बिनधास्त बोला मातृभाषेत (संतोष धायबर)

रविवार, 11 मार्च 2018

तंत्रज्ञानामुळं कोणत्याही भाषेतल्या संवादाचं, मजकुराचं भाषांतर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अगदी लगेच आणि नेमकं भाषांतर करू शकणाऱ्या अशाच काही ऍप्सबाबत माहिती. 

तंत्रज्ञानामुळं कोणत्याही भाषेतल्या संवादाचं, मजकुराचं भाषांतर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. अगदी लगेच आणि नेमकं भाषांतर करू शकणाऱ्या अशाच काही ऍप्सबाबत माहिती. 

मातृभाषेत आपण ज्या पद्धतीनं संवाद साधू शकतो, तो अन्य कोणत्याही भाषेत नाही. असं असेल, तर मातृभाषेची लाज बाळगायचीच का? जगाच्या पाठीवर कुठंही गेलं, तरी मातृभाषेला कमी न लेखता बिनधास्तपणे संवाद साधता आला पाहिजे. होय, तुमची भाषा समोरच्याला त्याच्या मातृभाषेत समजू शकली तर? केवढं सोपं होईल. तंत्रज्ञानामुळं हे शक्‍य झालं आहे. यासाठी दुभाषकाची आवश्‍यकता नसून, केवळ मोबाईलची आवश्‍यकता असणार आहे. मोबाईलवर "ट्रान्स्लेट व्हॉईस'चं ऍप असेल, तर जगभरात कुठंही भाषेच्या अडथळ्यांविना भ्रंमती करू शकतात. 

माहिती-तंत्रज्ञानामुळं विविध गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. फक्त आपल्याला त्याची माहिती हवी एवढंच. गूगल ट्रान्स्लेटरमुळं टाइप असलेला मजकूर आपल्या भाषेत भाषांतर करून मिळत आहे; पण आपलं बोलणंसुद्धा दुसऱ्या भाषेत काही क्षणांत भाषांतरीत करून मिळण्यासाठी विविध ऍप्स उपलब्ध आहेत, याविषयी थोडक्‍यात... 

ट्रान्स्लेट व्हॉईस (Translate voice - Translator) : 
ट्रान्स्लेट व्हॉईस ऍपच्या माध्यमातून टाइप केलेल्या मजकुरासोबत व्हॉईस मजकूरही भाषांतरीत करू शकतो. जगभरातील ऐंशी भाषांमध्ये आपली भाषा भाषांतरीत करू शकतो, तर 44 भाषांमध्ये आवाजाचं रूपांतर दुसऱ्या भाषेत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या ऍपवर टाइप करण्याबरोबरच आपला आवाज रेकॉर्ड करण्याची सुविधा आहे. काही क्षणांत ट्रान्स्लेट होत असल्यामुळं या ऍपला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. शिवाय, ट्रान्स्लेट केलेला मजकूर अथवा व्हॉईस क्‍लिप ई-मेल अथवा सोशल मीडियावर शेअर करता येते. 

व्हॉईस ट्रान्स्लेटर (Voice Translator) : 
हिंदी, इंग्लिश, पंजाबी, उर्दू या भाषांसह 41 भाषांमध्ये या ऍपच्या माध्यमातून आपण आपली भाषा भाषांतरीत करू शकतो. शिवाय, छापील मजकूर ट्रान्स्लेट करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या भाषेत लिहिलेल्या मजकुराचं छायाचित्र काढल्यास या ऍपच्या माध्यमातून तो मजकूरसुद्धा आपण सिलेक्‍ट केलेल्या भाषेमध्ये ट्रान्स्लेट करून मिळू शकतो. सोशल नेटवर्किंगवरही तो शेअर करू शकतो. 

ऑल लॅंग्वेज ट्रान्स्लेटर फ्री (All Language Translator Free) : 
जगभरातल्या 180हून अधिक भाषांमध्ये या ऍपच्या माध्यमातून मजकूर ट्रान्स्लेट करण्याबरोबरच ट्रान्स्लेट केलेला मजकूर ऐकता येतो. त्यामुळं या ऍपलाही जगभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. हाताळण्यासही सोपं असल्यामुळे विद्यार्थी आणि पर्यटक याचा मोठा वापर करतात. 

मायक्रोसॉफ्ट ट्रान्स्लेटर (Microsoft Translator) : 
साठ भाषांमधला मजकूर, आवाज, संभाषण व कॅमेरा छायाचित्र अथवा स्क्रीनशॉट ट्रान्स्लेट करण्यासाठी या ऍपचा उपयोग होतो. विशेष म्हणजे ऑफलाइन असतानाही हे काम करता येतं. दोन व्यक्तींमधल्या संभाषणाचं काही क्षणात भाषांतर करून मिळतं. शिवाय, तुमचं लोकेशनही दाखवलं जातं. 

विविध ऍप्सप्रमाणंच गॅजेट्‌सही बाजारात उपलब्ध आहेत. पेनड्राइव्हपेक्षा मोठ्या आकाराच्या आणि खिशात बसणाऱ्या विविध गॅजेटच्या माध्यमातून विविध भाषांमधून संवाद साधण्यास मदत होते. रिअल टाइमला ही गॅजेट्‌स दुभाषकाचं काम करतात. यामुळं जगभरात मोठ्या प्रमाणात या गॅजेट्‌सलाही पसंती मिळताना दिसते. मेक अलेक्‍सा (make Alexa) हे गॅजेट ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जगभराचा दौरा करताना भाषेची नक्कीच अडचण येणार नसल्यानं अगदी बिनधास्त मातृभाषेत बोलूया. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi features Techno Dost Android apps Santosh Dhaybar