चिंतनात्मक रियाज महत्त्वाचा

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

गाणं शिकावं, असं माझ्या मनात खरंतर कधीच नव्हतं. मात्र, योगायोग माणसाला वेगळ्या वाटेवरून घेऊन जात असतात. 'गुरुगृही 12 वर्षं राहून गुरूची सेवा करायची' एवढंच माझ्या मनात त्या वेळी, म्हणजे तरुणपणी, होतं. माझा जन्म वेदशास्त्रसंपन्न घराण्यातला. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर हे माझे वडील, तर वेदशास्त्रसंपन्न असे दाजी पणशीकर हे माझे काका. तेव्हा 'कला' आणि 'संस्कृत' या दोन्ही गोष्टी घरात होत्याच. बाबांची, म्हणजे वडिलांची, 'नाट्यसंपदा' नावाची नाटककंपनी होती, हे बहुतेकांना ठाऊक आहे. 'गुरुगृही राहून गुरुसेवा करायची' असा जो उल्लेख मी वर केला, याचं कारण म्हणजे गुरुसेवेचं महत्त्व बाबा आणि काका दोघांनीही माझ्यावर लहानपणापासूनच ठसवलं होतं. गुरुसेवेचं मला एक प्रकारे 'फॅसिनेशन'च होतं असं म्हटलं तरी चालेल! 

'नाट्यसंपदा'द्वारे 'तुझी वाट वेगळी' हे संगीत-नाटक करायचं ठरलं होतं. त्याचं संगीतदिग्दर्शन किशोरीताई अमोणकर करत होत्या. तेव्हा 'नाट्यसंपदाचा माणूस' म्हणून मी किशोरीताईंना मदतनीस या नात्यानं काम करत होतो. एकदा त्या कुणालातरी गाणं शिकवत होत्या; पण समोरच्या व्यक्तीला ते काही जमत नव्हतं. मी तिथंच बसलेला असल्यानं माझ्याकडं वळून किशोरीताईंना मला पटकन विचारलं ः ''तू पण गाणं शिकतोस ना रे?'' (तेव्हा मी वसंतराव कुलकर्णी यांच्याकडं गाणं शिकत होतो). मी 'होय' म्हटलं. मग किशोरीताई त्या व्यक्तीला जे काही शिकवत होत्या, तेच त्यांनी मलाही म्हणून दाखवायला सांगितलं. मी ते त्या वेळी अगदी सहजतेनं गाऊन दाखवलं. कारण, त्या वेळी मी किशोरीताईंकडं शिकत नसल्यानं त्यांच्यासमोर गाऊन दाखवण्याबाबतचं कसलंच दडपण माझ्यावर नव्हतं! मी गायलेलं त्यांनी ऐकलं आणि त्या मला लगेचच म्हणाल्या ः ''तू आज संध्याकाळपासूनच माझ्याकडं गाणं शिकायला ये.'' आणि अशा प्रकारे किशोरीताईंसारखा गुरू मला अनायासे लाभला. 

मग गाणं शिकण्यासाठी मी सकाळ-संध्याकाळ किशोरीताईंकडं जाऊ लागलो. संगीत म्हणजे काय, हे मला त्यांच्याकडं जाऊ लागल्यावर समजायला लागलं. मला घरच्यांचाही पाठिंबा अर्थातच होता. 

मी किशोरीताईंकडं एक तपच नव्हे, तर तब्बल 20 वर्षं शिकलो. गाणं शिकण्याचा तो काळ मी कधीही विसरू शकत नाही. त्या रोज सकाळ-संध्याकाळ जे गायच्या, ते आम्ही शिष्यवर्ग आमच्या गळ्यातून आणण्याचा प्रयत्न करायचो; मग ते राग-संगीत असेल किंवा सुगम संगीत. एकेका रागाचा विचार कसकशा पद्धतींनी करता येऊ शकतो, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आलापी ही 

किशोरीताईंची खासियत होती. आलापी कशी विकसित करत न्यायची, हे आम्हाला त्यांच्याकडून काही प्रमाणात का होईना शिकता आलं. त्या जशा गायच्या तसंच त्यांना आम्ही गाऊन दाखवत असू. मग त्या आम्हाला आमच्या गायनातल्या त्रुटी सांगत. काय चुकतंय, काय बरोबर आहे, ते सांगत. 

