...आणि 'भाऊं'नी मला 'अण्णां'च्या स्वाधीन केलं! (भरत कामत)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'कलापरंपरा लाभलेले ज्येष्ठ तबलावादक पंडित चंद्रकांत कामत (भाऊ) यांचा मुलगा,' अशी ओळख मला जन्मत:च मिळाली. पंडित भीमसेन जोशी (अण्णा) यांना किंवा अन्य मान्यवर गायकांना रियाजाच्या वेळी भाऊ तबल्याची साथसंगत करत असताना कित्येकदा मी भाऊंच्या मांडीवर डोकं ठेवून ऐकत ऐकत झोपून जात असे. परिणामी, संगीताचे संस्कार अगदी लहान वयातच माझ्यावर होत गेले. लहानपणी तबला हेच माझं प्रमुख 'खेळणं' असायचं! मी जसा थोडा मोठा झालो तसा भाऊंच्या मार्गदर्शनात माझा तबल्याचा रियाज सुरू झाला. एक लय किमान दोन तास टिकली पाहिजे, असा भाऊंचा नियमच असायचा. कडक शिस्तीत तालीम चालत असे. बैठक कशी असावी, हातांची रचना, वजन, बोटांची स्थानं, बोलांचा स्पष्टपणा या विविध गोष्टींचा त्यात समावेश असे. 

'' 'गळ्याचं वजन हाताला आणि हाताचं वजन गळ्याला जेव्हा एकजीव होईल तेव्हा ती खरी साथसंगत ठरेल...' 'काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात' या विचारसरणीनुसार गायकाला काय अपेक्षित आहे, हे साथसंगत करणाऱ्याला त्वरित समजायला हवं; म्हणजेच शब्दाबरहुकूम ठेका यायला हवा,' '' हे भाऊंचे शिकवणयुक्त मंत्र माझ्या मनावर लहानपणीच कोरले गेले होते. 

गायकाचं गाणं कसं ऐकावं इथपासून ते समेचा 'धा' वाजवताना डग्ग्यावरचं वजन आणि तबल्याचा स्वरनाद तानपुऱ्यात कसा मिसळेल, याचं ज्ञान व बारकावे भाऊंनी आम्हाला समजावून दिले. भाऊंच्या गुरुकृपेनं पंडित सामताप्रसाद यांचा मला लाभलेला सहवासदेखील मोलाचा आहे. सलग तीन-चार तास एके ठिकाणी ताठ बसून साथसंगत करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व बैठक लागते. कारण, मैफलीच्या सुरवातीचा व अखेरचा वादनदर्जा एकसारखाच असायला हवा. यासाठी लागणारी शारीरिक मेहनतदेखील फार महत्त्वाची होय. यासाठी लहानपणापासून मी कुस्तीबरोबरच जोर-बैठका हा व्यायाम नियमितपणे केला. याबाबतीत माझ्या डोळ्यांपुढं 'भाऊ' (माझे वडील), तसंच 'अण्णा' (पंडित भीमसेन जोशी) हेच आदर्श होते. आरतीपासून लावणीपर्यंत सर्व गानप्रकारांना साथसंगत करता येईल, अशी तालीम भाऊंनी आम्हा दोघा भावांना दिली. याच कारणानं मी सुलोचना चव्हाण यांच्या लावण्यांच्या कित्येक कार्यक्रमांमध्ये त्यांना तबल्याची साथ करू शकलो. 

