत, आपण तर आहोत राजहंस...ग. दि. माडगूळकरांची साधीभोळी शब्दरचना, सुधीर फडके यांची डोळ्यात आपोआप पाणी आणणारी चाल आणि आशा भोसले यांचा राजबन्सी स्वर...ही गीतगोष्ट इतकी शंभर हिश्‍शांनी किती मराठी होऊन गेली आहे बघा! हान्स क्रिस्तियन अँडरसननामक डेन्मार्कमधल्या एका अद्भुत परिकथालेखकानं 1842 मध्ये 'अग्ली डकलिंग' ही गोष्ट लिहिली. ती आता जगभरातल्या निरनिराळ्या भाषासंस्कृतींमध्ये त्या त्या रंगात मिसळून गेली आहे. एका तळ्यात होती...हे गाणं त्याचंच मराठी स्वररूप. ही गोष्ट वेगवेगळ्या रूपबंधात सांगितली गेली आहे, अजूनही सांगितली जातेच. 

'वंडर' ही अशीच एका राजहंसाची कहाणी. गेल्या वर्षीचाच हा चित्रपट. यंदा ऑस्करच्या रांगेत हा राजहंस उभा आहे; पण त्याला एकच नामांकन आहे-मेकप आणि केशभूषेबद्दलचं. इतर मातब्बर नामांकनांमध्ये 'वंडर' तितकासा टिकणार नाही, हे खरंय; पण तरीही हा चित्रपट प्रत्येक शिक्षकानं आणि पालकानं अगदी तिकीट काढून बघावा असा आहे. इतका चांगला की घरी टीव्हीवर बघितलात तरीही एका खोक्‍यात तिकिटाचे पैसे वेगळे टाकावेत. चांगली कलाकृती अस्वस्थ करते. क्‍वचित आपल्या मनात भिनलेलं आम्ल कमीही करते. खोल मनाच्या तळाशी पडून राहिलेलं आपल्यातलंच काहीतरी शुद्ध, तरल आणि स्वच्छ असं बारीक चाळणीनं चाळून देते. 'वंडर' म्हणूनच वंडरफुल आहे. 

* * * 

अप्पर मॅनहॅटनच्या सुखवस्तू वस्तीत राहणाऱ्या ऑगस्टिन पुलमनच्या आयुष्याची सुरवात काही बरी झाली नाही. तूर्त त्याचं वय असेल दहा-अकरा. नुकताच पाचव्या यत्तेत तो जाणार आहे. चिमुरडा असला तरी ऑगी ही एक वल्लीच आहे. त्याच्या शब्दात सांगायचं तर त्याचा जन्म हा एक विनोद होता. जन्मल्याजन्मल्या त्याची अवस्था बघून डॉक्‍टरही म्हणे टरकला होता, कारण तो अप्रेंटिस होता! वडील नेट पुलमन हातात मूव्ही कॅमेरा घेऊन बाळंतवेणा देणाऱ्या आईचं, इझबेलचं शूटिंग करत होते. नर्सेस कपाळाला हात लावून बसलेल्या असतानाच ऑगीची स्वारी जगात अवतरली. त्याला बघूनच डॉक्‍टरला कापरं भरलं. वडिलांनी ''अँ? हे काय?'' असा चेहरा केला. नर्सेसनं घाई केली, म्हणून पोरगं वाचलं. ऑगी पुलमनची अवस्था बिकट होती. त्याला धड श्‍वास घेता येत नव्हता की डोळ्यांना दिसत नव्हतं. निळं-जांभळं बेंद्रं पोर. पुढं एक-दोन नव्हे, तब्बल 27 शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो जरा नॉर्मल झाला; पण जरासाच. बाकी जगणं नॉर्मल असलं तरी ऑगीचा चेहरा मात्र पार विस्कटलेलाच होता. ऑगीला बघून मोठीमोठी माणसं दचकायची. लहान मुलांचं विचारूच नका. आइस्क्रीम पार्लरमध्ये गेलं तर याला बघून इतर मुलं किंकाळी फोडत. ओकत. ऑगीला वाईट वाटायचं; पण करणार काय? ऑगी पुलमन हा ट्रीचर कॉलिन्स सिन्ड्रोमचा बळी ठरला आहे. शास्त्रीय परिभाषेत त्याला Mandibulofacial dysostosis असं म्हणतात. शस्त्रक्रियेपलीकडं याला काहीही उपाय अजून तरी नाही. 

ऑगीची आई इझबेल आणि बाप नेट हे खरंच प्रेमळ जोडपं होतं. एकमेकांत छान गुंतलेलं. एक मोठी बहीण होती, तिचं नाव व्हिया...ऑलिव्हियाचं लघुरूप. तिघांमधला हा चौथा ऑगी. शेंडेफळ. सॉरी, आणि आणखी एक मेंबर होता कुटुंबाचा. डेझी! चार पायांची केसाळ डेझी ही त्या घराचा केंद्रबिंदूच. ऑगीची तोळामासा प्रकृती बघून मम्मा इझबेलनं त्याला घरीच शिकवलं. होमस्कूलिंग म्हणतात ना, तसं. घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बघून घाबरू नये, म्हणून ऑगी एक हेल्मेट घालायचा. अगदी अंतराळवीरटाइप. हेल्मेटच्या आत त्याला सुरक्षित वाटायचं. त्याला अंतराळवीर होण्याचीच इच्छा होती. गडी अवकाशातून खाली जमिनीवर यायला तयार नसे. 'स्टार वॉर्स' आणि अन्य सायफाय चित्रपटांचा हा परिणाम! कॉम्प्युटरचे गेम्स हे त्याचं विश्व झालं होतं. 

