अंतर्बाह्य सुंदर (राजेश पाटील)

राजेश पाटील 
रविवार, 4 मार्च 2018

श्रीदेवी यांचा मेकअप आर्टिस्ट राजेश पाटील याला या अभिनेत्रीचं माणूसपण बघायला मिळालं. श्रीदेवी यांच्या अखेरचा मेकअप करण्याची दुर्दैवी वेळही त्याच्यावर आली. त्याचं मनोगत. 

श्रीदेवी यांचा मेकअप आर्टिस्ट राजेश पाटील याला या अभिनेत्रीचं माणूसपण बघायला मिळालं. श्रीदेवी यांच्या अखेरचा मेकअप करण्याची दुर्दैवी वेळही त्याच्यावर आली. त्याचं मनोगत. 

मंगळवारी संध्याकाळी मला फोन आला. फोनवर श्रीदेवी यांच्या मॅनेजरनं 'मॅडमचा मेकअप करायचा आहे... बॅग घेऊन ये,' असं सांगितलं. ते ऐकताच माझं मन सुन्न झालं. क्षणभर मला काही सुचेनासं झालं. अशाही अवस्थेत मी स्वतःला सावरलं. नंतर घरून थेट मॅडमच्या घरी पोचलो. रात्री साडेदहा-अकरा वाजता मॅडमचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं. ते पाहताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी रडू लागलो. रात्री साडेबारापर्यंत तिथंच होतो. त्यानंतर 'उद्या सकाळी मेकअप करायला या,' असं मला सांगण्यात आलं. साहजिकच मग मी घरी आलो खरा; परंतु रात्रभर मला झोप काही लागली नाही. सतत मॅडमच्या आठवणी...त्यांचा तो हसरा चेहरा...डोळ्यांसमोर सगळं काही तरळत होतं. सकाळी लवकर उठलो आणि स्नान वगैरे करून पुन्हा मॅडमच्या घरी पोचलो. 

काही वेळेनंतर अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता कपूर मला बोलवायला आल्या. मॅडमचं पार्थिव पहिल्या मजल्यावर ठेवलेलं होतं. मी माझी मेकअपची बॅग घेऊन पहिल्या मजल्यावर गेलो. तिथं जात असताना माझे पाय लटपटत होते आणि मॅडमना पाहताच माझे हात-पाय थरथरायला लागले. डोळ्यांतून पाणी आलं. मॅडमच्या बाजूला राणी मुखर्जी बसलेल्या होत्या. त्या मला ओळखत होत्या. त्या मला भाऊ मानतात. त्यांनी माझी ही अवस्था पाहिली आणि त्यांनीच मला धीर दिला. मी थोडं स्वतःला सावरलं. बॅगेतून स्पंज बाहेर काढताच माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. पाणावलेल्या डोळ्यांनीच मॅडमचा शेवटचा मेकअप केला. मॅडमचा शेवटचा केलेला मेकअप कायम माझ्या स्मरणात राहील. ही घटना मी कधीच विसरणार नाही. 

खरं तर पंकज खरबंदा यांनी सात-आठ वर्षांपूर्वी मला फोन करून 'श्रीदेवी यांचा मेकअप करशील का?' असं विचारलं. मी या गोष्टीला नकार देऊच शकत नव्हतो. कारण एवढ्या मोठ्या सुपरस्टारचा मेकअप करण्याची संधी मिळतेय म्हटल्यानंतर मी साहजिकच होकार दिला. त्यानुसार मॅडमच्या घरी गेलो. त्यांचा पहिल्यांदा मेकअप केला आणि माझ्या त्या मेकअपवर मॅडम कमालीच्या खूश झाल्या. त्यानंतर मी त्यांच्याकडंच मेकअपमन म्हणून काम करू लागलो. खरं सांगायचं, तर मॅडम म्हणजे मेकअपची जणू शाळाच आहे. त्यांना मेकअपबद्दल बरंच काही समजतं. त्यांचा चेहराच सुंदर असल्यामुळं मेकअप करताना आम्हालाही जास्त त्रास व्हायचा नाही. मेकअप चांगला झाला, की त्या स्वतःहून 'आजचा मेकअप चांगला होता,' असं सांगायच्या किंवा दुसऱ्या दिवशीही त्याबाबतीत आपली कॉम्प्लिमेंट्‌स द्यायच्या. त्या कधी कोणावर रागावलेल्या किंवा ओरडलेल्या मला जाणवलं नाही आणि ओरडल्याच तर त्यांचं ओरडणं जणू काही नेहमीप्रमाणंच त्या बोलत आहेत की काय असं वाटायचं. खरं तर विविध जाहिराती आणि कार्यक्रम यांच्यासाठी मी त्यांचा मेकअप केला. मात्र, त्यांच्याबरोबर मेकअपमन म्हणून संपूर्ण चित्रपट करण्याची संधी मला मिळाली नाही. दोन-तीन वेळा संधी आली होती खरी; परंतु काही कारणास्तव ती मी घेऊ शकलो नाही. त्यांच्याबरोबर मेकअपमन म्हणून चित्रपटासाठी काम केलं नाही, ही खंत मला आयुष्यभर सतावत राहील हे नक्की. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Shridevi rajehsh Patil