ग्रंथप्रेमींचा एक 'आधार' संपताना... 

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

मुंबईच्या फोर्टमधलं स्ट्रॅंड बुक स्टॉल बंद होणार असल्याची बातमी आहे. या बातमीनं अनेक ग्रंथप्रेमी हळहळले. स्ट्रॅंडबद्दल इतकी आस्था का वाटावी? याचं उत्तर नुसतं भावनिक नात्यामध्ये नाही. वाचनसंस्कृतीचा होणारा ऱ्हास ही त्यामागची खरी चिंता आहे. वाङ्‌मय; मग ते ललित असो वा ललितेतर, शेवटी मानवी नात्यांशी आणि अनुभवाशी त्याची नाळ जोडलेली असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आणि इंटरनेटच्या आभासी विश्वात पुस्तकामागचं संस्कृतीकारण नष्ट होणार असेल तर या नव्या युगात पुस्तकांशी भावनिक नातं कसं राहील याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक असणारे सगळे घटक संदर्भहीन होणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. 

ग्रंथांच्या सहवासात रमणाऱ्या रसिकांच्या मनात पुस्तकांच्या दुकानांबद्दल, ग्रंथप्रदर्शनांबद्दल, ग्रंथविक्रेत्यांबद्दल एक हळवा कोपरा असतो. प्रत्येकाच्या मनात विकसित होणाऱ्या ग्रंथजाणिवेचा तो एक अविभाज्य भाग असतो. अलीकडच्या काळात अशी काही ठिकाणं बंद झाली आहेत अथवा बंद होऊ घातली आहेत.

मुंबईतलं स्ट्रॅंड बुक स्टॉल हे असंच एक ग्रंथजाणिवा जोपासणारं ठिकाण आता बंद होणार असल्याच्या बातमीनं सगळे ग्रंथप्रेमी अस्वस्थ झाले आहेत. काळाच्या ओघात वाङ्‌मयीन नियतकालिकं, प्रकाशनसंस्था, ग्रंथदालनं बंद होतात. काही नवीन निर्माण होतात. त्यामागं कारणं अनेक असतात. नफा-तोट्याच्या गणितांपेक्षा अनेकदा त्यांची सांस्कृतिक गरज संपलेली असते. कधी कधी बदलत्या वास्तवाशी जुळवून घेता न आल्यानं असे उपक्रम प्रतिसादाअभावी बंद पडतात. पुस्तकांची दुकानं असोत वा नियतकालिकं, त्यांच्याशी एक भावनिक नातं निर्माण झाल्यानं त्याबद्दल एक स्मरणरंजनात्मक भावना निर्माण होते. 

स्ट्रॅंड बुक स्टॉलबद्दल तिथं जाणाऱ्या प्रत्येकाचं असं एक भावनिक नातं होतं. त्याला व्यक्तिगत संदर्भ असल्यामुळं प्रत्येकाचं 'स्ट्रॅंड'बद्दलचं भावचित्र वेगळं असणार. फोर्टमधल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं 'स्ट्रॅंड' छोटेखानी होतं. चारी बाजूंना असलेल्या पुस्तकांच्या शेल्फमधून हिंडायला फारच थोडी मोकळी जागा होती. वरच्या भागात कलाविषयक पुस्तकं असत, तिथंही अशीच स्थिती होती. असं असलं तरी बुक स्टॉलचा पैस खूप मोठा होता; मानवी मेंदूचा आकार छोटा असला तरी त्याचा आवाका जसा खूप मोठा असतो तसा. याचं कारण 'स्ट्रॅंड'चे मालक टी. एन. शानभाग यांच्याकडं असलेली पुस्तकांची उत्तम जाण आणि पुस्तकं वाचकांपर्यंत पोचली पाहिजेत याविषयीची त्यांची तळमळ. यामुळंच 'स्ट्रॅंड बुक स्टॉल' आणि शानभाग हे एक आख्यायिका बनले. 

मी 1970 च्या दशकात दशकात थोडीफार पुस्तकं विकत घ्यायला सुरवात केली तेव्हा 
पुस्तकांची तीन-चार दुकानं मला परिचित होती. 