ऑगीच्या भाषेत सांगायचं तर तो खरं तर चांगला स्पोर्टसमन होता...पण एक्‍सबॉक्‍स या त्याच्या कॉम्प्युटर खेळाच्या दुनियेत. हॅलोविन हा त्याचा सगळ्यात आवडता दिवस. कारण, 'त्या दिवशी भयंकर मुखवटे घालून पब्लिक फिरतं; पण त्या दिवशी मला काहीच प्रॉब्लेम नसतो,' असा ऑगीचा एक कडवट विनोद! 

''...होमस्कूलिंगला मर्यादा आहेत. त्याला वेळीच शाळेत घालायला हवं,'' असं मम्मा इझबेलचं म्हणणं होतं. तर ''कशाला उगीच? त्यातनं नव्या काही कटकटी मात्र होतील'' असा बाप नेट याचा शेरा. 

''कटकटी झाल्या तर होऊ देत...त्याला जगाची कल्पना यायला नको का? घरातल्या सुरक्षित वातावरणात किती वाढवणार त्याला? आत्ताच गेला तर बरं, नंतर आणखी प्रॉब्लेम होतील,'' हे इझबेलचं म्हणणं बरोबरच होतं. ऑगी बीचर प्रेप स्कूलमध्ये पाचवीत जायला लागला. 

* * * 

शाळेचे संचालक प्रा. टुशमन यांनी त्याला पहिल्या दिवशी स्कूलची एक ओळखफेरी मारायला लावली. दोन-चार विद्यार्थी सोबत दिले. त्यातला एक होता जॅक विल. हा पुढं ऑगीचा खूप चांगला मित्र बनला. दुसरा होता ज्युलियन. हा शत्रू बनला. आणि तिसरी शार्लट...शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच ऑगीला जगाची कल्पना येऊ लागली. 

त्याला बघून आख्खा वर्ग शहारला होता. पोरांनी तर त्याला डार्थ सीडिअस ('स्टार वॉर्स'मधला विद्रूप खलनायक) असं नावही ठेवलं. दुपारच्या सुट्टीत त्याच्यासोबत डबा खाणं मुलं टाळत. जेवण जात नाही म्हणायची. न्यूटनचे नियम प्रात्यक्षिकासह शिकण्याच्या निमित्तानं मुलांनी त्याला चेंडूनं सडकून काढलं. मार खाणं, हेटाळणी हा ऑगीच्या दिनक्रमाचा भागच बनला. 

लहान मुलांचं जग निरागस असतं; पण त्या जगातही घृणा, द्वेष, तिरस्कार, राग असतातच. शाळकरी मुलंही प्रसंगी हिंस्र आणि निर्दय बनू शकतात. ऑगी हे सगळं सहन करत होता. वास्तविक जॅक विल त्याचा चांगला मित्र झाला होता; पण एकदा ऑगीनं त्याला मित्रांच्या कोंडाळ्यात बडबडताना ऐकलं. जॅक सांगत होता ः ''मी जर ऑगीसारखा दिसत असतो ना, तर जीवच दिला असता मी नक्की!'' 

ऑगीचं हृदय अक्षरश: विदीर्ण झालं. त्याला धड रडताही येत नव्हतं. शाळेत न जाता घरीच शिकलेलं बरं, असा त्यानं निर्णय घेऊन टाकला. व्हियानं त्याची अवस्था ओळखली. त्याची समजूत काढली. वास्तविक व्हियाची वेगळी दुखणी होती. पोर वयात येत होती. हे वय बॉयफ्रेंड गाठण्याचं. कुणासाठी तरी हृदय धडधडण्याचं. छान दिसण्याचं. शरीरात होणारे बदल न्याहाळण्याचं. पण... 

बिचारा ऑगी घरी येऊन हेल्मेटमध्ये कुढत होता. इझबेलचं बारीक लक्ष होतं. एक दिवस तिनं ऑगीला जवळ घेतलं. 

''हे बघ ऑगी, आपल्याला आयुष्यात 'कुठं जायचंय' याचा नकाशा इथं मनात असतो,'' हृदयावर बोट ठेवून तिनं सांगितलं. मग चेहऱ्याकडं बोट दाखवून म्हणाली, ''...आणि 'कुठं आहोत' हे इथं लिहिलंय!'' ऑगीला रडायला आलं. 

''परिस्थितीत बदल आपणच घडवायचा असतो. सतत हेल्मेटमध्ये चेहरा लपवून कसं चालेल?'' त्याला मायेनं जवळ घेत ती म्हणाली. ऑगीची समजूत पटली. शाळा नावाच्या यातनातळावर तो मन घट्ट करून रोज जात राहिला. शाळेत त्याला हळूहळू दोस्त जमा करता आले. प्रा. टुशमनचं पाठबळ वाढलं. 

