'छोटी छोटीसी बात' (अभिजित पानसे)

अभिजित पानसे
रविवार, 4 मार्च 2018

नातं यशस्वी करायला खूप मोठमोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. नातं जगायला, ते आनंदी, हलकंफुलकं करायला लागतात त्या छोट्याछोट्या गोष्टी. 'लिट्‌ल थिंग्ज' ही वेब सिरीज याच विषयावर छान भाष्य करते. प्रेमात पडलेल्या काव्याची आणि ध्रुवची ही गोष्ट आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन जाते. 

नातं यशस्वी करायला खूप मोठमोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. नातं जगायला, ते आनंदी, हलकंफुलकं करायला लागतात त्या छोट्याछोट्या गोष्टी. 'लिट्‌ल थिंग्ज' ही वेब सिरीज याच विषयावर छान भाष्य करते. प्रेमात पडलेल्या काव्याची आणि ध्रुवची ही गोष्ट आपल्याला नवा दृष्टिकोन देऊन जाते. 

नातं यशस्वी करायला खूप मोठमोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. नातं जगायला, ते आनंदी, हलकंफुलकं करायला लागतात त्या छोट्याछोट्या गोष्टी. 'लिट्‌ल थिंग्ज' ही वेब सिरीज याच विषयावर छान भाष्य करते. 'केमिस्ट्री' हा शब्द चित्रपटांमधल्या नायक-नायिकेचं वर्णन करताना नेहमी वापरला जातो. 'केमिस्ट्री' म्हणजे दोन प्रमुख पात्रांचं एकमेकांसोबत असलेलं ट्युनिंग, एकमेकांना दाद देणं, कॉम्प्लिमेंट करणं आणि ती 'केमिस्ट्री' पडद्यावर बघताना प्रेक्षकांना ती भावून त्यांच्याकडून दाद येणं. अशी अप्रतिम, जबरदस्त, लाजवाब 'केमिस्ट्री' बघायची असेल, तर 'लिट्‌ल थिंग्ज' आवर्जून बघावी. अशी अप्रतिम 'केमिस्ट्री', 'ट्युनिंग' खूप दिवसांनी बघायला मिळालं. 

एक मराठी मुलगी काव्या कुलकर्णी आणि दिल्लीचा मुलगा ध्रुव सेहगल हे सोबत राहणारं जोडपं. रोजच्या हलक्‍याफुलक्‍या क्षणांची; वाद, राग, गंमती, प्रेम, उत्स्फूर्तता या गोष्टींच्या अनुभवांची लज्जत घेणारं. अर्थातच एकमेकांच्या 'प्रेमात' पडलेलं. परफेक्‍ट नाही; पम 'कंपॅटिबल' कपल. जगताना कुठंही कृत्रिमता नाही. या काव्याची आणि ध्रुवची ही गोष्ट. मुळात या वेब सीरीजला ठराविक अशी कथाच नाही. वेगवेगळ्या प्रसंगांची, नात्यातले मर्मबंध उलगडून दाखवणारी एक मालिका. फक्त बघत राहावी आणि अनुभवत राहावी अशी. तरुण मनाचा कोणत्याही वयाचा प्रेक्षक या मालिकेशी 'रिलेट' होईल. 

यातला प्रत्येक भाग मनाला आनंद देणारा, प्रफुल्लित करणारा आहे. कुठलीही गोष्ट थोपण्याचा वा पुरस्कार करण्याचा अट्टहास यात नाही. कारण नातं तयार होतंच मुळात छोट्याछोट्या गोष्टींपासून. नवरा, बॉय फ्रेंड, पार्टनर कसा असावा, नातं कसं असावं असं सांगत, छोट्याछोट्या गोष्टी नातं किती टवटवीत ठेवतात हे 'लिट्‌ल थिंग्ज' सांगते. काव्या आणि ध्रुव 'लिव्ह इन'मध्ये राहतायत, की लग्न केलंय ते स्पष्ट नाही आणि त्याची गरज आहेच कुठं? लग्न वा प्रेमाचं नातं या टॅगखाली अडकण्यापेक्षा दोघांमध्ये 'कंपॅटिबिलिटी' असणं महत्त्वाचं असतं, हेच तर या सिरीजमधून अधोरेखित करायचं आहे. 

