पुतळ्यांचं राजकारण...(श्रीराम पवार)

रविवार, 11 मार्च 2018

आजवर डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरातलं लाल निशाण हटवून भाजपनं तिथं आपलं केशरी निशाण फडकवलं. विधानसभा निवडणुकीच्या या विजयोन्मादामुळं त्रिपुरातला लेनिनचा पुतळा पाडण्यात आला आणि त्यानंतर 'क्रियेला प्रतिक्रिया' म्हणून देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या थोर नेत्यांचे पुतळे पाडण्याचं, त्या पुतळ्यांच्या विटंबनेचं जणू सत्रच सुरू झालं. 'लेनिन विदेशी होता, त्याचा पुतळा पाडल्याचं एवढं दुःख कशाला?' असं समर्थनही पुतळा पाडल्याच्या कृत्याचं केलं जात आहे. मात्र, एक पुतळा पडण्यानं काय फरक पडतो, यापेक्षा यातून कोणत्या प्रवृत्ती सोकावताहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

आजवर डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरातलं लाल निशाण हटवून भाजपनं तिथं आपलं केशरी निशाण फडकवलं. विधानसभा निवडणुकीच्या या विजयोन्मादामुळं त्रिपुरातला लेनिनचा पुतळा पाडण्यात आला आणि त्यानंतर 'क्रियेला प्रतिक्रिया' म्हणून देशाच्या विविध भागांत वेगवेगळ्या थोर नेत्यांचे पुतळे पाडण्याचं, त्या पुतळ्यांच्या विटंबनेचं जणू सत्रच सुरू झालं. 'लेनिन विदेशी होता, त्याचा पुतळा पाडल्याचं एवढं दुःख कशाला?' असं समर्थनही पुतळा पाडल्याच्या कृत्याचं केलं जात आहे. मात्र, एक पुतळा पडण्यानं काय फरक पडतो, यापेक्षा यातून कोणत्या प्रवृत्ती सोकावताहेत, हे लक्षात घ्यायला हवं. पुतळ्यांच्या माध्यमांतून हे द्वेषमूलक राजकारण फोफावू देता कामा नये

त्रिपुरातील भाजपच्या दणदणीत विजयाची चर्चा जोरात असतानाच तिथं निवडणूक-निकालानंतर लगेचच लेनिनचा पुतळा पाडून टाकल्याची घटना समोर आली आणि देशात पुतळे आणि त्याआडून भूमिकांचं राजकारण सुरू झालं. 'लेनिन रशियाचा, त्याचा पुळका इथं कशाला?' असं समर्थन केलं जात असतानाच तामिळनाडूत बहुजनांचे आयकॉन असलेले द्राविडी विचारवंत ई. व्ही. रामास्वामी 'पेरियार' यांच्या पुतळ्यावर हल्ला झाला, पाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये भाजपसाठी आयकॉन असलेले नेते, जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्यावर आघात झाले, तर उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मोडतोड करण्याची घटना घडली. केरळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. या साऱ्या मोठ्या नेत्यांच्या अनुयायांना राजकारणासाठी आणखी एक व्यासपीठ मिळालं. 

लेनिनच्या पुतळ्याच्या निमित्तानं नेहमीची 'राष्ट्रवादी विरुद्ध देशविरोधी' अशी नसलेली लढाई चालवून हवेवर स्वार होणाऱ्यांच्या इतर घटनांनी ध्यानात आलं, की हे पुतळाप्रकरण उलटणारं आहे. पंतप्रधानांपासून सारेजण निषेधाची, कारवाईची भाषा करू लागले, हे बरंच घडत आहे. मात्र, यानिमित्तानं समोर आलेला उन्माद हे लोकशाही व्यवस्थेतलं चांगलं लक्षण नव्हे. बाकी डाव्यांनी किती हिंसा केली आणि उजव्यांनी काय दिवे लावले, यावरून उणीदुणी काढणं सुरूच राहील. टोकाचे मतभेद असलेल्यांसाठीही आपापली मतं कायम ठेवून लोकशाहीत निवडणुका अनिवार्य आहेत आणि निवडणुका जय-पराजयाच्या तराजूत तोलल्या जाणंही स्वाभाविक आहे.

