नशिबाच्या धावा! (मोहन देशमुख)

मोहन देशमुख
रविवार, 1 डिसेंबर 2019

शेवटी ठरल्यादिवशी कर्णधाराचं आपल्या सहकाऱ्यांबरोबर आगमन झालं. साहेबांनी सगळ्यांची ओळख करून दिली. सगळ्यात शेवटी अजयची ओळख करून देण्यात आली. कर्णधारानं अजयकडे पाहिलं आणि ‘‘अरे, अजय तू इथं?’’असं आश्‍चर्यानं विचारत त्याला मिठी मारली...

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा क्रिकेटचा एकदिवसीय सामना मुंबईत सुरू होता. त्या दिवशी सर्व मुंबईकर क्रिकेटरसिक सामन्यामध्येच दंग होते. अनेक ऑफिसेसमध्ये क्रिकेटचंच वातावरण होतं. साहेबापासून शिपायापर्यंत प्रत्येक जण टीव्हीवर किंवा मोबाईलवर मॅच पाहण्यात किंवा कॉमेंट्री ऐकण्यात दंग होता.

शेवटी ठरल्यादिवशी कर्णधाराचं आपल्या सहकाऱ्यांबरोबर आगमन झालं. साहेबांनी सगळ्यांची ओळख करून दिली. सगळ्यात शेवटी अजयची ओळख करून देण्यात आली. कर्णधारानं अजयकडे पाहिलं आणि ‘‘अरे, अजय तू इथं?’’असं आश्‍चर्यानं विचारत त्याला मिठी मारली...

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा क्रिकेटचा एकदिवसीय सामना मुंबईत सुरू होता. त्या दिवशी सर्व मुंबईकर क्रिकेटरसिक सामन्यामध्येच दंग होते. अनेक ऑफिसेसमध्ये क्रिकेटचंच वातावरण होतं. साहेबापासून शिपायापर्यंत प्रत्येक जण टीव्हीवर किंवा मोबाईलवर मॅच पाहण्यात किंवा कॉमेंट्री ऐकण्यात दंग होता.

असंच एक चर्चगेट भागातलं सरकारी ऑफिस. हे ऑफिसही याला अपवाद नव्हते. साहेबच क्रिकेटप्रेमी असल्यामुळे कर्मचारीवर्गही मॅच पाहण्यात गुंग होता. प्रत्येकजण काही ना काही कॉमेंट्‌स करत होता. साहेबांनी काही कॉमेंट केल्यास सर्वजण हसत होते.
आपण ऑफिसमध्ये आहोत आणि ऑफिसमधलं काम करणं हे आपलं प्रथमकर्तव्य आहे हे कुणाच्याच गावीही नव्हतं.
अशा वेळी एक ग्राहक त्याच्या काही तरी महत्त्वाच्या कामासाठी ऑफिसात आला; पण त्याची दखल कुणीच घेईना. ‘उद्या या’ असं त्या ग्राहकाला सांगण्यात आलं; पण त्याला कामाची तातडी असल्यामुळे तो साहेबांकडे गेला.
‘काय कटकट आहे’ अशा अर्थाचे भाव साहेबांच्याही चेहऱ्यावर उमटले. मात्र, त्या ग्राहकाचं काम करायला त्यांना ‘नाही’ही म्हणता येईना. साहेबांना एकदम अजय भोपळे या कर्मचाऱ्याची
आठवण झाली.

अजय हा अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा आणि कर्तव्याची जाणीव असलेला कर्मचारी होता. तो एकटाच क्रिकेट मॅच पाहण्याच्या भानगडीत न पडता स्वतःचं काम मन लावून करत असे. साहेबांनी त्या ग्राहकाला अजयकडे पाठवलं. अजयनं त्या माणसाचं काम तत्परतेनं आणि हसतमुखानं करून दिलं. काम झाल्यामुळे तो माणूस आनंदित झाला. तो माणूस समाधानी झाल्याचं पाहून अजयलाही आनंद झाला. त्याच्या समाधानातच अजयचाही आनंद दडलेला होता.

एव्हाना संध्याकाळ होत आली होती व मॅचही आता उत्कंठापूर्ण टप्प्यावर होती. काही क्षणांतच ऑफिसात एकच कल्लोळ उडाला. कारण, मॅच भारतानं जिंकली होती. तो आनंद साजरा करण्यासाठी ऑफिसात चहा मागवण्यात आला आणि चहा घेताना एकाच्या डोक्‍यात कल्पना आली, की टीम इंडियाचा कर्णधार मुंबईचाच आहे तर मग त्याचा आपल्या ऑफिसतर्फे सत्कार करायला काय हरकत आहे? ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली.
अजयला कुणीतरी सहज विचारलं :‘‘काय अजय, तुमचं काय मत आहे? आपण कर्णधाराचा सत्कार करायला हवा ना?’’
‘‘अरे, त्याला काय विचारता? त्यानं कधी क्रिकेटची मॅच पाहिली तरी असेल का? त्याला क्रिकेटमधलं काय कळतंय?’’ एक जण म्हणाला.
‘‘तरीही अजय सर, तुमचं काय मत आहे?’’ एका ज्युनिअरनं विचारलं.
‘‘कॅप्टनला रविवारी ऑफिसात बोलवा. त्याच्या सत्कारात ऑफिसच्या कामाचा वेळ वाया जायला नको,’’ अजय म्हणाला.
यावर सगळ्यांनीच त्याची टिंगल केली. सुटीचा दिवस कोण वाया घालवणार? तेव्हा ऑफिसच्या दिवशीच सत्काराचा घाट घालण्याचं ठरलं.
स्वतः साहेब निमंत्रण घेऊन कर्णधाराच्या घरी गेले. त्यानं चार दिवसांनंतर दुपारी दोन वाजता ऑफिसात येण्याचं कबूल केलं. सगळ्या ऑफिसात चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण पसरलं. ते चार दिवस ऑफिसच्या कामात कुणाचंच लक्ष नव्हतं. लोकांची कामं खोळंबलेली होती त्याचं कुणालाच काहीही वाटत नव्हतं.
शेवटी ठरल्यादिवशी कर्णधाराचं आपल्या सहकाऱ्यांबरोबर आगमन झालं. साहेबांनी सगळ्यांची ओळख करून दिली. सगळ्यात शेवटी अजयची ओळख करून देण्यात आली. कर्णधारानं अजयकडे पाहिलं आणि ‘‘अरे अजय, तू इथं?’’असं आश्‍चर्यानं विचारत त्याला मिठी मारली व तो त्याला म्हणाला ‘‘अरे, तुझा पत्ता बरेच दिवस मिळाला नाही. तुला खूप शोधलं; पण तू गायब झाला होतास.’’
मग कर्णधारानं अजयच्या आणि त्याच्या मैत्रीबद्दल व अजयच्या एकेकाळच्या क्रिकेटकौशल्याबद्दल सगळ्यांना सांगितलं.

