त्या मुलाला वेळेतच आत घेतलं म्हणून...! (शोभा भिडे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

बऱ्याच वर्षांपूर्वीची घटना आहे. त्या वेळी बारा डब्यांच्या गाड्या सुरूही झाल्या नव्हत्या. नोकरीनिमित्त मला रोज सकाळी मुलुंड ते दादर व संध्याकाळी दादर ते मुलुंड असा प्रवास करावा लागे. संध्याकाळी दादरला गाडीत प्रवेश मिळावा, यासाठी मी नेहमी पहिल्या वर्गाचा पास काढत असे. शिवाय संध्याकाळी लवकर घरी जाण्यासाठी जलद लोकल पकडत असे. जिना उतरला की लगेच समोरच पहिल्या वर्गाचा महिलांचा डबा येत असे. 

ही जलद लोकल दादर ते मुलुंडमध्ये कुर्ला, घाटकोपर अशी थांबत असे. दादर, घाटकोपर, मुलुंड एकाच बाजूला येत असल्यानं गाडीत चढल्यावर थोडं आत जाऊन उभं राहिलं की काम भागे. घाटकोपरच्या महिला उतरल्यावर थोडं दाराच्या जवळ किंवा कधी मागं टेकून उभं राहता येत असे. 

एकदा घाटकोपरला गाडी सुटता सुटता दहा-बारा वर्षांचा एक मुलगा गाडीत चढला. पाठीवर भलंमोठं दप्तर, गणवेश चुरगळलेला, चेहरा घामानं डबडबलेला, कमालीचा थकलेला. त्याला पाहून सगळ्या महिला वैतागल्यासारख्या झाल्या. तो एका हातानं गाडीचा दांडा पकडून, शरीराचा जास्तीत जास्त भाग गाडीच्या बाहेर ठेवून हवा खात होता. 

मी अचानक त्याचा दांड्याला धरलेला हात पकडला. तो माझ्याकडं नवलानं बघू लागला. ""असा बाहेर लटकू नकोस. नीट आत उभा राहा,'' मी त्याला म्हणाले. 

त्यानं माझं मुकाट्यानं ऐकलं. तो दांड्याच्या पलीकडं गाडीत आत येऊन उभा राहिला. गाडी सुसाट धावतच होती. काही सेकंदच गेले असतील आणि तो मुलगा उभ्याउभ्याच गाडीत कोसळला. माझ्या पायाजवळच तो पडला होता. त्याला अचानक चक्कर आली होती. 

आम्ही महिलांनी त्याला पाणी मारून सावध केलं. शुद्धीवर येताच त्याला प्यायला पाणी आणि खायला बिस्किटं दिली. तो मुलुंडचाच राहणारा होता. त्याला आत घेण्याची बुद्धी मला काही वेळापूर्वीच झाली, हे किती बरं झालं. नाहीतर त्याचं काय झालं असतं, या विचारानं मनाचा थरकाप उडाला. त्याला पडलेला पाहून माझंच अवसान गळालं. ""बरं झालं, तुम्ही त्याला आतल्या बाजूला उभं राहायला सांगितलं,'' इतर महिला मला म्हणत होत्या. 

मुलुंडला आम्ही उतरलो. आता त्याला जरा हुशारी वाटत होती. मी त्याला रिक्षासाठी पैसे दिले आणि घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसवून दिलं. 

मनाच्या तळाशी खोल विस्मृतीत गेलेली ही घटना "भ्रमंतीतली शिदोरी'मुळं परत जागी झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com