गालिबची पत्नी (प्रदीप निफाडकर)

pradip niphadkar
pradip niphadkar

मिर्झा गालिब यांची येत्या शुक्रवारी (ता. २७ डिसेंबर) दोनशे बाविसावी जयंती आहे. इतकी वर्षं होऊनही त्यांच्या शायरीची जादू किंचितही कमी झालेली नाही. त्यांच्या शायरीवर आणि त्यांच्या जीवनावर मराठीत खूप लिहिलं गेलं; पण त्याच्या पत्नीबद्दल, त्याच्या संसाराबद्दल फार कमी प्रसिद्ध झाले आहे. गालिबच्या संसारावर प्रकाश टाकणारा हा लेख.  
                        
‘‘अहंकारी, जुगारी, मद्यपी असूनही गालिबच्या बोलांवर, फुलांवरच्या फुलपाखरांसारखा झेपावणारा माणूस तरीही त्याला वलीच (संतच) समजतो. गालिबची कविता मराठी भाषकाला अगदी अज्ञात आहे, असे नाही. महाराष्ट्रातल्या बागांमध्येही बुलबुलाचं आगमन होत असतं. त्या मनोहर पाखराचे ऐटबाज तुरे मराठी रुखवाळीतूनही (उर्दूत रुख म्हणजे त्या दिशेनं; पण मराठीत रुख म्हणजे झाड. ‘रुखवाळी’तून म्हणजे झाडीतून. काय शब्द वापरायचे शब्दप्रभू, वा!) मिरवत असतात. गालिबचे मद्यप्रशस्तीचे शेर तर न पिणाऱ्यांनाही कैफ आणतात. दैनंदिन व्यवहारात गुंतलेल्या माणसांना पौर्णिमेचा सर्वांगाने उपभोग घेण्याची संधी मिळालेली नसली, तरी त्याच्या अंगाखांद्याला चांदण्याचा स्पर्शच झाला नाही असे कसे म्हणता येईल?’’
- ग. दि. माडगूळकर

अशा शायरे आझम, महाकवी मिर्झा असदउल्ला खान गालिब ( २७ डिसेंबर १७९७ ते १५ फेब्रुवारी १८६९- ७२ वर्षं) यांच्या जन्माला आज २२२ वर्षं पूर्ण होत आहेत. गदिमा म्हणतात तसं सेतुमाधवराव पगडी, विद्याधर गोखले, श्रीपाद जोशी यांच्यापासून डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यापर्यंत साऱ्यांनी गालिबवर लिहिलं आहे; पण त्यांच्या पत्नीबद्दल स्वतंत्रपणे कुणीच लिहिलेलं नाही. जिथं गालिब कितीही प्रतिभावान असला, तरी तो दारूड्या, जुगारी अशीच चित्रं रंगवली गेली, तिथं या बाईला कोण विचारणार? त्यातही मराठीत एकूणच उर्दू शायरीबद्दल आपलेपणा नव्हता. अलीकडे तो वाढला आहे; पण पूर्वी नव्हताच. गालिबच्या पत्नीविषयीच नाही, तर त्याच्या एकूण घरादाराबद्दल संशोधन करून लिहिणारे होते, कालिदास गुप्ता रिजा; पण ते उर्दूत. त्यामुळे मराठीत या बाईविषयी फार कशाला नाहीच्या बरोबर लिखाण झालं आहे. मात्र, तिनं गालिबला सांभाळलं, याबद्दल तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. ही बाई धीराची होती, कवी पती सांभाळणारी होती, टोकाची धार्मिक होती आणि नवाबाच्या घरातून येऊन काटकसरीनं, कोंड्याचा मांडा करत संसार करणारी होती.
समरकंदहून भारतात आलेले कोकानबेग यांचा मुलगा मिर्झा अब्दुल्ला बेग दिल्लीला जन्मला. तोच गालिबचा पिता. तो अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला यांचा मुलगा आसफुद्दौला याच्याकडं होता. नंतर हैदराबादच्या नवाबाकडं, मग अलवरच्या बख्तावर सिंहाकडं. तिथं ते युद्धात मारले गेले. त्यावेळी गालिब पाच वर्षाचा होता. गालिब, त्याची आई, त्याचा भाऊ, त्याची बहीण यांची जबाबदारी काका नसरूल्ला बेग याच्यावर आली. तो ग्वाल्हेरच्या मराठ्यांचा आग्र्याचा सुभेदार होता. नसरुल्लानं मराठ्यांशी  दगाफटका केला. आग्र्याचा किल्ला इंग्रजांना देऊन चारशे घोडेस्वार आणि दरमहा १७०० रुपये पगार मिळविला. या विश्‍वासघातकी नसरूल्लाबेगचा लवकरच हत्तीवरून पडून मृत्यू झाला. त्याला मूल नव्हतं. म्हणून त्याची संपत्ती त्याचा सासरा अहमदबख्श खान याच्या संपत्तीला जोडली गेली. अहमदबख्श याला गालिबची आजी, आई, भाऊ युसूफ, बहीण, गालिबच्या तीन आत्या सांभाळाव्या लागणार होत्या. त्यानं या सगळ्यांची फसवणूक केली. हेच १८०६ वर्ष नऊ वर्षाच्या गालिबच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलं- एक दुर्दशा आणि दुसरी कविता. आयुष्यभर या पैशासाठी तो लढत राहिला. रडत राहिला. ही त्याच्या घराची ओळख एवढी पुरे.  