टुशमनसरांनी तर मुलांना सांगितलं ः ''कसं दिसावं, हे काही ऑगीच्या हातात नाही; पण त्याच्याकडं कसं बघावं, हे तर आपण ठरवू शकतो ना?'' 

जानीदोस्त जॅक विलनं एक दिवस त्याला स्नॅपचॅटवर गाठलंच. 

''माझ्यासारखा दिसला असतास, तर तू खरंच जीव दिला असतास?'' -ऑगी. 

''नाही...पण ज्युलियनसारखा असतो तर नक्‍कीच दिला असता''- जॅक. 

ऑगीनं त्याला माफ केलं. तेवढ्यात शाळेमध्ये विज्ञान-प्रकल्प स्पर्धा जाहीर झाली आणि ऑगीचा भाव वधारला. जॅक त्याचा पार्टनर झाला. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं. त्या वर्षीचा बीचर प्रेप स्कूलचा आदर्श विद्यार्थी एक विस्कटलेल्या चेहऱ्याचा हुशार, लोभस मुलगा होता आणि तो 'वंडर' म्हणून ओळखला गेला. 

* * * 

या चित्रपटाची संपूर्ण कहाणी सांगणं अशक्‍य आहे. ती पडद्यावर उलगडताना बघणंच योग्य. आर. जे. पॅलेशिओ नावाच्या एका अमेरिकी लेखिकेनं 2012 मध्ये 'वंडर' ही कादंबरी लिहिली. ती 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या बेस्टसेलरच्या यादीत अनेक आठवडे टॉपला होती. तीवर बेतलेला हा चित्रपट आहे. पॅलेशियोबाई एकदा त्यांच्या लहानग्या मुलाला घेऊन आइस्क्रीम खायला गेल्या. तिथं एका मुलीला बघून त्यांच्या छोकऱ्यानं अक्षरश: अंग काढलं होतं. त्या मुलीकडं बघून अस्वस्थ झालेल्या पॅलेशियोबाईंनी ही कादंबरी लिहिली. 

संपूर्ण कादंबरी हे खरं तर शाळकरी मुलांचं भावविश्व आहे; पण त्याभोवती पालकांच्या भाव-भावनांचंही एक गडदरंगी वर्तुळ गोलगोल फिरत असतं. त्यातही आपलं पोर थोडं वेगळं असेल तर हे वर्तुळ अधिकच हळवं होऊन जातं. या दोन्ही वर्तुळांमध्ये तोल राखणं गरजेचं असतं आणि ते काम करतात शिक्षक आणि ती त्यांची शाळा. बदलत्या आधुनिक जगात तर हा तोल राखणं हेच एक आव्हान ठरतं. 'वेगळेपण असेलच तर मिसळून जाण्याचा अट्टहासही करण्यात अर्थ नसतो' हेही सत्य स्वीकारावं लागतं. 'वंडर'मधली ऑगी पुलमनची गोष्ट हीच बाब अत्यंत अलवारपणे प्रेक्षकांच्या मनात उतरवते. गोष्ट तशी साधीच; पण तीमधल्या जाणिवा मात्र कमालीच्या नव्या आणि आधुनिक आहेत. 

जेकब ट्रेम्ब्लेनं साकारलेला ऑगी अक्षरश: प्रेमात पाडतो. विद्रूप चेहऱ्याचं ते पोर प्रसंगी लोभस वाटू लागतं. यातली कमालीची संयत आणि थक्‍क करणारी व्यक्‍तिरेखा आहे ऑगीच्या आईची, इझबेलची. ती नन अदर दॅन ज्युलिया रॉबर्टसनं साकारली आहे. ते आईपण तिनं इतकं प्रभावी पद्धतीनं पेश केलं आहे की यापुढं तिला 'मम्मा' अशीच हाक मारावी की काय असं वाटावं! एरवी जॅकी चॅनच्या चित्रपटात धमाल विनोदी मारामाऱ्या करणारा ओवेन विल्सन इथं ऑगीचा बाप म्हणून भेटीला येतो. तोही अप्रतिम. ऑगीचा मित्र म्हणजे जॅक विल याची भूमिका करणारा नोह ज्यूप यालाही दाद द्यावी लागेल. 

दिग्दर्शक स्टीफन शबॉस्की यांनी चित्रपटात कुठंही रडारड घडवलेली नाही. हृदय पिळवटणारं संगीत नाही. तरीही तो मनाला भिडायचा तो भिडतोच. तीच त्याची खासियत आहे. हे थोडंसं हान्स अँडरसनच्या परिकथेसारखंच. 'अग्ली डकलिंग' लिहिणाऱ्या हान्स अँडरसनला त्याच्या उतारवयात कुणीतरी विचारलं होतं ः ''सर, तुम्ही आत्मचरित्र का नाही लिहीत?'' 

''लिहिलंय की...'अग्ली डकलिंग' काय आहे मग?'' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com