तो म्हणाला : ‘‘अजय आणि मी कॉलेजमध्ये एकाच वर्गात होतो. आमची खूप मैत्री होती. कारण, आम्हा दोघांमध्ये एक समान धागा होता व तो म्हणजे क्रिकेटप्रेम. अजय आमच्या कॉलेजच्या टीमचा कर्णधार होता. त्याच्या खेळावर कॉलेजमधल्या मुलीही खूप खूश असायच्या! मात्र, अजय हा पहिल्यापासूनच अबोल, बुजरा असल्यामुळे तो कुणातही फारसा मिसळत नसे. त्याला मित्रही कमी होते. खेळाबरोबरच तो अभ्यासातही हुशार होता मात्र. एक शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थी म्हणून तो वर्गात ओळखला जात असे.
आमचे आंतरमहाविद्यालयीन सामने सुरू होते. आमच्या कॉलेजनं सर्व महाविद्यालयांना हरवून अजिंक्‍यपद पटकावलं होतं. अजयमधल्या कुशल कर्णधारामुळेच हे शक्य झालं होतं. अशातच रणजी करंडक सामन्यांची घोषणा झाली. विशेष आनंदाची आणि आमच्या कॉलेजसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, त्या सामन्यासाठी अजयची निवड झाली होती. आम्हा सगळ्यांनाच फार आनंद झाला. आम्ही अजयबरोबर जोरदार सराव सुरू केला.
सामने पंधरवड्यावर आले असतील आणि त्याच काळात
अजयचे वडील अचानक आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.
अजयच्या घरची आर्थिक परिस्थितीही फार चांगली नव्हती. तो वडील बरे व्हावेत म्हणून जास्तीत जास्त धडपडत होता. त्यांची सेवा करत होता. अर्थातच त्याला रणजी ट्रॉफीचा सामना खेळता येऊ शकला नाही. त्यानं नाइलाजानं तसं कळवलं. आम्हा सगळ्यांनाच फार वाईट वाटलं. मग ऐनवेळी गुणवत्तेनुसार माझा नंबर त्या सामन्यांसाठी लागला. मी रणजी करंडक खेळलो. त्यात माझं कौशल्य - जे मला अजयकडूनच शिकायला मिळालं होतं - जगाला दिसून आलं. मग मी मागं वळून पाहिलं नाही आणि आज हा मी असा तुमच्यासमोर उभा आहे,’’ कर्णधारानं सलगपणे ही कहाणी सांगितली. सगळे कर्मचारी एकचित्तानं ऐकत होते.

कर्णधार पुढं म्हणाला : ‘‘वास्तविक, माझ्या जागेवर अजय असायला हवा होता; पण त्याचं दुर्दैव, त्याची त्या वेळची नाजूक परिस्थिती आड आली. त्यानं त्याच्या क्रिकेटच्या कारकीर्दीत धावांचे अनेक डोंगर रचले; पण त्याच्या नशिबाच्या धावा कमी पडल्या! मी त्याच्यापेक्षा पात्रतेनं कमी असूनही केवळ नशिबानं साथ दिल्यामुळे मी आज टीम इंडियाचा कर्णधार म्हणून तुमच्यासमोर दिसतोय.
अजयच्या दुर्दैवानं त्याची पाठ सोडली नाही. त्याचे वडील त्या आजारात निवर्तले. नाइलाजानं त्याला कॉलेज सोडावं लागलं. त्याच्यावर घरची जबाबदारी येऊन पडली. त्याला नोकरीच्या पाठीमागं धावावं लागलं. नोकरीही लवकर मिळेना. शेवटी लांब कुठंतरी त्याला तात्पुरती नोकरी मिळाली व तो कुटुंबासह तिकडे गेला. मी काही दिवसांनी त्याचा पत्ता शोधायचा प्रयत्न केला; पण तो कुठं गेला हे त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना कुणालाच ठाऊक नव्हतं. ...आणि असा हा माझा परमप्रिय मित्र आज मला इथं अचानक भेटतोय! मला खूप खूप आनंद झाला आहे.’’
कर्णधारानं अजयविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याचं बोलणं संपवलं.
त्यानंतर जेव्हा कर्णधाराच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा तो म्हणाला : ‘‘या सत्काराचा खरा मानकरी अजय आहे.’’
आणि त्यानं अजयच्या गळ्यात हार घातला आणि त्याला मिठी मारली. अजयचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.
सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. काही जण रुमालानं हळूच डोळे पुसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saptarang mohan deshmukh write kathastu article