स्वप्नातली 'सवारी'

रविवार, 18 फेब्रुवारी 2018

तरुणाईला भुरळ घालतील अशा स्मार्ट कार्स आणि दुचाकी, डोळे दीपवणाऱ्या कॉन्सेप्ट कार्स, प्रदूषण करणारी पर्यायी इंधनं अशा गोष्टींमुळं ग्रेटर नोइडामध्ये झालेलं 'ऑटो एक्‍स्पो' प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. या प्रदर्शनानं स्वप्नातली 'सवारी' दाखवलीच; पण वाहन उद्योग सध्या कुठं आहे आणि भविष्यात तो कुठं जाईल याचीही चुणूक दाखवली. या प्रदर्शनाला भेट देऊन नोंदवलेली निरीक्षणं. 

पर्यावरणस्नेही आणि स्मार्ट असलेल्या यंदाच्या 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये 'कॉन्सेप्ट कार्स', 'हायब्रिड' आणि इलेक्‍ट्रिक वाहनांचा गाजावाजा होता. वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण, दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन्‌ त्यातून निर्माण होणारे वाढतं प्रदूषण आणि इतर गोष्टी मनावर घेत वाहन उत्पादकांनी भविष्याची पावलं ओळखून कमी प्रदूषण करणाऱ्या (पर्यावरणस्नेही) यंत्रणा विकसित करून प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याची प्रचीती 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये आली. ग्रेटर नोएडात सुरू असलेल्या या वाहन मेळ्यामध्ये वाहन उद्योग सध्या कुठं आहे आणि भविष्यात तो कुठं जाईल, याची चुणूक बघायला मिळाली. यंदा इथं इलेक्‍ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात आल्या. शिवाय सध्याच्या 'स्मार्ट' जमान्याचं भान ठेवत भविष्याची चुणूक दाखवणाऱ्या 'स्मार्ट कॉन्सेप्ट कार्स' हेही 'ऑटो एक्‍स्पो'चं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं. 

'कॉन्सेप्ट कार्स'चं आगमन 
नेहमीप्रमाणंच यंदाच्या 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये 'कॉन्सेप्ट कार्स'ची न्यारी दुनिया अनुभवायला मिळाली. हॉलिवूडचा गाजलेला चित्रपट 'ट्रान्स्फॉर्मर चित्रपटात बघितल्याप्रमाणं कॉन्सेप्ट कार्स प्रत्यक्षात येऊ घातल्या आहेत. सरकारनं 'स्मार्ट सिटी'चा नारा दिला. त्यालाच प्रतिसाद देत वाहन कंपन्यांनी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित 'स्मार्ट कॉन्सेप्ट कार्स' सादर केल्या. एआयचा उपयोग करून 'ट्रान्स्फॉर्मर'मधले 'रोबो'च वाहन कंपन्यांनी प्रत्यक्षात आणले आहेत. 'सुपर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'कॉन्सेप्ट कार'मध्ये 'स्टिअरिंग'ऐवजी स्मार्टफोन किंवा कॉम्पुटरप्रमाणं एक लांब स्क्रीन देण्यात आलेला आहे. या 'डॅशबोर्ड'वरूनच सर्वकाही नियंत्रित केलं जाईल. तुम्हाला फक्त नियोजित ठिकाण आणि मार्ग सांगायचा आहे, मग तुमची गाडीच तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाईल. शिवाय यावेळी गाडीत बसलेल्या व्यक्तीचे हावभाव, मानसिक स्थितीचा मागोवा घेऊन गाडीतलं तापमान, संगीत हे सगळं गाडीच ठरवणार आहे. 

'कन्सेप्ट कार' या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यात फीड करण्यात आलेल्या डेटाचा वापर करतील. म्हणजेच आपण गाडीला मुक्कामाचं ठिकाण सांगितल्यास या मार्गावर कुठं पेट्रोल पंप आहेत, कुठे हॉटेल, टोल नाके किंवा स्पीड ब्रेकर आहेत, शिवाय मार्गावरचं वातावरण कसं आहे, मार्गावरची रहदारी, अडथळे, मार्गाचा डिजिटल नकाशा इत्यादी बारीकसारीक तपशील या गाड्यांच्या यंत्रणेत फीड केलेला असेल. गाडीतल्या अत्याधुनिक सेन्सर्सच्या मदतीनं या स्वयंचलित गाड्या त्यांचं कार्य पार पाडतील. यंदा 'ऑटो एक्‍स्पो'त अशा अनेक 'कॉन्सेप्ट कार' दिसल्या. 
'सुझुकी टोयोटा' यांच्या भागीदारीमधून 'ई-सर्व्हायवर', मर्सिडिज बेन्झची 'ईक्‍यू', टाटांची 'एच5एक्‍स आणि एच4एक्‍स', रेनॉची 'ट्रीझर', बीएमडब्ल्यूची 'आय रोडस्टार', ह्युंदाईची 'आयोनिक', कोरियन किआ कंपनीची 'एसपी' अशा कॉन्सेप्ट कारची दुनिया 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये अवतरली होती. अर्थातच या सर्व गाड्या पेट्रोल किंवा डिझेलवर चालणार नसून विजेवर चालणाऱ्या आहेत. 