निवडून आलेल्यांनी आपल्या राज्य करण्याच्या कल्पना राबवण्यातही काही गैर नाही. मात्र, या कल्पनांना राज्यघटनेची, लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांची चौकट असायला हवी, इतकी किमान अपेक्षा या व्यवस्थेत असते. साहजिकच त्यात मान्य नसलेली मतं, प्रतीकं यांचा विरोध जरूर करावा. मात्र, ती नष्ट करण्यासाठी हिंसेचा आधार घेऊ नये, एवढं पथ्य पाळायला हवं. देशात निरनिराळ्या विचारसरणींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या त्या काळातल्या मोठ्या नेत्यांच्या पुतळ्यांवरून जो वाद सुरू आहे तो लोकशाहीतल्या मूलभूत धारणांना आव्हान देणारा आहे म्हणून अधिक दखलपात्र आहे. 'त्यांनी अमक्‍याचा पुतळा तोडला, आम्ही तमक्‍याचा तोडू' आणि 'तिथं चालतं तर इथं का नाही?' यासारखा बाष्कळ युक्तिवाद करत राहणं हे शहाणपणाचं तर नाहीच; पण झुंडशाहीला प्रतिष्ठा देणारंही आहे आणि यालाच राजकीय शह-काटशह मानून चालणाऱ्या चॅनलचर्चा गोंधळाला हातभार लावणाऱ्याच आहेत. त्रिपुरात कम्युनिस्टांच्या लाल गडावर भाजपचं केशरी निशाण फडकणं हा ईशान्य भारतातला सर्वात चमकदार, लक्षवेधी निकाल होता. त्यानं भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण तयार होणं नैसर्गिक आहे. वैचारिक पातळीवर आणि धोरणात्मकदृष्ट्या भाजप आणि त्यांच्या परिवाराचं भांडण कॉंग्रेसपेक्षाही डाव्यांशी अधिक आहे. या दोन्ही प्रवाहांना सत्तेइतकाच आपला वैचारिक वरचष्मा आणि आपल्या कल्पनेतली समाजरचना येण्याला अधिक महत्त्व असतं. साहजिकच डाव्यांनी शर्थीनं राखलेलं राज्य भाजपच्या हाती लागण्याचा आनंद पक्षाला होणारच. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर व्लादिमिर लेनिनचे त्रिपुरातील पुतळे बुलडोझर लावून तोडण्याचे प्रकार उन्माद दाखवणारे होते. बरं, अत्युत्साही कार्यकर्त्यांची भावनेच्या भरातली अविवेकी प्रतिक्रिया म्हणून हे खपवण्यासारखंही राहिलं नाही, याचं कारण भाजपमधले निरनिराळ्या स्तरांवरचे नेते त्याचं आडून आडून समर्थन करू लागले. याचं टोक गाठलं गेलं ते त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी ट्विट करून 'लोकशाहीत निवडून आलेलं एक सरकार जे करू शकतं, ते लोकशाहीतूनच निवडून आलेलं दुसरं सरकार बदलू शकतं,' असं सांगून मुरलेल्या द्वेषाचं प्रदर्शन घडवलं. नंतर पुतळे पाडण्याचं समर्थन करत नसल्याचे त्यांचे खुलासे ही सारवासारवच होती. लेनिनचा पुतळा रशियात नव्हे तर त्रिपुरात पाडला, याचा राम माधव यांनाही झालेला आनंद न लपणारा होता. लेनिनपाठोपाठ, दक्षिणेत पेरियार रामास्वामी, महात्मा गांधी, उत्तरेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पूर्वेला श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांवर आघात झाले, तसंच पेरियार यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीनंतरची प्रतिक्रिया म्हणून तामिळानाडूत ब्राह्मणांची जानवी सक्‍तीनं कापण्याचे उद्योग हे सारंच धक्कादायक, लोकशाही समाजात धोकादायक आणि स्पष्टपणे निषेधपात्रच आहे. 