सन 1987 मध्ये मला प्रथमच पंडित जितेंद्र अभिषेकी यांना साथसंगत करण्याचं भाग्य लाभलं. इथूनच 'व्यायसायिक तबलावादक' म्हणून माझी वाटचाल सुरू झाली. यानंतर 1988 मध्ये 'सवाई गंधर्व महोत्सवा'त पंडित भीमसेन जोशी अर्थात अण्णा यांचे शिष्य माधव गुडी यांना साथ करून, माझं या महोत्सवात मुहूर्ताचं पदार्पण झालं. अण्णांनी ही साथसंगत ऐकली. त्यांनी भाऊंना त्या वेळी सांगितलं : ''मला वादनात जे वजन हवंय ते भरतकडं आहे. तुमची परवानगी असेल तर मी त्याला साथीला घेईन.'' हे वाक्‍य ऐकताच भाऊंना भरून आलं. त्यांनी त्याच क्षणी अण्णांना म्हटलं : ''तो तुमचाच आहे. तुम्ही त्याला केव्हाही साथीला नेऊ शकता. तो तुमचा हक्कच आहे.' भाऊंनी असं सांगून मला अण्णांच्या स्वाधीन केलं! माझ्या आयुष्यातला हा परमभाग्याचा क्षण होता. सन 1989 मध्ये अण्णांचा 'संतवाणी'चा पहिला कार्यक्रम मी पुण्यात 'टिळक स्मारक मंदिर इथं वाजवला. माझ्या सांगीतिक आयुष्यातलं ते एक देखणं वळण होतं. यानंतर भारतात व परदेशांत अण्णांच्या असंख्य कार्यक्रमांना दीड तपाहून अधिक काळ साथ करण्याचं भाग्य मला लाभलं. अण्णांचय अखेरच्या मैफलीपर्यंत म्हणजेच 2007 च्या सवाई गंधर्व महोत्सवापर्यंत त्यांनी मला साथीला घेतलं. हा माझ्या जीवनाला झालेला खऱ्या अर्थानं परीसस्पर्श म्हणावा लागेल. पितृतुल्य, ऋषितुल्य अशा स्वराधीशाला मी अनेक वर्षं साथसंगत करत होतो; परंतु अण्णांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचं दडपण माझ्यावर कदापि येऊ दिलं नाही. महत्त्वाचं म्हणजे 'साथीदार' म्हणून कधीही दुय्यम दर्जाची वागणूक त्यांनी मला (किंवा कुणालाही) दिली नाही. एवढंच नव्हे तर, कुठल्याही संयोजकांनादेखील त्यांनी तसं करू दिलं नाही. 

सोलो तबलावादन हे नक्कीच आव्हानात्मक आहे; परंतु गायनाची साथसंगत ही मोठी साधना आहे. तबल्याची संयमित साथसंगत करण्यासाठी तपश्‍चर्याच करणं आवश्‍यक असतं. यासाठी गुरूचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. साथसंगत करणं ही माझ्या मते व्यापक संकल्पना आहे. गायकाचं संपूर्ण सांगीतिक व्यक्तिमत्त्व संगतकाराच्या परिचयाचं असल्यास मैफल खुलते. मैफलीत गायक व साथसंगतकार या दोघांमध्ये एकमेकांच्या विचारांची उचित देवाण-घेवाण झाल्यास ते गायन श्रोत्यांना निश्‍चितच भावतं. अनेक कलाकारांचं गायन ऐकल्यावर त्यांच्या गायकीतल्या खास जागा समजतात. कुणाला कसा ठेका लागतो, आवडतो हे त्यातून समजतं. वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला तरच साथसंगत गायनाशी सुसंगत होते. 

''बाळ, तू टाळ्या घेण्यासाठी तबलासाथ करत नाहीस. आपण 'साथसंगत' करत आहोत, याचं भान तुला कायम असतं, ''असं मला सांगून 2015 मध्ये किशोरीताईंनी 'गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार' हा पहिला पुरस्कार मला प्रदान केला, हा माझ्या आयुष्यातला आणखी एक भाग्याचा क्षण. या माझ्या सगळ्या सांगीतिक प्रवासात पत्नी-गायिका डॉ. रेवती कामत हिचा मोलाचा वाटा आहे. तिच्या भक्कम 'साथी'मुळंच मी इथवरचा हा प्रवास करू शकलो आहे... 

(शब्दांकन : रवींद्र मिराशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com