विराट म्हणतो, आता इंग्लंड दौऱ्याचे वेध (Exclusive)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

विराट कोहली हे एक अजब रसायन आहे. भरपूर ऊर्जा असलेला आणि जोरदार कामगिरी करणारा हा खेळाडू नेमका कसा विचार करतो? दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींकडं बघण्याचा त्याचा दृष्टीकोन कसा आहे? महेंद्रसिंह धोनीबाबत त्याच्या मनात काय भावना आहेत?...अशा सगळ्या प्रश्‍नांबाबत थेट त्याच्याशी झालेला संवाद. 

तो सुसाट सुटला आहे. अगदी टी-20 क्रिकेट बाजूला ठेवलं, तरी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मिळून त्यानं 15 हजार धावांचा टप्पा दिमाखात पार केलाय. तब्बल 56 आंतरराष्ट्रीय शतकांवर त्यानं हक्क सांगितला आहे. याबरोबर त्यानं भारतीय संघाला आक्रमक क्रिकेट खेळायला उद्युक्त केलं आहे आणि परदेश दौऱ्यात गेल्यावर डोळ्याला डोळा भिडवून खेळायला शिकवलं आहे. होय, मी विराट कोहलीबद्दल बोलतो आहे. 

भारतीय संघ 2017 मध्ये जास्तकरून मायदेशात खेळला. समोर आलेल्या प्रत्येक संघाला मोठ्या फरकानं पराभूत करून भारतीय संघानं मायदेशातलं आपलं रेकॉर्ड चकाचक ठेवलं. 2018 वर्ष चालू झालं, तसं सगळे क्रिकेट जाणकार आणि टीकाकार म्हणू लागले : 'सध्याच्या क्रिकेटमध्ये सगळेच संघ 'गली में शेर' झाले आहेत. भारतीय संघ त्याला अपवाद नसेल. 2008 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असल्यानं दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. मायदेशात केलेल्या कामगिरीची फोटोकॉपी परदेश दौऱ्यात काढणे भारतीय संघाला जमणारच नाही.' 

तसं बघायला गेलं, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघानं कसोटी मालिका गमावली. पहिल्या दोन कसोटी सामन्यात जवळपास 100 धावांनी भारतीय संघाचा पराभव झाला. म्हणजेच दक्षिण आफ्रिका दौरा यशस्वी झाला म्हणणं चुकीचं ठरेल; पण दौरा संपल्यावर जाणवलं, की काही तरी नक्कीच कमावलं आहे भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात. या सर्व विचारांच्या कोलाहलात मी असताना 'भेटूयात का कॉफी प्यायला?' असा संदेश मी विराट कोहलीला मोबाईलवर संदेश पाठवला. 

'जरूर जी... शाम को टीम हॉटेल आ जाओ,' विराटचं उत्तर वाचून आनंद झाला. सहाव्या एकदिवसीय सामन्याच्या आदल्या दिवशी जोहान्सबर्ग शहरातल्या सॅंडटन भागातील इंटरकॉंटिनेंटल हॉटेलात विराटबरोबर दिलखुलास गप्पा झाल्या. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येताना जो काही विचार करून तू आला होतास, त्याचं किती टक्के प्रतिबिंब उमटवता आलं असं वाटतं? 
विराट कोहली : मी म्हणेन अंदाजे 80 टक्के! जे काही विचार मनात होते, ज्या योजना आखल्या होत्या, त्यापैकी बहुतांशी योजना मैदानात राबवता आल्या. पहिल्या दोन कसोटींत जबरदस्त संधी आपल्याला होती. निर्णायक क्षणी फिनिशिंग टच देता आला नाही. काहीसं बिचकत आम्ही खेळलो की काय असं वाटतं. संधी मिळाल्यावर तुटून पडायला पाहिजे ते जमलं नाही. केपटाऊन आणि सेंच्युरियन दोन्ही कसोटी सामन्यात वर्चस्व गाजवायची संधी आपल्याला नक्कीच होती. कधी थोड्या स्वैर गोलंदाजीनं उगाचच धावा जास्त गेल्या, ज्यामुळं आवाक्‍यात वाटणारी आघाडी वाढली तर कधी फलंदाजीत आम्ही कमी पडलो. सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकूनही पहिल्या दोन कसोटींत भारतीय संघानं दडपण ठेवले होतं, हे त्यांना कबूल करावं लागेल. 