गालिबचा जन्म आईच्या वडिलांकडं म्हणजे ख्वाजा गुलाम हुसेन कमीनदान यांच्या घरी झाला. गालिबचं खरं नाव मुहम्मद असद्दुला खान होतं. लहानपणी गालिबला लाडानं ‘नौशा’ म्हणत. नौशा म्हणजे पती. कवितेसाठी त्यानं ‘असद’ (अर्थ सिंहसारखा साहसी) नाव घेतलं होतं आणि त्या नावानं त्याच्या काही गझला सापडतात; पण मीर अमानी नावाचा एक मिर्झा सौदा यांचा शिष्य होता, त्याचं कवितेतलं नाव असद होते, त्यामुळे गालिबनं नाव बदलून कवितेसाठी गालिब घेतलं. गालिबचा जो काका होता- नसरूल्ला बेग त्याच्या पत्नीचा भाऊ अहमदबक्ष. अहमदबक्ष यांचा धाकटा भाऊ इलाहीबक्ष होता. हा इलाहीबक्ष कवी होता. तो ‘मारूफ’ (अर्थ : स्वीकारलेला) या टोपणनावानं कविता लिही. त्याची मुलगी इज्जतनिस्सा ही गालिबची पत्नी. काही ठिकाणी इज्जतनिस्सा हे नाव गालिबच्या आईचं म्हणूनही लिहिलेलं आढळतं. म्हणून गालिबच्या पत्नीला ज्या नावानं ओळखलं जातं ते म्हणजे उमराव बेगम. गालिबचं लग्न तेराव्या वर्षी- ८ ऑगस्ट १८१० रोजी झालं. त्याला एक-दोन नव्हे, तर सात मुलं झाली; पण एकही जगलं नाही. विचार करा, एका अपत्याच्या निधनानं आपण किती शोकाकुल होतो. गालिब आणि त्याच्या पत्नीवर काय प्रलय कोसळला असेल. मग गालिबनं बायकोचा भाचा झैनुल आबिदीखान ऊर्फ आरिफला दत्तक घेतलं; पण तोही मरण पावला. त्याची दोन मुलं सांभाळण्याची जबाबदारी गालिब आणि त्याच्या पत्नीवरच येऊन पडली. आरिफची पत्नी, त्याची दोन मुलं, चार नोकर असा नऊ-दहा जणांचा संसार सुरू झाला.  

