गोष्ट एका आघाताची (भाग्यश्री भोसेकर- बीडकर)

भाग्यश्री भोसेकर- बीडकर
रविवार, 11 मार्च 2018

'द स्कूल बॅग' ही शॉर्टफिल्म दहशतवाद या विषयावर अतिशय संवेदनशीलपणे भाष्य करते. फारूक या छोट्याशा मुलाची गोष्ट सुन्न करून टाकते. अतिशय कमी कालावधीत नेमका परिणाम साधणारी ही शॉर्टफिल्म बघावी अशीच. 

'द स्कूल बॅग' ही शॉर्टफिल्म दहशतवाद या विषयावर अतिशय संवेदनशीलपणे भाष्य करते. फारूक या छोट्याशा मुलाची गोष्ट सुन्न करून टाकते. अतिशय कमी कालावधीत नेमका परिणाम साधणारी ही शॉर्टफिल्म बघावी अशीच. 

जगभरात घडणारा दहशतवाद असो, की सध्या सीरियात सुरू असलेलं युद्ध आणि रक्तपात असो- हे सगळं पाहिलं, की आपला जीव हळहळतो. हे सगळं संपावं म्हणून नकळत आपले हात प्रार्थनेसाठी जोडले जातात. हे सहन करणाऱ्या लोकांसाठी नकळत आपले डोळे पाणावतात. नव्वदीच्या दशकापासून दहशतवाद हा तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. 'द स्कूल बॅग' ही शॉर्टफिल्म दहशतवाद याच विषयावर अगदी संवेदनशीलपणे भाष्य करते. 

कथा घडते पाकिस्तानमध्ये पेशावर या शहरात. फारूक हा शाळेत जाणारा मुलगा. फारूक इतर चार मुलांसारखाच आहे. शाळेत मस्ती करणारा, खोडकर. फारुकसाठी त्याची आई मैत्रीण आहे. तिच्याजवळ तो मनातलं बोलू शकतो, तिच्याजवळ हट्ट करू शकतो. फारूकची आईही इतर चार आईंसारखीच. आपल्या मुलाची काळजी करणारी, प्रसंगी त्याला दटावणारी, त्याचे बालहट्ट पुरवणारी, त्याच्या आवडीची शेवयाची खीर बनवणारी. 

वाढदिवसासाठी 'मला नवीन स्कूल बॅग हवी,' असा हट्ट फारूक आपल्या आईजवळ धरतो. आपल्या लेकाला कसं खूश करायचं, हे कोणत्याही आईला उपजत माहीत असतंच; तसंच फारूकची आई फारूकचा हट्ट कसा पुरवायचा याचा विचार करतेय. फारूक आणि त्याची आई या दोघांच्या संभाषणात फारूकच्या वडिलांचा उल्लेख होतो, त्यावरून समजतं, की त्याचे वडील पाकिस्तान सैन्यदलात काम करतात. ते कधीकधी सुट्टी काढून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी येतात. हे सगळं पाहताना, वाचताना वाटतंय, की नेहमीचीच 

तर कथा आहे की... यात काय विशेष? आणि याचा दहशतवादाशी काय संबंध? खरं आहे. आत्तापर्यंत वर्णन केलेली कथा खरंच नेहमीचीच आहे. कथा वळण घेते ती शेवटच्या तीन मिनिटांत... ते धक्कादायक वळण काय? शॉर्टफिल्मला 'द स्कूल बॅग' असं नाव देण्यामागचं प्रयोजन काय?... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ही शॉर्टफिल्म पाहाच. 

पंधरा मिनिटांची ही शॉर्टफिल्म पाकिस्तानमध्ये 16 डिसेंम्बर 2014 रोजी घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे.2017 मध्ये आलेली ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केलीय धीरज जिंदाल यांनी, तर मूळ कथा अन्शुल अग्रवाल यांची आहे. कथेला साजेसं संगीत दिलंय युसूफ हुसेन यांनी. कथेची उत्तम बैठक, कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन यामुळं ही शॉर्टफिल्म अवघ्या एक वर्षात 11 लाख लोकांनी पाहिली आणि तितकीच लोकप्रियही झाली. 

फारूक या छोट्या मुलाची भूमिका निभावलीय सरताज या बालकलाकारानं. 'आज हमने खूब गेम्स खेले, केक खाया' हे सांगताना फारूकचे चमकणारे डोळे, उद्या वाढदिवशी वडील आपल्याला 'तातारा पार्क'मध्ये फिरायला घेऊन जाणार आहेत हे समजल्यावर फारूकचा चेहऱ्यावर आपसूक दिसणारा आनंद आणि 'मला नवीन दप्तर (स्कूल बॅग) हवी; नाही तर मी उद्या शाळेत जाणार नाही,' असं म्हणून गाल फुगवून बसणारा फारूक हे सारं सरताजनं पडद्यावर खूप छान साकारलं आहे. फारूकच्या आईची भूमिका केलीय रसिका दुगल या गुणी अभिनेत्रीनं. 'अज्ञात', 'क्षय', 'मंटो' अशा चित्रपटांत झळकलेल्या आणि बऱ्याच वेब सिरीज आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलेल्या रसिकानं ही भूमिकाही ताकदीनं प्रेक्षकांसमोर मांडली आहे. मुलाचा हट्ट पाहून गालातल्या गालात हसणारी, त्याच्या आवडीची शेवयाची खीर बनवताना आज आपला मुलगा शाळेत किती खूश असेल याबद्दल कल्पना करणाऱ्या आईची वात्सल्यमूर्ती रसिकानं अक्षरशः डोळ्यांसमोर उभी केलीय. शेवटच्या काही मिनिटांत जेव्हा कथा अचानक वेडीवाकडी वळणं घेते, तेव्हा अंगाचा थरकाप उडालेली, शून्य, बधीर आणि असहाय आई रसिका इतकी जबरदस्त पद्धतीनं साकारते, की अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडतंय सारं असं वाटावं. 

मिनिटभरासाठी भारत-पाकिस्तान संबंध विसरून ही शॉर्टफिल्म पाहिली, तर तिच्या शेवटी येणारी वेदना अधिक खोल खोल रूतत जाते. कारण शेवटी आई-मुलाचं नातं, आईची आपल्या अपत्याबद्दल असणारी माया सगळीकडं सारखीच. शॉर्टफिल्मच्या शेवटी 'आज आपण आपल्या मुलाला नवीन स्कूल बॅग घेऊन दिली नसती तर? तर कदाचित....' हा फारूकच्या आईच्या डोळ्यांत दिसणारा प्रश्न प्रेक्षकांनाही छळत राहतो आणि पर्यायानं ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या मनाला सुन्न करून टाकते. 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Saptarang Marathi Features Web Series The School Bag