तिसऱ्या कसोटीत आम्ही बिनधास्त आणि बेधडक खेळ करायचा पक्का विचार केला आणि मैदानात तो राबवून दाखवू शकलो. मग त्याचा काय परिणाम झाला हे तुम्ही बघितलं. मालिका आम्ही 2-1 फरकानं गमावली हे कबूल आहे. तरीही आक्रमक खेळानं एक ठसा उमटवला हे मान्य करावंच लागेल. सर्वांत जास्त ठसा आपल्या वेगवान गोलंदाजीचा उमटला. तीनही कसोटी सामन्यांत समोरच्या संघाला दोन्ही डावांत पूर्ण बाद करायचा पराक्रम आपल्या गोलंदाजांनी करून दाखवला, ज्याचा मला खूप अभिमान वाटतो. आपल्या फास्ट बॉलर्सनी केलेली धारदार आक्रमक आणि सातत्यपूर्ण गोलंदाजी हे दौऱ्याचं सर्वांत मोठं फलित मानतो मी. जसप्रीत बुमराचा कसोटी गोलंदाज म्हणून झालेला उदय मला खूप आनंद देऊन गेलाय. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघनिवडीवरून बरीच चर्चा झाली, त्याबद्दल तुला काय वाटतं? 
विराट :
माझ्यासाठी ही एकदम सरळ बाब आहे. आम्ही संघ व्यवस्थापन म्हणून कसोटी सामन्यात उतरताना फक्त सामना जिंकून देण्याकरता मैदानावर लढणारे सर्वोत्तम 11 खेळाडू कोण असतील तो एकच विचार करतो. अंदाज घेताना खेळाडूचा त्यावेळचा फॉर्म आणि सरावादरम्यान तो करत असलेला खेळ यांचा आम्ही विचार करतो. अंदाज कधी बरोबर ठरतो, तर कधी चुकतो, हे मान्य आहे. फक्त एक लक्षात घ्या, की संघाबाहेरच्या सगळ्यांचे विचार हे सामन्यानंतरचे 'मागे वळून बघताना'चे असतात. प्रत्यक्ष सामन्यात उतरताना आम्हाला सिंहावलोकनाची संधी नसते. योग्य वाटेल त्याचा प्रामाणिकपणे विचार करून तत्क्षणी निर्णय घ्यावे लागतात. 

अजिंक्‍य रहाणेला बाहेर ठेवून रोहित शर्माला खेळवताना तेच घडलं. दौऱ्यावर येण्याअगोदरच्या सामन्यातला रोहितचा फॉर्म फारच जबरदस्त होता. सरावादरम्यान तो फॉर्म टिकून असल्याचं आम्हाला जाणवत होतं. दुर्दैवाने रोहितला अपेक्षित ठसा दोन कसोटी सामन्यांत उमटवता आला नाही आणि संधी मिळाल्यावर तिसऱ्या कसोटीत अजिंक्‍यनं ठसा उमटवला. लगेच सगळे संघनिवडीवरून बोलू लागले. डर्बनच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अजिंक्‍यनं झकास फलंदाजी केली; पण ती लय त्याला पुढच्या चार सामन्यांत राखता आली नाही; पण त्याबद्दल कोणी जास्त बोललं नाही. 

हार्दिक पंड्याचं बघा. तो संघात आल्यापासून एक प्रकारचा तोल संघात आलाय. गोलंदाजीत त्यानं सुधारणा केली आहे, तसंच त्याच्या फलंदाजीतली गुणवत्ताही बघायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणात तो मोठी जमेची बाजू आहे. कामगिरीत सातत्य अजून दिसत नाहीये, हे मान्य आहे. त्याकरता हार्दिकच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जम बसल्यावर आणि स्वत:च्या खेळाची खरी जाण आल्यावर हार्दिक खूप भन्नाट कामगिरी करेल, याचा आम्हाला विश्‍वास आहे. त्याकरता संघ व्यवस्थापन म्हणून थोडा वेळ आम्ही संयम राखायला तयार आहोत. 

मला इतकंच सांगायचं आहे, की आम्ही संघ निवडताना फक्त आणि फक्त सर्वोत्तम 11 खेळाडू कोण याचाच विचार करतो- बाकी काही नाही. ज्याला दुर्दैवानं संघात जागा मिळत नाही, त्याच्याशी आम्ही सुसंवाद साधतो. त्या खेळाडूला संपूर्ण विश्‍वासात घेतो. मग निर्णय बरोबर आला किंवा चुकला तरी त्याला धैर्यानं सामोरं जायला आमच्यात हिंमत आहे. 