यात मिथिला पारकरनं साकारलेली काव्या प्रेमात पाडतेच; पण या सिरीजचा खरा किंग आहे तो ध्रुव सेहगल! पार्टनर कसा असावा तो ध्रुवसारखा. 'तो तिला समजून घेतो' या अगदी चोथा झालेल्या वाक्‍याच्या पलीकडं त्याचं व्यक्तिमत्त्व. तो उगाच जड, अतिपरिपक्व, बोअर नाही. मुळात दोघंही अल्लड आणि परिपक्वसुद्धा आहेत. तो आधीच्या प्रेम प्रकरणावरसुद्धा तिच्याशी गंमतीनं बोलतो. पूर्णत: कूल मुलगा; पण कधी चिडतोही. त्याची प्रत्येक ऍक्‍शन, देहबोली अगदी कूल आहे. तो मोकळ्या मनाचा आहे. गणितात पीएचडी करतोय आणि त्याच भाषेत तो तिला बरेचदा व्यावहारिक बौद्धिक देत असतो. जे मजेशीर वाटतं. 

मिथिला पालकर आता सगळ्यांनाच माहिती आहे. उत्स्फूर्तता हे तिच्या अभिनयाचं मुख्य वैशिष्ट्य. तिचा अभिनय पारंपरिक, साचेबद्ध प्रकारचा नाही. 

सुसंगत शब्दफेक, अत्यंत भावदर्शी चेहरा या बळावर तिनं ही वेब सीरीज आणि काव्या जिवंत केलीये. तिचा आवाज, शब्दफेक हा तिचा एक जबरदस्त 'प्लस पॉइंट' आहे. ऑन स्क्रीन दोघंही एकमेकांना अप्रतिमरीत्या मॅच झाले आहेत. तो सावळा, उंच, मजबूत बांधा, चष्मा असलेला. ती नाजूक, कुरळ्या केसांची. ध्रुव आणि मिथिला कुठंही ओव्हर ऍक्‍टिंग करत नाहीत. 

या सिरीजमध्ये लॉजिकहीन 'ट्‌विस्ट्‌स अँड टर्न्स' नाहीत, टुकार मेलोड्रामा नाही. ध्रुवची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव सेहगल यानंच या सिरीजचं लेखन केलय. या दोघांचे एकमेकांसोबतचे व्हिडिओज यापूर्वीच लोकप्रिय झाले आहेत. या सिरीजचे पाच भाग आहेत. सगळे भाग अगदी पंधरा-सोळा मिनिटांचेच; पण प्रत्येक भाग हा डोळ्यांना, मनाला ट्रीट आहे. यातल्या एका भागात काव्याला तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडचं लग्न ठरलंय हे कळल्यावर ती काहीशी अस्वस्थ होते. तेव्हा ध्रुव तिला त्याच्या गणिताच्या भाषेत ज्या प्रकारे समजावतो, तो संपूर्ण भाग, संवाद अगदी लाजवाब! कधी तोही नाराज होतो तेव्हा ती त्याचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करते. कधी दोघांचाही दिवस वाईट जातो, तेव्हा दोघंही एकमेकांना 'चिअर अप' करतात. 

शेवटचा एपिसोड तर अगदी अप्रतिम, मनाला स्पर्श करणारा आहे. शहराबाहेर तळ्याकाठी त्या दोघांचा संवाद... वाह! मस्ट वॉच थिंग! या दोघांकडून 

इतकं सहज, नैसर्गिक काम करून घेण्याचं श्रेय दिग्दर्शक अजय भुयानचं. यात ध्रुवच्या मित्राची भूमिका करणारा वीर राजवंतसिंग हाच कास्टिंग डिरेक्‍टर आहे. तो स्वत:ही इंटरनेटवरचं एक मोठं प्रस्थ आहे. या सिरीजचे पाचही भाग शांतपणे बघताना, प्रत्येक भागाच्या शेवटी चेहऱ्यावर एक आनंद, स्मित असतं. त्यावेळी बॅकग्राऊंडला ऐकू येत असतं 'लिट्‌ल थिंग्ज'चं थीम सॉंग. शेवटी वाजणारं हे छोटंसं गाणं अप्रतिम आहे. प्रेमात पडू इच्छिणाऱ्यांनी, प्रेमात पडलेल्यानी, नात्यात वाद होत असलेल्यांनी सगळ्यांनी ही सीरीज बघावीच! प्रेमाचं, नात्याचं नवं परिमाण गवसेल. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi Features Web Series Abhijit Panse