गालिबचं पत्नीवर खूप प्रेम होतं. याचे दोन पुरावे- एक म्हणजे गालिबला कितीही कर्ज झालं, तरी त्यानं बेगमला कष्ट पडू नयेत म्हणून एकही नोकर कमी केला नाही. दुसरं म्हणजे कोलकता किंवा रामपूरला तो गेला, तेव्हा मित्रांना लिहिलेल्या पत्रात पत्नीबद्दल सतत विचारणा केली आहे. ‘तिला ही आनंदाची गोष्ट सांगा, तिला माझे क्षेमकुशल कळवा,’ वगैरे त्याची वाक्यं पत्रांतून दिसतात. गालिब आणि त्याच्या पत्नीनं ५९ वर्षं एकनिष्ठेनं संसार केला. गालिबच्या ज्या कथित प्रेयसीचा उल्लेख होतो, त्याचा नीट उल्लेख कुठंही नाही. एकतर तो लग्नाआधी आग्य्रातला प्रसंग आहे. दुसरी प्रेयसी मुघलजान (डोमनी) म्हणतात, जिचा अंगरखा आजही दिल्लीच्या गालिब इंस्टिट्यूटमध्ये आहे, आणि मी तो पाहिला आहे. ती तवायफ होती असं काही ठिकाणी म्हटलं आहे; पण ते काहीजणांनी नाकारलं आहे. गालिबचं पत्नीवर किती प्रेम होतं हेच पदोपदी दिसतं. ती टोकाची धार्मिक असूनही आणि गालिब धड अस्तिक नाही, की धड नास्तिक नाही, असं असतानाही एकदाही त्यांचं भांडण झालेलं नाही. एकदा गालिब घरात आला ते डोक्यावर चपला घेऊन. इज्जतनिस्सा बेगमनं विचारलं : ‘‘हे काय?’’ गालिब म्हणाला : ‘‘काय करू बेगम, तू संपूर्ण घराला मशीद केलं आहेस. चपला कुठं ठेवाव्या हे कळतच नाही.’’

मिर्झा गालिब यांना एकदा घर बदलायचं होतं. एक घर त्यांना आवडलं. त्या घराचा दिवाणखाना त्यांना आवडला; पण आतल्या खोल्या काही त्यांना बघता आल्या नाहीत. त्यांनी घरी येऊन पत्नीला सारं सांगितलं आणि आतल्या खोल्या तू बघून ये म्हणाले. पत्नी जेव्हा परतली, तेव्हा ती म्हणाली : ‘‘अहो, त्या घराबद्दल बरंच बोललं जातं. ते घर म्हणजे एक संकट आहे.’’ मिर्झा गालिब तोंड वेडंवाकडं करून म्हणाले : ‘‘छे काहीतरीच. तुझ्यापेक्षा मोठं संकट असू शकते का?’’ अशी संसारातली नोकझोक सुरूच असायची; पण या गंमती वेगळ्या. त्या गालिबच्या मिश्किल स्वभावाला साजेशा आहेत. मात्र, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. दिवसभरात मित्रांच्या किंवा शायरांच्या कितीही कोंढाळ्यात गालिब असला, तरी एकदा घरात जाऊन तो आपल्या पत्नीची विचारपूस करत असे.  

मिर्झा गालिब आयुष्यात एकदाच मशिदीत गेले. त्याचाही किस्सा आहे. त्यांनी पत्नीला मद्यपानासाठी पैसे मागितले. बेगम म्हणाली : ‘‘मला कुरआन वाचू द्या.’’ गालिब म्हणाले : ‘‘मग त्या खुदालाच माग ना माझ्यासाठी पैसे.’’ ती म्हणाली : ‘‘तुम्हीच मागा. तो सगळ्यांचं ऐकतो. फार दयाळू आहे तो.’’  मग काय, कधीही मशिदीत न जाणारे गालिबसाहेब त्या दिवशी मशिदीत गेले. आता तिथं तीन पद्धतींनी नमाज पढतात. प्रथम सुन्नते म्हणजे प्रार्थना करणारा अल्लाजवळ काही मागतो. मग फर्ज असते. इमामसाहेब येतात आणि आयाती पढतात. मग नमाज होतो. गालिबसाहेबांनी वजू केले म्हणजे हातपाय घुतले. सुन्नते म्हणजे जे मागायचे ते मागितले. त्याचवेळी इकडं गालिब यांचे एक शिष्य गालिब यांच्या घरी गेले होते. तिथं त्यांना कळलं, की कधीही मशिदीत न जाणारे गालिब कशासाठी गेले आहेत. मग त्या शिष्यानं ती गोष्ट घेतली आणि तोही मशिदीत गेला. सुन्नते पढून गालिब आता इमामसाहेबांची फर्ज ऐकणार होते; पण या शिष्यानं कोटात लपवलेली ती गोष्ट लांबून दाखविली. गालिब निघाले. इमाम म्हणाले : ‘‘गालिब फर्ज अदा करणार नाही का?’’ गालिब म्हणाले : ‘‘वो बडा रहेमदिल है, उसने मेरी सुन्नत सुन ली. अब फर्ज की जरूरत क्या?’’ घरी येऊन त्यांनी पत्नीला हे सारं घडलेलं गंमतीनं सांगितलंही.   
दिल्लीतल्या हकिमोंवाली मशिदीच्याजवळ मोहम्मद खान यांचं मोठं घर होते. कारण मोहम्मद खान त्यावेळचे दिल्लीतले एक नंबरचे युनानी डॉक्टर होते. त्यांच्याच घरात गालिब भाड्यानं राहत होता. त्यामुळे लोक त्यांना तिथं बसून मद्यपान करू नका सांगायचे. त्यामुळे तर शायरसाहेबांनी लिहिलं :
जाहिद, शराब पीने दे मस्जिद में बैठकर
या वो जगह बता, जहाँ खुदा न हो.  


