नको सत्त्व'परीक्षा' (डॉ. सुनीता भागवत)

डॉ. सुनीता भागवत
रविवार, 11 मार्च 2018

परीक्षांमुळं येणाऱ्या ताणाच्या मुळाशी पालकांच्या अवास्तव अपेक्षा, विद्यार्थी-पालक करत असलेल्या तुलना; तयारीचा अभाव अशा अनेक गोष्टी असतात. या मुळाशी जाऊन थोडा दृष्टिकोन घरातल्या सगळ्यांनीच बदलला, तर परीक्षांशी मस्त मैत्री होऊ शकते. 

परीक्षांमुळं येणाऱ्या ताणाच्या मुळाशी पालकांच्या अवास्तव अपेक्षा, विद्यार्थी-पालक करत असलेल्या तुलना; तयारीचा अभाव अशा अनेक गोष्टी असतात. या मुळाशी जाऊन थोडा दृष्टिकोन घरातल्या सगळ्यांनीच बदलला, तर परीक्षांशी मस्त मैत्री होऊ शकते. 

परीक्षा आणि ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. परीक्षांचे दिवस आले, की शालेय, महाविद्यालयीन मुलं आणि त्यांचे पालक तणावात जातात. सगळं घरच ताणघर बनतं आणि त्याचा अनेकदा विपरीत परिणामही होतो. मुंबईतल्या दहावीच्या मुलाला आलेल्या हृदयविकाराचा झटका ही घटना त्यापैकीच एक. अशा घटना थेट 'जनरालाइझ' करता येत नसल्या, तरी अभ्यासाशी संबंधित हा ताण अभ्यासाशी संबंधित गोष्टींमधूनच दूरही करता येतो. परीक्षांच्या या सगळ्या दिवसांत विद्यार्थ्यांना आणि पालकांना अभ्यासाचा, परीक्षेचा, लेखनाचा ताण का येतो, ओझं का होतं हे आपण बघूया आणि मग ते ओझं कमी कसं करायचं हेही बघू या. 

परीक्षांपूर्वीच्या काळात बऱ्याच विद्यार्थ्यांना ताण येतो, असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो आणि प्रत्यक्ष अनुभवतोसुद्धा. हा ताण मुळातच कोणत्या तरी दबावामुळं (प्रेशर) येतो, हे तर अगदी स्पष्टच आहे. हे परीक्षेचं 'प्रेशर' मुळात येतंच कशामुळं? 

बाह्य दबाव : कुटुंबातले सदस्य किंवा शिक्षकांच्या अपेक्षांमुळे अनेक विद्यार्थी दबावाखाली येतात, असं आपल्याला दिसतं. बहुतांश वेळेला या दबावाचं मूळ स्पर्धेमध्ये असतं. संशोधन असं सांगतं, की कोणत्याही क्षेत्रात आपण इतरांबरोबर सतत तुलना करत असतो. ही तुलना पुष्कळ वेळेला नकळत होते, तर सतत तुलना करत राहणं हा काहींच्या जीवनाचा भागच बनलेला असते. कोणत्याही प्रकारची तुलना ही आपल्याला यश मिळवण्यापासून दूर नेते, असं अमेरिकेतले प्रसिद्ध मानसतज्ज्ञ एड डेनीर यांचं संशोधन सांगतं. 

अंतर्गत दबाव : परीक्षेत अथवा कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी काही प्रमाणात अंतर्गत व बाह्य दबाव असल्याशिवाय व्यक्ती पुढं जात नाही. हेच सूत्र विद्यार्थ्यांनासुद्धा लागू पडते. कोणत्याच प्रकारच्या दबावशिवाय ताण येत नाही. हा दबाव योग्य प्रमाणात असेल, तर ताण विशिष्ट पातळीच्या पुढं जाण्याचा प्रश्नच येत नाही. 

या लेखाच्या निमित्तानं, काही विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्याच्या मते, आई-वडील सतत अभ्यास आणि परीक्षा याच विषयावर बोलत असल्यानं फार ताण वाढतो. मग अभ्यास करताना आपल्याला चांगले मार्क्‍स मिळतील का, याचेच विचार मनात येतात आणि मार्क्‍स मनासारखे मिळाले नाहीत तर काय होतील या विचारानं अभ्यासात लक्ष लागत नाही. त्याच प्रमाणं, कमी मार्क्‍स मिळाले, तर माझे मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, असा एक भुंगाही सतत डोक्‍यात असतो-जो ताण वाढवतो! 

आई-वडील नक्की काय बोलतात, असं विचारल्यावर उत्तर सारखं होतं. 'इतर विद्यार्थी करू शकतात, तर तुम्ही का ना नाही,' असाच पालकांचा सूर असतो, असं त्यांचं म्हणणं. याचाच अर्थ तुलना आणि फक्त तुलना! 

विषयाची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी पालकांशीही संवाद साधला, तेव्हा असं लक्षात आलं, की पालक विद्यार्थ्यांच्या बाबतीत फारच पुढचा विचार करतात. परीक्षा आणि त्यामध्ये मिळालेले मार्क्‍स अथवा ग्रेड याचा थेट संबंध ते मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या शाखेत प्रवेश आणि नंतर नोकरी मिळणं किंवा करिअर यांच्याशी लावताना दिसतात. बहुतांश वेळेला पालक आणि विद्याथ्यांमधला 'परीक्षा' या विषयावरच्या संवादाचा शेवट विसंवादातच होतो. आपण नीट बघितलं, तर हे सगळं नेमकं परीक्षेच्या आधीच्या काही दिवसांत होताना दिसतं. 