'लेनिनचा पुतळा पाडला तर एवढं दुःख कशासाठी? लेनिनचे पुतळे खुद्द रशियातही जमीनदोस्त झाले आहेत. लेनिन-स्टॅलिन इतिहासातून, रस्त्यांवरून हटवण्याच्या मोहिमा झाल्या. या लेनिनचा भारताशी काय संबंध? रशियात पाऊस पडल्यानंतर इथं छत्र्या उघडणाऱ्या डाव्या पंथाला त्याचं कौतुक असू शकतं; पण भारताशी संबंध काय त्याचा?' असं विचारणारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. तो सोशल मीडियावर भलताच सक्रिय असतो. यात एक मुद्दा विसरला जातो व तो म्हणजे, लेनिनचा पुतळा पाडण्याचं कृत्य हे 'जे मला मान्य नाही ते शिल्लकच ठेवणार नाही' ही प्रवृत्ती दाखवणारं आहे. प्रश्‍न केवळ पुतळ्याचा नाही, विरोधातला विचार आणि प्रतीकं संपवलीच पाहिजेत, याप्रकारची मानसिकता आणि त्यासाठी झुंडशाहीचा अवलंब समर्थनीय ठरवायचा का हा आहे. हे तण देशात जोमानं फोफावायला लागलं आहे. ते चिंता वाटायला लावणारं आहे. राजकारणासाठी या प्रवाहाला बळ देणं अराजकाची रेसिपी ठरणारं असेल. हा देश केवळ आकारानंच अवाढव्य नाही, तर त्यात अनेक प्रकारची विविधता आहे. एकमेकांना छेद देणाऱ्या वैचारिक परंपरा एकत्र नांदतात, हे खरंतर देश म्हणून आपलं वैशिष्ट्य आहे. या साऱ्यांना लोकशाहीच्या कोंदणात बसवता येणं हे सामर्थ्यही आहे. लेनिन, पेरियार असोत, डॉ. आंबेडकर, श्‍यामाप्रसाद मुखर्जी असोत, त्यांनी आपलं काम करून ठेवलं आहे. पुतळ्यांवर हल्ले करून ते पुसता येत नाही आणि त्यांनी मागं ठेवलेले विचारही संपत नाहीत, तरीही एक पुतळा पडण्यानं काय फरक पडतो, यापेक्षा यातून कोणत्या प्रवृत्ती सोकावताहेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 

लेनिन आणि पाठोपाठ पेरियार यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला गदारोळ परवडणार नाही, याचं भान अखेर पंतप्रधानांनाही दाखवावं लागलं हे बरंच घडलं. पंतप्रधानांनी एरवी असल्या मुद्द्यांवरचं सुप्रसिद्ध मौन सोडून या प्रवृत्तींना फटकारलं, देशाच्या गृहमंत्र्यांनी ही बाब गांभीर्यानं घेत करावाईचे आदेश राज्यांना दिले. भाजपच्या अध्यक्षांनाही यावर बोलावं लागलं. यातून पुतळा पाडणं हे किरकोळ प्रकरण म्हणून सोडून देण्यासारखं नाही हेच स्पष्ट होतं. दुसरा मुद्दा 'लेनिनचा देशाशी संबध काय? तो होता का देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात?' असे प्रश्‍न विचारले जाण्याचा. आता हे प्रश्‍न विचारणारे कोणता वारसा चालवतात हाच मुद्दा आहे. लेनिन रशियन क्रांतीचा महानायक होता आणि लेनिननं विचारांनी आणि कृतीनं जे काही करून ठेवलं, ते जगभरात साम्राज्यशाहीच्या विरोधातल्या लढ्याला बळ देणारं, वैचारिक आधार पुरवणारं होतं. साम्यवाद सोव्हिएत युनियनमधून सत्ताभ्रष्ट झाला, मार्क्‍सवाद, लेनिनवाद मागं पडला म्हणून त्यांचं जगाच्या संदर्भातलं योगदान कमी होत नाही. हे मोठेपण अनेकांना आजही आदर्श वाटतं. त्यांच्याशी वैचारिक मतभेद ठेवूनही ते वाटू द्यावं एवढाच लोकशाहीशी आणि सर्वसमावेशकतेशी निगडित मुद्दा आहे आणि भारतातही भगतसिंगांसारखे डाव्या विचारांचे क्रांतिकारी मार्क्‍सवादाला मानणारेच होते. भगतसिंगांना फाशी देण्यापूर्वी ते वाचत असलेलं शेवटचं पुस्तक लेनिनचं होतं. मार्क्‍स-लेनिन यांना मानणारी भगतसिंगांपासून ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंतची ही मंडळी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात होती. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत डावे कॉंग्रेसच्या माध्यमातून सहभागी झाले, याचं एक कारणही लेनिनची भूमिका हेच होतं, हे त्या संगरात काठावर बसणाऱ्यांच्या वैचारिक वारसांनी विसरायचं कारण नाही. 'परदेशी नेत्याचं किंवा विचारसरणीचं कौतुक भारतात कशाला?' हाही असाच दिशाभूल करणारा युक्तिवाद आहे. जगभरातल्या मानवसमूहांनी एकमेकांपासून काही ना काही घेतलं आहे. आपल्या परंपरांचा अभिमान बाळगूनही समाजाला पुढं नेणारी विचारव्यवस्था ही केवळ तिचं मूळ परकीय आहे म्हणून नाकारण्यात कसलं शहाणपण आहे? 