गालिबचं एकट्याचचं नाही, तर उमराव बेगमचेही गालिबवर खूप प्रेम होतं. नवाबाची मुलगी असूनही कर्जाच्या खाईत बुडालेल्या गालिबबरोबर ती प्रत्येक परिस्थितीत ठाम राहिली. गालिब सत्तावन्नाव्या वर्षी (इसवीसन १८५४) राजकवी झाला. तोपर्यंत हलाखीचेच दिवस होते. राजकवी झाल्यानंतरही फार चांगले दिवस दोनच वर्षं होते. तेव्हा त्याला ११६ रुपये भत्ता मिळत होता. त्याआधी अख्खं आयुष्य साडेबासष्ट रुपये भत्त्यात गेले. अर्थात तेव्हा एका रुपयात चाळीस शेर गहू आणि चार शेर तूप होतं म्हणा. तरीही गालिबचं जीवन बघता, त्याचे शौक बघता आणि घरातली माणसं, येणाऱ्यांचा राबता बघता, त्याला ते अपुरंच होतं.   

गालिब खाण्याबाबत चोखंदळ होता. जुन्या आणि लांब तांदळाचा भात, अर्धा शेर मांस, पोळी, फळं, पावशेर मद्य हा त्याचा आहार होता. त्याला कारलं, चण्याची डाळ तर एवढी आवडे, की प्रत्येक पदार्थात तो ती टाकून घेई. त्याला जेवणानंतर पान आवडेच. सन १८६६ नंतर तो सकाळी खडीसाखर, सात बदामांचा अर्क पाण्यात मिसळून घेई. दुपारी एक शेर मांसाचं दाट सूप, सायंकाळी तीन तळलेले कबाब. सूर्यास्तानंतर मद्य, जवसाची भाकरी, लिंबाच्या पानाचा रस पीत असे. मद्याचा जळजळीतपणा कमी करण्यासाठी तो गुलाबपाणी ओतायचा. देशी मद्य त्याला आवडत नसे. तो ओल्ड टॉम किंवा लिकर पीत असे. देशी दारूनं काय होतं हे सांगताना तो लिहितो : ‘‘त्यानं मी कबाबासारखा भाजला गेलो आहे.’’ मोठ्या चवीनं तो जेवत असे. त्याच्या जेवणाचे सारे नखरे त्याची पत्नी आनंदानं झेलायची.  

गालिबवर टीका होत होती, त्याला जुगाराबाबतच्या कायद्यात अडकवून अटक झाली, तेव्हा या महिलेनं सारं कसं धीरानं सांभाळलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पक्षाघात झाल्यानं त्यानं सन १८६७ पासून लिहिणं सोडलं. तो १५ फेब्रुवारी १८६९ रोजी अल्लाला प्यारा झाला. त्यानंतर या मानी महिलेला पेन्शन मिळायला लागली; पण ती घ्यायला सरकारी कचेरीत जावं लागणार होतं. त्याला तिचा इन्कार होता. तिनं तसं रामपूरच्या नबाबाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तिचं वाक्य आहे : ‘माझ्या पतीच्या इभ्रतीला ते शोभणार नाही. उपाशी मरेन; पण कचेरीत जाऊन पेन्शन घेणार नाही.’’  गालिबच्या निधनाला वर्ष होण्यास अवघे ११ दिवस बाकी होते, तेव्हा या पतिव्रतेनं प्राण सोडले. ती तारीख होती, ४ फेब्रुवारी १८७०. असं या बेगमचं आपल्या शायरसाहेबांवर प्रेम होतं. तिच्याविषयी अजून संशोधन व्हायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com