सेन्सेक्‍स आणि निफ्टी : गुंतवणूकदारांचे मित्र! (डॉ. वीरेंद्र ताटके)

डॉ. वीरेंद्र ताटके
रविवार, 4 मार्च 2018

शेअर बाजाराचा विचार करताना सेन्सेक्‍स आणि निफ्टी या शब्दांचा संदर्भ खूप वेळा येतो. हे सेन्सेक्‍स आणि निफ्टी म्हणजे नक्की असतात तरी काय, त्यांच्याद्वारे शेअर बाजाराचा अंदाज कसा घेता येतो आदी गोष्टींबाबत माहिती. 

शेअर बाजाराचा विचार करताना सेन्सेक्‍स आणि निफ्टी या शब्दांचा संदर्भ खूप वेळा येतो. हे सेन्सेक्‍स आणि निफ्टी म्हणजे नक्की असतात तरी काय, त्यांच्याद्वारे शेअर बाजाराचा अंदाज कसा घेता येतो आदी गोष्टींबाबत माहिती. 

ज्याप्रमाणं शाळेतल्या वेगवेगळ्या वर्गांतल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थ्यांची 'स्कॉलर बॅच' तयार केली जाते आणि अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेल्या एकूण गुणांची आधीच्या गुणांशी तुलना केली जाते, अगदी त्याचप्रमाणे 'सेन्सेक्‍स' आणि 'निफ्टी' ही म्हणजे भारतीय शेअर बाजारातली 'स्कॉलर बॅच' आहे. सेन्सेक्‍स आणि निफ्टी हे अनुक्रमे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारातल्या निवडक कंपन्यांच्या शेअरच्या एकत्रित बाजारभावातले चढ-उतार सर्वसामान्य गुंतवणूकदाराला सांगत असतात. एका अर्थानं ते बाजाराची दिशा दर्शवत असतात, म्हणूनच त्यांना बाजाराचे 'निर्देशांक' म्हणतात. अर्थात ज्याप्रमाणं शाळेतला प्रत्येक विद्यार्थी शाळेसाठी महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणं शेअर बाजारातल्या प्रत्येक कंपनीच्या शेअरचं स्वतंत्र अस्तित्व असतं. मात्र, असा प्रत्येक शेअर या निवडक कंपन्यांच्या निर्देशांकात समाविष्ट करणं शक्‍य नसतं. सेन्सेक्‍समध्ये निवडक तीस कंपन्यांच्या शेअरच्या बाजारभावाचा समावेश असतो, तर निफ्टीमध्ये पन्नास निवडक कंपन्यांच्या शेअरच्या बाजारभावाचा समावेश असतो. या सर्व कंपन्या आपापल्या क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्या असतात. ठराविक कालावधीनंतर या कंपन्यांचा आढावा घेऊन एखादी नवीन कंपनी निर्देशांकातल्या आधीच्या कंपनीची जागा घेते. सेन्सेक्‍सचं पूर्ण नाव सेन्सिटिविटी इंडेक्‍स (Sensitivity Index) आहे. शेअर बाजार किती सेन्सिटिव्ह अर्थात चंचल आहे हे तो सांगत असतो. निफ्टीचं पूर्ण नाव एनएसई निफ्टी (NSE Fifty) आहे. 1978 मध्ये सेन्सेक्‍स सुरू झाला, तर 1995 मध्ये निफ्टी सुरू झाला. 

गुंतवणूकदारांचे मित्र : 
सेन्सेक्‍स आणि निफ्टी हे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मित्र असतात, असं म्हणता येईल. कारण बाजारात प्रवेश करताना यांची चौकशी केल्याशिवाय गुंतवणूकदाराला चैन पडत नाही. दिवसभरात शेअर बाजारातले हेलकावे पाहण्यास अजिबात वेळ न मिळालेला एखादा गुंतवणूकदार संध्याकाळी निदान या दोन मित्रांचा कानोसा घेतोच. त्यामुळंच 'काय म्हणतोय शेअर बाजार?' या प्रश्नाचं उत्तरसुद्धा एका शब्दात देण्यासाठी याच दोन मित्रांची मदत होते. 

अर्थात शेअर बाजाराशी दिशा हे दोन्ही निर्देशांक प्रत्येक वेळी अचूकरीत्या टिपतात असं म्हणणं चुकीचं ठरेल- कारण मुळातच भारतीय शेअर बाजारातल्या हजारो कंपन्यांपैकी अगदी निवडक कंपन्यांचा त्यामध्ये विचार केलेला असतो. त्यामुळं या निर्देशांकांत समाविष्ट नसलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या बाजारभावांतील चढ-उतारांचा विचार हे दोन्ही निर्देशांक करू शकत नाहीत. म्हणूनच सेन्सेक्‍स आणि निफ्टी जेव्हा वेगानं वाढत असतील किंवा कोसळत असतील, तेव्हा त्यामुळं फार आनंदी किंवा विचलित न होता आपण स्वत: गुंतवणूक करत असलेल्या शेअरच्या बाजारभावातली चढ-उतार पाहणं आवश्‍यक ठरतं. 

निर्देशांकांची खरेदी करता येते का? 
सेन्सेक्‍स किंवा निफ्टीची खरेदी करता येते का, असा प्रश्‍न सर्वसामान्य गुंतवणूकदाराला पडू शकतो. याचं उत्तर 'नाही' असं आहे- कारण हे दोन्ही निर्देशांक प्रत्यक्षात अस्तित्वात नसून, ती एक संख्या आहे. त्यामुळं एखाद्या कंपनीच्या शेअरप्रमाणं सेन्सेक्‍स किंवा निफ्टी खरेदी करून आपल्या डिमॅट खात्यावर साठवून ठेवता येत नाहीत. मात्र, या निर्देशांकांत समाविष्ट असणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्यअल फंडांत गुंतवणूक करून हा उद्देश साध्य करता येतो. अशा फंडांना 'इंडेक्‍स फंड' म्हणतात. अशा फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्यास या निर्देशांकांत होणाऱ्या चढ-उतारांचा फायदा करून घेता येतो. वायदा बाजारातदेखील सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये व्यवहार करता येतात. तिथं या निर्देशांकांच्या पातळ्यांमध्ये होणाऱ्या सततच्या बदलाचा फायदा फ्युचर्स आणि ऑप्शन्स या व्यवहारांच्या माध्यमातून घेता येतो. अर्थात वायदा बाजारातले व्यवहार जोखीमयुक्‍त्त असल्यानं त्यांचा पूर्ण अभ्यास करूनच त्यामध्ये सहभाग घेणं योग्य ठरतं. 

1978 ते 2018 या चाळीस वर्षांत सेन्सेक्‍स जवळपास 340 पट वाढला. याचाच अर्थ ज्या गुंतवणूकदारानं चाळीस वर्षांपूर्वी शेअर बाजारात एक लाख रुपये गुंतवले होते, त्याच्या गुंतवणुकीचे आजचं बाजारमूल्य तीन कोटी चाळीस लाख रुपयांच्या आसपास आहे. या चाळीस वर्षांत सेन्सेक्‍सनं अर्थव्यवस्थेतले अनेक चढ-उतार पहिले; परंतु वाटेतल्या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यानं गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. निफ्टीनंदेखील त्याच्या कारकिर्दीत असाच आकर्षक परतावा दिला आहे. गुंतवणुकीच्या इतर पर्यायाबरोबर तुलना केल्यास शेअर बाजार आकर्षक का वाटतो हे कळण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसं बोलकं आहे. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Investment Share Market Sensex