Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

वेळ! (प्रिया टाकळकर-जोशी)

बाहेर येऊन घड्याळ बघते तर तिचं तिलाच खरं वाटेना. एकेक मिनिट पुढं न जाण्यासाठी हटून बसलेलं. घड्याळ चक्क 10 मिनिटं पुढं सरकलं होतं आणि मनावर आलेल्या ताणाचा तिला या 10 मिनिटांत थोडा का होईना चक्क विसर पडला होता. तसा तात्पुरताच; पण विसर पडला होता. लख्खकन्‌ वीज चमकावी तसा तिच्या मनात एक विचार आला... 

'माणसानं थोडं तरी समजून घ्यायला नको का? किती म्हणून हटवादीपणा करावा?' ंजिरीची अगदी चिडचिड झाली होती. सकाळपासून काल रात्री उशिरापर्यंत जागून तिनं मयंकबरोबर शाळेच्या प्रोजेक्‍टचं काम संपवलं होतं. सकाळी लवकर उठून राजीवला डब्यात गाजराचा हलवा करून दिला होता. 'त्याच्या साहेबाची फर्माईश होती म्हणे! त्यांना काय जातंय सांगायला? इथं माझी कोण धावपळ होतेय मलाच ठाऊक!' चटचट कामं हातावेगळी करताना मंजिरीची स्वत:शीच बडबड सुरू होती. विचारांचा ओघ आवरत नव्हता. कामवालीची सुट्टी असल्यानं सिंक भांड्यांनी ओसंडून वाहत होतं. नवरा, मुलगा यांना डबा देऊन त्यांना निरोप दिल्यावर जरा श्‍वास घ्यायला फुरसत मिळेल अशी आशा होती बिचारीला. भराभर हात चालवत कामं उरकायला घेतली होती तिनं. तोच ''मंजिरी, आज दुपारी काय गं करणारेस जेवायला?'' या माईंच्या प्रश्‍नानं तिचा उरलासुरला संयमही संपून गेला. ''माई...अहो, आत्ताच तर उपमा आणि गाजरहलवा खाल्लात ना? जरा दम धरा की. लगेच कसल्या जेवणाच्या गोष्टी करता?'' माई आपल्या हिरमुसल्या चेहऱ्यानं खोलीत परतताना फक्त पुटपुटल्या : ''मी आपलं सहज विचारलं हो. असू दे, असू दे. चालू दे तुझं काम. तू नको हो त्रास करून घेऊस.'' 

सगळं स्वयंपाकघर नीटनेटकं करेपर्यंत स्वयंपाकाचा विचारसुद्धा मंजिरीला नकोसा वाटत होता. आवरेआवरेतो एक वाजला. तिनं विचार केला, दोघीच आहोत तर पटकन्‌ खिचडीच टाकावी. माईंच्या खोलीत ती डोकावली तर त्यांचा डोळा लागला होता. छान मनासारखी मऊ खिचडी करून पटकन चार पापड भाजून तिनं माईंना जेवायला वाढलं. लोणच्याच्या फोडीसोबत माईंनी चवीचवीनं खिचडी संपवली. मंजिरीचं जेवण आटोपेपर्यंत माई तिच्यासोबत थांबल्या. आवराआवर करतानाही माईंना तिथंच घुटमळताना पाहून मंजिरीनं विचारलं : ''काही हवंय का माई?'' 

''तसं विशेष काही नाही गं. मयंक शाळेतून येईल तेव्हा संध्याकाळी खायला आंबोळ्या करशील काय गं?'' ''तेव्हाचं तेव्हा पाहू, माई. आत्तापासनं तो विचार कशाला? तुम्ही पडा आता जरा,'' मंजिरी धुसफुसत म्हणाली. 

माई निजल्या तरी मंजिरीचं विचारचक्र फिरतच राहिलं. एका वेळचं खाणं संपत नाही, तर यांना लगेच पुढचं खाणं कसं सुचतं? आधी तर माई अशा नव्हत्या. उलट स्वत:च हौसेनं करून घालायच्या काहीबाही; पण अण्णा गेले, तसं माईंचं स्वयंपाकघरात येणं हळूहळू कमीच होत गेलं. गेले काही महिने तर सकाळ-संध्याकाळ, आता काय करशील खायला नि मग काय करशील खायला, हेच सुरू असतं त्यांचं! रोज उठून नवनवीन पदार्थ सुचत होते त्यांना. अण्णा गेले तेव्हा काही महिने माईंची विशेष काळजी घेण्याच्या नादात ही गोष्ट मंजिरीच्या फारशी लक्षात आली नव्हती; पण हल्ली मात्र तिला हे फारच प्रकर्षानं जाणवू लागलं होतं. सतत खाण्याचा विचार! न्याहारी झाली की जेवायला काय करशील अन्‌ जेवण झालं न झालं की मधल्या वेळी काय करशील? मंजिरी अगदी त्रासून गेली होती. 

तसा माईंचा मंजिरीवर अन्‌ तिचाही माईंवर फार जीव. सासुरवास तर जणू तिला ठाऊकच नव्हता. राजीव हा माईंचा एकुलता एक लेक. मंजिरीला माईंचा राग राग करण्याचं काही कारणंच नव्हतं; पण माईंच्या या खाण्याच्या वेडापायी मात्र ती पार मेटाकुटीला आली होती. खूप दिवस तिनं समजुतीनं घेतलं होतं; पण आता मात्र तिचीही चिडचिड होत होती. मग व्हायचे दोन शब्द पुढं-मागं आणि मग माईंचा हिरमुसला चेहरा पाहून तिला फार फार अपराधी वाटत राहायचं. हा तिढा कसा सोडवावा, काही म्हणता काही कळत नव्हतं. 