किशोरीताईंना शिष्यवर्गाला केवळ गाणंच शिकवलं असं नव्हे, तर तंबोरा कसा लावायचा, गाणं कसं लिहायचं, गाण्याच्या नोटेशन्स कशा लिहायच्या (नोटेशन्स लिहिता आल्याच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे), गाणं 'कम्पोझ' कसं करायचं अशाही अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला आग्रहपूर्वक शिकवल्या. त्यांनी शिकवलेल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वराभ्यास! त्या वारंवार सांगायच्या ः ''ज्या सुरांच्या जिवावर तुम्ही पुढचं सगळं शिकताय, ते सूर तुम्हाला स्पष्ट कळायला हवेत. सूर तुम्हाला आपलेसे वाटले पाहिजेत. त्यांच्यावर प्रेम करता आलं पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थानं कलाकार व्हाल.'' सुरांवर, स्वरांवर प्रेम म्हणजे काय, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. 

किशोरीताईंच्या रियाजाच्या पद्धतीत रागांच्या रियाजापेक्षा थाटांचा रियाज जास्त असायचा. पहिल्या आणि शेवटच्या अशा दोन सप्तकांचा अभ्यास करून गाणाऱ्याच्या गळ्याची क्षमता वाढली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे. आमची रियाजाची पद्धतच वेगळी होती. केवळ गाऊन रियाज करण्यापेक्षा चिंतन करून आणि मग केलेल्या चिंतनाच्या आधारे गाऊन रियाज होत असे. मनातल्या मनात एखादं गाणं किंवा राग घेऊन त्याचा विचार करायचा...तो राग वेगळ्या पद्धतीनं मांडला तर काय होईल किंवा एखादं गाणं दुसऱ्या पद्धतीनं मांडलं तर काय होईल...अशा प्रकारचं हे चिंतन असे. मग हे चिंतन गाण्यात प्रत्यक्ष उतरवायचा प्रयत्न शिष्यवर्गानं करावा, असा त्यांचा आग्रह असे. शिकवण असे. दुसऱ्यानं केलेल्या कल्पनाही तुम्हाला उतरवून घेता आल्या पाहिजेत, असं त्या सांगत. किशोरीताईंचा असा दंडक होता, की त्या आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ द्यायच्या नाहीत आणि समजा गेलोच तर त्यातून काय शिकलात, असं त्या आम्हाला दुसऱ्या दिवशी विचारायच्या. मग त्या प्रत्येक वेळी विचारायला लागल्यावर गाण्यांच्या कार्यक्रमांना जाणंच आम्ही बंद केलं! आणि समजा गेलोच तर तिथून आम्ही काहीतरी शिकून यायचोच. ही एक चांगली सवय किशोरीताईंनी शिष्यवर्गाला लावली. 

किशोरीताई वेळेच्या बाबतीत इतक्‍या काटेकोर असत, की पाच मिनिटंही उशीर झालेला त्यांना चालायचा नाही. उशीर झाल्याचा त्यांना भयंकर राग यायचा. कुणाची काही चूक झाली की संबंधिताला त्या ओरडायच्याही. 

किशोरीताईंनी आम्हाला गझल, मराठी-हिंदी भजनं, कानडी संगीतही शिकवलं. आपल्या शिष्यांचा आवाज चौफेर कसा तयार होईल, याकडं त्यांचं लक्ष असायचं. 