बोलण्यापेक्षा कृती करून आदर्श निर्माण करणं हाच मार्ग विराट कोहलीला सोपा वाटतो ना? 
विराट :
कष्ट करणं आपल्या हाती असतं, ही सरळ साधी गोष्ट. मी आजच नाही, तर अगदी रोज योजना आखलेली मेहनत मनापासून करतो. मधल्या काळात विश्रांतीची गरज म्हणून आणि नंतर माझ्या लग्नाकरता मी क्रिकेटपासून लांब होतो. त्या काळातही माझी तंदुरुस्ती राखायची मेहनत थांबली नव्हती. अगदी खरं सांगायचं, तर तंदुरुस्ती राखायला व्यायाम करणं आणि योग्य आहार पाळणं ही आता माझ्याकरता मेहनतीचं गोष्ट नव्हे, तर ती माझी जीवनपद्धती बनली आहे. ज्याला इंग्लिशमध्ये 'वे ऑफ लाइफ' म्हटलं जातं. शिस्तपालन मी करतो- कारण त्याचा फायदा दुसऱ्या कोणाला नाही, तर मलाच होणार आहे हे मी जाणतो. 

खेळाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर पदार्पणापासून ते आतापर्यंत तुम्ही जवळपास माझ्या सगळ्या सामन्यांना हजर होता. मला सांगा, नुसता खेळाडू म्हणून संघात असताना आणि कर्णधार झाल्यावर माझ्या वृत्तीमध्ये काही फरक पडलाय का? मैदानात पाऊल ठेवण्याअगोदर मी जोमानं तयारी करतो आणि मैदानात पाऊल ठेवल्यावर 100 टक्के प्रयत्न करतो. यश मिळेल का अपयश येईल याचा विचार माझ्या मनाला शिवत नाही. फिल्डिंग करताना प्रत्येक चेंडू माझ्याकडेच येईल, या विचारानं मी मैदानात खबरदार राहण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजी करताना प्रत्येक चेंडूवर धाव कशी काढता येईल, याचा विचार करतो. 

बोलून काही होत नाही हो! कृतीतूनच होते. जी गोष्ट बडबड करून साध्य होत नाही, ती प्रत्यक्ष करून दाखवून समोरच्याला पटकन्‌ आणि कायमची समजते. मी भारतीय संघात दाखल झालो, तेव्हा संघातल्या ज्येष्ठ खेळाडूंच्या कार्यपद्धती बघून शिकलो. आता संघाचं नेतृत्व करत असताना मी बोलून नव्हे, तर कृतीतून आदर्श निर्माण करायचा मार्ग अवलंबतो आहे आणि मला त्यात विशेष काहीच वाटत नाही. माझं काम आणि जबाबदारी आहे ती. 

एकदिवसीय सामन्यात तू आणि धोनी ज्या प्रकारे एकत्र काम करता ते बघून बरं वाटतं... 
विराट :
काही महिन्यांपूर्वी याच धोनीवर लोक टीका करून तो अजून मर्यादित षटकांच्या संघात कसा म्हणून प्रश्‍न विचारत होते. आता काय म्हणाल? महेंद्रसिंह धोनीचं संघातलं स्थान आणि त्याच्याबद्दल आम्हा सगळ्यांना असलेला आदर बाहेरच्या लोकांना कळणार नाही. तोच एक असा खेळाडू आहे, जो संघ फलंदाजी करताना अडचणीत आला, तर डोक्‍यावर बर्फ ठेवल्याप्रमाणं खेळून मार्ग शोधतो. धोनी असा विकेटकीपर आहे जो गोलंदाजांना अचूक मार्गदर्शन करतो आणि धोनी असा खेळाडू आहे जो मला अत्यंत नि:स्वार्थीपणे सल्ला देतो. अजून काय सांगू माहीभाईबद्दल? 

तुझा माध्यमांवर राग का आहे? 
विराट :
राग नाही हो माझा. मी तर पत्रकार त्यांच्या बातम्यांत काय लिहितात हे वाचतही नाही. वेळच नसतो माझ्याकरता त्यासाठी. फक्त पत्रकार परिषदेत कोणी अनावश्‍यक उलट प्रश्‍न विचारला, की मला राग येतो. माझं आत-बाहेर काही नसतं. पटलं नाही तर मी तिथंच उत्तर देतो. क्रिकेट बाहेरून दिसतं तेवढं सोपं नसतं. सामना संपल्यावर टिप्पणी करताना 'असं केलं असतं, तर तसं झालं असतं,' हे म्हणणं सोपं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दडपणाखाली सर्वोत्तम निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा करायची हिंमत ठेवावी लागते. कसोटी क्रिकेट मला सर्वांत का भावतं, याला कारण आहे. एकदिवसीय सामन्यात 'रात गयी बात गयी' असं असतं. सामना संपला, की विचार करायला लागत नाही. कसोटी सामना चालू असताना सामन्याअगोदरचे दोन दिवस आणि सामन्याचे पाच दिवस डोक्‍यात सतत विचार चालूच असतात.

