विनोद कुठं हरवलाय? (संदीप वासलेकर)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

राजकीय विनोदाचा खरा उद्देश हलक्‍याफुलक्‍या शब्दांनी दुसऱ्या पक्षावर टीका करायची व गरज पडेल तेव्हा स्वत:ची थट्टा-मस्करी करून विरोधी नेत्यांशी संवाद साधायचा हा असतो. आता राजकीय विनोद हे विरोधी पक्षाच्या नेत्यावर व विचारसरणीवर टीका करण्याचं साधन झालं आहे. राजकीय विनोदाच्या रूपानं आपल्या नावडत्या नेत्याला नावं ठेवायची, त्याची टिंगल करणारे तथाकथित प्रसंग समाजमाध्यमांतून पसरवायचे व राजकारणाकडं केवळ सत्तासंघर्ष म्हणून पाहायचं अशी विचारसरणी रूढ झालेली आहे. 

ऑक्‍सफर्ड विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण करून भारतात परत यायला निघालो तेव्हा तिथल्या मित्र-मैत्रिणींनी मला काही पुस्तकं भेट दिली. त्यापैकी एका पुस्तकाचं नाव 'राजकीय विनोद' (Political Jokes) असं होतं. पुस्तक उघडल्यावर आत पहिल्याच पानावर एक वचन होतं : 'राजकीय विनोदांबद्दल सगळ्यात भयानक बाब अशी आहे, की त्यातले काही निवडणुकीत चक्क निवडून येतात.' 

भारताच्या संसदेत सुरवातीपासूनच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण होतं. राष्ट्रीय नेते स्वत:वरच विनोद करत अथवा विरोधकांनी मारलेली कोपरखळी हसून स्वीकारत. सन 1962 च्या युद्धातला एक प्रसंग सर्वश्रुत आहे. चीननं अक्‍साई चीन काबीज केल्यावर पंडित नेहरू यांनी सारवासारव करत संसदेत सांगितलं होतं : ''अक्‍साई चीनमध्ये गवताचं पानदेखील उगवत नाही...तेव्हा ते काबीज केलं गेल्याबद्दल आपण काही जास्त त्रागा करण्याची गरज नाही.'' त्यावर महावीर त्यागी म्हणाले होते : ''तुमच्या आणि माझ्या डोक्‍यावर एकही केस उगवत नाही म्हणून आपल्या दोघांचं शिर कुणी वेगळं करून घेऊन गेलं तर चालेल का?'' 

विरोधी नेत्यांपैकी पिलू मोदी व अटलबिहारी वाजपेयी हे सरकारला नेहमी धारेवर धरत असत; पण ते विनोदाचा वापर करून अतिशय तिखट मुद्दे हसत-खेळत मांडत. वेळप्रसंगी स्वत:वरही विनोद करत असत. 

मी भारतात आल्यावर संशोधनकार्य हे क्षेत्र म्हणून निवडलं. दरम्यान, राजीव गांधी पंतप्रधान झाले व काही वर्षांनी निवडणूक हरले. त्यांनी 'एकविसाव्या शतकातला भारत' अशी घोषणा केली होती. 

सन 1990 च्या सुरवातीला ऑक्‍सफर्ड व केम्ब्रिज विद्यापीठांच्या माजी विद्यार्थी संघाच्या चहापानाच्या कार्यक्रमात त्यांची व माझी भेट झाली. ते म्हणाले : ''आपला देश एकविसाव्या शतकात नेण्यासाठी व जगात एक प्रगत राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मला खूप काही करायचंय.'' 

मी म्हणालो : ''माहीत आहे.'' 

ते म्हणाले : ''तुम्ही देशाच्या भवितव्यासंबंधी बरंच संशोधन केलंय, असं मी ऐकलं आहे. मग मला कधी पत्र लिहून तुमच्या संशोधनाबद्दल कळवलं का नाही?'' 