जेव्हा कुणी एखाद्या गुरूकडं शिकतो, तेव्हा त्या गुरूच्या गानशैलीचा प्रभाव शिष्यावर कुठं ना कुठं पडतोच. मात्र, किशोरीताईंनी या गोष्टीकडंही लक्ष ठेवलं होतं. माझ्या बाबतीतलं उदाहरण देतो. 

किशोरीताई या स्त्री-गायक आणि मी पुरुष-गायक. एखाद्या स्त्री-गुरूकडं जर पुरुष-शिष्य शिकत असेल, तर त्याचं गाणं काहीसं बायकी वाटायला लागू शकतं, हे त्यांना माहीत होतं. त्यादृष्टीनं माझ्यावर त्यांचं बारकाईनं लक्ष असायचं. माझं गाणं जरा जरी बायकी वाटायला लागलं, तर त्या लगेच मला 'रघ्या, हातात बांगड्या भर' असं म्हणायच्या. त्यामुळं असं होऊ नये म्हणून त्यांनीच मला जागरूक ठेवलं. जेव्हा तुम्ही गाणं गाता, तेव्हा तुमच्या गुरूचं थोडं तरी तुमच्यात आलंच पाहिजे; पण ते वगळता तुम्ही तुमचं स्वतःचं काय गाता (मोगूबाई म्हणजेच माई नेहमी म्हणायच्या, की रुपयात एक आणा तरी तुमचा हवा. नुसती पोपटपंची कामाची नाही), गाणं गाताना त्या त्या वेळी तुम्हाला काय वाटतं, ते तुमच्या संगीतात उतरलं पाहिजे. अशा प्रकारे किशोरीताईंनी आम्हाला गाणं 'जिवंत' करायला शिकवलं! 

माझी पहिली व्यावसायिक मैफल मी 1984 मध्ये केली होती, तेव्हा मी 22-23 वर्षांचा असेन. त्या वेळी मी भूप राग सादर केला होता. सिंग बंधूंच्या 'सूरशृंगार' या संस्थेच्या कार्यक्रमात मला पाऊण तास गाण्याची संधी मिळाली होती. मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहातही गाण्याची संधी मला मिळाली होती. राग भूप आणि एक छोटं भजन मी त्या मैफिलीत गायलं होतं. या मैफलीसाठी किशोरीताईंनी माझी खूप तयारी करून घेतली होती. माझा पहिलावहिलाच अनुभव असल्यामुळं जसं शिकवलंय तसं, न चुकता म्हणणं हेच खूप मोठं आव्हान माझ्यापुढं त्या वेळी होतं! त्या मैफिलीला किशोरीताई उपस्थित होत्या. त्यांना ती मैफल खूप आवडली व त्यांनी मला त्याबद्दल शाबासकीही दिली. त्या मैफलीत माझ्या काही चुकाही झाल्या होत्या. त्या त्यांनी मला नंतर सांगितल्या. पहिला अनुभव म्हणून तो माझ्यासाठी चांगलाच होता. 

गेल्या सहा वर्षांपासून आम्ही 'गानसरस्वती महोत्सव' सुरू केला आहे. किशोरीताईंच्या गानकर्तृत्वाला मानवंदना म्हणून हा महोत्सव साजरा केला जातो. अनेक दिग्गजांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे. किशोरीताईंच्या कृपेनं हा महोत्सव सुरू झाला असून, तो पुढंही सुरूच राहील. दक्षिण भारतात एक प्रथा आहे. सगळ्यात विद्वान माणसाच्या पायात सोन्याचं कडं घालून त्याच्या विद्वत्तेचा सन्मान केला जातो. त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा किशोरीताईंच्या पायात सोन्याचं कडं घालून गुरुपूजन केलं होतं. 

आज किशोरीताई आपल्यात नाहीत; परंतु त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालणं, चांगल्या संगीताची बूज राखणं हे आमचं परमकर्तव्य आहे. ते पाळण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करू... 

(शब्दांकन : चिन्मयी खरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com