कथा दोन शिक्षिकांच्या शोधाची...(प्रवीण कुलकर्णी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

हा प्रसंग 2002 मधला आहे. मी तेव्हा खोपोलीच्या एका शाळेत कामाला होतो. त्या वर्षी आमच्या शाळेची नववी-दहावीची सहल बंगळूर, म्हैसूर व उटी इथं गेली होती. सहलीत 100 मुलं व 10 शिक्षक होते. जवळजवळ सगळी सहल पूर्ण झाली आणि शेवटी आम्ही बंगळूरला आलो. सगळी ठिकाणं बघितली व संध्याकाळी साडेपाचला आम्ही बंगळूरच्या मुख्य रस्त्यावर, म्हणजे महात्मा गांधी रस्त्यावर आलो. त्या रस्त्यावर सगळीकडं गजबजाट होता. मुलंही खरेदीसाठी उत्सुक होती. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक शिक्षकावर 10 मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवत खरेदी करायला पाठवलं व एका तासानं ठरलेल्या ठिकाणी यायला सांगितलं. सगळे जण आनंदात खरेदीसाठी निघून गेले. शॉपिंग झाल्यावर सात वाजेपर्यंत ठरलेल्या ठिकाणी सगळी मुलं पोचली; पण दोन शिक्षिका मात्र आल्या नव्हत्या. त्या वेळी आजच्या एवढी मोबाईलची सुविधा सर्रास नव्हती. त्यामुळं सगळे जण काळजीत पडले होते. आठ वाजता परत येण्यासाठी बंगळूर-मुंबई गाडीचं आरक्षण होतं. थोडा वेळ इकडं तिकडं शोध घेतला; पण त्या दोघी कुठंच दिसल्या नाहीत. शेवटी आमच्या मुख्याध्यापकांनी व अन्य शिक्षकांनी मला त्या शिक्षिकांचा शोध घ्यायला सांगितलं. आवश्‍यकता लागली तर असू द्यावेत म्हणून माझ्याकडं त्यांनी हजार रुपये दिले. मुलं व बाकीचे शिक्षक बसमधून स्टेशनकडं निघून गेले. स्टेशन जवळच होतं. 

आता मी एकटा त्या अनोळखी शहरात आमच्या शाळेच्या शिक्षिका कुठं दिसतात का ते शोधू लागलो. मी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर मुलांबरोबर फिरायला आलो होतो. पुढं गेल्यावर दोन पोलिस मला दिसले. ते आपल्याला नक्की मदत करतील, असं मला वाटलं म्हणून त्यांना मी हिंदीतून सांगण्याचा प्रयत्न केला; पण काहीच फायदा झाला नाही. त्यांना फक्त कन्नडच येत होतं. 

मग मात्र मी अगतिक झालो. दोघींना आता कुठं शोधायचं...मला काहीच सुचेना. 

मग बाजारात पुढं चालत राहण्याचं ठरवलं. गाडीची वेळ जवळ आली होती. फक्त 25 मिनिटं राहिली होती. त्या गजबजाटात पुढं जात असताना एका विजेच्या खांबाखाली एक शिक्षिका घाबरून इकडं तिकडं पाहत असताना दिसली. मला बघताच त्यांना हायसं वाटलं. मी त्यांना दुसऱ्या शिक्षिकेबद्दल विचारलं, तेव्हा त्यांना काहीच माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आता गाडी सुटायला केवळ 15 मिनिटंच राहिली होती. ""तुम्ही इथंच थांबा, मी दुसऱ्या शिक्षिकेला शोधतो,'' असं मी त्या शिक्षिकेला सांगितलं. तेव्हा त्या घाबरून मला म्हणाल्या : ""मीपण तुमच्याबरोबर येते.'' मग आम्ही दोघंही पुढं निघालो व पाचच मिनिटांत दुसरी शिक्षिकाही सापडली. त्यांचा चेहरा रडवेला झाला होता. मी काही जास्त न बोलता एक रिक्षा ठरवली व बंगळूर स्टेशनवर पोचलो. आम्ही रेल्वेगाडीत बसत नाही तोच गाडी निघाली. त्यानंतर मुख्याध्यापिका व त्या दोघी यांच्यात बरंच बोलणं झालं. बराच काळ त्या दोघी घाबरून रडत होत्या. मी या प्रसंगातून बरंच काही शिकलो, हे सांगायला नकोच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com