मी सरळ म्हणालो : ''तुमच्याभोवती चौकडीची पकड घट्ट आहे, असं मी एक नागरिक म्हणून ऐकलं आहे. तुम्हाला मी पत्र लिहिलं तर ते एकविसाव्या शतकापर्यंतही तुमच्यापर्यंत पोचणार नाही, असं मला वाटलं म्हणून मी तो खटाटोप करत नाही.'' 

ते हसले व माझं म्हणणं पटलं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मध्ये अडथळा न येता थेट त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचा मार्ग त्यांनी तयार केला. 

आता दिवस बदलले आहेत. सध्याच्या काळात जर एखाद्या तरुण संशोधकानं ज्येष्ठ राजकीय नेत्यासंदर्भात त्याच्या कार्यपद्धतीवर टीका करणारा विनोद त्याच्या तोंडावर केला तर त्याच्यावर कोणते आरोप करण्यात येतील याची काही खात्री नाही. 

भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरलीमनोहर जोशी हे कायम हसतच बोलत असत व स्वत: सोडून दुसऱ्यांची महती सांगत असत. अडवानींना परराष्ट्र धोरणासंबंधी प्रश्‍न विचारले की ते 'अटलजींशी बोला' असं सांगत व वाजपेयींना काश्‍मीरबद्दल चर्चेचं आमंत्रण दिल्यावर ते स्वत:बद्दल विनोद करत आणि 'यात डॉ. मुरलीमनोहर जोशी तज्ज्ञ आहेत,' असं आवर्जून सांगत. 

सध्याही संसदेत विनोद होतात; पण थोडं हातचं राखूनच. ज्येष्ठ नेत्यांना स्वपक्षातल्या इतर नेत्यांची स्तुती करण्यासाठी स्वत:बद्दल गमतीशीर बोलणं जमत नाही. महाराष्ट्रात सगळ्याच पक्षांचे नेते एखाद्या कार्यक्रमात एकत्र आले तर एकमेकांना कोपरखळ्या मारतात व विरोधकांनी मारलेले चिमटे आनंदानं स्वीकारतात; पण महाराष्ट्राच्या बाहेर व राष्ट्रीय पातळीवर हे चित्र पाहायला मिळत नाही. 

सर्वसामान्य व्यक्तीनं जर मोठ्या नेत्यावर विनोदी पद्धतीनं टीका केली तर तो कसा तुरुंगात जाईल हे त्यालाही कळणार नाही. काही वर्षांपूर्वी कोलकता इथं एकानं ममता बॅनर्जी यांचं व्यंग्यचित्र काढल्याबद्दल त्याला काय परिणाम भोगावे लागले होते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. 

आता राजकीय विनोद हे विरोधी पक्षाचा नेता व विचारसरणी यांच्यावर टीका करण्याचं साधन झालं आहे. राजकीय विनोदाच्या रूपानं आपल्या नावडत्या नेत्याला नावं ठेवायची, त्याची टिंगल करणारे तथाकथित प्रसंग समाजमाध्यमांतून पसरवायचे व राजकारणाकडं केवळ सत्तासंघर्ष म्हणून पाहायचं अशी विचारसरणी रूढ झालेली आहे. 

राजकीय विनोदाचा खरा उद्देश हलक्‍याफुलक्‍या शब्दांनी दुसऱ्या पक्षावर टीका करायची व गरज पडेल तेव्हा स्वत:ची थट्टा-मस्करी करून विरोधी नेत्यांशी संवाद साधायचा हा असतो. काही प्रमाणात कपिल सिब्बल, अरुण जेटली, शशी थरूर, अनंतकुमार आदी राष्ट्रीय पातळीवरचे नेते विनोदाचा वापर संवाद साधण्यासाठी करतात. 