पुतळ्यांच्या निमित्तानं राजकीय पक्षांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याचा उद्योग सुरू राहीलच. यात त्या त्या भागांतल्या राजकारणाचा विचार करता त्रिपुरात भाजपनं जम बसवलाच आहे. लेनिनवरून वाद झाला तरी मतपेढीच्या राजकारणावर लगेच फरक पडत नाही. उत्तर प्रदेशात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची मोडतोड करण्याच्या प्रकारानंतर काही प्रतिक्रिया येण्यापूर्वीच तिथं दुसरा पुतळा बसवून तिथल्या सरकारी यंत्रणेनं तणाव टाळण्यात यश मिळवलं. श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याच्या मोडतोडीनंतर भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस किंवा डाव्यांमध्ये रंगलेला कलगी-तुराही उणीदुणी काढण्यापुरताच राहण्याची शक्‍यता आहे. तिथला मतांचा संघर्ष प्रामुख्यानं तृणमूल आणि डावे यांच्यातलाच आहे. लेनिनचा पुतळा तोडल्यावर विरोध करणाऱ्यांनी मुखर्जींच्या पुतळ्याची मोडतोड केल्यानंतर मौनात जाणं तितकच भोंदूगिरीचं आहे. तामिळनाडूत मात्र काहीही करून थेट किंवा अप्रत्यक्ष पाय रोवायचा प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी पेरियार-प्रकरण सेल्फ गोल करणारं ठरणार आहे. एकतर पेरियार यांचं द्राविडी राजकारणातलं स्थान निर्विवाद आहे. त्यांचं नाव घेऊनच द्राविडी पक्ष वाटचाल करत आले आहेत. आज मितीला पेरियार यांच्या अवमानानं खवळणारे नेते त्यांचा आदर्श प्रत्यक्षात किती आचरणात आणतात हा प्रश्‍नच आहे. मात्र, पेरियार यांच्याबद्दल तामिळनाडूत प्रचंड आदर आहे आणि एच. राजा नावाच्या फारशा परिचित नसलेल्या नेत्याच्या एका सोशल मीडियावरच्या पोस्टनंतर पेरियार यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली. आता यानंतर त्या नेत्यानं माफीनामा दिला, तरी द्राविडी राजकारणात भाजपला बाहेरचा आणि द्राविडी अस्मितांचा विरोधक ठरवण्याचं एक हत्यार स्थानिक पक्षांना मिळालं. याला तिथल्या जातीय समीकरणांचाही संदर्भ आहेच. खरतर पेरियार यांच्या तत्त्वांची आणि विचारांची वाट त्यांचं नाव घेणाऱ्या तमिळ राजकारण्यांनी कधीच लावली आहे. मात्र, प्रतीकं आणि प्रतिमांच्या राजकारणात पेरियार यांचं नाव चलनी नाण्यासारखं चालवलं जातं. प्रतिमांच्या आणि प्रतीकांच्या राजकारणात निर्विवाद कौशल्य मिळवलेल्या भाजपला पेरियार-प्रकरणात मात्र उलटा अनुभव घ्यावा लागतो आहे. 

लेनिनचा पुतळा पाडण्याचं समर्थन करणारी मंडळी श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्यासंदर्भात मात्र अकांडतांडव करणार आणि लेनिन-पेरियार यांच्या पुतळ्याबद्दल कळवळा असणारे मुखर्जींच्या पुतळ्याबद्दल मौनात जाणार हे तद्दन राजकारण आहे. भाजपच्या त्रिपुरातल्या विजयानंतर लेनिनचा पुतळा तोडणारे त्या पक्षाशी संबंधित कार्यकर्ते होते. कोलकत्यात श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची मोडतोड करणारे विद्यार्थी माओवादी विद्यार्थी चळवळीतले कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच संधी मिळाली तर तोडफोडीत दोन्हीकडचे तसेच उत्साही असतात. तरीही चर्चा करत राहायचं, विचारांचा मुकाबला विचारांनी करावा म्हणायचं, हीच मुरलेली दांभिकता आहे. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Politics Lenin Statue Shriram Pawar