आज राजीव बॅंकॉकहून यायचा होता. 10-12 दिवसांनी येणार म्हणून मंजिरी खायला काहीतरी विशेष करण्याच्या बेतात होती. तेवढ्यात फोन वाजला : ''मंजिरी, मी बोलतोय. नीट ऐक.'' राजीवचा एवढा गंभीर आवाज ऐकून मंजिरी गडबडली. 

राजीव सांगत होता : ''मी अजून बॅंकॉक विमानतळावर पोचलो नाहीए. इथं लोकांचा कसलासा मोर्चा निघाला होता, त्यानं हिंसक वळण घेतल्यामुळं पोलिसांनी सगळी वाहतूक बंद केली आहे. मी गाडीतच अडकलो आहे; पण सुखरूप आहे. फक्त मोबाईलची बॅटरी केव्हाही उतरेल. मी विमानतळावर पोचलो की कळवतो. काळजी करू नकोस.'' 

-फोन बंद झाला तरी मंजिरी तशीच बसून होती. किती वेळ कुणास ठाऊक. माईंनी तिला हलवून हलवून विचारलं तेव्हा कुठं ती भानावर आली. माईंना सगळं सांगताना तिचं मन अगदी काळजीनं सैरभैर होऊन गेलं. नुसते वाईट विचार मनात फिरून फिरून येत होते. 

राजीवचा फोन येऊन पाच तास उलटून गेले होते. मंजिरी फेऱ्या मारून मारून थकली होती नि घड्याळ जणू पुढं सरकतच नव्हतं. तिच्यासाठी एकेक मिनिटही सरता सरत नव्हतं. मंजिरी फोनकडं हताश नजरेनं पाहत सोफ्यातच बसून होती. मेतकूट-भाताचा वास तिच्या नाकात शिरला आणि अचानक तिच्या लक्षात आलं, की सकाळपासून तिनं काही म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. माईही उपाशी असतील, या विचारानं तिला गलबलून आलं. चटकन्‌ उठून ती स्वयंपाकघरात गेली. बघते तर काय, माई दुसऱ्या पानात मऊ भात वाढत होत्या. खरं तर तिला एवढ्या तणावाच्या स्थितीतही माईंना खाणं सुचतंय, याचा राग यायला हवा होता; पण पोटातली भूक तर तिलाही जाणवत होती. तरीही बळं बळं ती म्हणाली : ''माई, तुम्ही घ्या दोन घास खाऊन. मला काही सुचत नाही हो. राजीवचा फोन आला म्हणजे मी जेवीन.'' प्रेमानं तिला खुर्चीवर बसवत माई म्हणाल्या : ''मंजिरी, अंग नको एवढी काळजी करूस आणि वाईट विचारतर मनातसुद्धा आणू नकोस. काही होणार नाही बरं राजीवला आणि तू उपाशी राहून का त्याला तिथं मदत होणार आहे? दोन घास खा, बाळा! येईल बघ त्याचा फोन इतक्‍यात.'' मानत नव्हतं; पण निसर्गनियमानं लागलेली भूकही तितकीच प्रबळ होती. शेवटी तिनं माईंसोबत दोन घास खाण्याचा निर्णय घेतला. एकदा सुरवात केली आणि बघता बघता तिनं ताटातला सगळा भात संपवला! 

बाहेर येऊन घड्याळ बघते तर तिचं तिलाच खरं वाटेना. एकेक मिनिट पुढं न जाण्यासाठी हटून बसलेलं घड्याळ चक्क 10 मिनिटं पुढं सरकलं होतं आणि मनावर आलेल्या ताणाचा तिला या 10 मिनिटांत थोडा का होईना चक्क विसर पडला होता. तसा तात्पुरताच; पण विसर पडला होता. लख्खकन्‌ वीज चमकावी तसा तिच्या मनात विचार आला...'वेळ' ! हा न जाणारा वेळच माईंच्या बदललेल्या वागण्यामागचं कारण होतं! आणि 'खाणं' हे त्यांनी त्यावरचं शोधलेलं सोपं उत्तर होतं! मंजिरीला फारच भरून आलं. बिचाऱ्या माई! अण्णांच्या पश्‍चात त्यांना मोकळा वेळ खायला उठत असेल, याचा तिनं कधी विचारच केला नव्हता! 

फोनची रिंग वाजली तशी मंजिरीची तंद्री मोडली. ''मी अर्ध्या तासात विमानात बसतोय,'' हे राजीवचे शब्द तिनं ऐकले आणि तिचा जीव पिसासारखा हलका होऊन गेला; पण खरं तर तिचं तिलाच उमगत नव्हतं, की राजीव सुखरूप आहे हे कळल्यानं तिच्या मनावरचं मणामणांचं ओझं उतरलं होतं की माईंच्या वागण्याचं कोडं सुटल्यानं! 

पण एक मात्र मंजिरीनं मनाशी पक्कं ठरवलं होतं. थोडे दिवस ती माईंना विचारूनच सकाळ-संध्याकाळचे पदार्थ आणि स्वयंपाक करणार होती. मग हळूहळू त्यांना या एकटेपणातून आणि खाण्याच्या चक्रातून बाहेर काढून ती त्यांना पुन्हा पूर्वीच्या माई बनवणार होती! 

''तुम्हाला आवडतात ना तर आज संध्याकाळी कोळाचे पोहे बनवते, माई. आणि रात्री जेवायला काय करू, सांगा बरं!'' असं म्हणून उत्साहात किचनकडं निघालेली मंजिरी पाहून माईंना वाटलं : ''चला. राजीवचा फोन आला. पोरीचं टेन्शन गेलं.'' आणि रात्री काय बरं सांगावं हिला करायला, या विचारात माई आनंदानं मग्न झाल्या! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com