'ऍपलेट्‌स'ची न्यारी दुनिया...

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

आकडेवारीची गंमत बाजूला ठेवू या. ऍप्समुळं मोबाईल स्मार्ट बनलाय आणि ऍप्समुळं रोजचं आयुष्य किंचित का होईना सोपं होतंय, हे अगदी खरंय. प्रश्न इतकाच आहे, की अनेकदा आवडीची ऍप्स आपण वेळेअभावी वापरू शकत नाही आणि काही अतिशय आवश्‍यक ऍप्स ऐनवेळी शोधाशोध करायच्या नादात नीट वापरायची राहून जातात. सोपं उदाहरण घेऊ या. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी कामात गढून गेल्यामुळं पाणी प्यायचं राहून जातं. दर दोन तासांनी पाणी प्यायला हवं, हे माहीत असूनही. त्यातून मग आरोग्याचे गुंतागुंतीचे प्रश्न तयार होऊ शकतात. आता मोबाईलमध्ये अलार्म असतो. तो वापरून हे करता येतं; पण रोज उठून अलार्म सेट करायचा कधी? अलार्म वाजतोय, तो पाणी प्यायची आठवण करून देण्यासाठीच कशावरून? या घोळात अलार्म लावणं विसरून जायला होतं आणि लावलेला अलार्म बंद करून टाकायची वेळ येते. 

मोबाईलमध्ये जर अलार्म असेल, तर तो अतिशय नेमक्‍या पद्धतीनं, हव्या त्याच कारणांसाठी वापरायची सोय का नसावी? 

आपण मोबाईलवर नोट्‌स घेतो आणि सेव्ह करतो. त्याच नोट्‌स आपोआप आपल्या विशिष्ट वेळानंतर आपल्याला ई-मेल का केल्या जाऊ नयेत? मोबाईलवर आपण शेकडो फोटो घेतोय तर आपोआप त्या फोटोंचा बॅकअप्‌ विशिष्ट वेळी का घेतला जाऊ नये? 

'इफ दिस, देन दॅट' (If This, Then That = IFTTT) हे या अशा सोप्या प्रश्नांवर आधारित ऍप आहे. कधी वापरलं नसेल, तर आधी डाउनलोड करून वापरावं आणि त्याच्यातल्या सोपेपणाचा अनुभव घ्यावा असं. जर मोबाईलसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं ऍप्स असतील, तर ती त्या त्या कारणासाठी आपोआप वापरता आली तर धमाल येईल, या विचारानं लिंडन टिबेट्‌स या तरुणानं सात वर्षांपूर्वी IFTTT (मराठी उच्चार इफ्ट्‌. गिफ्टला जवळ जाणारा असा आणि ग वगळून) नावाची सेवा सुरू केली. तुमच्याकडं अमुक आहे, तर ते तमुक पद्धतीनं अधिक सोईनं वापरण्यासाठी ऍपपेक्षा सोपी 'ऍपलेटस्‌' बनवायची लिंडनची कल्पना सुरुवातीला यूजर्सच्या फारशी अंगवळणी पडली नव्हती. मात्र, गेल्या चार वर्षांत जगभरात जसा इंटरनेटचा प्रसार झपाट्यानं झाला आहे, कनेक्‍टेड डिव्हायसेस जशी वाढली आहेत, तशी IFTTT च्या 'ऍपलेट्‌स'ची संकल्पनाही मोठ्या वेगानं रुजते आहे.

IFTTT हे एक ऍप आहे आणि त्याच्यामध्ये साध्या On/Of बटणांद्वारे कित्येक ऍपच्या हव्या त्या सोई वापरता येतात. ऍमेझॉनच्या 'इको' आणि 'अलेक्‍सा'पासून ते गूगलच्या 'असिस्टंट'पर्यंत प्रत्येक ऍप आणि कनेक्‍टेड डिव्हाईससाठी IFTTT कडं एक छोटंसं ऍपलेट आहे. एकदा IFTTT डाउनलोड केलं की स्वतंत्र ऍपलेट्‌स डाउनलोड करावी लागत नाहीत. दैनंदिन कामासाठी लागणारी ऍप्स अधिक सोईनं आणि उपयुक्त पद्धतीनं वापरण्यासाठी IFTTT हा आजच्या घडीचा सर्वोत्तम पर्याय नक्कीच आहे. 
यामध्ये सगळा खेळ एका बटणाचा आहे. 

आपलं जगणं अधिक आरामदायी करण्यासाठी आपला भोवताल कसा वापरता येईल, हा लिंडनचा मुख्य विचार. मोबाईलच्या जगात ऍप्स हा भोवताल. मग या भोवतालातल्या हव्या त्या गोष्टी (ऍप्स) आपल्याला हव्या तेवढ्या वापरण्यासाठी घेणं आणि त्यांची ऍपलेट्‌स बनवणं सुरू झालं. आजअखेर 10 लाखांहून अधिक यूजर्स ते अँड्रॉईडवर वापरत आहेत आणि त्यापैकी लाखभर लोकांनी आपलं ऍपविषयीचं मत व्यक्त केलं आहे. मोबाईलवर घेतलेल्या फोटोंचा गूगल फोटोमध्ये आपोआप बॅकअप घेण्यापासून ते सोशल मीडियावरच्या विशिष्ट विषयांच्या 'सर्च ऍलर्ट'पर्यंत शेकडो ऍप्सची ऍपलेट्‌स यात उपलब्ध आहेत. ऍप्स वापरून कंटाळा आला असेल, तर या ऍपलेट्‌स्‌ दुनियेची सैर करायला हरकत नाही. 

IFTTT ऍप 

  • डाउनलोड्‌सः दहा लाखांवर 
  • अँड्रॉईड रेटिंगः 4.3 
  • विविध ऍप्सची उपयुक्तता वाढवणारं खास ऍप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com