काळा घोडा इथे रिदम हाऊसच्या रांगेत पुढं 'ठाकर्स' बुक शॉप होतं. बॅलार्ड पिअरला 'बुक पॉइंट' होतं. या दोन्ही ठिकाणी उत्तम पुस्तकं असायची; पण या 'शॉप्स हाऊस'ना वैचारिक वाङ्‌मयाची, विशेषतः डाव्या विचारांची वेगळी ओळख होती; पण 'पीपल्स'शी माझा संबंध बऱ्याच उशिरानं, नंतरच्या काळात आला. 'न्यू अँड सेकंड हॅंड बुकशॉप'शी माझा कधी संबंध आला नाही. पुढच्या काळात, म्हणजे 1990च्या दशकात 'क्रॉसवर्डस' किंवा 'ऑक्‍सफर्ड' अशी नवी ग्रंथदालनं आली. ग्रंथविक्रीच्या व्यवसायात हे एक वेगळं वळण होतं. मॉलसंस्कृतीच्या झगमगाटाचं त्याला एक वलय होतं. ऑक्‍सफर्डचं चर्चगेटजवळचं ग्रंथदालन हे पुस्तकांच्या दृष्टीनं खूप आकर्षक होतं; पण लवकरच तिथल्या पुस्तकांची जागा कमी होऊ लागली आणि ती जागा स्टेशनरी, सीडीज्‌ आणि व्हिडिओज्‌ अशा वाङ्‌मयबाह्य गोष्टींनी व्यापून टाकायला सुरवात झाली. सन 2000 नंतर फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, बुकगंगा अशी ऑनलाइन पुस्तकविक्री सुरू झाली आणि ग्रंथविक्रीची सगळी गणितंच बदलून गेली. ई-बुक्‍सचा प्रसार अजून मुद्रित पुस्तकांच्या मुळावर उठला नसला तरी त्यांचा प्रभाव निश्‍चितपणे वाढत जाणार आहे. 

'स्ट्रॅंड बुक स्टॉल' बंद पडण्यामागं ग्रंथविक्री-ग्रंथदालन आणि वाचक यांच्यामधल्या बदलत गेलेल्या नात्यांचा किंवा नात्यांच्या अभावाचा परिपाक आहे. 'स्ट्रॅंड'चे शानभाग किंवा त्यांच्यासारखेंबई-पुण्यातले काही दुर्मिळ पुस्तकांचे ग्रंथविक्रेते असतील, हे ग्राहक वाचकांचे 'फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड' होते. ग्राहकांच्या सामूहिक अभिरुचीबरोबरच प्रत्येक ग्राहकाची व्यक्तिगत आवड-निवड जोपासण्याची, वृद्धिंगत करण्याची सोय या नात्यात होती. 

आता ऑनलाईन पुस्तकविक्रीमुळं हे व्यक्तिगत नातं आणि जिव्हाळा उरला नाही. पुस्तक हे प्रॉडक्‍ट झालं, एक क्रयवस्तू झालं आणि विक्रेत्यांच्या लेखी तेवढंच त्याचं मूल्य उरलं. हवं ते पुस्तक ऑनलाईन उपलब्ध असेल तर घरबसल्या तुम्हाला मिळू शकतं; तेही भरपूर सवलतीत! पण पुस्तकांच्या दुकानांमध्ये पुस्तकं हाताळता येतात, अगदी अनपेक्षितपणे आपल्या हाती एखादं उत्तम पुस्तक लागू शकतं, त्यात जो आनंद असतो तो ऑनलाईन पुस्तकं खरेदी करण्यात मिळत नाही. एखादं विशिष्ट विषयावरचं पुस्तक विशिष्ट ग्राहकासाठी जेव्हा पुस्तकविक्रेता राखून ठेवतो, तेव्हा 'पैसे मिळवण्यापेक्षा पुस्तकाला त्याची योग्य कदर करणारा रसिक मिळाला पाहिजे,' ही तळमळ असते. पुस्तकाला असलेलं सांस्कृतिक मूल्य जपण्याचा हा प्रयत्न ऑनलाईन व्यवहारात कसा साध्य होणार? 

'स्ट्रॅंड बुक स्टॉल'कडं आपण पुन्हा मागं वळून पाहतो तेव्हा 'स्ट्रॅंड'चं वळण आणि आजची बदललेली परिस्थिती यांची एक विसंगतीपूर्ण जाणीव होते. 'स्ट्रॅंड'ला भेट देणाऱ्या आणि तिथून पुस्तकंखरेदी करणाऱ्या महनीय व्यक्तींची नावं नेहमीच घेतली जातात; पण 'स्ट्रॅंड'चा जो गाभ्यातला ग्राहकवर्ग होता तो तुमच्या-आमच्यासारखा जिज्ञासू आणि आपल्या खिशाकडं पाहून निवडक पुस्तकांची खरेदी करणारा वर्ग होता. 'स्ट्रॅंड'नं जसे अभ्यासक, सेलिब्रिटीज्‌ सांभाळले, तसंच या ग्राहकवर्गाकडंही लक्ष दिलं. आज मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करणारा जो वाचक आहे तो या वर्गातला आहे. 

'स्ट्रॅंड'मध्ये जी पुस्तकं असतं तीसुद्धा मुख्यतः या जिज्ञासू वाचकवर्गाला आकर्षित करणारीच असत. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र अशा विषयांवरच्या विद्वज्जड पुस्तकांपेक्षा गंभीर विषय सोप्या भाषेत उलगडून सांगणारी पुस्तकं जास्त प्रमाणात असत. ललित (फिक्‍शन) आणि ललितेतर (नॉनफिक्‍शन) अशा प्रकारची लोकप्रिय; पण मान्यताप्राप्त लेखकांची पुस्तकं तिथं मोठ्या प्रमाणावर असत. विज्ञान, मानसशास्त्र, आरोग्य, व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या पुस्तकांमध्ये एक निवडीचं सूत्र जाणवत असे. 