वाहनांचे पर्याय अनेक; पण इंधनाचं काय? 
जगातले इंधनाचे स्रोत आता आटू लागले आहेत, असं आपण लहानपणापासून ऐकत आहोत. त्याच वेळी प्रदूषणाचा प्रश्‍नही गंभीर बनतो आहे. त्यामुळं वाहन कंपन्यांनी प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या पर्यायी इंधनाचा मार्ग 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये दाखवून दिला. काही कंपन्यांनी 'ग्रीन फ्युचर'चा नारा देत आता 'कार्बन उत्सर्जन'च न करणारी, हायड्रोजवर चालणारी गाडी आणली आहे. यंदा 'ऑटो एक्‍स्पो'मध्ये होंडा कार्सनं 'क्‍लॅरिटी फ्युएल सेल' श्रेणीत 'एफसीव्ही' ही भविष्यातली कार सादर केली. पेट्रोल, डिझेल अशा पारंपरिक इंधनावर किंवा पर्यावरणस्नेही इलेक्‍ट्रीकवर न चालता ही कार थेट 'हायड्रोजन'वर चालेल. शिवाय यातून कार्बन उत्सर्जन न होता उत्सर्जनाच्या रूपात पाणी बाहेर पडणार आहे. 

दुचाकी 'सुसाट' 
भारतात शहरांमधली गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळं पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये दुचाकींना मागणी वाढते आहे. शहरात वाहतूक जास्त असल्यानं चारचाकी किंवा गिअरची कोणतीही गाडी चालवणं त्रासदायक झालं आहे. त्यामुळंच दुचाकींमध्येही आता 'ऑटोमॅटिक स्कूटर'कडं ग्राहकांचा ओढा वाढतो आहे. आता चक्क इथेनॉलवर धावणारी बाइक येऊ घातली आहे. इथेनॉलमधलं ऑक्‍सिजन हे इंधनाच्या रूपात काम करेल. परिणामी दुचाकीमधून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन ऑक्‍साइडचं उत्सर्जन कमी होईल, असं हे तंत्र टीव्हीएसनं विकसित केलं आहे. टीव्हीएसनं 'ग्रीन फ्युचर'ची वाट दाखवत इथेनॉलवर चालणारी 'टीव्हीएस क्रिऑन इलेक्‍ट्रिक स्कूटर' दुचाकी बाजारात आणली आहे. ही एक पर्यावरणपूरक स्कूटर असून, अर्ध्या तासात 80 टक्के 'चार्ज' होऊ शकते. शिवाय स्कूटर 5.1 सेकंदात 100 किलोमीटर प्रतितास अशा वेगानं धावणार आहे. 'हिरो इलेक्‍ट्रिक'नं देखील इलेक्‍ट्रिक दुचाकी सादर केली आहे. अमेरिकी ब्रॅंड असलेली क्‍लीवलॅंड सायकलवर्क्‍स अधिकृतपणे भारतात दाखल झाली आहे. 'ओल्ड मेमरीज'मध्ये घेऊन जाणारी एस आणि मिसफिट अशी दोन रेट्रो मॉडेल्स कंपनीनं सादर केली आहेत. रुबाबदार बाइक्‍सच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणाईला या बाइक्‍स मोहवणार एवढं निश्‍चित. 

सेलिब्रिटींची हजेरी 
'ऑटो एक्‍सो'ला यंदाही अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ह्युंदाईच्या कार स्टॉलवर शाहरुख खानची एंट्री होताच त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा चकचकाट होत होता. सचिन तेंडुलकरचं गाड्यांचे वेड सर्वश्रुत आहे. त्यानं बीएमडब्ल्यू या कारचं प्रमोशन केलं. क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही या 'ऑटो एक्‍स्पो'ला हजेरी लावून त्याचं सेलिब्रिटी स्टेटस वाढवलं. 

'नवा भिडू, नवीन गाड्या' 
प्रत्येक वर्षी दीड कोटींहून अधिक वाहनांची बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारपेठेत यंदा 'नवा भिडू' म्हणजेच दक्षिण कोरियातली कंपनी असलेल्या 'किआ'नं पाऊल ठेवलं आहे. आंध्र प्रदेशात निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून,2019 मध्ये कंपनी वाहन बाजारात आणेल. 2025 पर्यंत कंपनीनं 16 इलेक्‍ट्रिक वाहनं बाजारात आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. 'फॉर इंडिया' एसपी कॉन्सेप्ट कार भारतामध्ये पुढील वर्षांच्या अखेरपर्यंत सादर करणार आहे. कंपनीनं प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, दर वर्षी तीन लाख वाहनांचं उत्पादन करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. 

'बिकट वाट' 
'कॉन्सेप्ट कार्स' प्रत्यक्षात आल्या असल्या, तरी त्या भारतीयांसाठी स्वप्नंच ठरतील का, असा प्रश्‍नही मनात निर्माण झाला. कॉन्सेप्ट कार्स चालवण्यासाठी चालक आणि रस्तेही 'स्मार्ट' असावे लागतील. स्मार्ट गाड्यांसाठी स्मार्ट चालकांची गरज असून, गाड्या पूर्णपणे कमांडआधारित असल्यानं चालकांनाही त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. प्रत्येकाला ते जमेल का, असा प्रश्‍न आहे. अनेक कार्स विजेवर चालणाऱ्या असल्या, तरी इलेक्‍ट्रिक चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण होणं ही खूपच लांबची गोष्ट आहे. 'कॉन्सेप्ट कार्स'चा 'कारनामा' दिसण्यासाठी सुलभ आणि गतिमान वाहतूक कुठून मिळणार, हाही एक प्रश्‍नच आहे. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Noida Auto Expo