रेल्वेगाडी व टॅक्‍सी यांची 'अविस्मरणीय शर्यत'! (भ्रमंतीतली शिदोरी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

माझी नात आरती विनोदकुमार हिच्या आग्रहावरून हवापालट म्हणून आम्ही सहकुटुंब बंगळूरला काही दिवस मुक्कामाला होतो. दरम्यान, केरळस्थित तिच्या धाकट्या दिराच्या लग्नाचं निमंत्रण आलं. केरळभेटीची आयतीच संधी आल्यामुळं आम्ही नातीबरोबर केरळला जाण्याचं ठरवलं. वराचं घर अलवायेजवळ असलेल्या चेन्नमंगलम्‌ या ठिकाणी होतं. बरोबर मुलगी, नात, पाच-सहा वर्षांची पणती व घरकाम करणारी बाई होती. नातीचे यजमान पूर्वीच गावी गेलेले होते. 

माझी नात बंगळूरमध्ये रामकृष्णपुरम्‌ या विभागात राहत असे. तिथून बंगळूर सिटी (सेंट्रल) स्टेशन बरंच दूर होतं. त्यामुळं स्टेशनवर पोचण्यासाठी टॅक्‍सीची सोयही आधीच करून ठेवलेली होती. रेल्वेगाडी निघण्याची वेळ रात्री आठच्या सुमाराची होती. आम्ही सगळे जण सामानासह संध्याकाळी 6 वाजताच तयार होतो; पण टॅक्‍सीचा पत्ताच नव्हता. चौकशीअंती कळलं की बंगळूर शहरात त्या दिवशी सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळं टॅक्‍सी रामकृष्णपुरम्‌पर्यंत येण्यास वेळ लागत होता. जसजसा उशीर होत होता तसतशी गाडी सुटण्याची वेळ जवळ येत होती. आमचा धीर सुटत होता. आम्ही लगेच दोन गट करून मिळेल त्या वाहनानं स्टेशनला जायचं ठरवलं. पहिल्या गटात काही सामानासह माझी मुलगी पद्मजा म्हात्रे हिला आरक्षित तिकीटं देऊन घरकाम करणाऱ्या बाईंबरोबर पाठवून दिलं. गाडीत स्थानापन्न होऊन ती आमची वाट पाहत बसली. 

त्या वेळी कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या व प्रवासाच्या दिवशी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी विधानसभेत होणार होता. विजयी पक्षाचा विजयोत्सव सुरू होता व गावागावातून पक्षाचे हजारो कार्यकर्ते शपथविधी संपल्यावर आपापल्या गावी परतण्यासाठी स्टेशनकडं निघाले होते. वाहतुकीची सर्वत्र भयंकर कोंडी झाली होती. स्टेशनकडं जाणारे रस्ते माणसांनी खच्चून भरून गेले होते. 

उशिरा पकडलेल्या टॅक्‍सीतून जेमतेम आम्ही स्टेशन परिसरात पोचलो; पण टॅक्‍सी फलाटापर्यंत पोचणं शक्‍यच नव्हतं. गाडी सुटायला दहा-पंधरा मिनिटं होती. काय करावं ते सुचत नव्हतं. आम्ही ताबडतोब टॅक्‍सीतून उतरून चालत फलाट गाठण्याचं ठरवलं. सोबत लहान मुलगी, सामानाच्या बॅगा घेऊन आम्ही मोठ्या प्रयासानं गर्दीतून वाट काढत फलाटावर पोचलो. गाडी सुटण्याच्याच बेतात होती. आम्हाला फलाट क्रमांक दोन जिना चढून गाठायचं होतं. आम्ही शक्‍य तितक्‍या वेगानं जिना चढायला सुरवात केली. जिन्याच्या मध्यावर आम्ही पोचत असतानाच गाडी हलली. गाडी पकडण्याचे आमचे सगळे प्रयत्न वाया गेले. मुलगी गाडीत आमची वाट पाहत होती व तिच्याशी आमचा मोबाइलवरही संपर्कही होता. गाडी सुटल्यामुळं काय करावं हे तिला सुचत नव्हतं. तीही या भागात नवखीच होती. 

फलाटावरून परतण्याचा निर्णय आम्ही निमिषार्धात घेतला आणि तडक टॅक्‍सी गाठली व पूर्व बंगळूर हे शहरातलं जवळचं स्टेशन टॅक्‍सीनं गाठण्याचं ठरवलं. टॅक्‍सी भरधाव सोडली. अगदी मिनिटामिनिटाला मुलीशी आमचा संवाद सुरू होता व गाडीचा ठावठिकाणाही कळत होता. टॅक्‍सी पूर्व बंगळूर स्टेशनवर पोचली; पण एका मिनिटापूर्वीच रेल्वेगाडीनं स्टेशन सोडलं होतं. पुन्हा मोठा पेचप्रसंग उभा राहिला. टॅक्‍सीचालकानं सरळ सरळ गाडी पुढच्या (आरके पुरम्‌) स्टेशनकडं पळवण्यास सुरवात केली. रेल्वेगाडी आणि टॅक्‍सीची जणू शर्यतच चालली होती. टॅक्‍सीचालक स्थानिक असल्यामुळं त्या स्टेशनवर गाडीचा थांबण्याचा कालावधी एक-दोन मिनिटांचा असतो, हे त्याला माहीत होतं. त्यानं टॅक्‍सी फलाटाच्या टोकाला उघड्या गेटकडं थांबवली. गाडी फलाटावर उभी दिसली. चालकाच्या हाती पाचशे रुपयांची नोट टेकवून आम्ही त्वरेनं बाहेर पडलो व सामानासह फलाटाच्या विरुद्ध बाजूला रुळ ओलांडून गाडीचा शेवटचा डबा गाठला. गाडीला सिग्नल मिळाला होता; पण कर्मधर्मसंयोगानं आम्ही गाडीत लहान मुलीसह चढण्याचा प्रयत्न करत असताना गार्डनं पाहिलं व गाडी अर्धा मिनिट थांबवली आमची धडपड पाहून गाडीतल्या दोन महाराष्ट्रीय तरुणांनी आम्हाला आमच्या बॅगांसह वर ओढून घेतलं व आमच्या आरक्षित डब्याजवळ पोचवलं. आमच्या जिवात जीव आला व सगळ्यांची भेट झाल्यावर आम्ही समाधानाचा सुस्कारा सोडला. दुसऱ्या दिवशी लग्नसमारंभ होता. टॅक्‍सीनं पुढचं स्टेशन गाठण्याची कल्पना सुचली नसती, तर गाडीत आधीच बसवून दिलेल्या आमच्या मुलीवर काय बिकट प्रसंग ओढवला असता याची कल्पनाही करवत नाही. ही टॅक्‍सीची व रेल्वेगाडीची 'शर्यत' मी कधीच विसरू शकत नाही. आम्हाला वेळेत रेल्वेगाडी गाठून देण्यास मोलाची मदत करणाऱ्या त्या टॅक्‍सीचालकाचे आभार मानायचे घाई-गडबडीमुळं राहूनच गेले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com