तारतम्य हवं 
या निमित्तानं पालकांना सांगावंसं वाटतं, की मुलांना केव्हा काय बोलावं, कोणत्या वेळेला त्यांना कोणता सल्ला द्यावा, याचं तारतम्य ठेवणं अतिशय आवश्‍यक असतं. ते तारतम्य ठेवलं, तर किती तरी समस्या मुळात निर्माणच होणार नाहीत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही लक्षात घ्यायला हवं, की त्यांनी ही तुलना स्वतःबरोबरच करायला हवी. मागच्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला म्हणजे सुधारणा होईल, याकडे त्यांनी जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. यावर लक्ष दिल्यास आपल्याला अपेक्षित असे बदल नक्कीच दिसायला लागतील. पुष्कळ वेळेला विद्यार्थी 'प्रोसेस'वर लक्ष न देता 'प्रॉडक्‍ट' कसा चांगला असेल, याचा विचार करतात. म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीवर लक्ष कमी; पण मार्क्‍स मात्र चांगले मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा. ती मानसिकता विद्यार्थ्यांनी बदलायला हवी आणि पालकांनीही त्यात मदत करायला हवी. 

तयारी परिपूर्ण हवी 
ताण येण्याचं मुख्य कारण म्हणजे तयारीचा अभाव! कोणत्याही विद्यार्थ्यानं प्रयत्नपूर्वक उत्तम तयारी केली असेल, तर ताण येणार नाही, असं नाही; पण तो नक्कीच कमी असेल किंवा नसेलही! कारण मुळातच त्या विद्यार्थ्यांचा परीक्षेला सामोरं जाताना आत्मविश्वास जास्त असेल. 

पुष्कळ कॉलेजचे विद्यार्थी परीक्षेचं दिवशी 'अरे! मी गेल्या आठवड्यात 'पोर्शन' मिळवला आणि आज परीक्षेला आलो,' अशाही फुशारक्‍या मारताना दिसतात. यातून त्यांचा नको इतका आत्मविश्वास दिसतो. असा खोटा आत्मविश्वास कधीच पाहिजे ते यश मिळवून देत नाही, हे सांगायला नकोच. सातत्यानं आणि संपूर्ण वर्षाचं योग्य त्या प्रमाणात नियोजन करून मग अभ्यास केल्यास आत्मविश्वास हा सातत्यानं वाढत जातो, असंही संशोधन सांगतं. अनेक विद्यार्थ्यांचे अनुभवही त्यावरच शिक्कामोर्तब करतात. 

विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ः 

  • ठराविक वेळेला, ठराविक वेळेपुरता एक ब्रेक घ्या. ठराविक अंतर चालून या, आवडणारी गाणी ऐका. 
  • योग्य तेवढी झोप घा. प्रमाणित झोपेमुळं शरीराचं चक्र संतुलित राहतं आणि मनही शांत होतं. 
  • आहार व्यवस्थित घ्या आणि भरपूर पाणी प्या. व्यायामही करा. 
  • आपण जे वाचलं आहे, लिहून काढलं आहे, ते सर्व आठवून बघा. मनन करा. 
  • आपल्या आजूबाजूच्या आपलं लक्ष विचलित करणाऱ्या सर्व गोष्टींपासून दूर राहा. उदाहरणार्थ, मोबाइल फोन, टीव्ही वगैरे. 

पालकांनी काय करावं? 

  • घरातल्या वातावरणात कोणतयाही प्रकारचा ताण येणार नाही, याची काळजी घा. 
  • मुलांना 'तू तुझ्या परीनं चांगला अभ्यास केला आहेस, त्यामुळं तुला अपेक्षित असं यश मिळेल,' अशा प्रकारे प्रोत्साहन द्या. 
  • कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक कॉमेंट्‌स करणं टाळा. 
  • मुळातच मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. त्या वास्तवदर्शी असतील, तरच मुलं अभ्यास आणि परीक्षांना हसतखेळत सामोरी जातील. 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. परीक्षा महत्त्वाच्या आहेत, यात वादच नाही; मात्र यशस्वी भविष्यासाठी त्या एकमेव मार्ग आहेत असा ग्रह करून घेणं चुकीचं आहे. अनेक जण शाळेतल्या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी न करतासुद्धा आयुष्यात पुढं यशस्वी होतात. याचा अर्थ या परीक्षांकडं दुर्लक्ष करायला नको; मात्र त्यांचं भूतही आपल्या मानगुटीवर सतत बसायला नको. परीक्षांकडे 'भूत' म्हणून न बघता त्यांच्याकडे निकोप दृष्टीनं बघितलं आणि त्यांच्याशी चक्क मैत्रीच केली, तर ती मैत्री जीवनातल्या इतर अनेक पैलूंसाठीसुद्धा उपयोगी पडेल. त्यामुळं अशी मस्त मैत्री करा आणि परीक्षेला, अभ्यासाला सामोरे जा. ऑल द बेस्ट! 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Student psychology Sunita Bhagwat