डोक्‍याचा कॉम्प्युटर बंद करता येत नाही. पाच दिवस विविध प्रश्‍न प्रतिस्पर्धी तुम्हाला विचारत असतात- ज्याला तुम्ही तडकाफडकी उत्तरं द्यायची असतात. कसोटी मालिका संपल्यावर कल्पना येणार नाही, इतकं थकून जायला होतं. मला कसोटी क्रिकेट सर्वांत जास्त आवडण्याचं, हेच कारण असेल. म्हणून अनावश्‍यक बोचरे प्रश्‍न कसोटी सामन्यानंतर विचारले गेले, की त्रास होतो. 

एक नक्की सांगतो, आम्ही कधीच कोणा खेळाडूला झुकतं माप द्यायचा किंवा कोणावर अन्याय करायचा विचार करूच शकत नाही. मग अशा वेळी संघाला अपयश आलं असताना कोणी मूळ कारण न समजून घेता टीका करतं, तेव्हा चिडायला होतं. रोज आरशात बघून मी प्रामाणिकपणे जगतो आहे, हे स्वत:च्या डोळ्यांत बघून सांगू शकतो, म्हणून मला शांत झोप लागते. मी बाकी कोणाला नाही- 'त्याला' उत्तर द्यायला बांधील आहे. (आकाशाकडे बघत) त्याचं लक्ष असतं. त्याचा स्कॅनर 24 तास चालू असतो. 

आता महत्त्वाचा दौरा इंग्लंडचा असेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केलेल्या कोणत्या चुका टाळल्या, की यशाचा मार्ग सापडेल असं तुला वाटतं? 
विराट :
मी फिटनेस आणि सरावाला जितकं महत्त्व देतो, तितकंच महत्त्व 'व्हिजुअलायझेशन'ला देतो. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात प्रतिस्पर्धी मला कुठं जाळ्यात पकडायचा प्रयत्न करतील आणि उत्तर द्यायला मी कशी फलंदाजी करणार, हे मी सतत मनात तपासून बघत होतो. त्याचा मला खूप फायदा झाला आहे. तुम्हाला सांगून खोटं वाटेल; पण माझी इंग्लंड दौऱ्याची मानसिक तयारी सुरू झाली आहे. त्या दौऱ्यात काय होऊ शकतं आणि त्याकरता माझ्याकडं काय उत्तरं तयार असायला पाहिजेत, याचं व्हिजुअलायझेशन मी करायला लागलो आहे. संपूर्ण संघानं पेटून उठून खेळायला पाहिजे. जोरदार तयारी करायची योजना आखायची आणि मग जास्त विचार न करता तुटून पडायचं. आम्ही जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात सगळेच्या सगळे पाच दिवस जी एकाग्रता राखली ती राखता यायला पाहिजे. संधी मिळाली, की समोरच्या संघावरचं दडपण सातत्यपूर्ण चांगला खेळ करून वाढवत नेलं, की कसोटी सामना जिंकायला मार्ग सापडतो. मला हे सगळं इंग्लंड दौऱ्यात करून दाखवायचं आहे. कधी एकदा इंग्लंड दौरा चालू होतोय, असं झालंय मला. 

गेल्या दोन महिन्यांबद्दल काय सांगशील? 
विराट :
केवळ कमाल. फार वेगळे सुंदर दिवस आहेत हे. देशाकरता खेळायचं स्वप्न साकारलं आहे आणि मला समंजस जीवन साथीदार लाभला आहे. खरं सांगू?...मी देवाचे रोज आभार मानतो. नुसतं क्रिकेटर म्हणून नाही, तर मला इतकं सुंदर जीवन जगायची संधी त्यानं दिली आहे म्हणून. प्रत्येक दिवस माझ्याकरता एक वरदान आहे. 

असं म्हणून विराटनं मला हळूच आलिंगन दिलं आणि कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे भारतीय संघातून खेळत असतानाचे शर्ट संदेश लिहून आणि सही करून दिले आणि ''जिम जाना है सर... आयपीएलमे मिलते है,'' असं म्हणत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com