'स्ट्रॅंड'कडं ग्राहकांपर्यंत पोचण्याची दोन प्रभावी माध्यमं होती. त्यातलं एक म्हणजे, दर महिन्याला पोस्टानं रवाना होणारं नव्या पुस्तकांची माहिती देणारं चतकोर आकाराचं बुकलेट. ही पुस्तिका म्हणजे सूची अथवा गृहपत्रिका अशा कुठल्याच साच्यात बसणारी नव्हती; पण पुस्तकांची थोडक्‍यात माहिती देणारा मजकूर आणि सवलतीच्या किमती यामुळं या महिन्यात कोणती पुस्तकं घ्यायची हे आधीच ठरवता येई. दुसरं माध्यम होतं ते वार्षिक प्रदर्शनाचं. पूर्वी सुंदराबाई हॉलमध्ये ग्रंथप्रदर्शनं अनेकदा होतच असत. त्यापैकी 'स्ट्रॅंड'च्या प्रदर्शनाबद्दल विशेष उत्सुकता असे. कारण तिथं कमी किमतीत आणि एरवी सहसा न मिळणारी पुस्तकं मिळण्याची शक्‍यता असे. शिवाय ज्ञानकोशांचे खंड, शब्दकोश, प्रसिद्ध लेखकांच्या समग्र साहित्याचे संग्रह असं बरंच काही असे. अलीकडच्या काळात मात्र स्ट्रॅंडच्या प्रदर्शनांमध्ये तीच ती ठराविक पुस्तकं दिसू लागली होती. नंतर तर मोठा इव्हेंट असणारी ही प्रदर्शनं बंदच झाली. 

'स्ट्रॅंड'नं ग्रंथांच्या बाबतीत आणखी काही उपक्रम केले. काही पुस्तकं मोठ्या प्रमाणात खरेदी करून अथवा 'स्ट्रॅंड'मार्फत ती कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून दिली. 'स्ट्रॅंड'मध्ये अनेक वर्षं 

15 रुपये किमतीत काही छोटी पुस्तकं मिळायची. त्यात अनेक जुने-नवे प्रसिद्ध लेखक असत. या मालिकेतलं बेंजामिन फ्रॅंकलिन यांचं छोटेखानी आत्मचरित्र माझ्याकडं आहे. याशिवाय अनेक विषयांवरची आर्ट पेपरवर छापलेली, रंगीत चित्रं असलेली छोटी पॉकेटबुक्‍स 'स्ट्रॅंड'मध्ये अनेक वर्षं मिळत असत. विविध ठिकाणांहून मी जी काही पुस्तकं खरेदी केली, त्यामध्ये 'स्ट्रॅंड'मधून घेतलेल्या पुस्तकांची संख्या अधिक भरेल. त्यात 'द स्टोरी ऑफ मॅथेमॅटिक्‍स' (रिचर्ड मॅंकेविझ), 'द ग्रॅंड डिझाइन' (स्टीफन हॉकिंग ), 'द एम्परर्स न्यू माइंड (रॉजर पेनरोड), तसंच अंबर्तो इको, ओऱ्हान पामुक यांची पुस्तकं आहेत. 'रिमेम्बरिंग मि-शॉन्स न्यू यॉर्कर (वेद मेहता), लुकिंग साइडवेज्‌(ऍलन फ्लेचर) अशी कितीतरी पुस्तकं 'स्ट्रॅंड'च्या दुकानात किंवा प्रदर्शनात मला मिळाली. अनेक दिवसांपासून मला हवं असलेलं केनेथ क्‍लार्कचं 'सिव्हिलायझेशन' हे पुस्तक एकदा अचानकपणे आणि अगदी कमी किमतीत मला स्ट्रॅंडमध्ये मिळालं. अशा पुस्तकांबद्दलच्या, त्यांनी दिलेल्या आनंदाबद्दलच्या प्रत्येकाच्याच अनेक कथा असतील. 

शेवटी, 'स्ट्रॅंड'बद्दल इतकी आस्था का वाटावी? याचं उत्तर नुसतं भावनिक नात्यामध्ये नाही. वाचनसंस्कृतीचा होणारा ऱ्हास ही त्यामागची खरी चिंता आहे. वाङ्‌मय; मग ते ललित असो वा ललितेतर, शेवटी मानवी नात्यांशी आणि अनुभवाशी त्याची नाळ जोडलेली असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आणि इंटरनेटच्या आभासी विश्वात पुस्तकामागचं संस्कृतीकारण नष्ट होणार असेल तर या नव्या युगात पुस्तकांशी भावनिक नातं कसं राहील याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक असणारे सगळे घटक संदर्भहीन होणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com