मात्र, सध्या नेत्यांपेक्षा त्यांचे अनुयायी खूप कर्मठ झालेले दिसतात. राजकारणातली प्रत्येक चर्चा म्हणजे जणू काही महायुद्ध आहे, असा त्यांचा समज झालेला दिसतो. वास्तविक गरिबी, वाढती विषमता, मनुष्यबळ विकास, पर्यावरणाचा ऱ्हास, दहशतवाद हे राष्ट्रीय मुद्दे आहेत. त्यावर कोणत्याही एका पक्षाकडं संपूर्ण समाधानकारक असं उत्तर नाही. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी व तज्ज्ञांनी विचारांची देवाण-घेवाण करणं ही देशाची नितांत गरज आहे. हा संवाद विनोद, काव्य, उपहास आदींचा उपयोग करून सुसह्य करता येईल. जर प्रत्येक चर्चेकडं आपल्याच देशातल्या इतर पक्षांना शत्रू, देशद्रोही अथवा नगण्य मानून सतत आक्रमकतेनं पाहिलं तर देशाचं नुकसान होईल. दुर्दैवानं असं नुकसान करणारे प्रसारमाध्यमांचे अँकर, समाजमाध्यमांतले नवलेखक, राजकीय पक्षांचे प्रवक्ते व राजकीय महत्त्वाकांक्षा मनात ठेवून देशात कोणत्या ना कोणत्या तरी मुद्द्यावर वाद निर्माण करणारे यांची संख्या खूप वाढत चालली आहे. राजकारणातून विनोद तर हरवलेला आहेच; पण त्याचबरोबर संयमही कमी होत चालला आहे. शिवाय, देशाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी मानसिक ऐक्‍य निर्माण करण्याची शक्‍यताही कमकुवत होत चालली आहे. 

आपल्याकडं 'ओनियन' अथवा 'प्रायव्हेट आय'सारखी मासिकं नाहीत. राजकारण्यांवर विनोद करणारे खुशवंतसिंग यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवरचे लेखक नाहीत. युवकांमध्ये 'स्टॅंड अप्‌ कॉमेडी' हा विषय मात्र वाढत चालला आहे. म्हणजे उभं राहून विशीतले युवक राजकीय व सामाजिक परिस्थितीचं विडंबन करतात. त्यांना ऐकण्यासाठी लोक पैसे देऊन जातात. सध्या असे कार्यक्रम मुंबई, कोलकता, चेन्नई यांसारख्या शहरांतपुरतेच मर्यादित आहेत; पण 'लोकांना केवळ संघर्षमय राजकारण नको आहे, तर स्वत:कडं स्थितप्रज्ञपणे पाहून देशाचे प्रश्‍न सोडवणारे राजकीय कार्यकर्ते हवे आहेत,' याचा 'स्टॅंड अप्‌ कॉमेडी'ची लोकप्रियता हा एक संकेत आहे. 

स्वत:कडं प्रामाणिकपणे पाहणं हे आजच्या नेत्यांना सहजी जमत नाही; पण केवळ आठ-10 वर्षांपूर्वी वेगळी परिस्थिती होती. देशात कुणाला फारसे माहीत नसलेले; पण दिल्लीत सगळ्यांना परिचित असलेले सोमपाल हे एक नेते आहेत. ते पूर्वी जनता दलात होते व विश्वनाथप्रताप सिंह पंतप्रधान असताना त्यांचे उजवे हात म्हणून राजकीय धुरिणांच्या समोर आले. त्यांनी कालांतरानं जनता दल सोडलं व भाजपमध्ये प्रवेश केला. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते शेती व जलस्रोत खात्याचे स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री झाले. 2005 मध्ये त्यांनी भाजपचा त्याग केला व ते कॉंग्रेसमध्ये गेले. काही काळानं कॉंग्रेस सोडून समाजवादी पक्षात जाण्यासाठी मुलायमसिंग यादव यांच्याशी त्यांनी चर्चा सुरू केली. त्यांचं राजकारण कसंही असलं तरी त्यांचं शेतीचं व पाण्याचं ज्ञान अफाट होतं व त्याबद्दल त्यांना सगळे जण खूप मानतात. मी त्यांना एकदा शेतीप्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी भोजनाला बोलावलं. 

मुख्य जेवण झाल्यावर मी त्यांना म्हणालो : ''इथं चांगलं डेझर्ट कोणतं मिळतं ते मी तुम्हाला सांगतो.'' ते म्हणाले : ''आप क्‍या मुझे डेझर्ट के बारे में बताएंगे? मैं ही भारी अनुभवी डेझर्टर हूँ!''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com